जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 188/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 22/08/2023.
तक्रार दाखल दिनांक : 20/09/2023. तक्रार निर्णय दिनांक : 27/05/2024.
कालावधी : 00 वर्षे 09 महिने 05 दिवस
सोमवंशी सन्स तर्फे प्रोप्रा. विष्णू पिता हंसराज सोमवंशी,
वय 29 वर्षे, धंदा : व्यापार, रा. मंठाळे नगर, लातूर, ता. जि. लातूर.
दुकान पत्ता : सोमवंशी सन्स, आर-3/1033, सोनवणे बिल्डींग,
टिळक नगर, मेन रोड, लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) हुडाज् टेक्नॉलॉजीज् तर्फे व्यवस्थापक (Manager),
वय सज्ञान, धंदा : व्यापार.
(2) हुडाज् टेक्नॉलॉजीज् तर्फे संस्थापक आणि सीईओ
(Founder & CEO), जाहिद सैफी, वय सज्ञान, धंदा : व्यापार.
(3) हुडाज् टेक्नॉलॉजीज् तर्फे संचालक (Director),
नुरुल हुडा मोहम्मद, वय सज्ञान, धंदा : व्यापार.
(4) हुडाज् टेक्नॉलॉजीज् तर्फे विपनन संचालक
(Marketing Director), सदारुल ऊला मोहम्मद,
वय सज्ञान, धंदा : व्यापार. सर्व रा. सिटी सेंटर बिल्डींग,
सिटी सेंटर पर्सिस्टंटच्या पाठीमागे, सर्वे नं. 138/1,
हिंजेवाडी फेज-1, ता. मुळशी, जि. पुणे - 411 057. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. ओमप्रकाश पंडीत
विरुध्द पक्ष :- अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्रीमती रेखा जाधव, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचा सोमवंशी सन्स् नांवे लाकडी वस्तुंचे साहित्य व सुशोभीकरणाच्या लाकडांच्या वस्तुंचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायाशी संबंधीत सॉफ्टवेअर प्रकल्प बनविण्याकरिता विरुध्द पक्ष यांच्या कर्मचा-यांशी बोलणी झाल्यानुसार रु.85,000/- मुल्य निश्चित करण्यात आले. तक्रारकर्ता यांनी दि.10/4/2023 रोजी आर.टी.जी.एस. द्वारे रु.45,000/- व युपीआय (फोन पे) द्वारे रु.8,700/- याप्रमाणे एकूण रु.53,700/- विरुध्द पक्ष यांच्याकडे वर्ग केले. सॉफ्टवेअर बनविण्याकरिता 30 दिवसांची मुदत असताना विरुध्द पक्ष विलंब करीत होते आणि विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले असता व पाठपुरावा केला असता दखल घेतली नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे नमूद करुन उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.53,700/- व्याजासह परत करण्याचा; नुकसान भरपाई रु.50,000/- देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्चासह अन्य शुल्क रु.35,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(3) तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला.
(4) तक्रारकर्ता यांनी दि.10/4/2023 रोजी विरुध्द पक्ष यांना युको बँकेतून रु.45,000/- पाठविल्यासंबंधी एन.इ.एफ.टी. पावती अभिलेखावर दाखल केलेली आहे. तसेच यु.पी.आय. द्वारे त्यांनी दि.20/4/2023 रोजी रु.8,700/- पाठविल्याचे दिसून येते. तक्रारकर्ता यांनी कथन केल्यानुसार उभय पक्षांमध्ये सॉफ्टवेअर प्रकल्प बनविण्याच्या व्यवहारासंबंधी उचित कागदपत्रे नसले तरी विरुध्द पक्ष यांच्याशी ई-मेलद्वारे साधलेल्या संपर्कामध्ये विरुध्द पक्ष यांनी सॉफ्टवेअर बनविण्याची जबाबदारी घेतल्याचे सिध्द होते. ई-मेल संपर्कामध्ये सॉफ्टवेअर बनविण्याचे 85 टक्के काम पूर्ण झाल्याचे व 15 टक्के काम प्रलंबीत असल्याचे विरुध्द पक्ष यांनी नमूद केलेले आहे. विरुध्द पक्ष यांना तक्रारकर्ता यांच्याकडून कोणते कागदपत्रे मिळणे आवश्यक होते, याबद्दल स्पष्टीकरण दिसत नाही. असे दिसते की, सॉफ्टवेअर देण्यामध्ये अपयशी ठरल्यामुळे तक्रारकर्ता यांनी दि.7/7/2023 रोजी विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवून रु.53,700/- व्याजासह मागणी केलेली आहे. परंतु विरुध्द पक्ष यांनी सूचनापत्रास उत्तर दिलेले नाहीत किंवा सूचनापत्राप्रमाणे पूर्तता करण्याची दखल घेतलेली नाही.
