जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 46/2021. तक्रार नोंदणी दिनांक : 01/02/2021. तक्रार निर्णय दिनांक : 18/04/2024.
कालावधी : 03 वर्षे 02 महिने 17 दिवस
राजकुमार पिता शेषेराव खेडकर,
व्यवसाय : शेती, रा. एकुर्गा, ता. जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
पॉवर हाऊस, साळे गल्ली, लातूर, ता. जि. लातूर.
(2) सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
उपविभाग मुरुड, ता. जि. लातूर.
(3) कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
शाखा : बोपला, ता. जि. लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- महेश ए. शिंदे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- अमोल निंबुर्गे
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, मौजे एकुर्गा, ता. जि. लातूर शिवारामध्ये त्यांना गट क्र. 73 मध्ये क्षेत्र 01 हे. 89 आर. शेतजमीन आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी कुपनलिका घेतलेली आहे. त्यांनी विरुध्द पक्ष (यापुढे 'विद्युत वितरण कंपनी') यांच्याकडून विद्युत पंपाकरिता विद्युत जोडणी घेतलेली असून त्यांचा ग्राहक क्रमांक 610410424797 आहे. ते विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत देयकांचा भरणा करीत असून त्यांच्याकडे थकबाकी नाही.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, कुपनलिकेच्या पाण्यावर त्यांनी सन 2017-2018 मध्ये ऊस पिकाची लागवड केलेली होती आणि ते ऊस पीक विकास सहकारी साखर कारखाना लि. निवळी यांच्याकडे गाळपासाठी दिलेले होते.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, सन 2018-19 च्या हंगामामध्ये त्यांच्या ऊस पिकाची 22 ते 25 कांड्यापर्यंत वाढ झालेली होती. दि.21/12/2018 रोजी सकाळी 11.00 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतजमिनीतील विद्युत वितरण कंपनीचे 'ए' 'बी' स्वीच नादुरुस्त असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने अल्युमिनियम तारेने बायपास करुन (थेट तारेने जोडून) 'बी' फेजचा जम्पर निसटून 'ए' 'बी' स्वीच लोखंडी चॅनलला चिटकला आणि प्रचंड स्पार्कींग होऊन ठिणग्या पडून बांधावरील गवताने पेट घेतला. ती आग वाढून गट क्र. 73 मध्ये असणा-या ऊसाच्या पाचटाला आग लागून तक्रारकर्ता यांचे ऊस पीक, ठिबक सिंचन संच, 7 पी.व्ही.सी. पाईप, 5 आंब्याचे झाडे इ. जळून खाक झाले आणि त्यांचे एकूण रु.4,50,000/- चे नुकसान झाले.
(4) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, घटनेबद्दल कळविल्यानंतर विद्युत वितरण कंपनीतर्फे पंचनामा करण्यात आला. तसेच तहसील व पोलीस यंत्रणने पंचनामा केलेला आहे. तक्रारकर्ता यांनी घटनेपूर्वी अनेकवेळा विद्युत वितरण कंपनीस 'ए' 'बी' स्वीच दुरुस्त करण्याबद्दल लेखी व मौखिकरित्या कळविलेले होते; परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. विद्युत वितरण कंपनीचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे घटना घडलेली आहे. नुकसान भरपाई देण्याबद्दल तक्रारकर्ता यांनी लेखी अर्ज व सूचनापत्र पाठविले असता विद्युत वितरण कंपनीने दखल घेतली नाही. उक्त विवेचनाअंती सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे नमूद करुन रु.4,50,000/- नुकसान भरपाई; आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.5,000/- देण्याकरिता विद्युत वितरण कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(5) विद्युत वितरण कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी खोट्या व बनावट माहिती व कागदपत्रांच्या आधारे ग्राहक तक्रार दाखल केलेली असल्यामुळे रद्द करण्यात यावी. दि.21/12/2018 रोजी अपघात झालेला असून ग्राहक तक्रार दि.4/2/2021 रोजी दाखल केल्यामुळे मुदतबाह्य आहे. श्रध्दा टायर वर्क्स व वॉशिंग सेंटर, एकुर्गा यांचे मालक श्री. जालिंदर गणपती भालेकर यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झालेला असल्यामुळे त्यांना आवश्यक पक्षकार करणे गरजेचे आहे. विद्युत वितरण कंपनीचे कथन असे की, त्यांनी सेवा देण्यामध्ये निष्काळजीपणा केलेला नाही. तक्रारकर्ता हे व्यवसायिक हेतुने ऊसाचे पीक घेत असल्यामुळे त्यांना ग्राहक तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. ग्राहक तक्रारीतील परिच्छेदनिहाय मजकूर खोटा असल्याचे नमूद करुन ग्राहक तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विद्युत वितरण कंपनीचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ता हे विद्युत वितरण कंपनीचे 'ग्राहक' आहेत काय ? होय
