::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, प्र.अध्यक्ष)
(पारित दिनांक-29 मे, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व 2 विरुध्द अनुचित व्यापारी प्रथेच अवलंब केल्याचे आरोपा वरुन केल्याने ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात सारांश खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं 2 हे ताजश्री ऑटो व्हिल प्रायव्हेट लिमिटेड (ताजश्री होंडा) या नावाने व्यवसाय करीत असून त्यांचे कार्यालय हे ताजश्री वर्षा-9, देवनगर, खामला रोड, नागपूर येथे आहे तसेच ते होंडा कंपनीच्या दुचाकी वाहनाचे डिलर आहेत. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-1) अध्यक्ष, होंडा मोटर सायकल एन्ड स्कुटर प्रायव्हेट लिमिटेड इंडीया गुडगाव हरीयाना हे हिरो हांडा वाहनाचे निर्माते आहेत.
तक्रारकर्ता हा शेतकरी असून शेतीची कामे व संगणक दुरुस्तीची कामे करणारा सामान्य व्यक्ती आहे व तो नागपूर येथील रहिवासी असून त्याला ठिक ठिकाणी जाण्या करीता दुचाकी मोटर सायकलची आवश्यकता होती त्यामुळे होंडा कंपनीची “एक नया ड्रीम एक नया युग” “ड्रीम युग” या दुचाकी मोटर सायकलची जाहिरात रस्त्यावरील घोषणाफलक, टी.व्ही., इंटरनेट, वृत्तपत्र तसेच फीरते जाहिरात फलक व होंडा कंपनीचे पत्रक मध्ये बघीतलेली होती. या दुचाकी मोटर सायकलची ग्राहकासाठी किम्मत रुपये-46081/- अशी ठळक अक्षरात जाहिरात होती. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदरची दुचाकी विकत घेण्याचे ठरविले व विरुध्दपक्ष क्रं-1) यांच्या देवनगर खामला रोड येथील कंपनी मध्ये दिनांक-08.09.2012 रोजी दुचाकी विकत घेण्यासाठी गेला. विरुध्दपक्षाने दुचाकी मोटर सायकल विकत घेण्यासाठी आठ ते दहा दिवस थांबावे लागेल असे सांगितले त्यामुळे दिनांक-18.09.2012 रोजी तक्रारकर्ता होंडा कंपनीचे आरंभिक मॉडेल “ड्रीम युग” (Kick-Drum-Spoke) बुक केली व त्याच दिवशी म्हणजे दिनांक-18.09.2012 रोजी बुकींग रक्कम रुपये-1000/- विरुध्दपक्ष क्रं 1 कडे जमा केली, त्या प्रमाणे तक्रारकर्त्याला बुकींग क्रं-BCR-118092012-45 प्राप्त झाला व विरुध्दपक्ष क्रं 1 ने तक्रारकर्त्याला 12 दिवसाचे कालावधी नंतर तुम्हाला दुचाकी वाहन प्राप्त होईल असे सांगितले परंतु बुकींग तारखे पासून 12 दिवस उलटून गेल्यावर सुध्दा त्याला कोणतीही सुचना देण्यात आली नाही, त्यामुळे त्याने दोन्ही विरुध्दपक्षानां दिनांक-10/10/2012 रोजी स्पीड पोस्टाव्दारे नोटीस पाठविली परंतु नोटीस मिळूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. विरुध्दपक्षांचे सदरचे वागणुकीमुळे त्याला झालेल्या नुकसानी पोटी त्याने पुन्हा दिनांक-27.02.2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून तीन दिवसांचे आत त्याने ड्रीम युग (Kick-Drum-Spoke) नोंदणी केलेली मोटरसायकलची बुकींग रक्कम परत करण्या बाबत व नुकसान भरपाई बाबत सुचित केले परंतु याही नोटीसला विरुध्दपक्षानीं कोणतेही लेखी उत्तर दिले नाही वा कार्यवाही केली नाही. परंतु विरुध्दपक्ष क्रं 2) यांनी नोटीसला उत्तर देऊन मान्य केले की, सदर मोटर सायकलचे उत्पादन मागील साडेचार महिन्या पासून हिरोहोंडा कंपनीने केलेले नाही. त्यानंतर तो स्वतः दिनांक-06/03/2013 रोजी नोंदणी केलेल्या