Dated the 21 Feb 2015
न्यायनिर्णय
द्वारा- श्री.ना.द.कदम...................मा.सदस्य.
1. सामनेवाले नं.1 ही वाहन विक्री तसेच वाहन दुरुस्ती देखभाल पुरविणारी खाजगी मालकीची संस्था आहे. सामनेवाले नं.2 हे त्या संस्थेचे वरीष्ठ व्यवस्थापक आहेत. तक्रारदार हे कल्याण येथील रहिवाशी आहेत. तक्रारदारांनी सामनेवाले यांजकडे, दुचाकी वाहन सर्व्हिसिंगसाठी दिल्याच्या बाबीमधुन प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदार यांच्या कथनानुसार त्यांनी सामनेवाले यांजकडून विकत घेतलेले वाहन नेहमीच ते सामनेवाले यांजकडे नियमितपणे सर्व्हिसिंगसाठी देत असत. त्यानुसार ता.25.09.2008 रोजी, त्यांनी त्यांचे वाहन सर्व्हिसिंग तसेच बोल्ट बदलण्यासाठी दिले व सामनेवलो यांनी सर्व्हिसिंग पुर्ण करुन त्याचदिवशी वाहन परत देण्याचे मान्य केले. तक्रारदार वाहन घेण्यासाठी सामनेवाले यांजकडे गेले असता तक्रारदारांच्या वाहनाचे इंजिन पुर्णतः खराब झाले असुन त्यासाठी रु.12,500/- खर्च करावा लागेल असे सांगितले. तक्रारदारांच्या कथनानुसार, त्यांनी त्यांचे वाहन सुस्थितीमध्ये असतांना व केवळ बोल्ट बदलण्यासाठी व सर्व्हिसिंगसाठी दिले असतांना, शिवाय याबाबतची नोंद सामनेवाले यांनी जॉब कार्डवर घेतली असतांना, सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या वाहनाचे इंजिन त्यांच्या संमतीशिवाय उघडून इंजिन नादुरुस्त असल्याची बाब वाईट हेतुने उपस्थित केली. त्यावर तक्रारदारांनी आक्षेप घेऊन त्यांचे वाहन सर्व्हिसिंगसाठी दिलेल्या स्थितीत करुन दयावे अथवा नवीन वाहन दयावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तथापि, सामनेवाले यांनी कोणतीही कृती न केल्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्यांच्या वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन मिळावे, रु.50,000/- नुकसानभरपाई व रु.20,000/- तक्रार खर्च मिळावा अशा मागण्या केल्या आहेत.
3. सामनेवाले यांनी कैफीयत दाखल करुन, तक्रारदारांचे सर्व आक्षेप फेटाळतांना असे नमुद केले आहे की, तक्रारदारांनी तक्रारीमध्ये काही महत्वाचा तपशिल व महत्वाची कागदपत्रे यांचा संदर्भ लपवुन वाईट हेतुने तक्रार दाखल केली आहे. सामनेवाले यांच्या कथनानुसार तक्रारदारांनी सामनेवाले कडून विकत घेतलेल्या विवादित वाहनाची वॉरंटी व मोफत सर्व्हिसिंगची मर्यादा संपल्यानंतर तक्रारदारांनी पेड सर्व्हिसिंगसाठी त्यांची दुचाकी ता.24.09.2008 रोजी सामनेवाले यांचेकडे जमा केले. त्यानुसार, त्या वाहनाचे जॉबकार्ड क्रमांक-2937 बनविण्यात आले, व त्यावर तक्रारदारांनी आपली स्वाक्षरी केली. सदर वाहन सर्व्हिसिंग पश्च्यात त्याच दिवशी तक्रारदार घेऊन गेले नाहीत. तथापि, ता.25.09.2009 रोजी ते घेऊन गेले. यानंतर,काही कालावधीनंतर तक्रारदारांनी ते वाहन टेम्पोमधुन त्याचदिवशी पुन्हा सामनेवाले यांचेकडे आणले व इंजिन पुर्णपणे बंद झाल्याचे नमुद केले. त्यानुसार, सामनेवाले यांनी क्वीक सर्व्हिस (Quick