::निकालपत्र::
(पारीत व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य )
(पारीत दिनांक–23 जानेवारी, 2017)
01. तक्रारकर्तीने मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) उत्पादीत फराळी चिवडया संबधात दाखल केली आहे.
02. तक्रारकर्तीची संक्षीप्त तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती घरकाम करणारी गृहीणी आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) फराळी चिवडयाचे उत्पादन करणारी कंपनी असून, विरुध्दपक्ष क्रं-3) हे विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं 2 चे उत्पादने आपल्या किराणा दुकानातून विक्री करणारा विक्रेता आहे. तक्रारकर्तीला चैत्र महिन्यात देवीचे नवरात्र, अष्ठमी असल्याने उपवास असल्याने तिने दिनांक-18/04/2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1)
व क्रं-2) उत्पादीत फलहारी चिवडयाचे 100 ग्रॅमचे पॉकीट, ज्याचा उत्पादन बॅच क्रं-13-R-267, पॅकींग तारीख-09.04.2013 आणि किम्मत रुपये-10/- विरुध्दपक्ष क्रं-3) चे किराणा दुकानातून विकत घेतले व बिल प्राप्त केले.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने फराळी चिवडयाचे बंद पॉकीट उघडून एक-दोन घास घेतले व त्यानंतर तिच्या हातात चामडयाच्या चपलेचा तुटलेला आंगठयाचा तुकडा आला, व त्याच्यासोबत अन्य बारीक चामडयाचे तुकडे सुध्दा होते . सदर चपलेचा आंगठा पूर्णपणे तळलेला होता त्यामुळे तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला, परिणामी तिला उलटयाचा त्रास सुरु झाला. तिने त्वरीत त्याचे फोटो काढले. तिचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) ही अन्नपदार्धाचे उत्पादन करणारी नामांकित कंपनी असून आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची ख्याती आहे, असे असताना फराळी चिवडयाचे पॉकीट मध्ये चामडयाचे तुकडे आढळणे हा एक निष्काळजीपणाचा प्रकार आहे.
तिला उलटयाचा त्रास सुरु झाल्यामुळे घरा शेजारी राहणा-या डॉ.टी.एम.पाटील यांचे मेहर क्लिनीक मध्ये तिला दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना अन्न सेवनातून विषबाधा झाल्याचे व तिला ताप असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी त्वरीत तिचा रक्तदाब, रक्त आणि युरिन व अन्य वैद्दकीय तपासण्या करुन तिला सलाईन व इंजेक्शन दिले. तिला डॉ.पाटील यांच्या क्लिनीक मध्ये दिड दिवस भरती करण्यातआले होते. डॉक्टर पाटील यांनी केलेल्या वैद्दकीय उपचाराचा दिनांक-19/04/2013 रोजीचा दस्तऐवज ती तक्रारी सोबत दाखल करीत आहे.
तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, या सर्व प्रकारा बद्दल विरुध्दपक्ष कंपनी आणि तिचे उत्पादन युनीट जबाबदार आहे. अशाप्रकारची खाद्द उत्पादने बाजारात विक्रीस आणण्यापूर्वी त्यांची पूर्णपणे तपासणी होणे आवश्यक आहे परंतु तिचे बाबतीत तसे घडलेले नाही. तिने उपरोक्त नमुद प्रकारा बद्दल विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) कडे तसेच वरिष्ठ पोलीस निरिक्षक, गिट्टी खदान, नागपूर यांचे कडे लेखी तक्रार केली. त्याच बरोबर दिनांक-20/04/2013 रोजी तिने अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विरुध्द लेखी तक्रार केली परंतु त्यांनी अद्दाप पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) निर्मित दोषपूर्ण फराळी चिवडयामुळे तक्रारकर्तीला विषबाधा झाल्याने तिला औषधोपचार, विविध वैद्दकीय तपासण्या करवून घ्याव्या लागल्यात आणि त्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 जबाबदार आहेत.
विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) ची कृती ही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब आणि खाद्द पदार्थाचे उत्पादन करुन पॅकींग करे पर्यंत निष्काळजीपणाचे कृत्यू दिसून येते. म्हणून तिने ग्राहक मंचात तक्रार दाखल करुन विरुध्दपक्षा विरुध्द खालील मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी उत्पादीत केलेल्या फराळी चिवडयाचे बंद पॉकिटात चामडयाचे चपलेचा आंगठा आढळून आल्याने त्यांचे उत्पादन दोषी ठरवून त्यांचे विरुध्द योग्य ती कारवाई करण्या संबधी आदेशित व्हावे.