(5) विरुध्द पक्ष हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिले. त्यामुळे तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीतील कथनांचे व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे खंडन झालेले नाही आणि त्या विरोधात पुरावा नाही.
(6) तक्रारकर्ता यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या "रोहित चौधरी /विरुध्द/ विपुल लिमिटेड", (2024) 1 Supreme Court Cases 8 न्यायनिर्णयाचा संदर्भ सादर केला. त्यामध्ये खरेदीकर्ता स्वंयरोजगाराच्या माध्यमातून उपजीविका भागविण्यासाठी खरेदी करीत असलेली वस्तू व्यापारी हेतुने असली तरी तो 'ग्राहक' ठरतो, असे तत्व आढळते. तसेच मा. राष्ट्रीय आयोगाचा "पुनम चेंबर्स "बी" कमर्शियल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि. /विरुध्द/ अलुप्लेक्स इंडिया प्रा.लि.", II (2013) CPJ 254 (NC) न्यायनिर्णयाचा सदंर्भ सादर केला आहे.
(7) तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर अ.क्र. 6 व पुरावा कागदपत्रांमध्ये अ.क्र.1 वर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, 2018 अंतर्गत फॉर्म "एफ" दाखल केले आहेत. त्यामध्ये नोंदणी तारीख 1/5/2017 व समाप्तीच्या तारीख अनुक्रमे 11/8/2024 व 1/5/2019 नमूद आहे. व्यवसायाचे स्वरुप अनुक्रमे 'Interior Furniture Land' व 'Furniture Interior Designer Landscape Designar' नमूद आहे. यावरुन तक्रारकर्ता हे घरगुती लाकडी साहित्याचे व्यापारी व त्यासंबंधी व्यवसायिक असल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याशी सॉफ्टवेअर खरेदी करण्याबद्दल व्यवहार केल्याचे निदर्शनास येत असले तरी ते सॉफ्टचेअर त्यांच्या व्यवसायाशी संबंधीत खरेदी केल्याचे सिध्द होते.
(8) तक्रारकर्ता यांनी उक्त न्यायनिर्णयाचा संदर्भ सादर करुन त्यांनी उपजीविकेसाठी सुरु केलेल्या व्यापाराकरिता वादकथित सॉफ्टवेअर खरेदी केल्याचे नमूद केले. परंतु त्यांच्या युक्तिवादानुसार ग्राहक तक्रारीमध्ये त्याप्रमाणे विधान किंवा कथन नाही. तक्रारकर्ता यांच्याद्वारे खरेदी करण्यात येत असलेल्या सॉफ्टवेअरचा त्यांच्या व्यापार व व्यवसायामध्ये कशाप्रकारे उपयुक्तता होती, याबद्दल विवेचन नाही. सकृतदर्शनी, तक्रारकर्ता यांनी स्वंयरोजगाराच्या माध्यमातून स्वत:ची उपजीविका भागविण्याकरिता व्यापार व व्यवसाय करीत असल्याचे सिध्द होत नाही. परिणामी, तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (7) अन्वये 'ग्राहक' असल्याचे सिध्द होत नसल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे ग्राहक तक्रारीमध्ये उपस्थित अन्य प्रश्नांना स्पर्श न करता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-