Service) जॉब कार्ड क्रमांक-3818 बनविले व त्यावर तक्रारदारांची स्वाक्षरी घेण्यात आली. वाहनाची स्थिती विचारात घेऊन संबंधीत तंत्रज्ञाने तक्रारदारास दुस-या दिवशी इंजिन उघडण्याच्या वेळी हजर राहण्यास सांगितले. दुस-या दिवशी तक्रारदारांच्या समक्ष त्यामध्ये इंजिन ऑईल नसल्याने व त्यामुळे इंजिन नादुरुस्त झाल्याने ते दुरुस्ती करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्यावर तक्रारदारांनी खर्चाची अंदाजे रक्कम सांगण्याची मागणी केली. तथापि, इंजिन पुर्णतः उघडल्यानंतरच त्याचा अंदाज करता येईल असे त्यांना सांगितले. मात्र तक्रारदारांनी वॉरंटी कालावधीमध्येच इंजिन नादुरुस्त झाल्याने ते वॉरंटी मध्येच दुरुस्त करुन देण्याची मागणी केली. परंतु वाहनाचा वारंटी कालावधी संपल्याचे तक्रारदारांच्या वारंवार निदर्शनास आणुन दिले. यानंतर तक्रारदार सामनेवाले यांचेकडे कधीच आले नाहीत व अंतिमतः त्यांनी ता.20.01.2009 रोजी नोटीस पाठवुन त्यामध्ये काही खोटे आरोप केले. त्यास सामनेवाले यांनी ता.10.02.2009 रोजी उत्तर देऊन सर्व बाबी फेटाळल्या. तक्रारदार यांनी यानंतर प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. सामनेवाले यांनी असेही कथन केले आहे की, तक्रारदारांनी ता.12.11.2008 रोजी याच बाबीवर तक्रार क्रमांक-482/2008 याच मंचात दाखल केली होती व ही तक्रार “नॉट प्रेसींग” असा अर्ज देऊन परत घेतली व तक्रार परत घेतल्यानंतर ता.20.01.2009 रोजी उपरोक्त नमुद नोटीस सामनेवाले यांनी दिली. उपरोक्त नमुद बाबींचा तक्रारदारांनी तक्रारीमध्ये कुठेही उल्लेख न करताच खोटया बाबींच्या आधारे तक्रार दाखल केली असल्याने ती फेटाळण्यात यावी.
4. तक्रारदार व सामनेवाले यांनी पुरावा शपथपत्रे व लेखी युक्तीवाद दाखल केला. ता.16.02.2015 रोजी प्रकरण तोंडी सुनावणीसाठी ठेवले असता, उभयपक्षांनी तोंडी युक्तीवाद न करता, लेखी युक्तीवाद हाच तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा असे निवेदन केले. प्रस्तुत मंचाने उभय पक्षांची फ्लीडिंगज तसेच उभयपक्षांनी शपथपत्राव्दारे दाखल केलेली कागदपत्रे यांचे वाचन केले. त्यावरुन खालील प्रमाणे निष्कर्ष काढण्यात येत आहेत.
अ. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेल्या महत्वाच्या कागदपत्रांमध्ये काही भिन्नता आढळून येतात. तक्रारदारांच्या कथनानुसार, त्यांनी ता.25.09.2008 रोजी क्वीक सर्व्हिस जॉबकार्ड क्रमांक-3518 (अनेक्चर सी-3 पृ.क्र.29) अन्वये, आपले दुचाकी वाहन सामनेवाले यांचेकडे बोल्ट बसविण्यासह इतर सर्व्हिसिंगसाठी सादर केले. सदर जॉबकार्डनुसार आणि त्याचदिवशी सामनेवाले यांनी तक्रार केलेल्या टॅक्स इन्व्हाईस क्रमांक-9273 (अनेक्चर सी-3 पृ.क्र.28) मधील तपशिलानुसार, सदर टॅक्स
इन्व्हाईसमध्ये इंजिनमधील बिघाडाबाबत कुठेही उल्लेख नाही. तक्रारदारानुसार,इंजिनमधील बिघाडाची बाब ही सामनेवाले यांनी ता.25.09.2008 रोजी तक्रार डिलीव्हरी घेण्यासाठी आले असता खोटेपणाने उपस्थित केली आहे.
