जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 274/2018. तक्रार दाखल दिनांक : 12/10/2018. तक्रार निर्णय दिनांक : 12/08/2022.
कालावधी : 03 वर्षे 10 महिने 00 दिवस
बाळासाहेब पिता रावसाहेब भिसे, वय 64 वर्षे,
व्यवसाय : सेवानिवृत्त, रा. साई मंदीराजवळ,
विशाल नगर, बार्शी रोड, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) दिलीपराव पिता शंकरराव आपेट, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार,
अध्यक्ष, शुभ कल्याण मल्टी स्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.,
रा. दिलीप नगर, हावरगाव, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.
(2) राजेश पिता दामोदर हाके, वय सज्ञान, व्यवसाय : नोकरी,
शाखा प्रबंधक, शुभ कल्याण मल्टी स्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.,
शाखा लातूर, रा. गुळ मार्केट, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- सचिन एन. नाईकवाडे
विरुध्द पक्ष अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, विरुध्द पक्ष क्र.1 हे शुभ कल्याण मल्टी स्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. यांचे अध्यक्ष / चेअरमन आहेत. त्यांच्या विरुध्द पक्ष क्र.2 शाखेमध्ये तक्रारकर्ता यांचे बचत खाते क्र. 10305/98 आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या शाखेमध्ये ठेव पावत्यांद्वारे रक्कम गुंतवणूक केलेली आहे. तक्रारकर्ता यांनी त्या ठेव रकमेची मागणी केली असता रक्कम उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव ठेव रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात आली. विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले असता ते परत प्राप्त झाले. उक्त कथनाच्या अनुषंगाने बचत खाते क्र. 10305/98 अंतर्गत शुभ कल्याण मुदत ठेव योजना खाते क्र. 10101/11/17 व ठेव पावती क्र. 089023 अन्वये व्याजासह गुंतवणूक रक्कम रु.2,51,789/- दि.22/12/2017 पासून द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दराने देण्याचा; शुभ कल्याण मुदत ठेव योजना खाते क्र. 10101/11/18 व ठेव पावती क्र. 089024 अन्वये व्याजासह गुंतवणूक रक्कम रु.2,39,491/- दि.25/12/2017 पासून द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दराने देण्याचा; शुभ कल्याण मुदत ठेव योजना खाते क्र. 10101/11/19 व ठेव पावती क्र. 089028 अन्वये व्याजासह गुंतवणूक रक्कम रु.2,91,482/- दि.18/7/2017 पासून द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दराने देण्याचा; बचत खाते क्र. 10305/98 मध्ये जमा रु.1,831/- देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.20,000/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.20,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना सूचनापत्र पाठविण्यात आले असता सूचनापत्राची बजावणी झाली नाही. त्यानंतर दैनिक वृतपत्रातून जाहीर प्रगटनाद्वारे सूचनापत्र प्रसिध्द करण्यात आले. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिले आणि लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(3) अभिलेखावर दाखल मुदत ठेव पावती क्र. 089023, 089024 व 089028 चे अवलोकन केले असता विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या विरुध्द पक्ष पक्ष क्र.2 शाखेमध्ये तक्रारकर्ता यांनी अनुक्रमे रक्कम रु.2,00,000/-, रु.1,90,000/- व रु.2,50,000/- गुंतवणूक केल्याचे दिसून येते. असे दिसते की, उक्त ठेव पावत्यांची मुदत पूर्ण झाल्यानंतर पावत्यांचे वेळावेळी नुतनीकरण करण्यात आलेले आहे. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, त्यांनी ठेव रकमेची मागणी केली असता रक्कम उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव टाळाटाळ करण्यात आली.
(4) जिल्हा आयोगाद्वारे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना सूचनापत्र बजावल्यानंतर ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद वादकथनांचे खंडण करण्यासाठी लेखी निवेदनपत्र व आवश्यक पुराव्यांची कागदपत्रे दाखल करण्यासाठी त्यांना उचित संधी होती. अशा स्थितीत तक्रारकर्ता यांच्या वादकथनांकरिता व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांकरिता आव्हानात्मक लेखी निवेदनपत्र व विरोधी पुरावा नाही.
