जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 279/2018. तक्रार दाखल दिनांक : 23/10/2018. तक्रार निर्णय दिनांक : 10/08/2022.
कालावधी : 03 वर्षे 09 महिने 18 दिवस
विधिज्ञ अस्मिता सिध्दांत काटे, वय 45 वर्षे,
व्यवसाय : विधिज्ञ, रा. 47, कल्पतरु, अयोध्या कॉलनी,
लाल बहादूर शास्त्री शाळेजवळ, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) कार्यकारी अभियंता, एम.एस.ई.डी.सी.एल., लातूर सर्कल, लातूर.
(2) उपकार्यकारी अभियंता, एम.एस.ई.डी.सी.एल. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- डब्ल्यू. एम. वाघमारे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- के. जी. साखरे
आदेश
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे वडील ॲड. वा.मा. वाघमारे यांच्या निवासस्थानामध्ये भाडेकरु म्हणून वास्तव्यास आहेत आणि तक्रारकर्ती यांनी विद्युत देयकाचा भरणा करण्यासंबंधी त्यांच्यामध्ये करार झालेला आहे. त्यांना ऑक्टोंबर 2007 मध्ये विद्युत मीटर क्र. 10550250651 करिता रु.33,940/- देयक आले. ते अवाजवी असल्यामुळे रु.15,000/- याप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर तक्रारकर्ती यांना अवाजवी देयके देण्यात येऊन रु.29,430/- थकबाकी दर्शवली. तसेच विरुध्द पक्ष यांच्या तंत्रज्ञाने ऑगस्ट 2017 च्या देयकावर "Meter Fast" असा शेरा नमूद केलेला असतानाही विद्युत मीटर देण्यासंबंधी कार्यवाही केली नाही. विरुध्द पक्ष यांनी चूक देयकांची आकारणी केलेली आहे. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने विद्युत देयकांसाठी अतिरिक्त भरणा केलेली रक्कम पुढील विद्युत देयकांमध्ये समायोजित करण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ती ह्या 'ग्राहक' नसल्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. विद्युत पुरवठा घेतल्यापासून तक्रारकर्ती यांनी विद्युत देयकांचा नियमीत भरणा केलेला नाही. ऑक्टोंबर 2017 पर्यंत थकीत रु.33,940/- पैकी रु.15,000/- चा तक्रारकर्ती यांनी भरणा केला आणि रु.18,940/- थकीत राहिले. त्यानंतर देयकांचा भरणा न केल्यामुळे रु.29,430/- थकीत आहेत. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही आणि ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष यांनी केलेली आहे.
(3) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारकर्ती ह्या त्यांच्या वडिलांच्या निवासस्थानामध्ये भाडेकरु म्हणून राहतात आणि तेथील विद्युत पुरवठ्याचा लाभ घेतात, ही बाब विवादीत नाही. तक्रारकर्ती ह्या विद्युत सेवेच्या लाभार्थी असल्यामुळे ग्राहक संरक्षण अधिनियम, 1984 चे कलम 2 (1)(डी) अन्वये "ग्राहक" संज्ञेत येतात.
(5) तक्रारकर्ती यांचे कथन असे की, त्यांनी रु.13,750/- चा अतिरिक्त भरणा केलेला आहे आणि त्याचा परतावा त्यांना मिळणे आवश्यक आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांचे कथन असे की, तक्रारकर्ती यांनी नियमीतपणे देयकांचा भरणा न केल्यामुळे त्यांचे देयक थकीत आहे. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता विद्युत मीटर जलद असल्यामुळे चुक देयके देण्यात आल्याचे तक्रारकर्ती यांचे कथन आहे; परंतु विद्युत मीटर तपासणी करण्यासंबंधी त्यांनी उचित कार्यवाही केलेली दिसून येत नाही. तसेच ज्याप्रमाणे अतिरिक्त रु.13,750/- रकमेचा भरणा केल्याचे त्यांनी नमूद केले, त्याकरिता उचित पुरावा नाही. आमच्या मते, तक्रारकर्ती ह्या ग्राहक तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरल्या आहेत. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रारकर्ती अनुतोषास पात्र नाहीत. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-