ब. तक्रारदाराच्या उपरोक्त कथना संदर्भात, तक्रारदारांनी (अनेक्चर सी-3 पृ.क्र.28 व 29) शपथपत्राव्दारे तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे सुक्ष्म निरीक्षण केले असता स्पष्ट होते की,तक्रारदारांनी त्यांचे दुचाकी वाहन सामनेवाले यांचेकडे रेग्युलर जॉब कार्ड नं.2937 अन्वये सामनेवाले यांचेकडे सर्व्हिसिंग व इतर दुरुस्तीसाठी जमा केले होते. परंतु या जॉबकार्डचा तक्रारदारांनी कुठेही उल्लेख केला नाहीच, शिवाय यासंदर्भात सामनेवाले यांनी सदर जॉबकार्ड आपल्या कैफीयतीसोबत शपथपत्राव्दारे दाखल केल्यानंतर, सुध्दा त्याबाबत त्यांच्यावर कोणतेही भाष्य केले नाही.
यासंदर्भात सामनेवाले यांनी दाखल केलेल्या रेग्युलर जॉबकार्ड क्रमांक-2937 व टॅक्स इन्व्हाईस क्रमांक-9273 यांचे अवलोकन केले असता असे स्पष्टपणे आढळून येते की, तक्रारदार यांनी त्यांचे वाहन ता.24.09.2008 रोजी रेग्युलर जॉबकार्ड क्रमांक-2937 अन्वये पेड सर्व्हिससाठी तसेच नटबोल्ट, आरआर ब्रेक शु इत्यादिसाठी दुपारी-02.30 वाजता सामनेवाले यांच्याकडे जमा केले. सदर जॉबकार्डवर तक्रारदारांची सही आहे. सदर वाहनाची दुरुस्ती/ सर्व्हिस पश्च्यात त्याचदिवशी सायंकाळी 06.30 वाजता देण्याचे उभयपक्षी संमत झाले होते. सदर सर्व्हिसिंगचे इन्व्हाईस क्रमांक-9273 (जॉब नंबर-2937 रु.314/-, ता.25.09.2008 रोजी बनविण्यात आले. सदर इन्व्हाईसवर तक्रारदारांनी स्वतःची सही करुन, त्यामधील तपशील मान्य असल्याचे सुचित केले. सदर इन्व्हाईसच्या तळाशी गेटपास असुन जॉबकार्ड नंबर-2937 प्रमाणे सर्व्हिसिंग केलेल्या वाहनाचा ताबा, वाहन समाधानकारकरित्या सर्व्हिसिंग केल्याचे मान्य करुन स्विकारुन त्या प्रीत्यर्थ त्यांनी स्वतःची स्वाक्षरी केली आहे. म्हणजेच ता.24.09.2008 रोजी सर्व्हिसिंग करण्यासाठी, जॉबकार्ड क्रमांक-2937 अन्वये दाखल केलेले वाहन, तक्रारदारांनी ता.25.09.2008 रोजी स्विकारले. तथापि, सदर बाब तक्रारदारांनी मंचापासुन लपवुन त्यांनी त्यांचे वाहन ता.25.09.2008 रोजी क्वीक सर्व्हिस जॉबकार्ड नंबर-3518 अन्वये प्रथमतः दाखल केल्याचे भासवुन त्या जॉबकार्डच्या संबंधी सर्व्हिसिंगचा तपशील इन्व्हाईस क्रमांक-9273 बाबींशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि इन्व्हाईस क्रमांक-9273 मधील काम हे ता.24.09.2008 रोजीच्या जॉबकार्ड नंबर-2937 बाबी संबंधी असल्याने तक्रारदारांनी नमुद केलेल्या उपरोक्त बाबी व कथने सपशेल चुकीची व खोटी असल्याचे स्पष्ट होते.