(2) ग्राहक तक्रार मुदतबाह्य आहे काय ? नाही
(3) विद्युत वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या
सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? नाही
(4) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(5) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 :- विद्युत वितरण कंपनीने तक्रारकर्ता हे व्यवसायिक हेतुने ऊसाचे पीक घेत असल्यामुळे त्यांना ग्राहक तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही, अशी प्राथमिक हरकत नोंदविलेली आहे. अभिलेखावर दाखल केलेल्या वीज आकार देयकाचे अवलोकन केले असता श्री. राजाराम शेषेराव खेडकर यांचे नांवे विद्युत वितरण कंपनीकडून ग्राहक क्र. 610410424790 द्वारे शेती प्रयोजनार्थ विद्युत जोडणी घेतल्याचे दिसते. वास्तविक पाहता तक्रारकर्ता यांनी ग्राहक तक्रारीमध्ये त्यांचा विद्युत ग्राहक क्र. 610410424797 नमूद केला आहे. अभिलेखावर दाखल देयकामध्ये नमूद नांव व ग्राहक क्रमांक याबद्दल असणा-या भिन्नतेबद्दल तक्रारकर्ता यांचे स्पष्टीकरण नाही. असे असले तरी विद्युत वितरण कंपनीने त्याचे खंडन करताना अन्य स्वतंत्र पुरावा दाखल केला नसल्यामुळे तक्रारकर्ता हे शेतजमिनीतील कुपनलिकेच्या विद्युत पंपाकरिता विद्युत जोडणीचा वापर करीत आहेत, हे ग्राह्य धरावे लागेल. तक्रारकर्ता हे विद्युत पंपाद्वारे पिकांना पाणी पुरवठा करण्यात येऊन पिकापासून उत्पन्न घेत आहेत. असे दिसते की, तक्रारकर्ता हे शेतकरी आहेत आणि त्यांच्या अत्यल्प शेतजमिनीमध्ये ऊसाचे नगदी पीक घेऊन उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करतात. तक्रारकर्ता यांचा शेती व्यवसाय व शेतीजमिनीचे अत्यल्प क्षेत्र पाहता त्यांनी उपजीविका भागविण्यासाठी ऊस पीक घेतल्याचे मान्य करावे लागेल. त्यामुळे ऊस पिकास पाणी देण्यासाठी विद्युत पंपाकरिता घेतलेल्या विद्युत जोडणीमागे नफा मिळविण्याचा व्यवसायिक उद्देश असू शकतो, हे ग्राह्य धरता येत नाही. त्या अनुषंगाने विद्युत वितरण कंपनीची हरकत अमान्य करण्यात येते आणि तक्रारकर्ता त्यांचे 'ग्राहक' असल्याच्या निष्कर्षाप्रत येऊन मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
(8) मुद्दा क्र. 2 :- विद्युत वितरण कंपनीने पुढे अशी हरकत घेतली की, दि.21/12/2018 रोजी अपघात झालेला असून ग्राहक तक्रार दि.4/2/2021 रोजी दाखल केल्यामुळे मुदतबाह्य आहे. मा. राष्ट्रीय आयोगाच्या निर्देशानुसार कोरोणा रोगाच्या साथीमध्ये दि.15/3/2020 ते 28/2/2022 कालावधीमध्ये मुदत संपुष्टात येत असल्यास त्या कालावधीमध्ये सवलत दिलेली आहे. विद्युत वितरण कंपनीच्या कथनानुसार दि.20/12/2020 रोजी मुदत संपुष्टात येत असली तरी त्या कालावधीमध्ये मुदतीची सवलत असल्यामुळे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार मुदतबाह्य ठरत नाही आणि मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
(9) मुद्दा क्र. 3 ते 5 :- मुद्दा क्र. 3 ते 5 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे विवेचन एकत्रपणे करण्यात येते. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, दि.21/12/2018 रोजी सकाळी 11.00 वाजता त्यांच्या शेतजमिनीतील विद्युत वितरण कंपनीचे 'ए' 'बी' स्वीच नादुरुस्त असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने अल्युमिनियम तारेने बायपास करुन (थेट तारेने जोडून) 'बी' फेजचा जम्पर निसटून 'ए' 'बी' स्वीच लोखंडी चॅनलला चिटकला आणि प्रचंड स्पार्कींग होऊन ठिणग्या पडून त्यांचे ऊस पीक व अन्य शेती उपयुक्त साहित्य नष्ट होऊन आर्थिक नुकसान झाले. उलटपक्षी, विद्युत वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांच्या कथनांचे खंडन करुन नमूद अपघात श्रध्दा टायर वर्क्स व वॉशिंग सेंटर, एकुरगा यांचे मालक श्री. जालींदर गणपती भालेकर यांच निष्काळजीपणामुळे घडल्याचे नमूद केले. (10) असे दिसते की, तहसील व पोलीस यंत्रणेद्वारे घटनेचा पंचनामा केलेला आहे. संलग्न प्रकरणामध्ये विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, लातूर यांनी घटनेची चौकशी करुन अपघाताचा निष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदविलेला आहे.