(2) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) निर्मित दोषपूर्ण फराळी चिवडयाचे सेवनामुळे तिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-2,00,000/-, तसेच दोषपूर्ण चिवडयाचे सेवनामुळे झालेल्या विषबाधेमुळे दवाखान्यात भरती होऊन केलेल्या औषधोपराचा खर्च म्हणून रुपये-50,000/- तसेच वैधानिक कारवाई करण्यासाठीचा खर्च म्हणून रुपये-20,000/- असे मिळून एकूण रुपये-2,70,000/- तक्रार दाखल दिनांका पासून वार्षिक-12 टक्के व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे.
(3) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) निर्मित दोषपूर्ण उत्पादनामुळे त्यांचे विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्या संबधी अन्न व औषधी प्रशासनास आदेशित व्हावे. तसेच तक्रारीचा खर्च मिळावा.
03 विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) हल्दीराम फुड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे एकत्रित लेखी उत्तर मंचा समक्ष दाखल करण्यात आले. त्यांनी उत्तरात नमुद केले की, त्यांनी सेवेत त्रृटी ठेवली नाही वा ग्राहक संरक्षण कायद्दातील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केलेले नाही त्यामुळे तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारकर्तीची संपूर्ण तक्रार ही नामंजूर करुन तक्रार ही खोटी असल्याचे नमुद केले. त्यांनी उत्पादन करताना कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. तक्रारकर्तीने तिला उपवास असल्याने दिनांक-18/04/2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) निर्मित फराळी चिवडयाचे 100 ग्रॅमचे पॉकीट एकूण रुपये-10/- एवढया किमतीत विरुध्दपक्ष क्रं-3) कडून विकत घेतले व बिल प्राप्त केले या बाबी नामंजूर केल्यात. तक्रारकर्तीने दाखल केलेला दस्तऐवज क्रं-1) पूर्णपणे बनावट असून त्यामध्ये कुठेही नमुद नाही की, ते विरुध्दपक्ष कंपनीचे उत्पादन आहे. बाजारात अनेक कंपन्यांचे फराळी चिवडयाची पॉकीटे विक्रीस उपलब्ध आहेत, त्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष कंपनी निर्मित उत्पादन विकत घेऊन सेवन केल्याचे विधान पूर्णपणे खोटे आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) निर्मित दोषपूर्ण फराळी चिवडयाचे सेवनामुळे तक्रारकर्तीची तब्येब बिघडल्याने तिल दवाखान्यात भरती होऊन औषधोपचार करावा लागल्याची बाब पूर्णपणे नामंजूर केली. आपल्या विशेष कथनात त्यांनी नमुद केले की, त्यांची उत्पादन करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही यांत्रिक असून त्यामध्ये मानवी संबध येत नाही. आलू स्वच्छ करण्या पासून ते पॅकींग पर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ही यांत्रिकी पध्दतीने करण्यात येते. तक्रारकर्तीची संपूर्ण तक्रार, तिने दाखल केलेले बिल, डॉक्टरांचे औषधोपचाराचे दस्तऐवज हे संपूर्ण खोटे व बनावट असल्याने तक्रार खर्चासह खारीज व्हावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) मिलींद विठठलराव राऊत याने उत्तर दाखल केले असून त्यात त्याला विनाकारण या तक्रारीत प्रतिपक्ष करण्यात आल्याचे नमुद केले. त्याने कोणताही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला नाही वा दोषपूर्ण सेवा दिली नाही तसेच त्याचे विरुध्द कोणतीही मागणी नाही. तक्रारकर्तीने त्याचे दुकानातून विरुध्दपक्ष हल्दीराम कंपनी निर्मित फराळी चिवडयाचे बंद पॉकीट खरेदी केले, त्यामुळे बंद असलेल्या पॉकीटच्या विक्री बाबत त्याला जबाबदार धरता येणार नाही. सबब त्याचे विरुध्दची तक्रार खारीज व्हावी अशी विनंती केली.
