(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
01. तक्रारकर्ता यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित तर्फे विरुध्दपक्ष क्रं-1 ते 3 तिचे अधिकारी यांचे विरुध्द शॉर्टसर्कीट मुळे आग लागून घरातील वस्तुचे झालेल्या नुकसानी बाबत भरपाई मिळावी म्हणून प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता यांचे घर मौजा धामनी येथे होते व आता नविन घरात ते राहत आहेत. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रं 3 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी कडून सन-1977 पासून विज पुरवठा घेतलेला असून त्याचा ग्राहक क्रमांक-435710300191 असा आहे. तक्रारकर्ता यांचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांनी त्यांचे घरातील जुने मीटर काढले आणि त्याऐवजी नविन विद्दुत मीटर बाहेर लावून दिले परंतु असे नविन मीटर स्थापीत करताना विरुध्दपक्ष यांनी नविन मीटरला अर्थींग लावली नाही. तक्रारकर्ता यांचे कडे नविन मीटर लावल्या नंतर त्याचे सात ते आठ दिवसांनी म्हणजेच दिनांक-16.02.2016 रोजी शॉर्ट सर्कीट मुळे त्यांचे घराला आग लागली आणि घरामधील धान्य, नित्यउपयोगी भांडे, कपडे,खाटा, पलंग, घराचे फाटे इत्यादी संपूर्ण जळून जवळपास रुपये-1,00,000/- ते रुपये-1,50,000/- एवढया रकमेचे नुकसान झाले. ज्यावेळी त्यांचे घराला आग लागली होती त्यावेळी घरातील लहान मुले ही शाळेत गेली होती व मोठी मंडळी शेतावर गेली होती तसेच तक्रारकर्ता हे पर्यावरण विषयक जनजागृतीचे शाहिर असून ते कार्यक्रमा निमित्य बाहेरगावी गेले होते. घरात कोणी व्यक्ती नसल्यामुळे जिवित हानी टळली.
तक्रारकर्ता यांनी पुढे असे नमुद केले की, त्यांचे घराला दिनांक-16.02.2016 रोजी आग लागली त्यावेळी गावातील लोकांनी एकत्र येऊन डी.पी. वरील विज पुरवठा खंडीत करुन आग विझवली. सदर आग लागण्यास विरुध्दपक्ष यांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा आहे कारण नविन मीटर घराचे बाहेर लावते वेळी अर्थींग केले नाही. आगीची घटना घडल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी दिनांक-16.02.2016 रोजी तक्रारकर्ता यांचे घरी भेट देऊन मोका निरिक्षण केले परंतु चुकीचा निष्कर्ष काढून खोटा व बनावटी अहवाल सादर केला. तलाठी यांनी मौका पंचनामा करुन रुपये-85,000/- नुकसान झाल्याचा अहवाल दिला. तक्रारकर्ता यांचे घराला आग लागल्या नंतर त्यांना आपले कुटूंबासह तीन ते चार महिने बौध्द विहारात उघडयावर राहावे लागले. तसेच गुरे विकून नविन छोटे घर तयार करावे लागले व सध्या ते नविन घरात राहत आहेत.
