::निकालपत्र:: (पारीत व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य) (पारीत दिनांक-30 एप्रिल, 2014 ) 01. तक्रारकर्त्याने वाहना मधील दोषपूर्ण टायर संबधाने विरुध्दपक्षा विरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खालील प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली. 02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 3) ताजश्री ऑटो, हिंगणा, एम.आय.डी.सी. नागपूर यांचे कडून दि.19.04.2012 रोजी DOST LE BS-3 हे वाहन खरेदी केले. वाहनाचे विवरण खालील प्रमाणे आहे- वाहनाचा नोंदणी क्रं : MH-40-Y-159 इंजिन क्रं : XCH008431P चेसिस क्रं : MB1 AA 22 E 4 CRX-08265 तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार सदर वाहनातील दोन टॉयर्स संबधीची आहे. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, सदर वाहनाच्या दोन टायरमध्ये हवेचे बबल्स तयार झाले आणि सदरचा दोष हा निर्मित दोष आहे. तक्रारकर्त्याने सदर दोषा संबधाने विरुध्दपक्ष क्रं 3 वाहन विक्रेता ताजश्री ऑटो नागपूर यांचेकडे दि.01.09.2012 रोजी सदर वाहनातील दोन्ही दोषपूर्ण टार्यस दर्शवून तक्रार केली असता, विरुध्दपक्ष क्रं -3 वाहन विक्रेता यांनी, विरुध्दपक्ष क्रं-1 सर्व्हीस इंजिनिअर, एम.आर.एफ.टॉयर्स, नागपूर यांना दि.01.09.2012 रोजी पत्र लिहून त्यामध्ये एम.आर.एफ. टॉयर क्रं-66326201112 आणि एम.आर.एफ.टॉयर क्रं-66596551312 या मध्ये हवेचे बबल्स तयार झाल्यामुळे ते निरिक्षणासाठी पाठवित असल्याचे आणि निरिक्षण करुन अहवाल देण्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं -1 व क्रं-2 यांनी दि.27.09.2012 रोजीचे पत्र तक्रारकर्त्यास देऊन तक्रारकर्त्याची तक्रार अमान्य केली. सदर पत्रा मध्ये त्यांनी दि.03.09.2012 रोजी वाहनाचे टायरचे निरिक्षण केले असता टायरचे नुकसान हे टायरला लागलेल्या माराकडे र्दुलक्ष्य केल्यामुळे झाले असल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्यास सदरचा अहवाल अमान्य आहे. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी टायर मधील निर्माण दोषाकडे पूर्णपणे र्दुलक्ष्य केले. वस्तुतः विरुध्दपक्षाने सदरचे दोन्ही टायर्स पूर्णपणे बदलवून देणे आवश्यक होते. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याची तक्रार अमान्य केल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना अधिवक्ता यांचे मार्फतीने नोंदणीकृत डाकेने दि.18.10.2012 रोजीची कायदेशीर नोटीस पाठविली. विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्याचे नोटीसला दि.30.10.2012 रोजी उत्तर पाठवून जबाबदारी नाकारली आणि नोटीस मागे घेण्या बाबत धमकी दिली. सदरचे उत्तर तक्रारकर्त्यास दि.03.11.2012 रोजी प्राप्त झाले. म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षां विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन तीव्दारे, विरुध्दपक्षास दोन्ही टार्यस बदलवून देण्याचे निर्देशित व्हावे अथवा दोन्ही टायर्सची किंमत परत करण्याचे आदेशित व्हावे. विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे झालेल्या व्यवसायीक नुकसानी बद्दल तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-80,000/- द.सा.द.शे.12% दराने व्याजासह परत मिळावे अशा मागण्या केल्यात.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 एम.आर.