05. तक्रारकर्तीने दस्तऐवज यादी सोबत एकूण 5 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. ज्यामध्ये दस्तऐवज क्रं-1) फराळी चिवडा खरेदी बाबतचे दिनांक-18.04.2013 रोजीचे बिल आहे. दस्तऐवज क्रं-2) हा फराळी चिवडयाचे पॉकीट मधून चामडयाचे चपलेच्या आंगठयाचा तुकडा निघाल्याचेछायाचित्र आहे. डॉ.टी.एम.पाटील यांच्या मेहर क्लिनीक मध्ये तक्रारकर्तीने वैद्दकीय उपचार घेतल्या बाबत दिनांक-219.04.2013 रोजीचे कॉर्ड आहे. दस्तऐवज क्रं-4) तक्रारकर्तीने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, गिट्टी खदान, नागपूर यांचेकडे दिनांक-20/04/2013 रोजी केलेली तक्रार आहे. तर दस्तऐवज क्रं-5) सह आयुक्त (अन्न), अन्न व औषधी प्रशासन विभाग, नागपूर यांचेकडे तक्रारकर्तीने दिनांक-20.04.2013 रोजी केलेल्या तक्रारीची प्रत आहे. तसेच तक्रारकर्तीने लेखी युक्तीवादा सोबत सह आयुक्त, अन्न औषधी प्रशासन , नागपूर यांनी तक्रारकर्तीला दिनांक-03/12/2013 रोजीच्या दिलेल्या पत्राची प्रत, माहिती अधिकारा खालील तक्रारकर्तीचा अर्ज, माहिती अधिकारात जनमाहिती अधिकारी, अन्न व औषध प्रशासन नागपूर यांनी दिलेले दिनांक-14.08.2014 रोजीचे उत्तर, फराळी चिवडयात चपलेचा तुकडा आढळल्या बाबत वृत्तपत्राचे कात्रण अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.
06. विरुध्दपक्ष क्रं 1) व क्रं-2) हल्दीराम फुडस तर्फे लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आला.
07. तक्रारकर्तीची तक्रार, दाखल दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 आणि विरुध्दपक्ष क्रं-3 ची लेखी उत्तरे, उभय पक्षां तर्फे दाखल लेखी युक्तीवाद तसेच उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन खालील प्रमाणे मंचा तर्फे निष्कर्ष देण्यात येतो-
::निष्कर्ष::
08. तक्रारकर्तीची संक्षीप्त तक्रार अशी आहे की, तिला चैत्र महिन्यात देवीचे नवरात्र, अष्ठमी असल्याने उपवास असल्याने तिने दिनांक-18/04/2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) हल्दीराम फुडस उत्पादीत फराळी चिवडयाचे 100 ग्रॅमचे बंद पॉकीट, ज्याचा उत्पादन बॅच क्रं-13-R-267, पॅकींग तारीख-09.04.2013 किम्मत रुपये-10/- विरुध्दपक्ष क्रं-3) चे किराणा दुकानातून विकत घेतले व बिल प्राप्त केले. तिने फराळी चिवडयाचे बंद पॉकीट उघडून एक-दोन घास घेतल्या नंतर तिला त्यामध्ये चामडयाच्या चपलेचा आंगठा व चामडयाचे तुकडे आढळून आलेत, त्यामुळे तिला उलटयाचा त्रास सुरु झाल्यामुळे घरा शेजारी राहणा-या डॉ.टी.एम.पाटील यांचे मेहर क्लिनीक मध्ये भरती करण्यात आले, डॉक्टरांनी तपासणी करुन अन्न सेवनातून विषबाधा झाल्याचे व त्यामुळे ताप आल्याचा निष्कर्ष काढला. डॉक्टरांनी त्वरीत तिचा रक्तदाब, रक्त आणि युरिन व अन्य वैद्दकीय तपासण्या करुन तिला सलाईन व इंजेक्शन दिले. तेथे तिला दिड दिवस भरती करण्यात आले होते.