तक्रारकर्ता यांनी पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र क्रं- वि.न.भ.-925/2018, दिनांक-17.12.2018 रोजीचे पत्र देऊन शॉर्ट सर्कीट मुळे घर जळाले नाही असे नमुद करुन नुकसान भरपाई देण्यास असमर्थता दर्शवून प्रकरण दप्तर दाखल करुन घेतले. विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी सदचे पत्रात दिनांक-17.06..2016 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 कार्यकारी अभियंता, पवनी आणि विरुध्दपक्ष क्रं 3 सहाय्यक अभियंता आसगाव यांचे कडे तक्रार मागे घेत असल्याचे सांगून नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने तक्रार दप्तर दाखल करुन घेतल्याचे नमुद केलेले आहे. वस्तुतः तक्रारकर्ता यांनी दिनांक-17.06.2016 रोजी असे कोणतेही पत्र दिलेले नाही, ते फार कमी शिकलेले असून त्यांना लिहिता वाचता येत नाही. विरुध्दपक्ष यांनी त्यांची एका को-या कागदावर सही घेउन त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगितले होते परंतु आज पर्यंत कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही. तक्रारकर्ता यांचे असे म्हणणे आहे की, जर त्यांनी तक्रार मागे घेत आहे असे लिहून दिले असते तर वारंवार वरिष्ठांकडे पत्र व्यवहार करुन नुकसान भरपाईची मागणीच केली नसती. म्हणून शेवटी त्यांनी त्यांचे वकीलांचे मार्फतीने दिनांक-16.07.2016 रोजीची विरुध्दपक्षांना रजिस्टर पोस्टाने कायदेशीर नोटीस पाठवून त्याव्दारे रुपये-1,50,000/- नुकसान भरपाईची मागणी केली. सदर नोटीस विरुध्दपक्षांना मिळाली परंतु आज पर्यंत नुकसान भरपाई दिली नाही म्हणून शेवटी तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे खालील प्रमाणे मागण्या विरुध्दपक्षां विरुध्द केल्यात-
1. विरुध्दपक्षांना आदेशित करण्यात यावे की, त्यांनी तक्रारकर्ता यांचे घरातील आगीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रककम रुपये-1,50,000/- तक्रारकर्ता यांना दयावी आणि सदर रकमेवर अपघात घटनेचा दिनांक-16.02.2016 पासून द.सा.द.शे.-18 टक्के दराने व्याज तक्रारकर्ता यांना दयावे.
2. तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-1,00,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-15,000/- आणि नोटीस खर्च रुपये-5000/- विरुध्दपक्षांकडून मिळावा.
3. या शिवाय योग्य ती दाद त्यांचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. जिल्हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी मर्यादित तर्फे तिचे अधिकारी विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांना नोटीस पाठविली असता त्यांनी उपस्थित होऊन एकत्रीत लेखी उत्तर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्ता यांनी स्वतःच त्यांचे दिनांक-20.04.2016 रोजीचे अर्जान्वये ही बाब मान्य केलेली आहे की, त्यांचे घराचे आतील वायरींग बरोबर नसल्यामुळे आग लागलेली आहे. तक्रारकर्ता यांनी अशी कबुली दिली असल्या मुळे विद्दुत निरिक्षक, उद्दोग व अर्जा कामगार विभाग, महाराष्ट्र शासन,भंडारा यांनी दिनांक-17.12.2018 रोजी दिलेल्या अहवालात नमुद केले की, तक्रारकर्ता यांनी स्वतःच तक्रार मागे घेत असल्याचे लिहून दिलेले आहे. सबब जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नसल्याने तक्रार खारीज व्हावी. तक्रारकर्ता यांनी तक्रारी मध्ये विद्दुत निरिक्षक, उद्दोग, उर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन यांना प्रतिपक्ष न केल्याने तसेच तक्रार मुदतबाहय असल्याने आणि जिल्हा ग्राहक आयोगास तक्रार चालविण्याचे अधिकार क्षेत्र येत नसल्याने ईत्यादी मुद्दावरुन तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असा आक्षेप घेतला. तक्रारकर्ता यांनी विरुदपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी कडून घरगुती वापराचे विद्दुत कनेक्शन घेतल्याचे मान्य केले. मात्र हे म्हणणे खोटे आहे की, तक्रारकर्ता यांचे कडील जुने विद्दुत मीटर काढून त्याऐवजी नविन मीटर लावण्यात आले तसेच हे म्हणणे सुध्दा खोटे आहे की, मीटरला अर्थींग नाही. तक्रारकर्ता यांचे कडे सुरुवाती पासून असलेले मीटर आजही सुस्थितीत आहे. तक्रारकर्ता यांचे घरातील वायरींग बरोबर नसल्यामुळे आगीची घटना घडली अशी कबुली तक्रारकर्ता यांनी स्वतः दिनांक-20.04.2016 रोजीचे पत्राव्दारे दिलेली आहे आणि सदर कबुली त्यांचेवर बंधनकारक असून आता ते टाळाटाळ करु शकत नाही. त्यांनी तक्रारकर्ता यांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तलाठी मौजा बोरगावय यांनी तयार केलेला मौका पंचनामा खोटा व बनावटी असल्याने मान्य नाही. विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी दिलेला अहवाल योग्य आहे. दिनांक-17.12.2018 रोजीचे पत्र हे