-निकालपत्र–
(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
( पारित दिनांक- 04 जानेवारी, 2017)
01. तक्रारकर्त्याची ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष आयडीया कंपनी तर्फे संबधितां विरुध्द इंटरनेट सेवेचे कनेक्शन विकत घेऊनही ते शेवट पर्यंत सुरु झाले नसल्या संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे-
यातील विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) हे आयडीया टेली सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीचे अनुक्रमे कार्यकारी संचालक आणि शाखा व्यवस्थापक आहेत तर विरुध्दपक्ष क्रं-3) ही सदर कंपनीची एजंट आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-3) प्रतिनिधीचे मार्फतीने, विरुध्दपक्ष आयडीया कंपनीचे इंटरनेट कनेक्शन दिनांक-21/01/2013 रोजी ते 24 तासाचे आत पुरविल्या जाईल व रुपये-25,000/- चे गिफ्ट व्हाऊचर मिळतील असे विरुध्दपक्ष आयडीया कंपनी कडून आश्वासित केल्या वरुन रुपये-799/-चा नगदी भरणा करुन विकत घेतले. त्याचा बिल क्रं-2012-13/म.ह./06226 असा आहे. तक्रारकर्त्याने इंटरनेट कनेक्शन घेते वेळी विरुध्दपक्ष कंपनीचे प्रतिनिधी जवळ निवासी पुरावा व ओळखी संबधीचे दस्तऐवज सादर केलेत, त्यानुसार तक्रारकर्त्यास सिम कॉर्ड क्रं-89912210000024858165 तसेच इन्स्ट्रुमेंट क्रं-860369010713772 पुरविण्यात आला.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष कंपनीने दिलेल्या सुचने प्रमाणे सदरचे इन्ट्रुमेंट कॉम्प्युटरला जोडून 3-जी इंटरनेट कनेक्शनचा वापर करण्यास सुरुवात केली असता ते सुरु झाले नाही. विरुध्दपक्ष कंपनीने दिलेल्या सुचने प्रमाणे 24 तास उलटण्याची वाट पाहिली परंतु त्यानंतरही ते सुरु झाले नाही. त्यानंतर त्याने विरुध्दपक्ष क्रं-3) कंपनीचे प्रतिनीधीला ते कनेक्शन बंद असल्या बाबत सुचित केले परंतु दुर्लक्ष्य करण्यात आले.
तक्रारकर्त्याने वारंवार विरुध्दपक्ष आयडीया कंपनीचे कार्यालयात पुरविलेला इंटरनेट संच सुरु झालेला नसल्या बाबत दुरध्वनीव्दारे कळविले परंतु विरुध्दपक्षाने पुढे तक्रारकर्त्याचा दुरध्वनी घेणे सुध्दा बंद केले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, तो व्यवसायाने वकील असून त्याला त्याचे व्यवसाया करीता इंटरनेट सेवेची अत्यंत आवश्यकता असते. त्याने सदरचे 3-जी जलदगतीने चालणारे इंटरनेट कनेक्शन घेतल्यामुळे त्याचे जवळ पूर्वी असलेले इंटरनेट कनेक्शन बंद केले. तक्रारकर्त्यास त्याचे मुंबई येथील पक्षकारा कडून इंटरनेटव्दारे काही दस्तऐवज मागावयाचे होते परंतु विरुध्दपक्षाने त्याची इंटरनेटरची सेवा सुरुच करुन न दिल्यामुळे त्याचे जवळपास रुपये-1,00,000/- रकमेचे नुकसान झाले. सदरचे इंटरनेट कनेक्शन विरुध्दपक्ष आयडीया कंपनीकडे वारंवार सुचित करुनही सुरु झालेले नाही. विरुध्दपक्षाची ही प्रक्रिया सेवेत त्रृटी तसेच अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करणारी असल्याचे स्पष्ट होते, परिणामी त्यास मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याने विरुध्दपक्षास दिनांक-29/01/2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी ही तक्रार मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्षा विरुध्द खालील मागण्या केल्यात-
(1) तक्रारकर्त्याने इंटरनेट कनेक्शन करता विरुध्दपक्षा कडे जमा केलेली रक्कम रुपये-799/- त्याला परत करण्याचे आदेशित व्हावे.