(5) अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावत्यांद्वारे रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतल्याचे दिसून येते. तक्रारकर्ता हे ठेवीदार आहेत आणि मुदत ठेव पावत्यांद्वारे रक्कम गुंतवणूक करुन व्याजाचा लाभ घेतात. असे दिसते की, मुदत ठेव पावत्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर व तक्रारकर्ता यांच्या मागणीनंतर विरुध्द पक्ष यांनी बचत ठेव खात्यातील व मुदत ठेव पावत्यांची रक्कम परत केलेली नाही. आमच्या मते, ठेव पावत्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ठेव रक्कम परत करणे ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी, दायित्व व कर्तव्य आहे.
(6) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे शुभ कल्याण मल्टी स्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. यांचे अनुक्रमे अध्यक्ष व शाखा प्रबंधक आहेत. वित्तीय संस्थेच्या रचनेत सभासद, सभासदांनी निवडून दिलेली व्यवस्थापन समिती, व्यवस्थापन समितीने निवडलेले पदाधिकारी व वेतनधारी कर्मचारी इ. बाबींचा अंतर्भाव असतो. संस्थेच्या घटनेप्रमाणे व कार्यकक्षेच्या मर्यादेत व्यवस्थापन समितीने कार्य करणे अनिवार्य असते. संस्थेचे नैमित्तीक व दैनंदीन कामकाज पगारी सेवक करतात आणि ते व्यवस्थापन समितीस जबाबदार असतात. समितीने अधिनियम, नियम व उपविधीस अनुसरुन कार्ये, कर्तव्ये व जबाबदा-या पूर्ण केल्या पाहिजेत.
(7) तक्रारकर्ता यांच्या ठेव पावत्यांची रक्कम परत का करण्यात आलेली नाही ? याचे उत्तर देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी प्रयत्न केलेला नाही. तक्रारकर्ता यांची ठेव रक्कम परत करण्यासाठी ते जबाबदार नाहीत, असेही स्पष्टीकरण देणारे उत्तर किंवा कागदपत्रे अभिलेखावर दाखल केलेले नाहीत. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 हे तक्रारकर्ता यांची ठेव रक्कम परत करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत आणि त्यांनी तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे, या अनुमानास येत आहोत. त्या अनुषंगाने तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांच्याकडून वादकथित ठेव रक्कम व बचत खात्यातील रक्कम व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत.
(8) तक्रारकर्ता यांच्या ठेव रकमेकरिता द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दर दिसून येतो. ठेव पावत्यांचे वेळोवेळी नुतनीकरण करण्यात आलेले आहे आणि त्या-त्यावेळी व्याजासह एकूण रक्कम पुन्हा द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दराने गुंतवणूक केल्याचे दिसते. अशा स्थितीत अंतिमत: देय रक्कम व्याजासह मिळण्यासाठी तक्रारकर्ता पात्र ठरतात. ठेव पावत्यांकरिता देय व्याज दर हा करारात्मक व्याज दर असतो. ठेव पावत्यांची रक्कम द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दराने गुंतवणूक केलेली आहे आणि ठेव पावत्यांची रक्कम अदा न केल्यामुळे तो दर कायम ठेवणे न्यायोचित आहे. अशाप्रकारे तक्रारकर्ता हे ठेव पावत्यांच्या नुतनीकरणानंतर अंतिमत: देय असणारी रक्कम पुढे द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दराने मिळण्यास पात्र ठरतात. तसेच ठेव खात्यावरील रकमेकरिता साधारणत: द.सा.द.शे. 4 टक्के व्याज दर उचित ठरेल.
(9) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.20,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.20,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना ठेव रक्कम मुदतअंती प्राप्त झालेली नाही आणि त्याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत. उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना ठेव पावती अ.क्र. 089023 करिता रु.2,51,789/- व त्यावर दि.22/12/2017 पासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 16 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना ठेव पावती अ.क्र. 089024 करिता रु.2,39,491/- व त्यावर दि.25/12/2017 पासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 16 टक्के दराने व्याज द्यावे.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना ठेव पावती अ.क्र. 089028 करिता रु.2,91,482/- व त्यावर दि.18/7/2017 पासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 16 टक्के दराने व्याज द्यावे.
ग्राहक तक्रार क्र. 274/2018.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना बचत खाते क्र. 10305/98 मध्ये जमा रक्कम रु.1,831/- व त्यावर दि.12/5/2016 पासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 4 टक्के दराने व्याज द्यावे.
(6) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-