(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य.)
(पारित दिनांक-08 डिसेंबर, 2016)
01. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षां विरुध्द प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल करुन तिचे मृतक पतीचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा राशी मिळावी या मुख्य मागणीसह दाखल केली.
02. तक्रारकर्तीची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारकर्तीचे पती श्री लक्ष्मण विठोबा जिवतोडे यांचे मालकीची मौजा उंदिरगाव, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा येथे भूमापन क्रं-102/2 एकूण क्षेत्रफळ-1 हेक्टर 08 आर एवढी शेती होती व ते शेती करीत होते. तक्रारकर्तीचे पतीचे दिनांक-19/11/2011 रोजी रोड अपघाताने निधन झाले. तक्रारकर्ती शिवाय मृतक श्री लक्ष्मण जिवतोडे यांचे कोणीही वारसदार नाहीत. तक्रारकर्तीने तिचे पतीचे अपघाती मृत्यू नंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तालुका कृषी अधिकारी, समुद्रपूर, जिल्हा वर्धा यांचेकडे विमा दावा अर्ज आवश्यक दस्तऐवजांसह सादर केला परंतु आजतागायत विमा दाव्याचे काय झाले याची माहिती न मिळाल्याने तिने जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, वर्धा यांचे कार्यालयात जाऊन चौकशी केली असता समजले की, विरुध्दपक्ष क्रं-1) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांना विमा दावा प्रस्ताव दिनांक-27/09/2012 रोजी प्राप्त झालेला आहे, म्हणून तक्रारकर्ती तर्फे गृहीत धरण्यात येते की, दिनांक-10/10/2012 रोजी विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-2) न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनीला प्राप्त झालेला आहे. परिपूर्ण विमा प्रस्ताव मिळाल्या नंतर एक महिन्याच्या कालावधीत विमा दावा रक्कम अदा करण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीची असताना विमा दाव्याची रक्कम दिलेली नाही वा दाव्या संदर्भात कुठलीही माहिती दिली नाही, ही विरुध्दपक्षा तर्फे दिलेली दोषपूर्ण सेवा आहे. म्हणून शेवटी तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्षां विरुध्द मागणी केली की, तिला विमा दावा रक्कम रुपये-1,00,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- अशी रक्कम आणि त्यावर व्याज देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस पुणे यांचे तर्फे रजिस्टर पोस्टाने लेखी निवेदन सादर करण्यात आले, ते नि.क्रं 12 वर दाखल आहे. त्यांनी आपल्या लेखी निवेदना मध्ये ग्राहक मंचाची नोटीस त्यांचे पुणे येथील कार्यालयाला दिनांक-18/05/2015 रोजी प्राप्त झाली परंतु तक्रारीच्या प्रती सोबत विमा दाव्या संबधित कोणतेही दस्तऐवज त्यांना प्राप्त झालेले नसल्याने ते लेखी उत्तर दाखल करण्यास असमर्थ आहेत, त्यामुळे ग्राहक मंचाचे मार्फतीने तक्रारीशी संबधित सर्व दस्तऐवजांच्या प्रती त्यांचे कार्यालयीन पत्त्यावर पाठविल्यास ते आपले लेखी उत्तर सादर करु शकतील असे नमुद केले.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी तर्फे लेखी उत्तर नि.क्रं-4 वर दाखल करण्यात आले. तक्रारकर्तीचे मृतक पती श्री लक्ष्मण विठोबा जिवतोडे यांचा रोड अपघातात दिनांक-19.11.2011 रोजी मृत्यू झाल्याची बाब पुराव्या अभावी नाकबुल केली. तसेच तक्रारकर्ती ही एकमेव वारसदार असल्या बाबतची बाब सुध्दा पुराव्या अभावी नाकबुल केली. तसेच मृतक श्री जिवतोडे हे शेतकरी होते ही बाब सुध्दा नाकबुल केली. तक्रारकर्तीने तालुका कृषी अधिकारी, समुद्रपूर, जिल्हा वर्धा यांचे कार्यालयात दिनांक-03.09.2012 रोजी विमा दावा दाखल केल्याची बाब सुध्दा नाकबुल केली.
विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्तीचे म्हणण्या नुसार तिचे पतीचा दिनांक-19.11.2011 रोजी मृत्यू झाला आणि तिने विमा दावा हा दिनांक-03.09.2012 रोजी विलंबाने दाखल केला तसेच विलंबाचे कारणही दिलेले नाही. तसेच या ग्राहक मंचास तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येत नाही कारण तक्रारकर्ती ही वर्धा जिल्हयातील रहिवासी असून तिने वर्धा येथे विमा दावा दाखल केलेला आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजा नुसर तिने विमा दावा हा दिनांक-24.09.2012 रोजी दाखल केलेला आहे. तक्रारकर्तीचे तक्रारी मध्ये नमुद केल्या प्रमणे विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीला दिनांक-10.10.2012 रोजी विमा दावा प्राप्त झाल्याची बाब नाकबुल केली. अन्य सर्व विपरीत विधाने नाकबुल केलीत. तक्रारकर्तीने शासन परिपत्रका नुसार आवश्यक ते दस्तऐवज सादर केलेले नाहीत. तक्रारकर्तीने पॉलिसीचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसांचे आत विमा दावा दाखल करणे आवश्यक होते परंतु तिने तसे केलेले नाही. तक्रारकर्तीने शेती संबधीचे कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाहीत. तसेच अपघाता संबधने एफआयआर, स्पॉट पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र अशा
दस्तऐवजाच्या प्रती दाखल केलेल्या नाहीत. या प्रकरणात पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-15.08.2011 ते दिनांक-14.08.2012 असा होता. पॉलिसी संपल्याचे कालावधी पासून 90 दिवसांचे आत म्हणजे दिनांक-14.11.2012 पर्यंत विमा दावा दाखल करणे आवश्यक होते परंतु उशिराने विमा दावा दाखल केलेला असल्याने तक्रारकर्तीची तक्रार खारीज व्हावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-2) न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी तर्फे करण्यात आली.
05. तक्रारकर्तीने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून सोबत दस्तऐवजाच्या प्रती ज्यामध्ये शेतकरी अपघात विमा योजना क्लेम फॉर्म, तालुका कृषी अधिकारी, समुदपूर, जिल्हा वर्धा यांचेकडे रजिस्टर पोस्टाने दिनांक-03/09/2012 रोजी पाठविल्या बाबत पोस्टाच्या पावतीची प्रत, गावनमुना 7/12 प्रत, मृत्यू प्रमाणपत्र, शेतकरी अपघात विमा योजना-2012-2013 परिपत्रकाची प्रत, पोलीस स्टेशन, बोरी, जिल्हा नागपूर येथील दिनांक-20/11/2011 रोजीचे मरणान्वेषण प्रतिवृत्त, डिपार्टमेंट ऑफ फोरेन्सीक मेडीसिन, गव्हरनमेंट मेडीकल कॉलेज, नागपूर येथील दिनांक-25/11/2011 रोजीचा शवविच्छेदन अहवाल ज्यामध्ये मृत्यूचे कारण “Injury to vital organs” असे नमुद आहे अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे.
06. विरुध्दपक्ष क्रं-2) दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड मुंबई कार्यालयाने नागपूर कार्यालयास ओरीजनल क्लेम फॉर्म फाईल पाठविण्या बाबत दिलेले दिनांक-10 ऑक्टोंबर, 2013 रोजीच्या पत्राची प्रत, घटनास्थळ पंचनामा दिनांक-19/11/2011 रोजीची प्रत दाखल केली. तसेच लेखीयुक्तीवाद दाखल केला.
07. तक्रारकर्तीची तक्रार, लेखी दस्तऐवज आणि विरुध्दपक्ष क्रं-2) दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीचे लेखी उत्तर व दाखल दस्तऐवज तसेच उभय पक्षांचे अधिवक्ता यांचा युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष::
08. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या गाव नमुना 7/12 वर्ष-2009-2010 चे उता-याचे प्रतीवरुन गाव उंदिरगाव, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा येथील भूमापन क्रं-102/2 या शेतीचे मालकी हक्का मध्ये तक्रारकर्तीचे मृतक पती श्री लक्ष्मण विठोबाजी जिवतोडे यांचे नावाची नोंद आहे, त्यामुळे तक्रारकर्तीचे पती हे अपघाताचे वेळी शेतकरी होते, ही बाब सिध्द होते.