एफ. टायर्स तर्फे श्री विजयकांत अशोक यादव यांनी प्रतिज्ञालेखावरील उत्तर मंचा समक्ष सादर केले. त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, त्यांच्यात आणि तक्रारकर्त्यामध्ये खरेदी विक्रीचा कोणताही व्यवहार झालेला नसल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 चा ग्राहक होत नाही. तक्रारकर्त्याने दि.19.04.2012 रोजी विरुध्दपक्ष क्रं 3 यांचे कडून मिनी ट्रक अशोक ले-लॅन्ड दोस्त खरेदी केला होता. दि.19.04.2012 रोजी सदरचे वाहन खरेदी केल्या नंतर जवळपास 05 महिन्या नंतर वाहना सोबत संलग्न असलेल्या टायर्समध्ये उत्पादकीय दोषा बाबत तक्रारकर्त्याने तक्रार केली, जी अनुचित आणि बेकायदेशीर आहे. दि.27.09.2012 रोजीचा टायर्स तपासणी अहवाल अभिलेखावर दाखल आहे, सदर अहवाला मध्ये टायर्स मध्ये कोणताही उत्पादकीय दोष नसल्याचे नमुद केले आहे आणि म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. सदर टार्यस निरिक्षण अहवाला मध्ये तक्रारकर्त्याने वाहनाची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे वाहन चालू स्थितीत असताना कुठल्या तरी कठीण अथवा टोकदार वस्तुमुळे टायर्सचे नुकसान झाले असल्याचे सिध्द होते. तक्रारकर्त्याचे दि.18.10.2012 रोजीचे नोटीसचे उत्तर विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी दि.30.10.2012 रोजी दिलेले आहे. वाहनाचे टायर्स संबधाने विरुध्दपक्ष क्रं 1 यांचा कोणताही दोष नाही वा सेवेतील त्रृटी नाही म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज व्हावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी केली. 04. विरुध्दपक्ष क्रं 2 महालक्ष्मी एजन्सीज तर्फे मॅनेजर, दुकान क्रं 2, एम.आय.डी.सी. टी पॉईन्ट जवळ, अमरावती रोड, वाडी, नागपूर-440023 या नाव आणि पत्त्यावर पाठविलेली नोटीस प्राप्त झाल्याची नोंदणीकृत डाकेची पोच निशाणी क्रं-14 वर दाखल आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त होऊनही ते न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी निवेदनही सादर केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 2 विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात मंचाने दि.19.11.2013 रोजी पारीत केला. 05. विरुध्दपक्ष क्रं -3 वाहन विक्रेता ताजश्री ऑटो, नागपूर तर्फे श्री नासीरखान गुलाम रसुल खान, सर्व्हीस मॅनेजर यांनी प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तर मंचा समक्ष सादर केले. विरुध्दपक्ष क्रं-3 वाहन विक्रेता यांचे उत्तरा नुसार प्रस्तुत तक्रार ही शुल्लक आणि मनःस्ताप देणारी असल्याने ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-26 अनुसार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याचे तक्रारी मध्ये विरुध्दपक्ष क्रं 3 यांचे कडून सेवा प्राप्त करताना त्रृटी झाल्याचे नमुद नाही तसेच विरुध्दपक्ष क्रं 3 विरुध्द नुकसान भरपाईची मागणी नाही. तक्रारकर्ता हा स्वच्छ हाताने मंचा समक्ष आलेला नाही. वाहनाच्या तांत्रिक स्पेसीफीकेशनच्या विपरीत म्हणजे युझर मॅन्युअल मध्ये प्रतिबंधीत सुचनेच्या विपरीत फेर बदल केला असल्याने वाहनाची वॉरन्टी संपुष्ठात आल्याची बाब लपविली आहे व त्या सर्व फेरबदलाने वाहनावरील पुष्परिणामासाठी विरुध्दपक्ष क्रं 3 जबाबदार राहू शकत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची मागणी अमान्य करण्यात येते. तक्रारकर्त्याने वाहनाची निर्मिती करणा-या कंपनीस प्रतिपक्ष केलेले नाही आणि म्हणून Non joinder of necessary party या एकमेव कारणास्तव तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्ता आणि तक्रारीतील नमुद व्यवहार हा नागपूर शहरातील असल्याने प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकार क्षेत्र वि.