मोटरसाईकल बाईकची उरलेली संपूर्ण रक्कम नगदी घेऊन दिनांक- विरुध्दपक्ष क्रं-2 यांचे कार्यालयात गेला परंतु तक्रारकर्त्याने बुक केलेली कंपनीची “ड्रीम युग” (Kick-Drum-Spoke) मोटर सायकल दिली नाही, याउलट, या बाबत विचारणा केली असता विरुध्दपक्ष क्रं 2 ने तक्रारकर्त्याच्या मित्रा समोर उध्दटपणे अपमानास्पद वागणूक दिली, इतकेच नव्हे तर तक्रारकर्त्याला नोंदणी केलेल्या मोटर सायकल बाबत कुठल्याही प्रकारे समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. विरुध्दपक्षानीं तक्रारकर्त्याचे नोटीसला कोणताही प्रतिसाद दिला नाही वा कारवाई केली नाही त्यामुळे त्याचे लक्षात आले की, त्याची फसवणूक करण्यात आलेली आहे. या सर्व बाबींमुळे त्याला अतिशय शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याला मोटर सायकल न मिळाल्यामुळे तो संगणकीय कामकाज करु शकला नाही त्यामुळे त्याचे प्रतीदिन रुपये-1000/- नुकसान झाले तसेच शेतीवर जाऊन खतपाणी देऊ शकला नाही त्यामुळे शेतीचे रुपये-50,000/- नुकसान झाले व शेतीचे पिक सुध्दा वाया गेले अशाप्रकारे तक्रारकर्त्याचे एकूण रुपये-1,50,000/- चे नुकसान झालेले आहे, त्यामुळे त्याने तक्रार ग्राहक मंचात दाखल करुन विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रकारे मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्षानां आदेशित करण्यात यावे की, त्यांनी तक्रारकर्त्याला होंडा कंपनीची एक नया ड्रीम एक नया युग ड्रीम युग ही दुचाकी मोटर सायकल त्वरीत उपलब्ध करुन देण्याचे आदेशित व्हावे.
(2) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रास, असुविधा, आर्थिक धक्का व शेतीचे नुकसान भरपाई असे एकूण येणारा खर्च रुपये-5,90,638/- त्यास विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे.
(3) विरुध्दपक्षानीं भारतीय ग्राहकांची भूल तफावत केल्यामुळे ग्राहक हितार्थ रुपये-14,00,000/- इतकी दंडाची रक्कम ग्राहक कल्याण निधी मध्ये जमा करण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी एकत्रित लेखी उत्तर ग्राहक मंचा समक्ष दाखल केले, त्यांनी आपल्या लेखी उत्तरात नमुद केले की, जाहिराती प्रमाणे रुपये-46,081/- अशी मोटर सायकलची किम्मत नमुद केली होती, सदरची किम्मत ही एक्स शो-रुम किम्मत होती व त्यावर लागणारा वाहन विमा, इतर टॅक्स खरेदीदाराला द्दावयाचे होते, त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केलेली किम्मत खोटी आहे तसेच दिनांक-08.09.2013 रोजी तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 2 चे शो-रुम मध्ये आला होता व त्याचेच म्हणण्या प्रमाणे ड्रीम युग(Kick-Drum-Spoke) हे दुचाकी वाहनाचे मॉडेल उपलब्ध नसल्यामुळे आठ ते दहा दिवसा नंतर उपलब्ध होणार असल्याचे सांगितले होते. तरी सुध्दा त्याने सदरचे दुचाकी वाहन विकत घेण्याची तयारी दर्शवली त्यामुळे सदर मॉडेल 1000/- देऊन तुम्ही नोंदणी करु शकता असे त्याला सांगितले होते व त्यानंतर रक्कम पूर्ण घेऊन डिलेव्हरी देऊ असे त्याला सांगितले होते. परंतु दिनांक-18.09.2012 रोजी तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्रं 2 कडे आला असता त्यांनी बुकींग फॉर्मवरती स्पष्टपणे नमुद केले की, त्याला हवे असलेले दुचाकी वाहन उपलब्ध नसल्यामुळे