रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक ४/२०१२
तक्रार दाखल दि. ३०/०३/२०१२
न्यायनिर्णय दि.- ०२/०३/२०१५
कु. निलम विठ्ठल औकीरकर,
रा. किल्ले रायगड, ता. महाड, जि. रायगड. ..... तक्रारदार
विरुध्द
१. जनकल्याण सहकारी पतसंस्था मर्यादित,
विरेश्वर मंदीराजवळ, महाड, जि. रायगड.
२. मा. चेअरमन,
जनकल्याण सहकारी पतसंस्था मर्यादित,
विरेश्वर मंदीराजवळ, महाड, जि. रायगड.
३. मा. व्यवस्थापक,
जनकल्याण सहकारी पतसंस्था मर्यादित,
विरेश्वर मंदीराजवळ, महाड, जि. रायगड. ..... सामनेवाले क्र. १ ते ३
समक्ष - मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर,.
मा. सदस्या, श्रीम. उल्का अं. पावसकर,
मा. सदस्य, श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी,
उपस्थिती – तक्रारदार तर्फे अॅड. सचिन पाटील
सामनेवाले १ ते ३ गैरहजर.
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
१. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी तक्रारदार यांस कराराप्रमाणे मुदतबंद ठेव खात्यामधील रक्कम मुदतीपूर्ती होऊनही परत न करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार हया वर नमूद पत्त्यावर रहात असून त्या पायाने अपंग आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. १ ते ३ यांचेकडे खालीलप्रमाणे मुदतठेव ठेवली होती.
तक्रारदार यांच्या ठेवीचे वर्णन :-
अ.क्र. | ठेवपावती क्र. | ठेव दिनांक | ठेवीची रक्कम रु. | ठेव देय दिनांक | ठेव पूर्ति रक्कम रु. | व्याज दर |
१. | ०१९५०७ | २०/०८/०२ | २५,०००/- | २०/०८/०७ | ५०,०००/- | १४.५% |
३. सदर मुदतबंद ठेवींची मागणी मुदतीनंतर सामनेवाले क्र. १ ते ३ यांचेकडे तक्रारदार यांनी केली असता, सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी सदर ठेव रक्कम “आज” देतो “उद्या” देतो असे सांगून तक्रारदारांना परत पाठविले व वेगवेगळी कारणे सांगून ठेव रक्कम देण्यास टाळाटाळ केली. परंतु त्यानंतरही तक्रारदारांनी अनेकवेळा सामनेवाले क्र. १ ते ३ यांचेकडे मागणी करुनही सामनेवाले यांनी तक्रारदारांस कोणतेही समर्थनीय कारण सांगितले नाही अथवा तक्रारदार यांची ठेव परत केली नाही. तक्रारदार यांनी दि. २५/११/१० व दि. १२/१२/११ रोजी सामनेवाले यांस ठेव रकमा परत देण्याविषयी वकीलांमार्फत रजिस्टर्ड नोटीस पाठविली असता सामनेवाले यांनी सदर नोटीसांना त्यावेळी कोणतेही उत्तर दिले नाही. परंतु दि. २६/१२/११ रोजी सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या नोटीसीला उत्तर पाठवून तक्रारदाराचीं ठेवीची रक्कम देय असल्याचे मान्य केले व मागील सन २००२ या वर्षातील काही झालेल्या मिटींगची कागदपत्रे सदर नोटीसच्या पाठीमागे जोडून पाठविली. परंतु आजपर्यंत तक्रारदार यांना त्यांच्या मुदतठेवीची रक्कम व्याजासह सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी परत न दिल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
४. तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने सामनेवाले क्र. १ ते ३ यांना लेखी जबाब दाखल करण्यासाठी नोटीस पाठविली. मंचाची नोटीस प्राप्त झाल्यावर सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी मंचासमक्ष हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी जबाबात तक्रारीमधील मुद्दयांचे खंडन केले आहे. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी जबाबात असे कथन केले आहे की, सामनेवाले पतसंस्था ही एक अडचणीतील पतसंस्था आहे. संस्था आर्थिक अडचणीतून बाहेर यावी व सर्वच ठेवीदारांना न्याय मिळावा या हेतूने संस्थेने सर्व ठेवीदारांची जाहीर मिटींग घेऊन त्यात रक्कम परताव्याचा तपशिल सर्व ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन ठेवीदारांच्या संमतीनेच निश्चित केला गेला व त्यानुसार गेले ३० महिने सर्वच ठेवीदार त्यांच्या ठेव रकमा संस्थेकडून दरमहा घेत आहेत. संस्थेच्या ठेवीदारांनी केलेल्या ठेव परतावा योजनेनुसार तक्रारदार यांना आज पर्यंत अनेकवेळा रक्कम स्विकारण्याची विनंती संस्थेने केलेली असून याबाबत संस्थेने कोणत्याही प्रकारे टाळाटाळ केलेली नाही. सर्व ठेवीदारांना न्याय देण्याचे धोरण डोळयासमोर ठेवून थकीत वसूली नवीन व्यवहार या गोष्टी चालू केल्या असून संस्था स्थिरावण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे तक्रारदारांची ठेव रक्कम परत करणेकामी संस्थेला दरमहा रु. २,५००/- प्रमाणे रकमेचा हप्ता मिळावा, संस्था अडचणीत व तोट्यात असल्याने सामनेवाले यांस तक्रारदारांस कोणत्याही प्रकारे शारीरिक व मानसिक त्रासासाठी नुकसानभरपाईची रक्कम देणे परवडणारे नाही व तक्रारदारांच्या मुदतठेव रकमेवर बचत खात्याच्या व्याज दराप्रमाणे आकारणी करण्याचा आदेश मिळावा अशी विनंती सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी केली आहे.
५. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले क्र. १ ते ३ यांचा लेखी जबाब, तक्रारदारांचे पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व तक्रारदारांची वादकथने यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक १ - सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस
कराराप्रमाणे तक्रारदाराच्या मुदतबंद ठेव खात्यामधील
रक्कम मुदतपूर्तीनंतरही परत न करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर
केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक २ - सामनेवाले क्र. १ ते ३ वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस
नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक ३ - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमीमांसा-
६. मुद्दा क्रमांक १ व २ - सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी तक्रारदारांस कराराप्रमाणे मुदतबंद ठेव खात्यावरील रक्कम मुदतपूर्ती नंतर व्याजासह परत करण्याची हमी दिली होती. त्याप्रमाणे तक्रारदारांनी मुदतपूर्तीनंतर व तक्रारदारांच्या निकडीच्या वेळी जमा रक्कमेची सामनेवाले यांचेकडे मागणी केली असता, सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. तक्रारदारांनी नोटीस पाठवूनही तक्रारदाराच्या नोटीसीला उत्तर पाठवून तक्रारदाराचीं ठेवीची रक्कम देय असल्याचे मान्य केले व मागील सन २००२ या वर्षातील काही झालेल्या मिटींगची कागदपत्रे सदर नोटीसच्या पाठीमागे जोडून पाठविली. परंतु आजपर्यंत तक्रारदार यांना त्यांच्या मुदतठेवीची रक्कम व्याजासह सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी अदा करण्याबाबत कोणतीही कोणतीही उपाययोजना केली नाही हे कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते.
याठिकाणी ही बाब नमूद करणे आवश्यक आहे की, मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र. ५२२३०९, श्रीमती वर्षा रविंद्र ईसाई विरुध्द सौ. राजश्री राजकुमार चौधरी व इतर मध्ये दि. २२/१२/१० (AIR 2011 Bombay 68) रोजी पारीत न्यायनिर्णयामध्ये तक्रारदारांची थकीत मुदतठेव रक्कम अदा करण्यास संचालक मंडळ वैयक्तिकरित्या जबाबदार नसून तक्रारदारांना ग्राहक मंचाकडे वैयक्तिक संचालकांविरुध्द तक्रार दाखल करता येणार नाही असे न्यायतत्त्व विशद केले आहे. त्याप्रमाणे प्रस्तुत तक्रार ही वैयक्तिक संचालकांचे विरुध्द दाखल झाल्याने सामनेवाले क्र. २ व ३ यांची ही वैयक्तिक जबाबदारी नसून ती त्यांची सामूहिक जबाबदारी आहे. कोणतीही पतसंस्था ही एक कायदेशीर व्यक्ति असून वैयक्तिक संस्थेच्या पदाधिकारी / संचालक यांच्या विरुध्द तक्रारदारांना ग्राहक मंचाकडे तक्रार सादर करता येणार नाही या न्यायतत्त्वास अनुसरुन केवळ पतसंस्थे विरुध्द तक्रारदारांना ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करता येईल.
तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे गुंतविलेली रक्कम विहीत कालावधीनंतर व्याजासहीत परत करण्याबाबत उभयपक्षांत करारनामा झाला होता. सदर करारनाम्याप्रमाणे सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी तक्रारदारांस सदरील रक्कम परत न दिल्याने तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. परंतु वर नमूद केलेल्या न्यायनिर्णयातील न्यायतत्त्वामध्ये विशद केल्यानुसार सामनेवाले क्र. २ व ३ हे वैयक्तिकरित्या तक्रारदार यांना नुकसानभरपाई देण्यास जबाबदार नसून ती त्यांच्यावरील एक सामूहिक जबाबदारी आहे. परंतु सामनेवाले क्र. २ व ३ हे पतसंस्थेचे प्राधिकृत प्रतिनिधी व विश्वस्त या नात्याने तक्रारदारांच्या मुदतबंद ठेवीची खात्यावरील रक्कम विहित कालावधीनंतर व्याजासह परत करण्याची कायदेशीर सामूहिक जबाबदारी सामनेवाले क्र. २ व ३ यांचेवर आहे. त्यामुळे सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी तक्रारदारांची ठेव रक्कम परत देण्याविषयी योग्य ती उपाययोजना विहीत मुदतीत करणे आवश्यक होते. परंतु सदर बाबींची पूर्तता सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी न केल्याची बाब दाखल कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सबब, मुद्दा क्रमांक १ व २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
८. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
१. तक्रार क्र. ४/२०१२ अंशत: मंजूर करण्यात येते.
२. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना कराराप्रमाणे मुदतठेव रक्कम मुदतपूर्तीनंतरही अदा न करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना खालील कोष्टकात नमूद केल्याप्रमाणे मुदतबंद ठेव खात्यामधील रक्कम कराराप्रमाणे देय असलेल्या व्याज रकमेसह या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसांत अदा करावेत.
तक्रारदार यांच्या ठेवीचे वर्णन :-
अ.क्र. | ठेवपावती क्र. | ठेव दिनांक | ठेवीची रक्कम रु. | ठेव देय दिनांक | ठेव पूर्ति रक्कम रु. | व्याज दर |
१. | ०१९५०७ | २०/०८/०२ | २५,०००/- | २०/०८/०७ | ५०,०००/- | १४.५% |
४. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे वर नमूद क्र. ३ ची पूर्तता विहीत कालावधीत न केल्यास सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी पूर्तता करेपर्यंत खालील कोष्टकात नमूद केल्याप्रमाणे मुदतबंद ठेव खात्यामधील रक्कम दि. ३०/०३/१२ पासून द.सा.द.शे. ९% व्याजासह तक्रारदारांस अदा करावी.
तक्रारदार क्र. १ यांच्या ठेवीचे वर्णन :-
अ.क्र. | ठेवपावती क्र. | ठेव दिनांक | ठेवीची रक्कम रु. | ठेव देय दिनांक | ठेव पूर्ति रक्कम रु. | व्याज दर |
१. | ०१९५०७ | २०/०८/०२ | २५,०००/- | २०/०८/०७ | ५०,०००/- | १४.५% |
५. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना तक्रार खर्च, मानसिक व शारिरिक त्रासापोटी एकत्रित रक्कम रू. १०,०००/- (रु. दहा हजार मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसांत अदा करावेत.
६. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक – ०२/०३/२०१५.
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.