अतिरिक्त मंचास नाही. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज व्हावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 3 वाहन विक्रेता यांनी केली. 06. तक्रारकर्त्याने दस्तऐवज यादी नुसार विरुध्दपक्ष क्रं 3 ताजश्री ऑटो, नागपूर यांचे कडून वाहन खरेदी केल्या बाबतचे बिलाची प्रत, वाहनाचे नोंदणीचा दस्तऐवज, वि.प.क्रं 3 वाहन विक्रेत्याने, वि.प.क्रं 1 ला तक्रारकर्त्याचे वाहनाचे तक्रारी संबधाने पाठविलेल्या पत्राची प्रत, वि.प.क्रं 1 यांचा वाहन तपासणी अहवाल, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस, तक्रारकर्त्याचे नोटीसला वि.प.क्रं 1 ने दिलेले उत्तर अशा दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात. तसेच प्रतीउत्तरा दाखल प्रतिज्ञालेख सादर केला. 07.अ- विरुध्दपक्ष क्रं-1 ने लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर सादर केले व लेखी युक्तीवाद सादर केला. अन्य दस्तऐवज दाखल केले नाहीत. 07.ब- तर विरुध्दपक्ष क्रं 3 वाहन विक्रेता यांनी प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तर सादर केले व पुरसिस सादर करुन कळविले की, त्यांचे लेखी उत्तर हाच लेखी युक्तीवाद समजावा. अन्य दस्तऐवज दाखल केले नाहीत. 08. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री ए.आर.इंगोले यांचा तर विरुध्दपक्ष क्रं-1 तर्फे वकील श्री सोलट यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. 09. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 व 3 यांची प्रतिज्ञालेखा वरील स्वतंत्र लेखी उत्तरे, प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले असता, न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत-
मुद्दे उत्तर (1) विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी तक्रारकर्त्यास विक्री केलेल्या वाहनाचे टायर्स दोषपूर्ण पुरवून सेवेत त्रृटी ठेवल्याची बाब सिध्द होते काय?..................होय. (2) त्यासाठी कोण वि.प.जबाबदार आहे?.................. वि.प.क्रं-3 (3) काय आदेश?...................................................तक्रार अंशतः मंजूर. ::कारण मिमांसा ::
मु्द्दा क्रं 1 ते 3 बाबत- 10. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार त्याने विरुध्दपक्ष क्रं 3) ताजश्री ऑटो, नागपूर या वाहन विक्रेत्या कडून दि.19.04.2012 रोजी DOST LE BS-3 हे वाहन खरेदी केले. मंचा तर्फे येथे विशेषत्वाने नमुद करण्यात येते की, तक्रारकर्त्याने आपले तक्रारीमध्ये वि.प.क्रं 3 यांचा अशोक ले लॅन्ड डोस (एलसीव्ही) एलई ताजश्री ऑटो, डी-12,13,67 हिंगणा एम.आय.डी.सी.नागपूर असा उल्लेख केला आहे परंतु विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी निर्गमित केलेल्या दि.01.09.2012 रोजीचे पत्राचे प्रतीवरुन ताजश्री ऑटो, ऑथोराईज्ड डिलर्स अशोक ले लॅन्ड लाईट व्हेईकल, डी’12,13,67, हिंगणा, एमआयडीसी, नागपूर असे नमुद केले आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-3 यांचे नाव दि.01.09.2012 रोजीचे पत्रात नमुद केल्या प्रमाणे समजण्यात/वाचण्यात यावे. वाहनाचा नोंदणी क्रं: MH-40-Y-159 असा आहे. तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार सदर वाहनातील एम.आर.एफ. टॉयर क्रं-66326201112 आणि एम.आर.एफ.टॉयर क्रं-66596551312 या दोन टायरमध्ये हवा पकडल्यामुळे बबल्स तयार झालेत आणि सदरचा दोष हा उत्पादकीय दोष आहे. तक्रारकर्त्याने सदर दोषा संबधाने विरुध्दपक्ष क्रं 3 वाहन विक्रेता ताजश्री ऑटो नागपूर यांचेकडे दि.01.09.2013 रोजी तक्रार केली असता, त्यांनी विरुध्दपक्ष क्रं-1 सर्व्हीस इंजिनिअर, एम.