जेंव्हा ते उपलब्ध होईल तेंव्हा ते त्याला पुरवले जाईल. परंतु तक्रारकर्त्याने बुकींग केलेले वाहन उत्पादक कंपनी कडून उपलब्ध झाले नाही. त्यानंतर तब्बल चार ते पाच महिन्या नंतर विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी दुचाकी वाहनाची डिलेव्हरी देऊ शकत नाही असे त्याला कळविले कारण मोटर सायकल उत्पादना मध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असल्याने सदरचे वाहन कोणत्याही ग्राहकाला वितरीत करण्यात आलेले नाही त्यामुळे विरुध्दपक्षानीं तक्रारकर्त्याची कोणतीही फसवणूक केली नाही त्यांनी तक्रारकर्त्याला वस्तुस्थिती समजावून सांगितली व त्याला मोटर सायकल न देऊन कोणताही कसुर केला नाही किंवा कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खोटया स्वरुपाची एकंदरीत उत्पादक कंपनीच्या नावाला जाणुनबुजून काळीमा लावण्या करीता सदरची तक्रार दाखल केलेली आहे, त्यामुळे तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
04. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दस्तऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने होंडा कंपनीचे माहितीपत्रक, कोटेशन, बुकींग रिसीप्ट व विरुध्दपक्षानां पाठविलेल्या कायदेशीर नोटीसच्या प्रती तसेच नोटीस मिळाल्या बाबतच्या पोच अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे.
05. विरुध्दपक्षानीं उत्तरा सोबत दिनांक-18.09.2012 रोजीच्या अप्रुव्हल फॉर्म प्रत दाखल केली.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-2) यांनी तक्रारीचे अनुषंगाने सादर केलेले उत्तर, दाखल दस्तऐवज आणि उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात-
मुद्दा उत्तर
(1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचां
ग्राहक होतो काय............................................ होय.
(2) विरुध्दपक्षानीं तक्रारकर्त्या सोबत
अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब
तसेच दोषपूर्ण सेवा दिली आहे
काय..............................................................होय.
(3) काय आदेश....................................................अंतिम आदेशा नुसार.
कारणे व निष्कर्ष
07. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तो संगणकाची दुरुस्ती व शेतीचे काम करणारा सर्व सामान्य व्यक्ती असून त्याला सदर कामा करीता दुचाकी वाहनाची अत्यंत आवश्यकता होती व त्यामुळे विरुध्दपक्ष होंडा कंपनीने दिलेल्या जाहिराती नुसार त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 डिलरकडे जाऊन, विरुध्दपक्ष क्रं-1) निर्मित ड्रीम युग या दुचाकी वाहनाची रुपये-1000/- देऊन दिनांक-18.09.2012 रोजी नोंदणी केली व त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 2 ने सुचित केल्या प्रमाणे काही दिवसांची वाट पाहून सुध्दा त्याला सदर वाहन पुरविले नाही. तक्रारकर्ता दुचाकीची उर्वरीत संपूर्ण किम्मतीची रक्कम घेऊन विरुध्दपक्ष क्रं 2 कडे गेला असता त्यांनी वाहन पुरविण्यास असमर्थता दर्शविली व त्यानंतरही 06 महिन्याचा कालावधी उलटून गेल्या नंतर जेंव्हा तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्रं 2 चे कार्यालयात गेला तेंव्हा त्याला उध्दटपणाची वागणूक देण्यात आली.