09. आपल्या उपरोक्त कथना पुष्टयर्थ तक्रारकर्तीने पुराव्या दाखल विरुध्दपक्ष क्रं-3) विक्रेता निर्गमित फराळी चिवडा खरेदीचे दिनांक-18.04.2013 रोजीचे बिल, फराळी चिवडयाचे पॉकीट मधून चामडयाचे चपलेच्या आंगठयाचा तुकडा निघाल्याचे छायाचित्र तसेच डॉ.टी.एम.पाटील यांच्या मेहर क्लिनीक मध्ये तिने वैद्दकीय उपचार घेतल्या बाबत दिनांक-219.04.2013 रोजीचे कॉर्ड , वरिष्ठ पोलीस निरिक्षक, गिट्टी खदान, नागपूर यांचेकडे दिनांक-20/04/2013 रोजी केलेली तक्रार त्याच बरोबर सह आयुक्त (अन्न), अन्न व औषधी प्रशासन विभाग, नागपूर यांचेकडे दिनांक-20.04.2013 रोजी केलेली तक्रार अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तसेच सह आयुक्त, अन्न औषधी प्रशासन, नागपूर यांनी तक्रारकर्तीला दिनांक-03/12/2013 रोजीच्या दिलेल्या पत्राची प्रत, माहिती अधिकारा खालील तक्रारकर्तीचा अर्ज, माहिती अधिकारात जनमाहिती अधिकारी, अन्न व औषध प्रशासन नागपूर यांनी दिलेले दिनांक-14.08.2014 रोजीचे उत्तर, फराळी चिवडयात चपलेचा तुकडा आढळल्या बाबत वृत्तपत्राचे कात्रण अशा दस्तऐवजाच्या प्रती सुध्दा दाखल केलेल्या आहेत.
10. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) हल्दीराम फुड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी तक्रारकर्तीची संपूर्ण तक्रार नामंजूर करुन तिने दाखल केलेले दस्तऐवज खोटे व बनावट असल्याचे नमुद केले. त्यांचे असेही म्हणणे आहे की, तक्रारकर्तीने दिनांक-18.04.2013 रोजीचे फराळी चिवडयाचे दाखल केलेल्या बिलामध्ये तो फराळी चिवडा हा हल्दीराम फुड यांनी उत्पादीत केल्याचे कुठेही नमुद केलेले नाही. तसेच डॉक्टरांच्या दस्तऐवजातही हल्दीराम फुडसचे नावाचा उल्लेख नाही.
11. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे तिने विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) उत्पादीत फराळी चिवडयाचे 100 ग्रॅमचे पॉकीट, ज्याचा उत्पादन बॅच क्रं-13-R-267, पॅकींग तारीख-09.04.2013 आणि किम्मत रुपये-10/- विरुध्दपक्ष क्रं-3) चे किराणादुकानातून विकत घेतले व बिल प्राप्त केल्याचे म्हणणे असून बिलाची प्रत दाखल केली आहे. विरुध्दपक्ष क्रं-3) विक्रेता याने त्याने तक्रारकर्तीला
दिनांक-18.04.2013 रोजी हल्दीराम फुडस निर्मित फराळी चिवडयाचे बंद पॉकीट विकल्याची बाब लेखी उत्तरात मान्य केलेली आहे, त्यामुळे तक्रारकर्तीचे उपरोक्त कथनाला पुष्टी मिळते.
12. मेहर क्लिनीकचे डॉ.टी.एम.पाटील यांनी तक्रारकर्तीला दिलेल्या दिनांक-19.04.2013 चे वैद्दकीय दस्तऐवजा वरुन ते स्वतः एम.बी.बी.एस., एम.डी.आय.डी.सी.सी असून Consultant Physician & Infectious Diseases तज्ञ असून त्यांनी असे नमुद केले की, Fever, headache, pain in abdomen , nausea, vomiting (4times), Food infected in hotel yesterday असे नमुद केलेले आहे.
13. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या वैद्दकीय दस्तऐवजावर अविश्वास ठेवण्याचे कोणतेही प्रयोजन नाही. तक्रारकर्तीने दिनांक-18.04.2013 रोजी दोषपूर्ण फराळी चिवडयाचे सेवन केल्यामुळे तिला त्यातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट वैद्दकीय प्रमाणपत्रात नमुद आहे, यावरुन तक्रारकर्तीला फराळी चिवडयामुळे विषबाधा झाली होती, त्यामुळे तिला उलटया झाल्यात व तिला दवाखान्यात भरती व्हावे लागले या तिच्या कथनाला पुष्टी मिळते.