आर.एफ.टॉयर्स, नागपूर यांना दि.01.09.2012 रोजी पत्र देऊन उपरोक्त नमुद क्रमांकाच्या दोन्ही टायर्समध्ये हवेचे बबल्स तयार झाल्यामुळे ते तपासणीसाठी पाठवून अहवाल देण्याचे नमुद केले. 11. विरुध्दपक्ष क्रं -3 वाहन विक्रेता ताजश्री ऑटो, नागपूर तर्फे लेखी उत्तरामध्ये वाहनाच्या तांत्रिक स्पेसीफीकेशनच्या विपरीत म्हणजे युझर मॅन्युअल मध्ये प्रतिबंधीत सुचनेच्या विपरीत फेर बदल केला असल्याने वाहनाची वॉरन्टी संपुष्ठात आल्याची बाब तक्रारकर्त्याने लपविली व त्या सर्व फेरबदलाने वाहनावरील पुष्परिणामासाठी विरुध्दपक्ष क्रं 3 जबाबदार राहू शकत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची मागणी अमान्य करण्यात येते. तक्रारकर्त्याने वाहनाची निर्मिती करणा-या कंपनीस प्रतिपक्ष केलेले नाही आणि म्हणून Non joinder of necessary party या एकमेव कारणास्तव तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्ता आणि तक्रारीतील नमुद व्यवहार हा नागपूर शहरातील असल्याने प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकार क्षेत्र वि.अतिरिक्त मंचास नाही. 12. यावर तक्रारकर्त्याने आपले प्रतीउत्तर प्रतिज्ञालेखावर मंचा समक्ष सादर करुन नमुद केले की, त्याने सदर वाहनाच्या तांत्रिक स्पेसीफीकेशन मध्ये युझर मॅन्युअल मध्ये प्रतिबंधीत सुचनेच्या विपरीत कोणताही फेरबदल केलेला नाही म्हणून वाहनाची वॉरन्टी संपुष्ठात आली असे म्हणणे चुकीचे आहे. सदर वाहनाचे टायरचे नुकसान हे त्यामधील उत्पादकीय दोषामुळे झाले आहे. 13. विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी मंचाचे अधिकार क्षेत्रा बाबत आक्षेप घेतलेला असल्याने प्रथम त्यावर विचार होणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 3 यांचे कडून वाहन खरेदी केलेले आहे आणि विरुध्दपक्ष क्रं 3 वाहन विक्रेता यांचे विक्री शोरुम हे हिंगणा, नागपूर या परिसरातील असून सदर हिंगणा क्षेत्र नागपूर लगत ग्रामीण क्षेत्रात मोडत असल्याने अतिरिक्त जिल्हा ग्राहक न्यायमंचास अधिकारक्षेत्र आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-3 यांचे सदरचे आक्षेपात कोणतेही तथ्य दिसून येत नाही. 14. विरुध्दपक्ष क्रं-3 वाहन विक्रेता यांचा आक्षेप असा आहे की, तक्रारकर्त्याने वाहनाची निर्मिती करणा-या कंपनीस प्रतिपक्ष केलेले नाही आणि म्हणून Non joinder of necessary party या एकमेव कारणास्तव तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. मूळात तक्रारकर्त्याची तक्रार ही वाहना सोबत संलग्न असलेल्या एम.आर.एफ.टायर्सशी संबधित मर्यादित आहे. अन्य वाहनातील सुटे भाग यांचे संबधीची तक्रारकर्त्याची तक्रार नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने एम.आर.एफ. टायर्स यांचेशी संबधित सर्व्हीस सेंटर म्हणजे विरुध्दपक्ष क्रं-1 ज्यांचे कार्यालय नागपूर येथे स्थित आहे त्यांना प्रस्तुत प्रकरणात प्रतिपक्ष केलेले आहे आणि विरुध्दपक्ष क्रं-1 हे एम.आर.एफ.टायर्सची निर्मिती करणा-या कंपनीचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी एम.आर.एफ.टायर्सचा तपासणी अहवाल दिलेला आहे. तक्रारकर्त्याचा संबध हा वाहन विक्रेत्याशी प्रत्यक्ष येत असल्यामुळे व तक्रारकर्त्याने वाहन विक्रेत्याशी व्यवहार केलेला असल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 3 यांचे सदर आक्षेपात कोणतेही तथ्य दिसून येत नाही. 15. विरुध्दपक्ष क्रं-1 एम.आर.एफ.