जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 132/2020. तक्रार दाखल दिनांक : 22/09/2020. तक्रार निर्णय दिनांक : 28/07/2022.
कालावधी : 01 वर्षे 10 महिने 06 दिवस
सुशिलाबाई भ्र. गणपती उर्फ गणपतराव सूर्यवंशी, वय 80 वर्षे,
व्यवसाय : शेती व घरकाम, रा. चाडगांव, ता. रेणापूर, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्या.,
सं. व सु. मंडळ, विद्युत भवन, तळमजला, जुने पॉवर हाऊस,
साळे गल्ली, लातूर.
(2) उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
मर्या., ग्रामीण उपविभाग, रेणापूर.
(3) कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.,
ग्रामीण भोकरंबा सब स्टेशन, ता. रेणापूर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- पी.आर. सोनवणे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- आर.बी. पांडे
आदेश
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, मौजे चाडगांव, ता. रेणापूर येथील गट क्रमांक 31 मध्ये त्यांचे नांवे असणा-या 2 हे. 30 आर. व त्यांचे पती मयत गणपती उर्फ गणवतराव मोतीराम सोमवंशी यांचे नांवे 7/12 नोंद असणा-या 1 हे. 32 आर. क्षेत्राच्या त्या मालक व कब्जेदार आहेत. सन 2018-19 मध्ये त्या शेतजमिनीतील 2 हेक्टर क्षेत्रामध्ये खोडवा व 1 हेक्टर क्षेत्रामध्ये नवीन ऊस लागण केलेली होती. सन 2007 पासून त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून विद्युत जोडणी घेतलेली आहे आणि त्यांचा ग्राहक क्रमांक 570450284212 आहे. ऊस पीक कारखान्यामध्ये गाळपासाठी तयार असल्यामुळे दि.3/4/2019 रोजी ऊस तोडणी सुरु होती. परंतु दि.4/4/2019 रोजी सकाळी 6.00 वाजता त्यांच्या शेतजमिनीमधून गेलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा ढिल्या असल्यामुळे एकमेकांना घर्षण होऊन ठिणग्या ऊसामध्ये पडल्या आणि ऊस पिकासह ठिबक सिंचन संच, पी.व्ही.सी. पाईप लाईन, स्प्रींकलर जळून गेले. विरुध्द पक्ष यांच्यासह तहसील कार्यालय व कृषि सहायक यांना घटनेची सूचना दिली. तलाठी, चाडगांव यांनी घटनेची पाहणी करुन पंचनामा केला. तसेच पोलीस यंत्रणेद्वारे घटनास्थळ पंचनामा केला. परंतु विरुध्द पक्ष यांनी स्थळ पाहणी करुन चौकशी केलेली नाही. शासकीय यंत्रणेच्या अहवालानुसार तक्रारकर्ती यांचे रु.7,00,000/- चे नुकसान झाले आहे. विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवूनही नुकसान भरपाई देण्याकरिता दखल घेतली नाही. उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.7,00,000/- नुकसान भरपाई व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.1,00,000/- देण्याचा व रु.25,000/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश मजकूर अमान्य केला आहे. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ती ह्या विरुध्द पक्ष यांच्या ग्राहक नाहीत. तसेच देयक थकबाकीमध्ये आहे. विद्युत वाहिनीची दररोज पाहणी करण्यात येते आणि त्रुटी आढळल्यास त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात येते. त्यांच्या दैनंदीन कार्य पत्रकाप्रमाणे दि.4/4/2019 रोजी सकाळी 6.35 वाजता 11 के.व्ही. मोटेगांव फिडर या ठिकाणी Over Current ची कुठलीही ट्रिपींग घडलेली नसून अर्थ फॉल्टची ट्रिपींग झालेली आहे. त्यामुळे अशाप्रकारे ठिणगी पडून घटना घडण्याचा प्रश्न येत नाही. विरुध्द पक्ष यांचे पुढे कथन असे की, तक्रारकर्ती यांच्या शेतजमिनीतील 168.587 टन ऊस दि.1/4/2019 ते 12/4/2019 या कालावधीमध्ये रेणा सहकरी साखर कारखाना लि., दिलीप नगर येथे रु.2,477.90 पैसे या दराने गाळपास दिलेला आहे. कारखान्याने तक्रारकर्ती यांना रु.4,17,742/- रक्कम दिलेली आहे. तक्रारकर्ती यांनी खोटी व बनावट तक्रार दाखल केलेली असल्यामुळे खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(3) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ती ह्या विरुध्द पक्ष यांच्या 'ग्राहक' आहेत काय ? होय.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(3) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? अंशत:
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 :- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांचे पती गणपती मोतीराम सोमवंशी यांच्या नांवे विद्युत पुरवठा दिलेला आहे आणि त्यांचा ग्राहक क्रमांक 570450284212 आहे, याबद्दल उभयतांमध्ये दुमत नाही. गणपती सोमवंशी यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती ह्या त्या शेतजमिनीकरिता विद्युत पुरवठ्याचा लाभ घेत आहेत, हे विवादीत नाही. असे दिसते की, गणपती सोमवंशी यांच्या मृत्यूपश्चात तक्रारकर्ती यांनी विद्युत जोडणी त्यांच्या नांवे हस्तांतरीत करुन घेतलेली नाही. असे असले तरी तक्रारकर्ती ह्या गणपती सोमवंशी यांच्या पत्नी आहेत आणि ज्या शेती प्रयोजनाकरिता विद्युत जोडणी घेतली, त्याकरिता विद्युत पुरवठ्याचा वापर करण्यात येत आहे. अशा स्थितीमध्ये तक्रारकर्ती ह्या विद्युत पुरवठ्याकरिता लाभार्थी ग्राहक ठरतात आणि त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
(5) मुद्दा क्र. 2 ते 4 :- मुद्दा क्र. 2 ते 4 एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. हे सत्य आहे की, दि.4/4/2019 रोजी तक्रारकर्ती यांच्या ऊस पिकास आग लागून ऊस पीक व ठिबक सिंचन संच व अन्य साहित्य जळाले. तक्रारकर्ती यांच्या कथनानुसार आग लागण्याकरिता विरुध्द पक्ष यांच्या विद्युत वाहिनीतील घर्षण कारणीभूत आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या कथनानुसार कथित दिवशी ट्रिपींग झालेले नाही. निर्विवादपणे, विद्युत वितरण करण्यासाठी उभारलेले उपरी तारमार्ग, विद्युत खांब व विद्युत रोहित्र इ. संलग्न विद्युत संच मांडणी यांची वेळोवेळी आवश्यक देखभाल, दुरुस्ती व ते सुरक्षीत ठेवणे ही विरुध्द पक्ष यांची जबाबदारी आहे. ऊस जळीत घटनेच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा व तलाठी यांनी पंचनामा केलेला आहे. असे दिसते की, ऊस जळीत घटनेबाबत तक्रारकर्ती यांनी त्याच दिवशी लेखी अर्जाद्वारे विरुध्द पक्ष यांनाही कळविलेले होते. परंतु विरुध्द पक्ष यांनी ऊस जळीत घटनेबाबत चौकशी व पंचनामा केलेला दिसून येत नाही. विरुध्द पक्ष यांनी घटनेबाबत विद्युत निरीक्षक यांना कळविलेले नाही, असेही दिसते. ज्यावेळी विद्युत वाहिनीच्या तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडल्यामुळे ऊस पिकास आग लागली, अशी तक्रार होती, त्यावेळी विरुध्द पक्ष यांनी घटनेबाबत चौकशी व पंचनामा करणे आवश्यक होते; परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे. विरुध्द पक्ष यांचे कथन असे की, त्यांच्या दैनंदीन कार्य पत्रकाप्रमाणे दि.4/4/2019 रोजी सकाळी 6.35 वाजता 11 के.व्ही. मोटेगांव फिडर या ठिकाणी Over Current ची कुठलीही ट्रिपींग घडलेली नसून अर्थ फॉल्टची ट्रिपींग झालेली आहे. वास्तविक पाहता, उक्त कथनापृष्ठयर्थही त्यांनी उचित पुरावा सादर केलेला नाही. तसेच विद्युत तारांमध्ये असणारे अंतर, खांबामध्ये असणारे अंतर, तारामध्ये असणारा झोळ, एकमेकांना तारांचे घर्षण न होण्याकरिता केलेले उपाययोजना इ. बाबत उचित पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारकर्ती यांचे ऊस पीक गाळपासाठी नेत असताना ऊस जळीत घटना घडलेली आहे. विद्युत तारांच्या घर्षणाशिवाय अन्य कारणामुळे ऊस पिकास आग लागली, असा पुरावा नाही. अशा स्थितीमध्ये ऊस पिकास विद्युत वाहिनीच्या तारांच्या घर्षणामुळे निर्माण झालेल्या ठिणग्यांमुळे आग लागली, असा निष्कर्ष काढणे उचित ठरते. ऊस जळीत दुर्घटनेच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येते. विरुध्द पक्ष यांच्या दुर्लक्षामुळे किंवा निष्काळजीपणामुळे घडलेल्या विद्युत दुर्घटनेच्या अनुषंगाने नुकसान झाले असल्यास त्याची भरपाई करण्यापासून त्यांना मुक्त होता येणार नाही.
