न्यायनिर्णय
(द्वारा श्री. म.य. मानकर - मा.अध्यक्ष )
1. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून इमू पक्षी विकत घेतले होते. त्याकरीता तक्रारदारांनी बँकेकडून थोडे कर्ज घेतले होते. परंतु सामनेवाले यांनी कराराप्रमाणे विकत घेतलेल्या अंडयांचे पैसे दिले नाहीत. पहिल्या वर्षी विकत घेतलेल्या इमू पक्षांचे अंडयांकरीता दिलेले धनादेश वटले नाही. म्हणून ही तक्रार दाखल करण्यात आली. सामनेवाले यांना नोटीस पाठविण्यात आली. दि. 15/09/2014 च्या रोजनाम्याप्रमाणे सामनेवाले यांचे लेखी म्हणण्याशिवाय तक्रार पुढे चालविण्याचे आदेश पारीत करण्यात आले. तक्रारदार यांनी दि. 20/02/2015 रोजी अर्ज करुन तक्रारीसोबत दाखल करण्यात आलेले शपथपत्र हेच पुराव्याचे शपथपत्र समजण्यात यावे अशी पुरसिस दाखल केली. तक्रारदारांनी निवेदन केले की त्यांना लेखी युक्तीवाद दाखल करावयाचा नाही. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. सामनेवाले या प्रकरणात केव्हाही उपस्थित झाले नाहीत.
2. तक्रारदार हे मोबदला मिळण्यास पात्र आहेत काय? हे पाहणे आवश्यक आहे. तक्रारदार हा सामान्य शेतकरी आहे व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी इमू पक्षी पालनाचा व्यवसाय सुरु केला. त्याकरीता त्यांना दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा चिंचणीकडून रु. 5,10,000/- चे कर्ज घेतले व स्वतः रु. 1,80,000/- मोजून एकूण पक्षांच्या 30 जोडया विकत घेतल्या. त्याकरीता तक्रारदार व सामनेवालेमध्ये करार झाला. त्याची प्रत अभिलेखावर दाखल आहे. कराराप्रमाणे सामनेवाले हे तक्रारदाराकडून रु. 1,700/- प्रती अंडी याप्रमाणे 3 वर्षांकरीता विकत घेणार होते. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सन 2010-11 मध्ये 117 अंडी सामनेवाले यांना दिली. त्याची किंमत रु. 1,98,900/- होती. सामनेवाले यांनी धनादेश दिले होते ते वटले नाही. धनादेशाच्या प्रती अभिलेखावर दाखल आहेत. सन 2011-12 मध्ये 321 व सन 2012-13 मध्ये 409 अंडी सामनेवालेस देण्यात आली.
3. सामनेवाले यांनी इमू पक्षी विकतांना करार केला होता व तीन वर्षे अंडी घेण्याची हमी दिली होती. तसेच इतर सेवा देण्याचे मान्य केले होते. परंतु नंतर ती पूर्ण केली नाही. अंडी घेतली परंतु पैसे दिले नाही. तक्रारदार यांनी पक्षी विकत घेण्याकरीता व्याजाने बँकेकडून कर्ज घेतले. बँकेकडून प्राप्त झालेली नोटीस अभिलेखावर आहे. याप्रमाणे पक्षी विकतांना अंडी घेण्याची हमी दिली होती. त्याची पूर्तता न केल्याने सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथा अवलंबली असे म्हणता येईल व सेवा प्रदान करण्यात कसूर केली असे म्हणता येईल.
4. तक्रारदार यांनी मागणी केलेल्या रकमेचा तपशिल तक्रारीत दिलेला आहे. झालेल्या नुकसानीकरीता रु. 13,07,550/-, व्याजाकरीता रु. 67,345/-, मानसिक त्रासाकरीता रु. 30,000/- असे एकूण रु. 14,04,895/- ची मागणी केली आहे. तक्रारदार यांचा पुरावा अबाधित आहे. ते मान्य न करण्याचे काही कारण दिसत नाही. तक्रारदार यांनी दिलेल्या विवरणावरुन त्यांचे रु. 13,08,550/- चे नुकसान झाले आहे. तक्रारदार यांनी व्याज कसे आकारले ते स्पष्ट होत नाही. तक्रारदार यांना एकूण रकमेवर व्याज देता येऊ शकेल.
5. तक्रारदार यांनी ही तक्रार इमू लाईफ इंडिया, आय.एन.सी. कंपनी व श्री. विश्वास घोलप व अन्य तीन जणांविरुध्द दाखल केली आहे. परंतु त्यांनी तक्रारीमध्ये इतर तीन इसमांचे संपूर्ण नांव दिलेले नाहीत. त्यामुळे आमच्यामते तक्रारीत नमूद दोन जणांचे नावांविरुध्दच आदेश पारीत करता येईल. सामनेवाले यांनी दिलेल्या धनादेशावर इमू लाईफ इंडिया, आय.एन.सी. कंपनी ही स्वामित्व संस्था दाखविली आहे. परंतु मालकाचे नांव धनादेशावर किंवा करारपत्रावर स्पष्टपणे नमूद नाही. वरील चर्चेनुसार व निकषानुसार आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोतः
आ दे श
1. तक्रार अंशतः मान्य करण्यात येते.
2. सामनेवाले इमू लाईफ इंडिया, आय.एन.सी. कंपनी व श्री. विश्वास घोलप यांनी सेवा देण्यात कसूर केली व अनुचित व्यापार पध्दत अवलंबिली असे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले इमू लाईफ इंडिया, आय.एन.सी. कंपनी व श्री. विश्वास घोलप यांनी वैयक्तीकरित्या किंवा संयुक्तीकरित्या तक्रारदारास रु. 13,08,550/-, तक्रार दाखल दि. 05/04/2013 पासून 15% द.सा.द.शे. व्याजदराने दि. 31/07/2015 च्या आंत अदा करावे. तसे न केल्यास दि. 01/08/2015 पासून सदर रकमेवर 18% व्याज अदा करेपर्यंत लागू राहिल.
4. तक्रारदार यांना इमू लाईफ इंडिया, आय.एन.सी. कंपनी व श्री. विश्वास घोलप यांनी वैयक्तीकरित्या किंवा संयुक्तीकरित्या मानसिक त्रासापोटी रु. 20,000/- दि. 31/07/2015 पर्यंत अदा करावेत. अदा न केल्यास त्यावर दि. 01/08/2015 पासून 12% व्याज रक्कम अदा करेपर्यंत लागू राहिल.
5. आदेशाच्या प्रती उभय पक्षांना निःशुल्क पाठविण्यात याव्यात.