टायर्स सर्व्हीस सेंटर, नागपूर यांचे अधिवक्ता श्री सोलट यांनी मौखीक युक्तीवादाचे वेळी असा युक्तीवाद केला की, एम.आर.एफ.टायर्स ही कंपनी अशोक ले लॅन्ड वाहन निर्माता कंपनीस प्रत्यक्षरित्या टायर्सचा पुरवठा करते आणि त्यामुळे त्यांचा तक्रारदार ग्राहकाशी कोणताही संबध येत नसल्याने ते नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. या संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, एम.आर.एफ.टायर्स कंपनी त्यांचे व्दारा निर्मित टायर्सचा पुरवठा प्रत्यक्ष्यरित्या वाहन निर्मिती करणा-या कंपनीस करते. टायर्स मध्ये काही दोष निर्माण झाल्यास त्यासाठी मुख्यतः निर्माता कंपनी जबाबदार असते आणि टायर्सची विक्री करणा-या विक्रेत्याचा प्रत्यक्ष ग्राहकाशी संबध येत असल्यामुळे ग्राहकास झालेल्या नुकसानीची भरपाई निर्माता कंपनी व्दारे भरपाइ मिळवून देण्यास विक्रेता जबाबदार आहे त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 एम.आर.एफ.टायर्स सर्व्हीस सेंटर नागपूर यांचा तक्रारकर्त्याशी कोणताही संबध येत नाही या वि.प.क्रं 1 यांचे अधिवक्ता श्री सोलट यांचे म्हणण्यात मंचास तथ्य वाटते. 16. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 3) ताजश्री ऑटो, नागपूर या वाहन विक्रेत्या कडून दि.19.04.2012 रोजी DOST LE BS-3 हे वाहन खरेदी केल्याचे बिलाची प्रत अभिलेखावर दाखल केली. वाहन खरेदी केल्या नंतर तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार सदर वाहनातील दोन टॉयर्स संबधीची आहे. सदर वाहनातील दोन टायरमध्ये हवा पकडल्यामुळे बबल्स तयार झालेत आणि सदरचा दोष हा उत्पादकीय दोष आहे. तक्रारकर्त्याने सदर दोषा संबधाने विरुध्दपक्ष क्रं 3 वाहन विक्रेता ताजश्री ऑटो नागपूर यांचेकडे सर्वप्रथम दि.01.09.2012 रोजी म्हणजे वाहन खरेदी केल्या पासून 04 महिने, 13 दिवसा नंतर तक्रार केली असता, त्यांनी विरुध्दपक्ष क्रं-1 सर्व्हीस इंजिनिअर, एम.आर.एफ.टॉयर्स, नागपूर यांना दि.01.09.2012 रोजी पत्र देऊन वादातील एम.आर.एफ. टॉयर क्रं-66326201112 आणि एम.आर.एफ.टॉयर क्रं-66596551312 या मध्ये बबल्स तयार झाल्यामुळे ते तपासणीसाठी पाठवून अहवाल देण्यास सांगितले. विरुध्दपक्ष क्रं -1 व क्रं-2 यांनी दि.27.09.2012 रोजीचे पत्र तक्रारकर्त्यास देऊन त्यामध्ये दि.03.09.2012 रोजी वाहनाचे टायरचे निरिक्षण केले असता टायरचे नुकसान हे टायरला लागलेल्या माराकडे र्दुलक्ष्य केल्यामुळे झाले असल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्यास सदरचा अहवाल अमान्य आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-3 वाहन विक्रेता यांचे दि.01.09.2013 रोजीचे पत्र आणि विरुध्दपक्ष क्रं 1 एम.आर.एफ.टायर्स यांचा दि.27.09.2012 रोजीचा तपासणी अहवाल हा अभिलेखावर दाखल केला आहे. 17. मंचाचे मते विरुध्दपक्ष क्रं -1 एम.आर.एफ.टायर्स, नागपूर तर्फे जे दि.27.09.2012 रोजीचे तपासणी अहवालाचे जे पत्र तक्रारकर्त्यास देण्यात आले तेच मूळात अतिशय त्रोटक स्वरुपाचे आहे. त्यामध्ये खालील मजकूर नमुद आहे-