09. तक्रारकर्ती तर्फे दाखल दस्तऐवज ज्यामध्ये पोलीस स्टेशन, बुटीबोरी, जिल्हा नागपूर येथील दिनांक-20/11/2011रोजीचे मरणान्वेषण प्रतिवृत्त, डिपार्टमेंट ऑफ फोरेन्सीक मेडीसिन, गव्हरनमेंट मेडीकल कॉलेज,नागपूर येथील दिनांक-25/11/2011 रोजीचा शवविच्छेदन अहवाल ज्यामध्ये मृत्यूचे कारण “Injury to vital organs” असे नमुद आहे तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी तर्फे दाखल दिनांक-19/11/2011 रोजीची घटनास्थळ पंचनामा प्रती वरुन असे दिसून येते की, दिनांक-19/11/2011 रोजी मृतक लक्ष्मण विठोबा जिवतोडे, वय-60 वर्ष यांचे प्रेत बुटीबोरी ते वर्धा कडे जाणारी रेल्वे लाईन येथे आढळून आल्याचे त्यात नमुद आहे. शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळ पंचनामा या वरुन मृतक श्री लक्ष्मण विठोबा जिवतोडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब सिध्द होते. क्लेम फॉर्म भाग-2 मध्ये मृतक श्री लक्ष्मण विठोबा जिवतोडे यांची पत्नी सावित्रीबाई, मुलगा विजय आणि विनोद यांची नावे नमुद केलेली आहेत. मृत्यू प्रमाणपत्रा वरुन आणि अन्य दस्तऐवजा वरुन मृतकाचा मृत्यू हा दिनांक-19/11/2011 रोजी झालेला आहे.
त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-2) दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी तर्फे लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्तीचे मृतक पती श्री लक्ष्मण विठोबा जिवतोडे यांचा रोड अपघातात दिनांक-19.11.2011 रोजी मृत्यू झाल्याची बाब पुराव्या अभावी नाकबुल केली, या विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणण्या मध्ये मंचाला काहीही तथ्य दिसून येत नाही. तसेच मृतक श्री जिवतोडे हे शेतकरी होते ही बाब नाकबुल केली. यामध्ये सुध्दा मंचास काहीही तथ्य दिसून येत नाही.
10. विरुध्दपक्ष क्रं-2) दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीने लेखी उत्तरात तक्रारकर्तीने तालुका कृषी अधिकारी, समुद्रपूर, जिल्हा वर्धा यांचे कार्यालयात दिनांक-03.09.2012 रोजी विमा दावा दाखल केल्याची बाब सुध्दा नाकबुल केली. परंतु तक्रारकर्तीने विमा दावा तालुका कृषी अधिकारी, समुद्रपूर, जिल्हा वर्धा यांचे कडे रजिस्टर पोस्टाने दिनांक-03/09/2012 रोजी पाठविल्या बाबत पोस्टाचे पावतीची प्रत पुराव्यार्थ दाखल केलेली आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-2) दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीचे या आक्षेपातही मंचास काहीही तथ्य दिसून येत नाही.
11. विरुध्दपक्ष क्रं-2) दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीने लेखी उत्तरात असाही आक्षेप घेतलेला आहे की, या ग्राहक मंचास तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येत नाही कारण तक्रारकर्ती ही वर्धा जिल्हयातील रहिवासी असून तिने वर्धा येथे विमा दावा दाखल केलेला आहे. परंतु अपघाता संबधाने पोलीस स्टेशन, ग्रामीण बुटीबोरी, तालुका जिल्हा नागपूर येथील दस्तऐवज पाहता, मृतकाचा अपघात हा बुटीबोरी, जिल्हा नागपूर येथे घडलेला असल्याने तक्रारीचे कारण हे नागपूर ग्रामीण येथे घडलेले असल्याने अतिरिक्त जिल्हा ग्राहक मंचास तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येते, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-2) दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी तर्फे अधिकारक्षेत्रा संबधाने घेतलेल्या आक्षेपात मंचास काहीही तथ्य दिसून येत नाही.
12. विरुध्दपक्ष क्रं-2) दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीचा आणखी एक आक्षेप असाही आहे की, तक्रारकर्तीने पॉलिसीचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसांचे आत विमा दावा दाखल करणे आवश्यक होते परंतु तिने तसे केलेले नाही.
मृतकाचा अपघाती मृत्यू हा दिनांक-19/11/2011 रोजी झाल्याचे पोलीस दस्तऐवजां वरुन दिसून येते. म्हणजेच अपघात हा वर्ष-2011-2012 मध्ये झालेला आहे आणि या वर्षातील योजनेचा कालावधी हा दिनांक-15/08/2011ते दिनांक-14/08/2012 असा होता. तक्रारकर्तीने सर्वप्रथम विमा दावा तालुका कृषी अधिकारी, समुद्रपूर, जिल्हा वर्धा यांचे कडे रजिस्टर पोस्टाने दिनांक-03/09/2012 रोजी पाठविल्या बाबत पोस्टाचे पावतीची प्रत पुराव्यार्थ दाखल केलेली आहे. पॉलिसी संपल्याचे दिनांका पासून म्हणजे दिनांक-14/08/2012 पासून 90 दिवसांचे आत म्हणजे दिनांक-14/11/2012 पर्यंत विमा दावा दाखल करण्याची मुदत होती परंतु तक्रारकर्तीने त्यापूर्वीच म्हणजे दिनांक-03/09/2012रोजी सर्वप्रथम विमा दावा हा तालुका कृषी अधिकारी, समुद्रपूर, जिल्हा वर्धा यांचे कडे दाखल केलेला असल्याने तक्रारकर्तीने उशिराने विमा दावा दाखल केला या विरुध्दपक्ष क्रं-2) दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीने घेतलेल्या आक्षेपा मध्ये मंचास काहीही तथ्य दिसून येत नाही.
13. शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत सर्वप्रथम विमा दावा हा तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सादर करण्यात येतो. त्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे विमा दावा सादर केल्या जातो.तेथून तो कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस या ब्रोकींग कंपनीकडे सादर केल्या जातो, तेथे विमा दाव्याची छाननी करुन व त्यामधील त्रृटयांची पुर्तता संबधित शेतक-यांचे वारसदारा कडून करवून घेऊन पुढे तो विमा दावा संबधित विमा कंपनीकडे निर्णयार्थ पाठविल्या जातो. अशाप्रकारची शासनाची योजना एवढया साठीच निर्माण केलेली आहे की, बहुतांश शेतक-यांचे वारसदार हे निरक्षर, कमी शिकलेले असून एखाद्दा दस्तऐवजाची पुर्तता करण्याचे राहून गेले असेल तर त्या दस्तऐवजाची पुर्तता या यंत्रणेला संबधित मृतक शेतक-यांचे वारसदार यांचे
कडून करणे आवश्यक आहे. परंतु या यंत्रणे मध्येच कुठलाही ताळमेळ दिसून येत नाही, त्यामुळे विमा दावा विहित मुदतीत सादर करुनही या त्रिस्तरीय यंत्रणेमुळे तो विमा दावा प्रत्यक्षात विमा कंपनीकडे फार उशिरा सादर होतो, परिणामी गरजू शेतक-यांचे मृतक वारसदारांना त्यांचा विमा दावा हा योग्य असूनही (Genuine Claim) तो मिळत नाही आणि एखाद्दा दस्तऐवज नाही मिळाला आणि इतर पुरक दस्तऐवज असूनही केवळ तेवढया एकाच दस्तऐवजाचे कारणा वरुन त्याचा विमा दावा हा संबधित विमा कंपनी कडून नाकारल्या जातो या सर्व गोष्टींना आता शासन स्तरावरुनच योग्य तो पायबंद बसायला पाहिजे. सध्या संगणकीय युग असून पोलीस दस्तऐवज, शेतीचे मालकी हक्काचे दस्तऐवज, मेडीकलचे दस्तऐवज हे शासनाच्या त्या-त्या विभागां कडून योग्य तो समन्वय साधून स्कॅनींग करुन ईमेलने संबधित विमा कंपनीला पाठविल्यास संबधित मृतक शेतक-याचे वारसदारास त्वरीत विमा दावा रक्कम मिळू शकेल, त्यास एखाद्दा दस्तऐवजाच्या अभावाने विमा दावा रकमे पासून वंचित राहावे लागणार नाही. तरी महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजने संदर्भात लागणारे पोलीस, मेडीकल आणि महसूली दस्तऐवज ते त्यांचे स्तरावरुन प्रमाणित करुन स्कॅनींग करुन ई-मेलने संबधित विमा कंपनीला त्वरीत पाठविण्याची व्यवस्था करावी असे येथे सुचवावेसे वाटते.
14. वरील सर्व वस्तुस्थिती वरुन तक्रारकर्तीचा विमा दावा योग्य असूनही (Genuine Claim) तिला विमा दाव्याची रक्कम आज पर्यंत न देऊन विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने दोषपूर्ण सेवा दिलेली आहे, परिणामी तक्रारकर्तीला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी कडून शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा राशी रुपये-1,00,000/- आणि त्यावर सर्व प्रथम विमा प्रस्ताव दाखल दिनांक-03/09/2012 पासून 60 दिवस (महाराष्ट्र शासन परिपत्रका नुसार विमा दावा निर्णयाचा कालावधी) सोडून येणारा दिनांक-03/11/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने व्याजासह रक्कम मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
15. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, मंच तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-2) दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड, मंडल कार्यालय, कुपरेज रोड, मुंबई यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) आणि त्यावर दिनांक-03/11/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने व्याज यासह मिळून येणारी रक्कम द्दावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/-(अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने तक्रारकर्तीस द्दावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे संबधित
अधिका-यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका
पासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) विरुध्दपक्ष क्रं-(1) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचे विरुध्द कोणतेही आदेश नाहीत, त्यांना या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
(06) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.