विद्दुत निरिक्षक, उद्दोग, उर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेले असून सदर पत्रावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्ता यांचे घरास शार्ट सर्कींट मुळे आग लागलेली नाही कारण विद्दुतमीटर हे सुस्थितीत होते व वायरींग जळाल्याचे निदर्शनास आले नाही असे स्पष्ट मत विद्दुत निरिक्षक भंडारा यांनी प्रत्यक्ष मोका चौकशी करुन दिलेले आहे. विद्दुत निरिक्षक हे शासकीय सेवेत असल्याने त्यांचे मत नाकारण्याचे कोणतेही कारण नाही. तक्रारकर्ता यांना चांगल्या प्रकारे लिहिता व वाचता येत असून ते सुशिक्षीत आहेत. विरुध्दपक्षांनी तक्रारकर्ता यांची एका कागदावर सही घेऊन नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगितले होते ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्ता यांचे दिनांक-19.07.20019 रोजीचे नोटीसला विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीचे अधिवक्ता श्री डी.आर. निर्वाण यांनी दिनांक-29.07.2019 रोजी रजिस्टर पोस्टाने उत्तर पाठविले. तक्रारकर्ता यांची तक्रार मुदतबाहय आहे. दिनांक-16.02.2016 रोजीचा कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी आसगाव यांनी तयार केलेला परंतु तक्रारकर्ता यांनी तक्रारी सोबत दाखल केलेला पंचनामा अमान्य करण्यात येतो कारण तक्रारकर्ता यांनी हातचलाखी करुन सदर मूळ पंचनाम्या मध्ये खोडातोड करुन पंचनाम्याची प्रत दाखल केली आहे.सदर पंचनाम्याची खरी प्रत ते दाखल करीत आहेत. तक्रारकर्ता यांनी तक्रारीमध्ये केलेली मागणी खोटी व बनावट असून तक्रार खर्चासह खारीज व्हावी अशी विनंती विरुध्दपक्ष विज वितरण कंपनी व्दारे करण्यात आली.
04. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्दपक्ष यांचे उत्तर तसेच उभय पक्षां तर्फे दाखल शपथे वरील पुरावा आणि दाखल दस्तऐवज, ईत्यादीचे जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्यात आले. प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारकर्ता यांचे तर्फे वकील श्री जयेश बोरकर यांचा तर विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनी तर्फे वकील श्री डी.आर. निर्वाण यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर तक्रारीचे न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष यांनी दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द झालेली आहे काय ? | -होय- |
2 | तक्रारकर्ता हे आगीचे घटनेमुळे घरातील झालेल्या नुकसानी संबधात विरुध्दपक्ष विज वितरण कंपनी कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय | -होय- |
3 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: निष्कर्ष ::
मुद्दा क्रं 1 ते 3 बाबत
05. सदर प्रकरणात उभय पक्ष हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत असे निदर्शनास येते. सदर प्रकरणात तक्रारकर्ता यांनी आपली भिस्त विरुदपक्ष क्रं 3 कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित आसगाव यांनी तक्रारकर्ता यांचे कडे आगीची घटना घडल्या नंतर प्रत्यक्ष्य मोक्यावर जाऊन जो पंचनामा केलेला आहे, त्यावर ठेवली. सदर पंचनाम्यावर तक्रारकर्ता यांचे तर्फे ग्राहक प्रतिनिधी म्हणून श्री संजय ब्रम्हदास हुमणे यांची सही असून अन्य साक्षीदारांच्या सहया आहेत तसेच कनिष्ठ अभियंता आसगाव यांची सही आहे. विरुध्दपक्ष विज वितरण कंपनी तर्फे सदर पंचनाम्या बाबत असा आरोप आहे की, तक्रारकर्ता यांनी तक्रारी सोबत जो विरुध्दपक्ष क्रं 3 कनिष्ठ अभियंता यांनी तयार केलेला पंचनामा दाखल केलेला आहे, त्या पंचनाम्यामध्ये काही शब्द तक्रारकर्ता यांनी जास्तीचे मागाहून टाकलेले आहेत, जसे मीटर पर्यंत येणारी म.रा.वि.वि.कंपनीची सर्व्हीस वायर सुस्थितीत (नाही हा शब्द मागाहून जोडलेला आहे) आहे. सदर घटनास्थळाच्या चतुःसिमा या मध्ये दक्षीणेस ब्रम्हदास धर्मदास हुमणे यांचे नविन बांधकाम आहे (आर्थींग नाही हे शब्द मागाहून जोडलेले आहेत) विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे विरुध्दपक्ष क्रं 3 कनिष्ठ अभियंता,म.रा.वि.वि.कंपनी आसगाव यांनी जो दिनांक-16.02.2016 रोजीचा मोका पंचनामा केला होता त्याची सत्यप्रत दाखल केली, सदर विरुध्दपक्षातर्फे दाखल मोका पंचनाम्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये वर नमुद केल्या प्रमाणे नाही हा शब्द तसेच आर्थींग नाही हे शब्द दिसून येत नाही, याचाच अर्थ असा होतो की विरुध्दपक्ष विज वितरण कंपनी तर्फे जो आरोप केलेला आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रं 3 चे मोका पंचनाम्या मध्ये खोडतोड करुन पंचनाम्याची प्रत जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केली या आरोपा मध्ये जिल्हा ग्राहक आयोगास तथ्य दिसून येते.
06. विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रं 3 कनिष्ठ अभियंता, म.रा.वि.वि.कं. आसगाव यांना दिनांक-20.04.2016 रोजी एक लेखी पत्र देऊन नमुद केले होते की, माझे घर हे घराचे आतील वायरींग बरोबर नसल्यामुळे जळाले आहे, त्या करीता म.रा.वि.वि.कं.चा काहीही दोष नाही, त्यामुळे मी ब्रम्हदास लोटन हुमणे म.रा.वि.वि.कं. आसगाव यांचे विरोधात कंपनीकडे केलेली नुकसान भरपाईची मागणीची तक्रार मागे घेत आहे असे नमुद आहे.
या उलट तक्रारकर्ता यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी दिनांक-17.06.2016 रोजीचे विरुध्दपक्ष क्रं 3 कनिष्ठ अभियंता म.रा.वि.वि.कं. आसगाव यांना तक्रार मागे घेण्याबाबत असे कोणतेही पत्र दिलेले नाही, ते फार कमी शिकलेले असून त्यांना लिहिता वाचता येत नाही. विरुध्दपक्ष यांनी त्यांची एका को-या कागदावर सही घेउन त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगितले होते परंतु आज पर्यंत कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही. तक्रारकर्ता यांचे असे म्हणणे आहे की, जर त्यांनी तक्रार मागे घेत आहे असे लिहू नदिले असते तर वारंवार वरिष्ठांकडे पत्र व्यवहार करुन नुकसान भरपाईची मागणीच केली नसती.
07. जिल्हा ग्राहक आयोगाचे मते तक्रारकर्ता यांचे सदरचे म्हणण्यात तथ्य दिसून येते याचे कारण असे आहे की, तक्रारकर्ता म्हणतात त्या प्रमाणे विरुध्दपक्ष यांनी नुकसान भरपाई देण्याचे आमीष दाखवून तक्रारकर्ता यांची को-या कागदावर सही घेतलेली आहे असे दिसून येते कारण सर्वसाधारण व्यवहारा मध्ये सदर पत्रातील मजकूर लिहिल्या नंतर त्याचे लगेच खाली तक्रारकर्ता यांनी सही केली असती परंतु पत्रातील मजकूर संपल्या नंतर त्याचे
खालीच तक्रारकर्ता यांची सही नसून मजकूर आणि सही मध्ये ब-याच मोठया जागेची गॅप पडलेली आहे, याचाच अर्थ को-या कागदावर तक्रारकर्ता यांची सही घेऊन मागाहून त्यावर तक्रार मागे घेत आहे असा मजकूर विरुध्दपक्षाने लिहिल्याची बाब दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी त्यांची तक्रार मागे घेतल्या बाबतचे दिनांक-20.04.2016 रोजीचे पत्राचा दस्तऐवज विश्वासार्ह वाटत नाही असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
08. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रं 3 कनिष्ठ अभियंता यांनी तयार केलेल्या पंचनाम्या मध्ये मागाहून काही शब्द जोडले आहेत याचा अर्थ त्यामुळे तक्रारकर्ता यांची संपूर्ण तक्रारच खोटी आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. आगीची प्रत्यक्षातील घटना आणि तक्रारकर्ता यांनी मागाहून विरुध्दपक्ष क्रं 3 यांचे पंचनाम्या मध्ये जोडलेले शब्द यांचा परस्पराशी कोणताही संबध दिसून येत नाही. तक्रारकर्ता यांनी मोका पंचनाम्या मध्ये काही शब्द जरी जोडलेले असले तरी आगीची घटना ही त्यापूर्वीच घडलेली आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