“We have thoroughly inspected the subject item on 03.09.2012 and our inspection revealed that the same was damaged as a result of Run flat due to usage of the tyre after neglecting the injury caused by cuts. Tyre run under low inflation/No inflation”. 18. मंचाचे मते दोन्ही टायर्समध्ये हवेमुळे बबल निर्माण झाल्याची बाब विरुध्दपक्ष क्रं 3 वाहन विक्रेता यांनी स्वतः विरुध्दपक्ष क्रं-1 एम.आर.एफ. टायर्स सर्व्हीस सेंटर नागपूर यांना दिलेल्या दि.01.09.2012 रोजीचे पत्रातच मान्य केली आहे. तक्रारकर्त्याने दि.01.09.2012 रोजी वाहनातील दोन्ही टायर्स मध्ये हवेमुळे बबल निर्माण झाल्याची तक्रार जेंव्हा विरुध्दपक्ष क्रं 3 ताजश्री ऑटो, नागपूर वाहन विक्रेता यांचेकडे केली व त्यांना दोन्ही टायर्स दाखविले त्यावेळी विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी सुध्दा सदर वाहनाचे निरिक्षण केले, जर वाहनाचे दोन्ही टायर्सला मार लागलेला असता तर ही बाब त्याच वेळी विरुध्दपक्ष क्रं 3 वाहन विक्रेता यांचे लक्षात आली असती व त्यांनी तसा उल्लेख विरुध्दपक्ष क्रं-1 एम.आर.एफ. सर्व्हीस सेंटर नागपूर यांना दिलेल्या पत्रात केला असता परंतु असा उल्लेख सदरचे पत्रातून करण्यात आलेला नाही. 19. मंचाचे मते तक्रारकर्त्याने वाहन हे दि.19.04.2012 रोजी खरेदी केले आणि वाहनातील एम.आर.एफ. टॉयर क्रं-66326201112 आणि एम.आर.एफ.टॉयर क्रं-66596551312 या मध्ये हवेमुळे बबल्स तयार झाल्याची सर्व प्रथम तक्रार वाहन खरेदी केल्या पासून 04 महिने, 13 दिवसा नंतर केलेली आहे. कोणत्याही वाहनाचे टायरची वॉरन्टी ही सर्वसाधारणपणे एक वर्षासाठी असते आणि सदरचा दोष हा वॉरन्टी कालावधीत उदभवलेला आहे. टायर्सला कठीण तीक्ष्ण वस्तुने इजा झाली असती तर टायर्स हे फाटून भ्रष्ट झाले असते परंतु टायर्स मध्ये हवेचे बबल निर्माण झाल्याची तक्रारकर्त्याची तक्रार आहे आणि सदरचा दोष हा उत्पादकीय स्वरुपाचा दोष आहे. सर्वसाधारण व्यवहारात वाहन खरेदी केल्या नंतर जवळपास चार ते पाच वर्ष टायर व्यवस्थीत चालतात परंतु आमचे समोरील प्रकरणातील दोन्ही टायर्स मध्ये खरेदी पासून केवळ 04 महिने, 13 दिवसा नंतर हवेमुळे बबल्स निर्माण होऊन दोष निर्माण झाला. एवढया कमी कालावधीत टायर्समध्ये हवेमुळे बबल्स निर्माण होणे याचा अर्थ सदर टायर्स हे त्यात भरलेल्या हवेचा भार सोसण्यास सक्षम नाहीत. याचाच अर्थ सदरचा दोष हा उत्पादकीय दोष असल्याची बाब सिध्द होते.
20. या संदर्भात तक्रारकर्त्या तर्फे त्यांचे अधिवक्ता यांनी खालील नमुद मा. वरिष्ठ न्यायालयांचे निकालपत्रांवर आपली भिस्त ठेवली.
I (2011) CPJ 85 Union Territory State Consumer Disputes Redressal Commission, Chandigarh. United Auto Centre -V/s- Gurpeet Singh Consumer Protection Act, 1986-Goods-Damaged-Warranty period-Replacement-Complainant purchased four tyres from OP-Tyres got damaged during warranty period-Engineer for inspection was called-Shape of tyres spoiled-OP did not replace tyres-District Forum allowed complaint and directed OP to replace tyres-Compensation awarded-Hence appeal-OP liable to replace tyres as purchased from dealer-Tyres in warranty period-Duty of OP to inform manufacture and get tyres replaced- Order of For a below upheld. ****** IV (2008) CPJ 153 Union Territory State Consumer Disputes Redressal Commission, Chandigarh. Ceat Limited -V/s- Dhiman Earth Developer Company Consumer Protection Act, 1986-GoodsManufacturing defect-Tyres damaged, went out of order within warranty-Not replaced-New tyres purchased by complainant-Complaint allowed by Forum-Refund of cost of new tyres with interest directed, costs awarded-Hence appeal-Manufacturing defect in tyres proved-Tyres damaged within warranty, complaint maintainable even if complainant’s firm carrying on commercial activities-Order of District Forum upheld. ****** मा. आयोगाचे उपरोक्त नमुद निकालपत्रां मध्ये वॉरन्टी कालावधीत खरेदी केलेल्या टायर्स मध्ये काही दोष निर्माण झाल्यास टायरची विक्री करणा-या विक्रेत्याने संबधित वाहनाचे उत्पादक कंपनीशी संपर्क साधून ग्राहकास टायर बदलवून देणे हे विक्रेत्याचे कर्तव्य ठरते असे प्रतिपादीत केलेले आहे. मा.