(2) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-50,000/- तसेच नोटीस खर्च रुपये-2000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) अनुक्रमे आयडीया टेली सिस्टीम्स लिमिटेड तर्फे- मॅनेजिंग डॉयरेक्टर, मुंबई आणि आयडीया टेली सिस्टीम्स लिमिटेड, तर्फे- शाखा व्यवस्थापक, नागपूर यांनी एकत्रित लेखी उत्तर मंचा समक्ष दाखल केले. त्यांनी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्त्याची तक्रार खोटी असून विरुध्दपक्ष कंपनीला या तक्रारीमध्ये विनाकारण गोवलेले आहे, करीता तक्रार खारीज करण्यात यावी. तक्रारकर्ता हा स्वच्छ हाताने मंचा समक्ष आलेला नाही. विरुध्दपक्ष ही एक नामवंत व बाजारात ख्यातीप्राप्त कंपनी आहे. विरुध्दपक्ष क्रं-(2) आणि क्रं-(3) हे कंपनी म्हणून नाहीत आणि विरुध्दपक्ष क्रं-2) हा कंपनीचा कर्मचारी आहे त्यामुळे दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर-29 रुल-1 नुसार सदरची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, नौकरदार व्यक्तीला जबाबदार धरल्या जाऊ शकत नाही.
विरुध्दपक्ष कंपनीने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष आयडीया कंपनीचा तक्रारकर्त्या सोबत कोणताही करार झालेला नाही, त्यामुळे तक्रार त्यांचे विरुध्द चालू शकत नाही. विरुध्दपक्ष क्रं-2) आणि क्रं-3) ला विनाकारण प्रतिपक्ष केलेले आहे, त्यामुळे चुकीचे व्यक्तीस प्रतिपक्ष केल्याचे कारणा वरुन सुध्दा तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने यु.एस.बी. डाटा कॉर्डसाठी रुपये-799/- चा भरणा करुन ते प्राप्त केले आणि त्यानंतर त्याचे उपयोगा प्रमाणे बिले भरण्याची त्याचेवर जबाबदारी येते. यु.एस.बी. डाटा कॉर्ड हे प्लगव्दारे कॉम्प्युटरला जोडण्यात येते व त्याचे सॉफ्टवेअरची कॉपी केल्या जाते. सध्याचे यु.एस.बी.कॉर्ड 3.0 एवढे असून ते योग्य रितीने डिटेक्ट न करता तक्रारकर्त्याने सॉफ्टवेअर अपग्रेड केले. तक्रारकर्त्याची तक्रार प्राप्त झाल्या नंतर विरुध्दपक्ष कंपनीचे प्रतिनिधीने तक्रारकर्त्याचे घरी भेऊ देऊन पाहणी केली असता सदर यु.एस.बी.3.0 हे कॉम्प्युटरवर काम करीत नव्हते, त्यासाठी त्याने ते अपग्रेड करण्याची सुचना केली व तसे विरुध्दपक्ष कंपनीला कळविले. यु.एस.बी. बद्दल आज पर्यंत विरुध्दपक्ष कंपनीकडे तक्रारी आलेल्या नाहीत. प्रस्तुत प्रकरणात कॉम्प्युटर आणि यु.एस.बी. डाटा कॉर्ड यामध्ये तांत्रिक दोष उत्पन्न झाल्याचे दिसून येते आणि तो दोष संगणकीय अभियंत्याचे मार्फतीने दुर करता येतो. विरुध्दपक्ष कंपनीने पुरविलेले यु.एस.बी. डाटा कॉर्ड हे अस्सल असून त्यामध्ये कोणताही दोष नाही. तक्रारकर्त्याने गिफ्ट व्हाऊचर संबधी नमुद केलेली गोष्ट ही खोटी आहे. टेलीग्रॉफ एक्टचे कलम-4 प्रमाणे त्यांचे विरुध्द तक्रार मंचा समक्ष चालू शकत नाही. तसेच काही विवाद उत्पन्न झाल्यास लवादाची सुध्दा सोय केलेली आहे.
विरुध्दपक्ष आयडीया कंपनीने त्यांचे म्हणण्याचे पुष्टयर्थ्य “General Manager, Telecom-Versus- M.Krishnan & Anr.” Order dated-01st September, 2009 या सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्रावर आपली भिस्त ठेवली.
