तक्रारदार स्वत:
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही.पी.उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 9मे 2014
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटी संदर्भात जाबदेणार यांचे विरुध्द दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. तक्रारदार फुरसूंगी, पुणे येथील रहिवासी असून जाबदेणार ही नोईडा, उत्तरप्रदेश येथील सेवा पुरविणारी संस्था आहे. दिनांक 26/11/2012 रोजी “ आदित्य” नाव असलेल्या इसमाचा तक्रारदारांना फोन आला व त्यांनी जाबदेणार कंपनीत नोकरी उपलब्ध असून त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेश्न करावे लागेल. त्यासाठी आधी रुपये 185/- फी भरावी लागेल व नोकरी लागल्यानंतर रुपये 1500/- फी भरावी लागेल असे सांगितले. तक्रारदार यांनी “अनिकेत सायबर कॅफे” येथे असतांना जाबदेणार यांच्या वतीने त्यांना सूचना देण्यात आल्या व कळविण्यात आले की, रुपये 185/- तक्रारदारांच्या खात्यामधून वजा होतील. जाबदेणार यांनी तक्रारदारांन विश्वासात घेऊन चार वेळा रक्कम भरावयास लावली व जेव्हा तक्रारदार पाचव्यांदा पैसे भरावयास गेले असता खात्यातील क्रेडिट संपल्यामुळे ते अयशस्वी ठरले. सर्व पैसे तक्रारदारांच्या एस.बी.आय क्रेडिट कार्ड मधून गेले. तक्रारदारांनी क्रेडिट कार्ड संस्थेकडे चौकशी केली असता तक्रारदारांच्या असे निदर्शनास आले की, त्यांच्या खात्यामधून प्रत्यक्षात रुपये 34,432/- वजा झालेले आहेत. याबाबत तक्रारदारांनी श्री.आदित्य, श्री.कबीर जयस्वाल व श्री.रोनित अग्रवाल यांच्याबरोबर संपर्क साधला असता तक्रारदारांना कळविण्यात आले की, सात दिवसात पूर्ण पैसे परत होतील, नंतर 15 दिवसात होतील व त्यानंतर 21 दिवसात होतील असे तक्रारदारांना सांगण्यात आले. परंतू तक्रारदारांना पैसे परत मिळाले नाहीत. जाबदेणार यांनी तक्रारदारांना सेवा न देता सेवेतील त्रुटी निर्माण केली आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार दाखल करुन जाबदेणार यांच्याकडून रक्कम रुपये 34,432/-, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 1500/- व इतर खर्च रुपये 12,800/- एकूण रक्कम रुपये 58,732/- ची मागणी केलेली आहे.
2. या तक्रारीची नोटीस जाबदेणार यांना बजावूनही जाबदेणार गैरहजर. जाबदेणार यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करण्यात आले.
3. तक्रारदारांनी तक्रारीतील कथनांच्या पुष्टयर्थ शपथपत्र, क्रेडिट कार्ड खात्याचा उतारा, वेळोवेळी जाबदेणार यांच्या प्रतिनिधींना पाठविलेले ई-मेल यांचा नकला दाखल केल्या आहेत. प्रस्तूत प्रकरणातील कथनांचा व पुराव्याचा विचार केला असता असे स्पष्ट होते की, जाबदेणार यांनी तक्रारदार यांचेकडून पैसे घेऊन कोणतीही सेवा दिलेली नाही. सदरची बाब सेवेतील त्रुटी ठरते. त्यामुळे तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रक्कम रुपये 34,432/- परत मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रुपये 5,000/- मिळण्यास पात्र आहेत. सबब खालील प्रमाणे आदेश देण्यात येतो-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी निष्पन्न होतात असे
जाहिर करण्यात येते.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 34,432/-
[रुपये चौतीस हजर चारशे बत्तीस फक्त ] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. जाबदेणार यांनी तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रुपये 5,000/- [रक्कम रुपये पाच हजार फक्त] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
5. जाबदेणार यांनी वर नमूद आदेशाची पूर्तता विहीत कालावधीत न केल्यास संपूर्ण रकमेवर द.सा.द.शे 9 टक्के दराने तक्रार दाखल दिनांक 28/1/2014 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यन्त व्याज दयावे लागेल.
6. तक्रारदारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत. अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.
ठिकाण- पुणे
दिनांक: 09/05/2014