आयोगाचे सदरचे दोन्ही निवाडे आमचे समोरील प्रकरणात तंतोतंत लागू पडतात कारण आमचे समोरील तक्रारीमध्ये वॉरन्टी कालावधीत टायर्स मध्ये हवेचे बबल्स निर्माण होऊन दोष निर्माण झालेला आहे. 21. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 3 ताजश्री ऑटो, वाहन विक्रेता, नागपूर यांचे कडून सदर दोन्ही टायर्स बदलवून मिळण्यास वा दोन्ही टायर्सची किंमत परत मिळण्यास पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 यांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्ता शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-3000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-3000/- मिळण्यास पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 हे एम.आर.एफ.टायर्स कंपनीचे सर्व्हीस सेंटर असून त्यांनी फक्त टायर्सची पाहणी करुन अहवाल दिलेला आहे एवढाच त्यांचा मर्यादित सहभाग असल्याने त्यांना दोषी धरता येणार नाही म्हणून वि.प.क्रं 1 यांना मुक्त करण्यात येते. विरुध्दपक्ष क्रं 2 महालक्ष्मी एजन्सीज, नागपूर यांचा तक्रारकर्त्याशी प्रत्यक्ष्य कोणताही संबध प्रस्थापित होत नसल्याने त्यांना मुक्त करण्यात येते. म्हणून मुद्दा क्रं 1 ते 3 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविलेले आहे. त्यावरुन प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. ::आदेश:: तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 3 वाहन विक्रेता, ताजश्री ऑटो, नागपूर यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना प्रस्तुत तक्रारीतून मुक्त करण्यात येते. 1) विरुध्दपक्ष क्रं 3 वाहन विक्रेता, ताजश्री ऑटो, नागपूर यांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास त्याने खरेदी केलेल्या DOST LE BS-3 नोंदणी क्रं : MH-40-Y-159 वाहनातील उत्पादकीय दोष असलेले एम.आर.एफ. टॉयर क्रं- 66326201112 आणि एम.आर.एफ.टॉयर क्रं-66596551312 बदलवून देऊन त्याऐवजी नविन चांगल्या प्रतीचे दोन एम.आर.एफ. टायर्स द्दावेत व नविन टॉयर्सचे बिल देऊन त्यावर नव्याने वॉरन्टी संबधीचे दस्तऐवज तक्रारकर्त्यास द्दावेत. तक्रारकर्त्यास निर्देशित करण्यात येते की, त्याने सदर वाहनातील टॉयर्सचे बदला संबधाने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त होताच विरुध्दपक्ष क्रं-3 विक्रेता यांचेशी संपर्क साधून त्यांना योग्य ते सहकार्य करावे. विरुध्दपक्ष क्रं- 3 विक्रेता यांना वाहनाचे टायर्स बदलवून देणे शक्य नसल्यास त्यांनी सदर वाहनाचे एम.आर.एफ.टायर क्रं-66326201112 आणि एम.आर.एफ.टॉयर क्रं-66596551312 ची वाहन खरेदीचे दिनांकास म्हणजे दि.19.04.2012 रोजी असलेली किंमत तक्रारकर्त्यास अदा करावी. 2) विरुध्दपक्ष क्रं- 3 वाहन विक्रेता यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रु.-3000/-(अक्षरी रु. तीन हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रु.-3000/-(अक्षरी रु.तीन हजार फक्त) द्दावेत. 3) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं -3 वाहन विक्रेता यांनी निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे. 4) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |