द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
** निकालपत्र **
दिनांक 27 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या एअर होस्टेस अकॅडमी मध्ये 2008-09 या वर्षासाठी प्रवेश घेतला. कोर्सची फी रुपये 1,18,000/- होती, कोर्स एक वर्षांचा होता, जाबदेणार यांचा लिडींग एअरलाईन कंपनी व पंचतारांकीत हॉटेल्स बरोबर टाय अप होता असे जाबदेणार यांनी तक्रारदारांना सांगितले, तसेच कोर्स पूर्ण झाल्यावर चांगल्या पगाराची नोकरी मिळेल अशी हमी तक्रारदारांना देण्यात आली होती. तक्रारदारांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांना देखील कर्ज काढून त्यांनी कोर्सची फी जाबदेणारांकडे भरली. तसेच जाबदेणार यांचा युनिर्व्हसिटी ऑफ केम्ब्रीज बरोबर टाय अप होता असेही तक्रारदारांना सांगण्यात आले होते, परंतु काही कारणांमुळे युनिर्व्हसिटी ऑफ केम्ब्रीज यांनी टाय अप रद्य केल्याचे तक्रारदारांना कळले. कोर्स पुर्ण झाल्यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदारांना प्रोव्हीजनल सर्टिफिकीट जबरदस्तीने दिले. तसेच तक्रारदारांना जॉब देण्यात येणार नाही असेही सांगण्यात आले. कोर्स दरम्यान क्लासेस नियमित होत नसत, प्रॅक्टीकल्स घेण्यात आलेले नव्हते, शिक्षक शंकांचे निरसन करु शकत नव्हते, In flight training दिले नाही. बँकेने घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीबाबत तगादा लावलेला आहे. तक्रारदारांची बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तक्रारदारांना समस्यांना सामोरे जावे लागले. तक्रारदारांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले, जाबदेणारांकडे वारंवार मागणी करुनही जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून तक्रारदारांनी जे बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करुन मागतात, तसेच शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले म्हणून नुकसान भरपाई मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे मंचाने अवलोकन केले असता तक्रारदारांनी दिनांक 22/5/2008 रोजी रुपये 5,000/-, दिनांक 04/06/2008 रोजी रुपये 17,000/- व दिनांक 04/08/2008 रोजी रुपये 1,13,000/- जाबदेणारांकडे कोर्सच्या फी पोटी भरल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार विदयार्थी आहेत. जाबदेणार यांनी त्यांच्या प्रॉस्पेक्टस मध्ये पहिल्याच पानावर “ Placements – Along with expert training, AHA takes great care to provide its students 100% placement assistance.” असे नमूद केलेले आहे. जाबदेणार यांनी 100 टक्के नोकरीची हमी दिल्यामुळे तक्रारदार विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये “ Aviation and Hospitality Management” या एका वर्षाच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. तक्रारदारांनी जाबदेणारांकडे फी ची रक्कम भरण्यासाठी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मधून कर्ज घेतले होते. परंतु जाबदेणार यांनी 100 टक्के चांगल्या पगाराची नोकरी मिळेल असे सांगून, तसे प्रॉस्पेक्टसमध्ये छापूनही, नोकरी न दिल्यामुळे, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तक्रारदार कर्जाची परतफेड करु शकल्या नाहीत ही बाब बँकेने तक्रारदारांना दिलेल्या ओव्हरडयू नोटीस दिनांक 07/11/2011 वरुन स्पष्ट होते. जाबदेणारांकडे कोर्स पुर्ण करुनही जाबदेणार यांनी प्रोव्हीजनल सर्टिफिकीट तक्रारदारांना दिले, कोर्स व्यवस्थित चालविला नाही, चांगली नोकरी मिळाली नाही त्यामुळे तक्रारदार घेतलेल्या कर्जाची परतफेड करु शकल्या नाहीत. तक्रारदारांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले यासर्वावरुन जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी स्पष्ट होते. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून फी पोटी भरलेल्या एकूण रक्कम रुपये 1,35,000/- चा परतावा 9 टक्के व्याजासह तक्रार दाखल दिनांक 30/11/2011 पासून मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदारांना व्याज देण्यात आल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी मंच नामंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
** आदेश **
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना 1,35,000/- दिनांक 30/11/2011 पासून 9 टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होई पर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
[3] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.