अपघाताचा निष्कर्ष :- महावितरण कंपनी यांनी सादर केलेली अपघाताची सूचना व अहवाल, घटनास्थळ पंचनामा, अपघातस्थळाचे प्रत्यक्ष केलेले निरीक्षण व तपासणी, नोंदविलेले जबाब व चौकशी यावरुन खालीलप्रमाणे निष्कर्ष अभिप्राय आहे.
"दिनांक 21/12/2018 रोजी मौजे एकुरर्गा, ता. जि. लातूर येथील श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांचे शेतातील वीज कंपनीचे ए.बी. स्वीच नादुरुस्त आहे. त्यास वीज कंपनीने ॲल्युमिनियम तारेने बायपास केले (थेट तारेने जोडले). त्यामधील बी फेजचा जम्पर निसटून ए.बी. स्वीच लोखंडी चॅनलला चिटकला व प्रचंड स्पार्कींग होऊन ठिणग्या प्रथम 1) श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांच्या शेतात असलेल्या ऊसात व ऊसाच्या पाचटावर पडल्या. त्यामुळे आग लागली व ती आग त्यालगत इतर ऊसाचे शेतकरी 2) प्रभावती श्रीकृष्ण पाटील 3) संभाजी नामदेव नागटिळक 4) नंदकुमार विठोबा खेडकर 5) विजयकुमार विठोबा खेडकर 6) सुभद्राबाई नामदेव नागटिळक 7) राजकुमार शेषेराव खेडकर 8) समाधान बाजीराव अडसूळ 9) शिवाजी किसन नागटिळक 10) अर्जून किसन नागटिळक 11) देविदास किसन नागटिळक यांच्या ऊसास आग लागली व यामध्ये गट नं. 72, 73, 74, 76 मधील एकूण अकरा शेतक-याचा ऊस व शेतातील साहित्य जळाले. यामध्ये केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, 2010 नियम क्र. 73, 18, 12, 46 चा भंग झाला. यास वीज कंपनी पूर्णपणे जबाबदार आहे. त्यामुळे संबंधीत वरील सर्व ऊस जळीत शेतक-यास महावितरणने नुकसान भरपाई देण्याची शिफारस करण्यात येते."
(11) अभिलेखावर जालिंदर गणपतराव भालेकर यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून त्यांच्या निवेदनानुसार दि.21/12/2018 रोजी कसल्याही प्रकारची ट्रॅक्टरच्या टायरची डिक्स वर उडाल्याबद्दल घटना घडलेली नाही.
(12) उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांचे शेतातील वीज कंपनीचे 'ए' 'बी' स्वीच नादुरुस्त होते आणि त्यास वीज कंपनीने ॲल्युमिनियम तारेने बायपास केल्याचे व त्यामधील 'बी' फेजचा जम्पर निसटून 'ए' 'बी' स्वीच लोखंडी चॅनलला चिटकून निर्माण झालेल्या ठिणग्यामुळे ऊस पिकाने पेट घेतला, हे मान्य करावे लागेल.
(13) विद्युत तारेमधून ठिणग्या पडण्याची घटना श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांच्या शेतजमिनीमध्ये घडलेली आहे आणि श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांच्या ऊस पिकाने पेट घेतल्यानंतर त्याची आग अन्य शेतक-यांच्या ऊस पिकामध्ये म्हणजेच तक्रारकर्ता यांच्या ऊस पिकास लागल्याचे दिसून येते.
(14) तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर खालीलप्रमाणे न्यायनिर्णय दाखल केलेले आहेत.
मा. राष्ट्रीय आयोग :- "शांताबाई संभाजी इंगळे /विरुध्द/ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.", रिव्हीजन पिटीशन नं. 1048/2017, निर्णय दि. 13/10/2017.
मा. राष्ट्रीय आयोग :- "कर्नाटक राज्य विद्युत मंडळ /विरुध्द/ निलकांता गौडा सिध्दगौडा पाटील", रिव्हीजन पिटीशन नं. 37/2002, निर्णय दि. 11/2/2002.
