निकालपत्र
(दिनाक 17-07-2015 )
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार हा इलेक्ट्रीकलचे दुकान चालवून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. अर्जदारास मोबाईलची आवश्यकता असल्याने अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल मॉडेल नं. नोट-11 नं. 7100, आय.एम.ई.आय. नं. 352613060258021 हा विकत घेतला. सदर मोबाईल विकत घेताना त्याची गॅरंटी, वॉरंटी, बॅटरी बॅकअप व पूर्ण सुविधायुक्त मोबाईल आहे अशी गॅरंटी गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिली. अर्जदाराने सदरील मोबाईल रक्कम रु. 28,000/- मध्ये विकत घेतलेला आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे सॅमसंग कंपनी म्हणजेच सदर मोबाईलचे उत्पादन करणारी कंपनी आहे. मोबाईल विकत घेतल्यानंतर अवघ्या 10 दिवसात मोबाईलचे स्क्रीन व्यवस्थीत काम करीत नव्हते. तसेच मोबाईल एक मिनटाच्या आत अतिशय गरम होत होता. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे मोबाईलच्या तक्रारीबद्दल विचारणा केली असता त्यांनी सॅमसंग कंपनीच्या सर्व्हीस सेंटरमध्ये दाखविण्यास सांगितले. अर्जदार यांनी सॅमसंग कंपनीच्या अधिकृत सर्व्हीस सेंटरमध्ये मोबाईल दाखवून तक्रारीबद्दल सांगितले असता ऑनलाईन कम्प्लेट करुन मोबाईल दुरुस्तीसाठी ठेवून घेतला. सर्व्हीस सेंटर वाल्यांनी सदर मोबाईल दिनांक 27.6.2014 रोजी अर्जदारास परत दिला परंतू सदरील मोबाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. अर्जदाराने पुन्हा जुलै 2014 मध्ये गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे जावून मोबाईल दुरुस्त करुन दया अथवा बदलून दयावे अशी विनंती केली परंतू गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराची विनंती मान्य केली नाही. दिनांक 6.9.2014 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली परंतू गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा मोबाईल बदलूनही दिलेला नाही किंवा दुरुस्तही करुन दिलेला नाही त्यामुळे अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराचा मोबाईल बदलून न देता दुकानातून अपमानित करुन दुकानातून हाकलून दिल्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार कडून अर्जदाराचा नादुरुस्त मोबाईल बदलून देण्यात यावा किंवा रु.28,000/- व्याजासह खरेदी तारखेपासून दयावेत. अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- देण्याची विनंती तक्रारीद्वारे अर्जदार यांनी केलेली आहे.
2. गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस प्राप्त होवूनही गैरअर्जदार क्र. 1 प्रकरणामध्ये हजर झालेले नाहीत. तसेच गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस प्राप्त होवूनही ते प्रकरणात हजर झालेले नसल्यामुळे दिनांक 17.6.2015 रोजी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्यात आला. त्यानंतर दिनांक 9.7.2015 रोजी गैरअर्जदार क्र. 2 वकिलामार्फत प्रकरणामध्ये हजर झाले परंतू लेखी युक्तीवाद दाखल केलेले नाही.
अर्जदाराचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
3. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडून गैरअर्जदार क्र. 2 यांनी उत्पादित केलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट रक्कम रु. 28,000/- ला दिनांक 2.5.2014 रोजी खरेदी केलेला असल्याचे दाखल पावतीवरुन सिध्द होते. अर्जदाराने मोबाईल हॅन्डसेट नादुरुस्त झाला असल्याबद्दलचे कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदाराचा मोबाईल हॅन्डसेट नादुरुस्त झालेला असल्याबद्दल अर्जदाराने दिनांक 27.6.2015 रोजीची हॅन्डसेट दुरुस्तीबद्दलचे टॅक्स इनव्हाईस तसेच वॉरंटी क्लेम फॉम दाखल केलेले आहे. अर्जदार मोबाईल हॅन्डसेट नादुरुस्त झालेला असल्याचे दिसून येते. अर्जदाराचा मोबाईल हॅन्डसेट नादुरुस्त झालेला असतांनाही गैरअर्जदार क्र. 2 यांनी अधिकृत सर्व्हीस सेंटरने दुरुस्त करुन दिलेला नाही. अर्जदाराने तक्रार दाखल केल्यानंतरही दिनांक 17.6.2015 रोजी पुन्हा हॅन्डसेट दुरुस्त केलेला असल्याचे दिसते व सदर दुरुस्तीस अर्जदारास 7,411/- रुपये खर्च आलेला असल्याचे टॅक्स इनव्हाईसवरुन दिसते. अर्जदाराचा हॅन्डसेट वॉरंटी कालावधीमध्ये नादुरुस्त झालेला असतांना गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराचा हॅन्डसेट दुरुस्त करुन न देता त्याबद्दल दुरुस्तीची रक्कम आकारलेली आहे. सदर बाब सेवेतील त्रुटी आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास योग्य ते मार्गदर्शन करणे आवश्यक होते. अर्जदाराचा नादुरुस्त हॅन्डसेट बद्दल गैरअर्जदार क्र. 2 यांना कळवून त्याबद्दलची योग्य ती माहिती अर्जदार यांना देणे हे गैरअर्जदार क्र. 1 यांचे विक्रेता या नात्याने कर्तव्य होते परंतू गैरअर्जदार क्र. 1 यांनी तसे केलेले नाही त्यामुळे निश्चीतच अर्जदारास मानसिक त्रास झालेला असावा असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार 2 यांनी अर्जदाराने खरेदी केलेल्या मोबाईल हॅन्डसेटची किंमत रक्कम रुपये 28,000/- दिनांक 02.05.2014 पासून 6 % व्याजासह आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास परत करावी.
3. गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.