08. विरुध्दपक्षानीं आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेले संपूर्ण आरोप खोटे असल्याचे नमुद केले, तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ही विरुध्दपक्ष कंपनीच्या ख्यातीला काळीमा फासण्या करीता केलेली आहे. परंतु त्यांनी मान्य केले की, तक्रारकर्त्याने दिनांक-18.09.2012 रोजी ड्रीम युग दुचाकी वाहन त्यांचे कडे बुक केले व या संबधाने त्यांनी रुपये-1000/- रक्कम त्याचे कडून स्विकारली परंतु त्याला वाहन जेंव्हा उपलब्ध होईल त्यावेळी ते वितरीत करण्यात येईल असे स्पष्टपणे बुकींग फॉर्मवर लिहून दिले होते. परंतु पुढे विरुध्दपक्ष क्रं-1) हिरोहोंडा कंपनी तर्फे निर्मित ड्रीम युग या वाहनाचे निर्मितीचे वेळी काही तांत्रिक बिघाड निर्माण झालेला असल्याने ती मोटर सायकल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे विरुध्दपक्षानीं तक्रारकर्त्याला कोणत्याही प्रकारे सेवेत त्रृटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला नाही, करीता तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे नमुद केले.
09. सदरच्या तक्रारीचे स्वरुप पाहता तसेच तक्रारकर्ता व विरुध्दपक्षा तर्फे दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते की, विरुध्दपक्षानीं ड्रीम युग हे वाहन बाजारात विक्रीसाठी आणण्यापूर्वी निरनिराळया तंत्राव्दारे व्यापक प्रमाणावर जाहिरात केली होती व त्या जाहिरातीचे प्रलोभनाने तक्रारकर्त्याने दिनांक-18.09.2012 रोजी मोटर सायकलची नोंदणी केली व नोंदणी बाबत रुपये-1000/- दिल्या बाबत पावती प्रत अभिलेखावर दाखल केली. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं-2) ने तक्रारकर्त्याला ते वाहन लवकरात लवकर पुरविण्यात येईल असे वेळोवेळी आश्वासन दिले व त्यांचे आश्वासनावर विसंबून त्याने ब-याच कालावधी पर्यंत वाट पाहिली व दुसरे कोणतेही वाहन नोंदणी केले नाही, त्यामुळे वाहनाचे अभावी त्याचे संगणक व्यवसयाचे व शेतीचे नुकसान झाले. विरुध्दपक्षानीं आपल्या उत्तरात असे नमुद केले की, निर्माता कंपनीने होंडा ड्रीम दुचाकी वाहन तांत्रिक बिघाडामुळे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले नाही, प्रथम मोठया प्रमाणावर जाहिरात करुन वाहनाची नोंदणी करणे व नंतर बराच कालावधी उलटल्या नंतर त्या वाहनाची निर्मितीच होणार नाही असे संबधित ग्राहकास सांगणे या प्रकार पाहता तक्रारकर्त्याच्या मानसिक व आर्थिक त्रासाला विरुध्दपक्ष हे जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षा कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
10. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहेत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता श्री शैलेश माणिकराव हुमणे यांची, विरुध्दपक्ष क्रं-1) अध्यक्ष, होंडा मोटर सायकल एन्ड स्कुटर इंडीया प्रायव्हेट लिमिटेड (एच.एम.एस.आय.) गुडगाव हरीयाना (वाहन निर्माता) आणि विरुध्दपक्ष क्रं-2) ताजश्री ऑटोव्हील प्रायव्हेट लिमिटेड (ताजश्री होंडा) खामला रोड, नागपूर (अधिकृत डिलर) यांचे विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक नुकसानी संबधाने भरपाई म्हणून रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) तक्ररकर्त्याला द्दावेत.
(03) त्याच बरोबर तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिक स्वरुपात तक्रारकर्त्यास द्दावेत.
(04) तक्रारकर्त्याच्या अन्य मागण्या या प्राप्त परिस्थितीत नामंजूर करण्यात येतात.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत आदेशाची पुर्तता न केल्यास विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 हे आर्थिक नुकसानीची रक्कम रुपये-10,000/- निकाल पारीत दिनांक-28.05.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6% दराने दंडनीय व्याजासह देण्यास विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) जबाबदार राहतील.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.