(6) तक्रारकर्ती यांचे कथन असे की, जळीत दुर्घटनेमध्ये ऊस पिकाचे रु.6,60,000/- व ठिबक सिंचन संच व पाईपचे रु.2,00,000/- चे नुकसान झाले आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष विरुध्द पक्ष यांचे कथन असे की, दि.1/4/2019 ते 12/4/2019 या कालावधीमध्ये तक्रारकर्ती यांच्या शेतजमिनीतील 168.587 टन ऊस रेणा सहकरी साखर कारखाना लि., दिलीप नगर येथे रु.2,477.90 पैसे या दराने गाळपास दिलेला असून कारखान्याने तक्रारकर्ती यांना रु.4,17,742/- रक्कम दिलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी रेणा सहकारी साखर कारखान्याचे दि.28/8/2021 रोजीचे पत्र दाखल केले असून ज्यामध्ये तक्रारकर्ती यांना रु.4,17,742/- देयक अदा केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ती यांनी उक्त पुराव्याचे खंडन केलेले नाही किंवा त्याविरुध्द पुरावा सादर केलेला नाही. तक्रारकर्ती यांचे ऊस पीक कारखान्याकडे गाळपासाठी नेत असताना जळाले आणि ते कारखान्यास गाळपासाठी दिल्यानंतर त्याचे देयक प्राप्त झालेले आहे. अशा स्थितीत तक्रारकर्ती यांचे ऊस पीक जळाले असले तरी ते गाळप होऊन देयक प्राप्त झाल्यामुळे तक्रारकर्ती यांचे नुकसान झाले, हे मान्य करता येत नाही. त्यामुळे जळीत ऊस पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर करता येणार नाही.
(7) तक्रारकर्ती यांच्या ठिबक सिंचन संच व पाईप लाईनबद्दल नुकसान भरपाई मागणीबाबत विचार करताना पोलीस यंत्रणा व तलाठी पंचनाम्यामध्ये ठिबक सिंचन संच जळाल्याचा उल्लेख आढळतो. तक्रारकर्ती यांनी ठिबक सिंचन संचाबद्दल रु.2,00,000/- चे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. वास्तविक पाहता, ठिबक सिंचन संच किती क्षेत्रामध्ये होता ? तो कधी खरेदी केला होता ? त्याचे मुल्य काय होते ? इ. प्रश्न पुराव्याअभावी अनुत्तरीत राहतात. ठिबक सिंचन संच खरेदी केल्याबाबत तक्रारकर्ती किंवा विक्रेता यांच्याकडे अभिलेख असू शकतो. परंतु तो अभिलेखावर दाखल केलेला नाही. तसेच वापरानुसार ठिबक सिंचन संचाची झीज होत असल्यामुळे त्याकरिता घसारा निर्माण होतो. परंतु ठिबक सिंचन संचाबद्दल आवश्यक व उचित पुरावे उपलब्ध नसल्यमुळे केवळ तर्क व अनुमानाच्या आधारे नुकसान भरपाई मंजूर करणे योग्य ठरेल. योग्य विचाराअंती तक्रारकर्ती यांना ठिबक सिंचन संचाकरिता रु.20,000/- नुकसान भरपाई मंजूर करणे न्यायोचित राहील, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(8) तक्रारकर्ती यांनी मानसिक त्रासाकरिता रु.1,00,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.25,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम ठरविताना गृहीत त्या–त्या परिस्थितीवर आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ती ह्या गृहिणी असून व्यवसायाने शेतकरी आहेत. ऊस जळीत घटनेनंतर त्यांना स्वत:चे दैनंदीन व्यवहार बाजुला ठेवून पोलीस, महसूल, विद्युत महामंडळ इ. यंत्रणाकडे जावे लागले. तसेच नुकसान भरपाई मिळविण्याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्याकरिता त्रास होणे स्वाभाविक आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी नुकसान भरपाई न दिल्यामुळे तक्रारकर्ती यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला, सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती तक्रारकर्ती ह्या मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता तक्रारकर्ती रु.3,000/- मिळण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्ही येत आहोत. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.4 करिता खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ती यांना रु.20,000/- नुकसान भरपाई द्यावी.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ती यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-