09. विद्दुत निरिक्षक,महाराष्ट्र शासन,भंडारा यांनी त्यांचे कार्यालयाचे जा.क्रं-925/2018, दिनांक-17.12.2018 रोजीचे विरुध्दपक्ष क्रं 1 कार्यकारी अभियंता, म.रा. वि.वि.कं. यांना दिलेले निष्कर्ष पत्राचे अवलोकन जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे करण्यात आले, त्यामध्ये दिनांक-16.02.2016 रोजी मौजा धमणी, पोस्ट विरली बुर्जूग, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा येथे श्री ब्रम्हदास लोटण हुणे यांचे घराला आग लागून नुकसान झाल्या बाबत नमूद केलेले असून पुढे पत्रात असे नमुद आहे की, तक्रारकर्ता यांनी त्यांची तक्रार दिनांक-170.06.2016 रोजी मागे घेत आहे असे नमुद केलेले आहे परंतु दिनांक-22.11.2018 रोजी तक्रारकर्ता श्री ब्रम्हदास हुमणे यांचा पुःनश्च अर्ज दाखल केल्याने चौकशी केली असता त्यामध्ये घटना स्थळावरील विज मीटर योग्य व सुव्यवस्थीत आहे. मीटरच्या बाजूला लाकडी बोर्डवर 16 अॅम्पीयर फयुजेस लावलेले असून मीटर सुस्थितीत आहे. तक्रारकर्ता श्री ब्रम्हदास लोटण हुमणे यांचे घरातील वायरींग जळाल्याचे कुठेही निदर्शनास आले नाही अडीच वर्षा नंतर सुध्दा त्यांचे घरातील वायरींग जळाल्याचे कुठेही निदर्शनास आले नाही. दिनांक-16.02.2016 रोजी श्री ब्रम्हदास हुमणे यांचे घराला लागलेल्या आगीचे निश्चीत कारण सांगता येत नाही असे नमुद आहे.
10. जिल्हा ग्राहक आयोगाचे मते विद्दुत निरिक्षक,महाराष्ट्र शासन,भंडारा यांना सुध्दा तक्रारकर्ता यांचे घरातील लागलेल्या आगीचे नेमके कारण कोणते आहे याचा निष्कर्ष काढता आलेला नाही. विद्दुत निरिक्षक हे एक तांत्रीक अधिकारी असून त्यांना सुध्दा आगीचे नेमके कारण काय हे सांगता आलेले नाही.
11. तक्रारकर्ता यांचे तक्रारी प्रमाणे त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 3 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी कडून सन-1977 पासून विज पुरवठा घेतलेला असून त्याचा ग्राहक क्रमांक-435710300191 असा आहे. विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांनी त्यांचे घरातील जुने मीटर काढले आणि
त्याऐवजी नविन विद्दुत मीटर बाहेर लावून दिले परंतु असे नविन मीटर स्थापीत करताना विरुध्दपक्ष यांनी नविन मीटरला अर्थींग लावली नाही. तक्रारकर्ता यांचे कडे नविन मीटर लावल्या नंतर त्याचे सात ते आठ दिवसांनी म्हणजेच दिनांक-16.02.2016 रोजी शॉर्ट सर्कीट मुळे त्यांचे घराला आग लागली आणि घरामधील धान्य, नित्यउपयोगी भांडे, कपडे,खाटा, पलंग, घराचे फाटे इत्यादी संपूर्ण जळून जवळपास रुपये-1,00,000/- ते रुपये-1,50,000/- एवढया रकमेचे नुकसान झाले. विरुध्दपक्ष महाराष्ट्र विज वितरण कंपनीने ही बाब अमान्य केली की, तक्रारकर्ता म्हणतात त्या प्रमाणे जुन्या मीटर ऐवजी नविन मीटर लावून दिले. जिल्हा ग्राहक आयोगाने विरुध्दपक्ष विज वितरण कंपनी तर्फे तक्रारकर्ता यांचा जो विज वापराचा गोषवारा दाखल आहे, त्यामध्ये तक्रारकर्ता यांचे कडील मीटर क्रं-39000870828 हा एप्रिल-2015 ते ऑक्टोंबर,2020 पर्यंत हा एकच क्रमांकाचा आहे. तक्रारकर्त्याचे घराला आग दिनांक-16 फेब्रुवारी, 2016 रोजी लागली त्याचे आधी पासून ते आगीचे घटने पासून आज पर्यंत तोच मीटर क्रं 39000870828 असल्याचे विज वापराचे गोषवा-या वरुन सिध्द होते, त्यामुळे तक्रारकर्ता यांचे असे म्हणणे की, त्यांचे घरातील जुने मीटर काढून त्याऐवजी नविन मीटर बाहेर लावले या मध्ये जिल्हा ग्राहक आयोगास तथ्य दिसून येत नाही.
