(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर पी. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 22 सप्टेंबर 2016)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. ही तक्रार विरुध्दपक्ष इफ्को टोकीओ जनरल इंशुरन्स कंपनीच्या विरुध्द सेवेतील कमतरता संबंधी दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. विरुध्दपक्ष क्र.1 ही विमा कंपनीची प्रमुख शाखा असून, विरुध्दपक्ष क्र.2 ही नागपूर येथील शाखा कार्यालय आहे. तक्रारकर्त्याचा मय्यत मुलगा हा LMV पिकअप व्हॅनचा मालक होता आणि त्याच्या गाडीचा नोंदणी क्रमांक MH-36-F-1722 असा होता. ही गाडी विरुध्दपक्षा मार्फत दिनांक 20.7.2012 ते 19.7.2013 या कालावतीकरीता विमाकृत केलेली होती. गाडीत बसण्याची क्षमता 4 लोकांची होती. दिनांक 10.3.2013 ला त्या गाडीला अपघात झाला, त्यावेळी तक्रारकर्त्याचा मुलगा गाडी चालवीत होता व अपघातात त्याचे निधन झाले. त्यावेळी तक्रारकर्त्याचे मुला व्यतिरिक्त आणखी एक ईसम गाडीतून प्रवास करीत होता. अपघातात झालेल्या गाडीच्या नुकसानीबद्दल तक्रारकर्त्याने विमा दिनांक 21.3.2013 ला क्लेम फॉर्म विरुध्दपक्षाकडे दाखल केला आणि नुकसानीची सुचना दिली. विरुध्दपक्षाने दिनांक 30.7.2013 च्या पञाव्दारे तक्रारकर्त्याला कळविले की, अपघाताचेवेळी त्या गाडीमध्ये नियमाविरुध्द 3 ईसम बसले होते आणि म्हणून त्याचा दावा बंद करण्यात आला. सबब, या तक्रारीव्दारे गाडीची IDV रुपये 4,12,301/-, 24 टक्के व्याज दराने मागितली असून त्याशिवाय नुकसान भरपाई, तक्रार खर्च मागितला आहे.
3. दोन्ही पक्षास मंचाची नोटीस मिळून हजर झाले व निशाणी क्र.10 खाली लेखी जबाब सादर केला. त्यांच्या जबाबानुसार सदर गाडी चोलामंडलम् इन्वेस्टमेंटस् अॅन्ड फायनान्स कंपनी लिमिटेड यांचेकडे गहाण होते आणि म्हणून पॉलिसी अंतर्गत मिळाणा-या रकमेवर त्या कंपनीचा पहिला चार्ज आहे. ती कंपनी आवश्यक प्रतीपक्ष आहे, परंतु तिला या प्रकरणात सामिल न केल्यामुळे ही तक्रार खारीज करण्याची विनंती केली. सदर गाडीचा विमा आणि गाडीचा झालेला अपघात हा मान्य करुन पुढे असे नाकबूल केले आहे की, घटनेच्या वेळी केवळ दोन ईसम त्या गाडीत बसले होते. वस्तुस्थिती अशी आहे की, त्या गाडीत एकूण तीन ईसम घटनेच्या वेळी गाडीत बसले होते आणि त्या अपघातामध्ये तिघानांही गंभीर दुखापत झाली होती. विरुध्दपक्षाने हे मान्य केले आहे की, घटनेची सुचना त्यांना प्रथम दिनांक 21.3.2013 ला देण्यात आली, त्याचदिवशी विमा दावा दाखल करण्यात आला. पॉलिसीच्या शर्तीनुसार विमाकृत गाडीला झालेल्या नुकसानीची सुचना पोलीस आणि विरुध्दपक्षाला देणे गरजेचे होते, परंतु त्याप्रमाणे तशी सुचना देण्याकरीता 11 दिवसांचा विलंब झाला असून त्यामुळे घटनास्थळाची तपासणी करण्याचा विरुध्दपक्षाचा हक्क नष्ट झाला. तसेच गाडीमध्ये नियमांविरुध्द जास्त ईसम बसलेले होते. या सर्व कारणास्तव विमा दावा कायद्यानुसार योग्यरितीने फेटाळण्यात आला. सबब, ही तक्रार खारीज व्हावी अशी विनंती करण्यात आली.