क. परिच्छेद ब मध्ये नमुद केल्यानुसार जॉबकार्ड क्रमांक-2937 (ता.24.09.2008) व इन्व्हाईस क्रमांक-9273 (ता.25.09.2008) अन्वये रु.314/- चे अधिदान करुन ता.25.09.2008 रोजी गेटपासवर सही करुन सर्व्हिसिंग केलेल्या वाहनाचा ताबा घेतल्याचे स्पष्ट होते व यानंतर त्याचदिवशी ते वाहन तक्रारदारांनी इंजिन बंद झाल्याने सामनेवाले यांचेकडे क्वीक सर्व्हिस जॉबकार्ड नं.3518 अन्वये ता.25.09.2008 पुन्हा जमा केल्याचे, सदर जॉबकार्डवरील तपशिलावरुन स्पष्ट होते. सदर वाहन दुरुस्तीनंतर त्याचदिवशी देण्याचे सामनेवाले यांनी मान्य केले होते. तथापि क्वीक सर्व्हिस जॉबकार्ड मधील इंजिन बंद झाले बाबतचा तपशिल आपल्या सोयीनुसार लपवुन ठेवला.
ड. तक्रारदार यांनी या तक्रारी पुर्वी याच बाबी संबंधी ता.11.12.2008 रोजी तक्रार क्रमांक-482/2008 दाखल केली होती. यासंबंधी तक्रारदारांनी ही तक्रार मागे घेतल्याची बाब सामनेवाले यांनी निदर्शनास आणली आहे. तथापि, तक्रारदारांनी सदर बाब तक्रारीमध्ये नमुद करणे आवश्यक होते, तसेच तक्रार मागे का घेतली याबाबत सविस्तर कारण नमुद करणे आवश्यक होते. तथापि, तक्रारदार यांनी सदर बाबी नमुद करण्याचे टाळल्यामुळे तक्रारदार, स्वच्छ हाताने मंचापुढे आलेले नाही हे दिसुन येते.
इ. तक्रारदारांच्या दुचाकी वाहनाची वॉरंटी संपल्यामुळे तक्रारदारांनी ता.24.09.2008 रोजीच्या जॉबकार्ड अन्वये त्यांनी पेडसर्व्हिस घेतली आहे व ही बाब तक्रारदार यांनी त्या जॉबकार्डवर तसेच टॅक्स इन्व्हाईस नं.9273 मधील रक्कम अदा करुन मान्यही केली आहे. तक्रारदार यांनी ता.24.09.2008 रोजी सर्व्हिसिंगसाठी जमा केलेले वाहन ता.25.09.2008 रोजी ते घेऊन गेले व त्याचदिवशी सायंकाळी इंजिन बिघाडासाठी पुन्हा Quick Jab Card No.3518 अन्वये जमा केल्याचे दिसुन येते. तक्रारदारांच्या वाहनाची वॉरंटी संपली असल्याने, त्यांनी इंजिन दुरुस्ती स्वखर्चाने करणे आवश्यक होते. परंतु इंजिन बिघाडाचा सामनेवालेवर दोषारोप केल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसुन येते. सामनेवाले यांनी सुध्दा हीच बाब कागदपत्रा आधारे नमुद केली आहे. सामनेवाले यांनी आपल्या कथनाच्या पुष्टयर्थ दाखल केलेली कागदपत्रे व त्यामधील तपशिलाबाबत तक्रारदारांनी कोणताही उल्लेख अथवा भाष्य केले नसल्याने सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या वाहन सर्व्हिसिंग / दुरुस्तीसंबंधी कसुरदार सेवा दिली ही बाब सिध्द होत नाही.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश :
1. तक्रार क्रमांक-190/2009 खारीज करण्यात येते.
2. खर्चाचा आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.