(आदेश पारीत व्दारा - सौ.चंद्रिका कि. बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 20 जुलै 2016)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अनव्ये दाखल केली असून, तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार तक्रारकर्ता हा डी.आर.डी.ओ. खात्यात नोकरीला असून वरील पत्त्यावर राहतो. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 हे विख्यात हल्दिराम गृपचे मालक व डायरेक्टर आहे. दिनांक 7.4.2012 रोजी तक्रारकर्त्याने 70192 ए.एफ.कॅन्टीन, व्हि.एस.एन., नागपूर येथून काही सामान खरेदी केले. त्यामध्ये तक्रारकर्त्याने हल्दिरामचे खारे दाण्याचे पाकिट रुपये 23.90 ला खरेदी केले. त्यानंतर जेंव्हा तक्रारकर्त्याने ते दाणे खाल्ले व दाणे संपले की नाही हे बघण्याकरीता दाण्याचे पाकिट उलटे केले तेंव्हा त्या पाकिटमधून मृत झुरळे निघाली. त्यानंतर तक्रारकर्त्यानी विरुध्दपक्ष क्र.2 ला घटनेची माहिती दिली, तेंव्हा विरुध्दपक्ष क्र.2 ने दोषीविरुध्द कार्यवाही करुन त्याबाबतची माहिती तक्रारकर्त्यास व त्यांचे वरीष्ठास कळविण्यात येईल असे आश्वासन दिले. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने अथवा त्याचे परिवाराने चुकून सदर मृत झुरळे खाल्ली असती तर खाणा-यांची तब्येत नक्कीच खराब झाली असती व त्याचे जिवालाही धोका संभवू शकत होता. त्यानंतर, तक्रारकर्त्याने दिनांक 20.5.2012 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 व 2 ला वकीला मार्फत नोटीस देवून जाब विचारला, माञ नोटीस मिळूनही विरुध्दपक्ष क्र.1 व 2 ने कसल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदरची तक्रार दाखल केली.
2. तक्रारकर्त्याने प्रार्थना केली की, तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,00,000/-, मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 25,000/-, तक्रारीच्या खर्च रुपये 5000/- अशा त-हेने तक्रारकर्त्याने एकूण रुपये 1,30,000/- ची मागणी केली आहे.
3. अर्जदाराचे तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्षास नोटीस काढण्यात आले. विरुध्दपक्ष हजर होऊन निशाणी क्र.8 नुसार लेखी जाबाब दाखल केला. विरुध्दपक्षाचे म्हणण्यानुसार सर्व तक्रारकर्त्याचे आरोप विरुध्दपक्षांनी अमान्य केला. विरुध्दपक्षाचे म्हणण्यानुसार खारे दाण्याचे पाकिटमध्ये मृत झुरळे निघाली हे खोटे आहे, त्यामुळे ते नाकबूल केले. त्याचप्रमाणे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र.2 ला कधी भेटायला आला नाही व घटनेची माहिती दिली नाही. वकीलांनी दिलेले दिनांक 20.5.2012 कुठलीही नोटीस मिळाली नाही. तक्रारकर्त्याची मागणी ही खोटी व कायद्यात न बसणारी आहे, सबब नाकबूल आहे. विरुध्दपक्षाचे म्हणण्यानुसार सदरची तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडले नाही व सदरची तक्रार ही विरुध्दपक्षास बदनाम करण्याचे उद्देशाने दाखल केली आहे. सदरची तक्रार खोटी व बनावटी असल्याने खारीज करण्याची विनंती केली आहे.
4. विरुध्दपक्षाचे विशेष कथनानुसार विरुध्दपक्ष क्र.1 ही मध्य भारतातील नामांकित कंपनी असून ही कंपनी निरनिराळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ तयार करते. कंपनीने खाद्य पदार्थ तयार करण्याकरीता स्वयंचलित संयञणे बसविली आहेत. पदार्थाचे उत्पादन व पॅकिंग हे स्वयंचलित यंञणेव्दारे आपोआप केली जाते. तसेच संपूर्ण संयञाची नियमितपणे Pest Control देखील केल्या जाते, त्यामुळे संयञणात कोणतेही कीटक राहण्याची मुळीच शक्यता नाही. सबबची तक्रार कायद्याच्या कोणत्याही तरतुदीत बसत नाही. तक्रारकर्त्याला कोणतीही दाद मागण्याचा अधिकार नाही, त्यामुळे सदर तक्रार खोटी व बनावटी असल्यामुळे खर्चासह खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना केली आहे.