12 तक्रारकर्ता यांचे असे म्हणणे आहे की, ते घरी नसताना दिनांक-16.02.2016 रोजी त्यांचे घराला आग लागली त्यावेळी गावातील लोकांनी एकत्र येऊन डी.पी. वरुन लाईट बंद करुन आग विझवली. विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने नेमकी आग कशामुळे लागली या बाबत कोणताही पुरावा (Evidence) दाखल केलेला नाही तसेच तक्रारकर्ता यांचे घराची आग विझविणारे गावातील लोकांना तपासून (Not examine to the witnesses) पाहिलेले नाही. अशा परिस्थितीत मीटर मधील शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली नाही हे पुराव्यानिशी सिध्द करण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीची आहे (Burden on the Opposite Party to prove the case by adducing eveidence) परंतु विरुध्दपक्ष विज वितरण कंपनी ही बाब सिध्द करु शकलेली नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता यांची तक्रार विरुदपक्ष विज वितरण कंपनी विरुध्द मंजूर होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. तलाठी बोरगाव यांनी केलेल्या मोका पंचनाम्या नुसार तक्रारकर्ता यांचे घरातील आगीमुळे झालेले नुकसान एकूण रुपये-85,000/- आणि सदर रकमेवर अपघातील घटना घडल्याचा दिनांक-16.02.2016 पासून 03 महिन्याचा कालावधी सोडून म्हणजे 16.05.2016 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्यास मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. तसेच तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा रकमा विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना दयाव्यात असे आदेशित करणे योग्य व न्यायोचीत होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
13. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्ता श्री ब्रम्हदास लोटन हुमणे यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1 ते क्रं 3 महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी मर्यादित तर्फे अनुक्रमे कार्यकारी अभियंता, भंडारा, उपकार्यकारी अभियंता, पवनी,जिल्हा भंडारा आणि सहाय्यक अभियंता, आसगाव, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं-1 ते क्रं 3 महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी मर्यादित तर्फे अनुक्रमे कार्यकारी अभियंता, भंडारा, उपकार्यकारी अभियंता, पवनी, जिल्हा भंडारा आणि सहाय्यक अभियंता, आसगाव, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ता
यांना आगीचे अपघातामुळे झालेल्या नुकसानी संबधात नुकसान भरपाई दाखल रक्कम रुपये-85,000/-(अक्षरी रुपये पंच्याऐंशी हजार फक्त) दयावे आणि सदर नुकसान भरपाईचे रकमेवर दिनांक-16.05.2016 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज तक्रारकर्ता यांना दयावे.
- विरुध्दपक्ष क्रं-1 ते क्रं 3 महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी मर्यादित तर्फे अनुक्रमे कार्यकारी अभियंता, भंडारा, उपकार्यकारी अभियंता, पवनी, जिल्हा भंडारा आणि सहाय्यक अभियंता, आसगाव, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल भरपाई म्हणून रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा रकमा तक्रारकर्ता यांना दयाव्यात.
- विरुध्दपक्ष क्रं-1 ते क्रं 3 महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी मर्यादित तर्फे अनुक्रमे कार्यकारी अभियंता, भंडारा, उपकार्यकारी अभियंता, पवनी, जिल्हा भंडारा आणि सहाय्यक अभियंता, आसगाव, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या सदर आदेशाचे अनुपालन निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जाव्यात.