निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार यांचा मुलगा कृष्णा दिलीप देव यास त्याच्या शैक्षणीक गरजेसाठी एक लॅपटॉप खरेदी करणे गरजेचे असल्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांच्या दुकानात गेले असता अर्जदारास सोनी कंपनीचा ज्याचा मॉडेल नं. E14A15 पसंत पडला. सदर लॅपटॉपची किंमत रक्कम रु.40,000/- असल्याचे गैरअर्जदार यांनी सांगितले. लॅपटॉपची संपूर्ण किंमत अदा केल्यानंतर लॅपटॉप 15 दिवसानंतर मिळेल असे गैरअर्जदार यांनी सांगितले. त्यानुसार अर्जदार यांनी दिनांक 11.04.2013 रोजी गैरअर्जदार यांचेकडे रक्कम रु.40,000/- नगदी स्वरुपात जमा केले. गैरअर्जदार यांनी अर्जदारास पावती दिलेली आहे. अर्जदार हे 15 दिवसानंतर गैरअर्जदार यांचेकडे लॅपटॉपची मागणी करण्याकरीता गेले असता गैरअर्जदार यांनी सदर कंपनीने लॅपटॉप पुरवठा केलेला नाही. त्यामुळे पुन्हा 15 दिवसांनी या असे सांगितले. त्यानंतर पुन्हा 15 दिवसानंतर दिनांक 11.05.2013 रोजी अर्जदार लॅपटॉपची मागणी करण्याकरीता गेले असता गैरअर्जदार यांनी सदर कॉन्फीगरेशनचा लॅपटॉप हा कंपनीकडे उपलब्ध नाही. त्यामुळे सदर लॅपटॉप तुम्हाला देण्यास असमर्थ आहोत असे सांगून गैरअर्जदार यांनी अर्जदारास चेक क्र. 97390 पुसद अर्बन को-ऑप. बँक या बँकेचा रक्कम रु.40,000/- दिनांक 19.05.2013 रोजीचा चेक दिला. अर्जदार यांनी सदर चेक हा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शिवाजीनगर येथे दिनांक 13.05.2013 रोजी वटविणेसाठी टाकला परंतु सदर चेक हा गैरअर्जदार यांचे खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे अनादरीत झाला. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे जाऊन चेक अनादरीत झालेला असून रक्कम रु.40,000/- नगदी देण्यास सांगितले. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदारास पुन्हा एकवेळेस बँकेत टाकण्याची विनंती केली. त्यानुसार अर्जदाराने दिनांक 16.05.2013, दिनांक 27.05.2013, दिनांक 06.06.2013 व दिनांक 09.07.2013 रोजी सदर चेक वटविणेसाठी टाकला. परंतु प्रत्येक वेळी चेक अनादरीत झालेला आहे. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 27.07.2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली, नोटीस प्राप्त होऊनही गैरअर्जदार यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांचेकडून त्यांनी घेतलेली रक्कम रु.40,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह परत करावी. तसेच गैरअर्जदार यांनी खोटा धनादेश देऊन अर्जदाराची फसवणूक केल्याबद्दल रक्कम रु.25,000/- तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- व दावा खर्च रु.2,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना पाठविलेली नोटीस ‘’दिलेल्या पत्त्यावर नाही’’ या शे-यामुळे परत आल्याने अर्जदार यांनी वर्तमानपत्राव्दारे जाहीर नोटीस काढण्याचा अर्ज दिला, अर्ज मंजूर करण्यात आला. अर्जदाराने दिनांक 20.01.2015 रोजीचे दैनिक ‘’प्रजावाणी’’ वर्तमापनत्र दाखल केले. गैरअर्जदार यांना जाहीर नोटीस काढूनही गैरअर्जदार तक्रारीमध्ये हजर झालेले नाहीत. त्यामुळे अर्जदार यांचा युक्तीवाद ऐकला. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
4. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून लॅपटॉप खरेदीसाठी रक्कम रु.40,000/- दिलेले असल्याचे दाखल पावतीवरुन सिध्द होते. दाखल पावतीचे अवलोकन केले असता पावतीवर Total Paid असे हस्ताक्षरात लिहिलेले असून Terms and Conditions मध्ये
i) payments terms - 100% advance
ii) Delivery within 4 working Days.
iii)Validity of quotation for 4 days only.
iv)Taxes as applicable
One year warranty against manufacturing. असे नमुद आहे. यावरुन लॅपटॉप ची संपुर्ण रक्कम रु.40,000/-दिल्यानंतरच गैरअर्जदार लॅपटॉप देणार होते ही बाब सिध्द होते.
गैरअर्जदार यांनी अर्जदारास लॅपटॉप न दिल्यामुळे रक्कम रु.40,000/- चा धनादेश 97390 पुसद अर्बन को-ऑप. बँक या बँक शाखा भगतसिंग मार्केट या बँकेचा धनादेश दिलेला होता. सदर धनादेश बँकेत म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शिवाजीनगर येथे वटविण्यासाठी टाकला असता तो अनादरीत झालेला आहे. अर्जदाराने दिनांक 17.05.2013, दिनांक 27.05.2013 व दिनांक 08.06.2013 रोजीच्या चेक रिटर्न मेमोच्या प्रती तक्रारीसोबत दाखल केलेल्या आहेत. त्यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु.40,000/- दिलेले नाहीत ही बाब निदर्शनास येते.
गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून लॅपटॉपची संपूर्ण किंमत स्विकारुनही दिलेल्या मुदतीमध्ये लॅपटॉप दिलेला नाही व लॅपटॉप देण्यास असमर्थ असतांनाही अर्जदाराची रक्कम अर्जदारास परत न करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी दिलेला धनादेश अनेकवेळा गैरअर्जदार यांचे विनंतीवरुन वटविणेसाठी अर्जदार यांनी टाकला असता सदर धनादेश प्रत्येकवेळी अनादरीत झालेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक व शारिरिक त्रास दिलेला आहे हे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास वस्तूची संपूर्ण किंमत स्विकारुन वस्तूही दिलेली नाही व रक्कमही परत केलेली नाही ही बाब सेवेतील त्रुटी ठरते. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु.40,000/- स्विकारलेल्या दिनांक 11.04.2013 पासून रक्कम अदाकरेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह तीस दिवसाच्या आत द्यावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 7000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.