न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती रोहिणी बा. जाधव, सदस्य
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
जाबदार हे लर्निंग स्टार या नावाने शैक्षणीक सॉफ्टवेअर तयार करुन त्याची ग्राहकांना विक्री करीत असतात. तक्रारदार यांची मुलगी इ. 1 ली मध्ये शिकत आहे. जाबदार यांच्या ऑफिसमध्ये असणा-या स्वाती पवार यांनी दि. 5/07/2021 रोजी तसेच त्यानंतर वारंवार तक्रारदार यांना फोन करुन शैक्षणीक अॅपची माहिती दिली. तसेच व्हाट्सअॅपवर देखील त्याबाबतची माहिती पाठविली. तसेच दि. 5 जुलै 2021 रोजी नोंदणी केल्यास दिलेल्या किंमतीमध्ये सूट असलेबाबत सांगितले. तसेच टॅब मोफत दिला जाईल असेही सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी जाबदार यांना रक्कम रु. 11,000/- जाबदार यांचे खातेवर पाठविले. तदनंतर जाबदार यांच्या कार्यालयातून तक्रारदार यांना, तुम्ही अजून रक्कम भरल्यास तुम्हाला अधिक शैक्षणीक सवलती मिळून तुम्हाला उच्च प्रतीचे शैक्षणीक अॅप प्रदान केले जाईल असे सांगितले तसेच तुम्ही भरलेली रक्कमही पुन्हा तुम्हाला परत मिळेल व त्यासाठी फक्त त्यावर दाखविण्यासाठी पैसे भरा व त्याचा परतावा तुम्हाला केला जाईल असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी जाबदार यांना वेळोवेळी रकमा प्रदान केल्या. अशा प्रकारे तक्रारदार यांनी जाबदार यांना एकूण रक्कम रु.51,998/- प्रदान केली आहे. तदनंतर जाबदार यांनी तक्रारदार यांना केवळ रक्कम रु.7,000/- चा 7 इंची टॅब पाठविला. त्यामध्ये केवळ इयत्ता पहिलीचे अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर होते. त्यातील अभ्यासक्रम हा पाठयपुस्तकाप्रमाणे नव्हता. तदनंतर तक्रारदार यांनी जाबदार यांचेशी संपर्क साधला असता जाबदार यांनी 10 इंची टॅब पाठवितो तसेच सर्व आधुनिक शैक्षणीक माहिती व शैक्षणीक सॉफ्टवेअर पाठवितो असे सांगितले परंतु जाबदार यांनी ते पाठविले नाही. उलट जाबदार यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी तक्रारदार यांनी जाबदार यांना वकीलामार्फत दि.16/11/2021 रोजी नोटीस पाठविली. परंतु तरीही जाबदार यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, जाबदार यांनी तक्रारदाराकडून स्वीकारलेली रक्कम रु.51,998/- परत मिळावी, सदर रकमेवर 18 टक्के दराने व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,00,000/- मिळावी व अर्जाचा खर्च रु.50,000/- जाबदार यांचेकडून मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत तक्रारदार यांनी जाबदार यांना अदा केलेल्या रकमांच्या पावत्या, तक्रारदार यांनी जाबदार यांचे कर्मचा-यांशी व्हाट्सअॅपद्वारे केलेल्या संवादाचा तपशील, जाबदार यांची जाहीरात, तक्रारदार यांनी जाबदार यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत व सदर नोटीसची पोस्टाची पावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार यांचेवर होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत तसेच त्यांनी म्हणणेही दाखल केले नाही. सबब, जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र व युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे जाबदार यांचेकडून भरलेली रक्कम परत मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
6. जाबदार हे लर्निंग स्टार या नावाने शैक्षणीक सॉफ्टवेअर तयार करुन त्याची ग्राहकांना विक्री करीत असतात. तक्रारदार यांनी त्यांचे इ. 1 ली मध्ये शिकणा-या मुलीसाठी शैक्षणीक सॉफ्टवेअर व टॅबचे खरेदीसाठी जाबदार यांना एकूण रक्कम रु.51,998/- प्रदान केली. त्याच्या पावत्या तक्रारदारांनी याकामी दाखल केल्या आहेत. जाबदार यांनी याकामी हजर होवून सदरची बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील कथन तसेच तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदयादीतील अ.क्र.1 ला दाखल केलेल्या पावत्यांचे अवलोकन करता, तक्रारदार यांनी जाबदार यांना शैक्षणीक सॉफ्टवेअरचे खरेदीपोटी एकूण रक्कम रु. 51,998/- अदा केल्याचे दिसून येते. त्याबदल्यात जाबदार यांनी तक्रारदार यांना 10 इंची टॅब, आधुनिक शैक्षणीक माहिती असलेले सॉफ्टवेअर पाठवितो असे सांगितले परंतु त्यांनी तक्रारदारांना फक्त 7 इंची टॅब पाठविला व त्यामध्ये फक्त इयत्ता पहिलीचाच अभ्यासक्रम होता व तोही पाठयपुस्तकातील अभ्यासक्रमाप्रमाणे नव्हता असे तक्रारदाराचे कथन आहे. तक्रारदाराने जाबदार यांचे ऑफिसमधील कर्मचा-यांबरोबर केलेल्या व्हाट्सअॅप संवादाच्या प्रती तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदयादीसोबत दाखल केल्या आहेत. सदरचे संवादाचे अवलोकन करता, तक्रारदाराने जाबदारांकडे वारंवार विचारणा केल्याचे व जाबदारांचे कर्मचा-यांनी तक्रारदारांना सतत, हयांना फोन करा, त्यांना फोन करा, ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला आहे, काळजी करु नका, अशी उडवउडवीची उत्तरे देवून तक्रारदारांची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येते.
8. तक्रारदारांनी दि. 29/07/2021 ते दि. 21/08/2021 पर्यंत रु.51,998/- जाबदारांना दिले. त्यानंतर जाबदारांकडून 10 इंची टॅबलेट, आधुनिक शैक्षणीक साहित्य अथवा पैसे परत मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याचे दिसून येते तथापि जाबदारांकडून तक्रारदारांना समाधानकारक असे कोणतेही उत्तर मिळालेचे दिसून येत नाही अथवा जाबदारांनी तक्रारदाराचे मागणीनुसार कोणतेही पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही. तक्रारदारांनी जाबदारांना मॅसेज व फोन केलेचे दिसून येते परंतु जाबदारांनी त्यास कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दाखल पुराव्यांवरुन दिसून येत नाही. तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदयादीतील अ.क्र.7 वरुन तक्रारदारांनी जाबदार यांना दि. 14/4/2022 रोजी वकीलामार्फत नोटीसही पाठविल्याचे दिसते परंतु सदर नोटीसीसही जाबदार यांनी उत्तर दिलेले नाही. सदर नोटीस जाबदारांना मिळाल्याबाबतची पोहोचपावती याच कागदयादीत अ.क्र.8 ला जोडलेली आहे. तक्रारदाराने त्यांचे तक्रारअर्जातील सदर कथनांचे पुष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. जाबदार हे याकामी हजर झाले नाहीत तसेच त्यांनी त्यांचे म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब, जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश केलेला आहे. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. जाबदारांना याकामी संधी असूनही म्हणणे व पुरावा दाखल करुन तक्रारअर्जातील कथने नाकारलेली नाहीत. या सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदाराने आपली तक्रार शाबीत केलेली आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, जाबदारांनी तक्रारदारांना योग्य आधुनिक शैक्षणीक साहित्य व त्यासाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर तसेच 10 इंची टॅब न देवून तसेच घेतलेली रक्कम परत न करुन तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
9. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचेकडून जाबदार यांना अदा केलेली रक्कम रु. 51,998/- परत मिळण्यास पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे या आयोगाचे मत आहे. तसेच जाबदार यांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास नाहक मानसिक त्रास सोसावा लागला तसेच या आयोगात तक्रार दाखल करावी लागली. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- जाबदारांकडून मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार यांनी तक्रारदार यांना उर्वरीत विमाक्लेमपोटी रक्कम रु. 51,998/- अदा करावी. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
- जाबदारांनी तक्रारदारास वर नमूद आदेश क्र.2 नुसार रक्कम अदा केलेनंतर तक्रारदार यांनी जाबदार यांना जाबदार यांनी तक्रारदारांना दिलेला सात इंची टॅब व अन्य शैक्षणीक साहित्य परत करावे.
- जाबदार यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी प्रस्तुत निकालपत्राची प्रत मिळालेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.