4. दोन्ही पक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच अभिलेखावरील दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
5. प्रकरणातील अभिलेखावर दोन रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट दाखल आहे. एका सर्टीफिकेट मध्ये गाडीची बसण्याची क्षमता चालक धरुन दोन दाखविली आहे आणि दुस-या सर्टीफिकेट मध्ये गाडीची बसण्याचे क्षमते बद्दल उल्लेख केलेला नाही. दोन्ही सर्टीफिकेट तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या आहेत. ती गाडी पिकअप LMV होती. विमा पॉलिसीच्या शर्तीनुसार जर त्या गाडीचा उपयोग प्रवासी वाहून नेण्यासाठी करण्यात येत असेल तर विमा पॉलिसीचा लाभ मिळणार नव्हता. तक्रारकर्त्याने असे म्हटले आहे की, अपघाताच्या वेळी त्याचा मय्यत मुलगा आणि एक ईसम त्या गाडीतून जात होते, परंतु आमच्या असे निदर्शनास आणून देण्यात आले की, त्या गाडीमध्ये एकूण तीन ईसम बसले होते, हे सिध्द करण्यासाठी आमचे लक्ष तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या एफ.आय.आर. मध्ये वेधण्यात आले. एफ.आय.आर. मध्ये असे नमूद केले आहे की, त्या गाडीत तक्रारकर्त्याच्या मय्यत मुला व्यतिरिक्त आणखी दोन ईसम ज्याचे नांव त्यात दिलेले आहे त्या गाडीतून प्रवास करीत होते, अपघातात त्यांना दुखापत झाली होती. यावरुन हे सिध्द होते की, अपघाताच्या वेळी त्या गाडीमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा जास्त ईसम प्रवास करीत होते, त्यामुळे तक्रारकर्त्याचे म्हणणे खोटे ठरते. मंजूर क्षमतेपेक्षा जास्त ईसम जर गाडीतून प्रवास करीत असेल तर तो विमा पॉलिसीतील शर्तीचा भंग होत नाहीतर रजिस्ट्रेशन सर्टीफिकेटचा सुध्दा भंग होतो. हे खरे आहे की, विमा पॉलिसीमध्ये गाडीची बसण्याची क्षमता 4 दाखविली आहे. विमा रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट मध्ये बसण्याची क्षमता दोन दाखविली आहे, त्यावर विश्वास ठेवतो. पॉलिसीमध्ये गाडीतील बसण्याचे क्षमतेबद्दल एकतर चुकीची माहिती देण्यात आली असावी किंवा लिहिण्यात काहीतरी चुक झाली असावी. याबाबत रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट महत्वाचे विश्वासार्ह दस्ताऐवज असतो.
6. विरुध्दपक्षाचा दुसरा आक्षेप गाडीला झालेला नुकसानीची सुचना ताबडतोब न देता 11 दिवसांचे विलंबाने देण्यात आली असा आहे. त्यामुळे सुध्दा पॉलिसीच्या शर्तीचा भंग झालेला आहे, त्यामुळे विरुध्दपक्षाला नुकसान भरपाई देणे लागत नाही. या संबंधीचा कायदा पूर्णपणे प्रस्थापित झाला असून विमाकृत झालेल्या नुकसानीची सुचना संबंधीत विमा कंपनीला नुकसान भरपाई मिळण्यासाठी ताबडतोब देणे अनिवार्य असते, अन्यथा कंपनी ती देण्यास बाध्य राहू शकत नाही.
7. वरील कारणास्तव आम्हांला ही तक्रार मंजूर होण्या लायक दिसत नाही. विरुध्दपक्षाने दावा फेटाळून कुठलिही चुक केली नाही किंवा सेवेत कमतरता ठेवली असे सुध्दा म्हणता येत नाही, कारण त्याने तो दावा अपघाताची सुचना विलंबाने देवून शर्तीचा भंग केला. तसेच गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेले या कारणास्तव कायदेशिररित्या फेटाळला आहे. सबब, तक्रार खारीज करण्यात येते व खालील प्रमाणे आदेश देण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 22/09/2016