14. याशिवाय तक्रारकर्तीने हल्दीराम फुडस विरोधारत वरिष्ठ पोलीस निरिक्षक, गिट्टीखदान, नागपूर यांचेकडे दिनांक-24.04.2013 रोजी लेखी तक्रार दिल्या बाबत पत्राची प्रत व पोच दाखल केली आहे. तसेच सहआयुक्त अन्न व औषधी प्रशासन नागपूर यांचेकडे दिनांक-20.04.2013 रोजी लेखी तक्रार केल्या बाबत पत्राची प्रत व पोच दाखल केली आहे. या शिवाय तक्रारकर्तीने सह आयुक्त, अन्न औषधी प्रशासन , नागपूर यांनी तक्रारकर्तीला दिनांक-03/12/2013 रोजीच्या दिलेल्या पत्राची प्रत, माहिती अधिकारा खालील तक्रारकर्तीचा अर्ज, माहिती अधिकारात जनमाहिती अधिकारी, अन्न व औषध प्रशासन नागपूर यांनी दिलेले दिनांक-14.08.2014 रोजीचे उत्तर, फराळी चिवडयात चपलेचा तुकडा आढळल्या बाबत वृत्तपत्राचे कात्रण अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.
15. माहिती अधिकारा खाली तक्रारकर्तीचे अर्जास अनुसरुन जनमाहिती अधिकारी तथा सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन, नागपूर तर्फे दिनांक-14.08.2014 रोजीचे दिलेल्या माहिती नुसार विरुध्दपक्ष हल्दीराम फुडस, गुमथळा, तालुका कामठी, जिल्हा नागपूरयेथील पेढीची दिनांक-20.04.2013 रोजी तपासणीकरुन फराळी चिवडयाचा नमुना विश्लेषणा करीता घेतल्याचे नमुद केले. परंतु तक्रारकर्तीने जो फराळी चिवडा विकत घेतला होता, त्याचे नमुने पाठविण्यात आल्याचे या पत्रावरुन दिसून येत नाही.
16. तक्रारकर्तीला विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) मे.हल्दीराम फुडस यांचे विरुध्द विनाकारण तक्रार करण्याचे कोणतेही प्रयोजन दिसून येत नाही. सर्वसाधारणतः मे.हल्दीराम फुडस ही एक ख्यातीप्राप्त कंपनी असून तिचे उत्पादनावर विश्वासठेऊन खरेदी करणा-या ग्राहकांची कमतरता नाही. तक्रारकर्तीला विशेषतः उपवास होता आणि उपवासाचे दिवशी फराळी चिवडयातून चामडयाचे तुकडे निघणे हा एक र्दुदैवी प्रकार आहे आणि सदरील चामडयामुळे तिला उलटी झाल्यात, तिला दिड दिवस दवाखान्यात भरती व्हावे लागले, तिच्या विविध वैद्दकीय चाचण्या घेण्यात आल्यात आणि तिला अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न डॉक्टरांनी काढले आणि एवढा सर्व प्रकार घडूनही विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) मे.हल्दीराम फुडस तर्फे कोणतीही दिलगिरी व्यक्त न करता उलट तक्रारकर्तीने विकत घेतलेला फराळी चिवडा हे त्यांचे उत्पादनच नाही अशी भूमीका विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) मे.हल्दीराम फुडस तर्फे घेण्यात आली. या सर्व प्रकारामुळे तक्रारकर्तीला निश्चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला व त्यामुळे ती विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) मे.हल्दीराम फुडस यांचे कडून नुकसान भरपाई म्हणून रुपये-15,000/- (तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- मिळण्यास पात्र आहे. फराळी चिवडयाचे उत्पादना संबधीची तक्रार असल्याने विरुध्दपक्ष क्रं-3) विक्रेता यास मुक्त करण्यात येते.
17. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही, तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
1) तक्रारकर्ता सौ.किरण प्रकाश बिडकर यांची, विरुध्दपक्ष क्रं- 1) हल्दीराम फुड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे-संचालक, हल्दीराम हाऊस, प्लॉट नं.-145/146, नागपूर-440008 आणि विरुध्दपक्ष क्रं- 2) हल्दीराम फुड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड युनिट खसाना तर्फे-उत्पादन व विक्री अधिकारी, गुमथळा,नागपूर-441104 यांचे विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) द्दावेत.
3) विरुध्दपक्ष क्रं-3) मिलींद प्रोव्हीजन्स किराणा आणि जनरल स्टोअर्स, नागपूर तर्फे-प्रोप्रायटर यांना या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
4) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी वैयक्तिक व संयुक्तिक स्वरुपात सदर आदेशाचे अनुपालन निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.