मा. राष्ट्रीय आयोग :- "जगन्नाथ कृष्णाजी जमाले /विरुध्द/ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.", रिव्हीजन पिटीशन नं. 3703/2014, निर्णय दि. 8/9/2017.
मा. राष्ट्रीय आयोग :- "अंकुश /विरुध्द/ अधीक्षक अभियंता", रिव्हीजन पिटीशन नं. 2054/2015, निर्णय दि. 24/11/2015.
मा. आंध्रप्रदेश राज्य आयोग :- "ए.पी. साऊथर्न पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लि. /विरुध्द/ जी. सुब्बारामा नायडू", प्रथम अपिल क्र. 119/2008, निर्णय दि. 20/1/2009.
मा. चंदीगड राज्य आयोग :- "एच.व्ही.पी.एन. /विरुध्द/ भाग राम", अपिल क्र. 391/2006, निर्णय दि. 5/10/2006.
(15) मा. राष्ट्रीय आयोगाचा "शांताबाई संभाजी इंगळे /विरुध्द/ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि." न्यायनिर्णयामध्ये तक्रारकर्ता 'ग्राहक' नसल्याचे अधोरेखीत केले आहे. अन्य न्यायनिर्णयामध्ये विद्युत वाहिनीच्या तारांमधून निर्माण झालेल्या ठिणग्यांमुळे पिकाच्या नुकसानीस विद्युत कंपनी / मंडळास जबाबदार धरलेले आहे.
(16) प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारकर्ता हे विद्युत वितरण कंपनीकडून त्यांच्या शेतजमिनीमध्ये असणा-या कुपनलिकेच्या विद्युत पंपाकरिता विद्युत पुरवठा घेत असले आणि त्या विद्युत जोडणीकरिता ते विद्युत वितरण कंपनीचे विद्युत ग्राहक असले तरी घडलेल्या ऊस जळीत घटनेच्या अनुषंगाने विद्युत वितरण कंपनीचे कृत्य सेवेतील त्रुटी ठरेल काय ? हा मुद्दा विचारार्थ येतो.
(17) असे दिसते की, श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांच्या शेतामध्ये असणारे विद्युत वितरण कंपनीचे 'ए' 'बी' स्वीच नादुरुस्त होते आणि त्यास वीज कंपनीने ॲल्युमिनियम तारेने बायपास केल्याचे व त्यामधील बी फेजचा जम्पर निसटून 'ए' 'बी' स्वीच लोखंडी चॅनलला चिटकून निर्माण झालेल्या ठिणग्यामुळे ऊस पिकाने पेट घेतलेला आहे. निर्विवादपणे, श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांच्या शेतजमिनीमध्ये असणा-या ऊसाची आग पसरत जाऊन तक्रारकर्ता यांचे ऊस पीक पेटलेले आहे. हे स्वंयस्पष्ट आहे की, तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीमध्ये असणा-या विद्युत वाहिनीमध्ये दोष निर्माण होऊन किंवा तेथे ठिणग्या पडलेल्या नाहीत. आमच्या मते, ज्यावेळी निष्काळजीपणा किंवा सेवा त्रुटीचा मुद्दा उपस्थित होतो, त्यावेळी तो निष्काळजीपणा किंवा सेवेतील त्रुटी ही संबंधीत घेतलेल्या सेवेस किंवा सेवेच्या कृतीस थेटरित्या जोडले जाणे आवश्यक ठरते. तक्रारकर्ता यांनी ज्या विद्युत पुरवठ्याच्या अनुषंगाने 'ग्राहक' नात्याने ग्राहक तक्रार दाखल केली, त्या विद्युत पुरवठ्याच्या अनुषंगाने कथित घटना घडलेली नाही. असे दिसते की, अन्यत्र घडलेल्या घटनेची आग पसरत येऊन तक्रारकर्ता यांचे ऊस पीक जळाल्यामुळे त्या घटनेचा तक्रारकर्ता यांच्या विद्युत जोडणीशी प्रत्यक्ष व थेट संबंध स्थापित होत नाही. तक्रारकर्ता यांना देण्यात आलेल्या विद्युत जोडणीमध्ये दोष असल्यामुळे किंवा तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीमध्ये असणा-या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन ऊस पीक जळालेले नाही. त्या अनुषंगाने विद्युत वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांच्या विद्युत जोडणीच्या अनुषंगाने सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही.
(18) उक्त विवेचनाअंती विद्युत वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांना दिलेल्या विद्युत जोडणीच्या अनुषंगाने त्रुटी केल्याचे सिध्द होत नसल्यामुळे तक्रारकर्ता हे अनुतोषास पात्र ठरत नाहीत. त्यामुळे मुद्दा क्र. 3 व 4 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.5 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-