विरुध्दपक्ष कंपनीने परिच्छेद निहाय उत्तर देताना नमुद केले की, यु.एस.बी. डाटा कॉर्ड 24 तासाचे आत सेवा सुरु होते परंतु तक्रारकर्त्याने सदरील सेवा विहित मुदतीत का घेतली नाही हे कळून येत नाही. तक्रारकर्त्याची तक्रार आल्या बरोबर त्यांचे प्रतिनिधीने त्वरीत तक्रारकर्त्याचे घरी भेट देऊन तक्रार दुर केली. त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. यु.एस.बी. डाटा कॉर्डची सेवा न मिळण्यास अनेक अन्य तांत्रिक बाबी कारणीभूत आहेत ज्या विरुध्दपक्षाचे नियंत्रणा बाहेरील आहेत. तक्रारकर्त्याची तक्रार नामंजूर करुन ती खारीज करण्याची विनंती केली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) सोनू दांडेकर, एजंट ला नोटीस मिळूनही ती मंचा समक्ष हजर झाली नाही म्हणून दिनांक-18/02/2016 रोजी तिचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
05. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत विरुध्दपक्ष आयडीया टेली सिस्टीम्स लिमिटेड यांचे दिनांक-21/01/2013 रोजीचे युएसबी डाटा कॉर्डचे बिलाची प्रत, दिनांक-29/01/2013 रोजीच्या ई मेल ची प्रत, तक्रारकर्त्या तर्फे दिलेली दिनांक-29.01.2013 रोजीची नोटीस अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तसेच प्रतीउत्तर दाखल केले.
06. तक्रारकर्त्याची तक्रार तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 चे लेखी उत्तर आणि उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रतीं तसेच उभय पक्षकारांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
07. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने विरुध्दपक्ष आयडीया टेली सिस्टीम्स लिमिटेड यांचे कडून दिनांक-21/01/2013 रोजीचे बिला प्रमाणे सिम कॉर्ड क्रं-89912210000024858165 तसेच इन्स्ट्रुमेंट क्रं-860369010713772 विकत घेतले.परंतु विरुध्दपक्ष कंपनीने दिलेल्या सुचने प्रमाणे सदरचे डोंगल कॉम्प्युटरला जोडून 3-जी इंटरनेट कनेक्शनचा वापर करण्यास सुरुवात केली असता ते सुरुच झाले नाही. विरुध्दपक्ष कंपनीने दिलेल्या सुचने प्रमाणे 24 तास उलटण्याची वाट पाहूनही ते सुरु झाले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं-3) कंपनीचे प्रतिनीधीला ते कनेक्शन बंद असल्या बाबत सुचित केले परंतु दुर्लक्ष्य करण्यात आले. त्याने वारंवार विरुध्दपक्ष आयडीया कंपनीचे कार्यालयात पुरविलेला इंटरनेट संच सुरु झालेला नसल्या बाबत दुरध्वनीव्दारे कळविले परंतु विरुध्दपक्षाने पुढे त्याचा दुरध्वनी घेणे सुध्दा बंद केले.
08. या उलट विरुध्दपक्ष आयडीया टेली सिस्टीम्स लिमिटेड यांचे उत्तरा प्रमाणे तक्रारकर्त्यास पुरविण्यात आलेले यु.एस.बी.कॉर्ड 3.0 एवढे असून ते योग्य रितीने डिटेक्ट न करता त्याने सॉफ्टवेअर अपग्रेड केले. तक्रारकर्त्याची तक्रार प्राप्त झाल्या नंतर विरुध्दपक्ष कंपनीचे प्रतिनिधीने त्याचे घरी भेऊ देऊन पाहणी केली असता सदर यु.एस.बी.3.0 हे कॉम्प्युटरवर काम करीत नव्हते, त्यासाठी त्याने ते अपग्रेड करण्याची सुचना केली व तसे विरुध्दपक्ष कंपनीला कळविले. यु.एस.बी. बद्दल आज पर्यंत विरुध्दपक्ष कंपनीकडे तक्रारी आलेल्या नाहीत. विरुध्दपक्ष कंपनीने पुरविलेले यु.एस.बी. डाटा कॉर्ड हे अस्सल असून त्यामध्ये कोणताही दोष नाही. प्रस्तुत प्रकरणात कॉम्प्युटर आणि यु.एस.बी. डाटा कॉर्ड यामध्ये तांत्रिक दोष उत्पन्न झाल्याचे दिसून येते आणि तो दोष संगणकीय अभियंत्याचे मार्फतीने दुर करता येतो. विरुध्दपक्ष कंपनी ख्यातीप्राप्त कंपनी असून त्यांना विनाकारण तक्रारीत प्रतिपक्ष केलेले आहे. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी असून ती खारीज व्हावी अशी विनंती केली.
09. उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने डोंगल व सीम कॉर्ड हे इंटरनेट सेवा घेण्या करीता विरुध्दपक्ष कंपनी कडून विकत घेतले होते, परंतु इंटरनेटची सेवा तक्रारकर्त्याला प्राप्त झाली या बाबत कोणताही दस्तऐवजी पुरावा विरुध्दपक्षानीं मंचा समक्ष समोर आणलेला नाही, विरुध्दपक्ष कंपनीच्या ज्या प्रतिनिधीने तक्रारकर्त्याच्या घरी भेट दिली, त्याचा तपासणी अहवाल वा त्याचा प्रतिज्ञालेख पुराव्या दाखल मंचा समोर सादर केलेला नाही.
10. विरुध्दपक्ष कंपनीचे म्हणण्या प्रमाणे टेलीग्रॉफ एक्टचे कलम-4 प्रमाणे त्यांचे विरुध्द तक्रार मंचा समक्ष चालू शकत नाही. तसेच काही विवाद उत्पन्न झाल्यास लवादाची सुध्दा सोय केलेली आहे. विरुध्दपक्ष आयडीया कंपनीने त्यांचे म्हणण्याचे पुष्टयर्थ्य “General Manager, Telecom-Versus- M.Krishnan & Anr.” Order dated-01st September, 2009 या सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्रावर आपली भिस्त ठेवली.
11. आम्ही, टेलीग्राफ एक्टचे कलम-4 चे काळजीपूर्वक वाचन केले, त्यामध्ये खाजगी मोबाईल कंपन्यां विरुध्द तक्रारी चालविण्याचे ग्राहक मंचाचे अधिकारक्षेत्र प्रतिबंधीत केलेले नाही. तसेच प्रकरणात जरी लवादाची सोय केलेली असली तरी ग्राहक मंचाचे अधिकारक्षेत्रास बाधा येत नाही असे वेळावेळी मा.वरिष्ठ न्यायालयाचे निकाल असल्याने विरुध्दपक्षाचे उपरोक्त आक्षेपामध्ये मंचास तथ्य दिसून येत नाही.
12. मंचा तर्फे सुध्दा उभय पक्षांचे उपस्थितीत तक्रारकर्त्याला पुरविलेले डोंगल व सिमकॉर्ड मंचा समोर तपासणीसाठी तारीख निश्चीत करुनही विरुध्दपक्षा तर्फे कोणीही उपस्थित झाले नाही वा त्यांनी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे डोंगल व सिम विरुध्द केलेली विधाने खोडून काढलेली नाहीत, विरुध्दपक्षाने आपले कथनाचे समर्थनार्थ कोणताही पुरावा मंचा समक्ष सादर केलेला नाही वा तक्रारकर्त्याची विधाने योग्य त्या पुराव्याव्दारे खोडून काढलेली नाहीत. अशापरिस्थितीत तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र असल्याचे मंचाचे मत आहे, त्यावरुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: आदेश ::
(01) तक्रारकर्ता श्री बाळकृष्ण भीमरावजी चौधरी यांची विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-1) आयडिया टेली सिस्टीम्स लि. तर्फे मॅनेजिंग डॉयरेकटर, मुंबई आणि विरुध्दपक्ष क्रं-2) आयडिया टेली सिस्टीम्स तर्फे शाखा व्यवस्थापक, नागपूर यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्ररकर्त्या कडून डोंगल व सीमपोटी स्विकारलेली रक्कम रुपये-799/- (अक्षरी रुपये सातशे नव्व्याण्णऊ फक्त) तक्रार दाखल दिनांक-22/02/2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6% दराने व्याजासह तक्रारकर्त्यास परत करावी.
(03) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी तक्रारकर्त्यास द्दावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून तीस दिवसांचे आत करावे.
(05) विरुध्दपक्ष क्रं-3) सोनू दांडेकर, अधिकृत प्रतिनिधी आईडिया टेली सिस्टीम्स, नागपूर ही विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) आयडिया टेलीसिस्टीम या कंपनीची अधिकृत प्रतिनिधी असल्याने तिला या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
(06) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.