5. दोन्ही पक्षाच्या वकीलांना तोंडी युक्तीवाद करण्याची संधी देवूनही तोंडी युक्तीवाद केला नाही, त्यामुळे प्रकरण निकालपञाकरीता ठेवण्यात आले. प्रकरणात दाखल केलेल्या अभिलेखावरील दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले. त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ताची तक्रार मान्य होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) अंतिम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
// निष्कर्ष //
6. तक्रारकर्ता डि.आर.डी.ओ. खात्यात नोकरीला असून सदर तक्रार ही विरुध्दपक्ष क्र.1 व 2 हे विख्यात हल्दिराम गृपचे मालक व डायरेक्टर यांचे विरुध्द आहे. दिनांक 7.4.2012 रोजी तक्रारकर्त्याने 70192 ए.एफ.कॅन्टीन, व्हि.एस.एन., नागपूर येथून काही सामान खरेदी केले. त्यामध्ये तक्रारकर्त्याने हल्दिरामचे खारे दाण्याचे पाकिट रुपये 23.90 ला खरेदी केले. त्यानंतर जेंवहा तक्रारकर्त्याने ते दाणे खाल्ल्यानंतर दाणे संपले की नाही हे बघण्याकरीता दाण्याचे पाकिट उलटे केले तेंव्हा त्या पाकिटमधून मृत झुरळे निघाली. निशाणी क्र.3 वरील दस्त 2 नुसार दाखल केलेल्या फोटोनुसार झुरळ स्पष्टपणे दिसत आहे. त्याचप्रमाणे ही तक्रार तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचे ऑफीसमध्ये जावून केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी दिनांक 16.6.2012 रोजी कमिश्नर, फुड अॅन्ड ड्रग डिपार्टमेंट, नागपूर मध्ये तक्रार केली, ती निशाणी क्र.6 सोबत दाखल केली त्यावर श्री नागदेवे यांची सही आहे.
7. विरुध्दपक्षाचे म्हणण्याप्रमाणे त्यांचे कंपनीतील खाद्य पदार्थ हे स्वयंचलित यञणेव्दारे तयार व पॅकिंग होते, याचा अर्थ असा होत नाही की त्यात कुठलाही कीटक जाऊ शकत नाही. तसेच विरुध्दपक्षानी असे म्हटले की, त्यांनी त्यांची Pest Control सुध्दा केली आहे, परंतु Pest Control सुध्दा दर वर्षी करणे आवश्यक असते आणि त्या मध्यंतरी झुरळ उडून येऊ शकत नाही असे नाही. फुड अॅन्ड ड्रग डिपार्टमेंट मध्ये दिनांक 16.6.2012 ला तक्रारकर्त्याने पञ देवून सुध्दा फुड अॅन्ड ड्रग डिपार्टमेंट यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्याकरीता त्यांनी आर.टी.आय. मध्ये देखील अर्ज केला होता. ग्राहक सुरक्षा कायदा हा ग्राहकाच्या फायद्यासाठी तयार करण्यात आला असून हा कायदा Beneficial Legislation या कायद्याअंतर्गत मोडतो. तसेच, खाद्य पदार्थ उत्पादकास मुंग्या, झुरळे व इतर किटकांची खाद्य पदार्थात मिलावट न होण्यासाठी योग्य ती काळजी घेणे अनिवार्य आहे.
8. विरुध्दपक्ष हे भारतातील एक नामांकित कंपनी आहे यात काही दुमत नाही. त्याचप्रमाणे ते खाद्य पदार्थ तयार करण्याकरीता व उत्पादन व पॅकिंग स्वयंचलित यंञणेव्दारे करतात तरी देखील कोणतेही कीटक उडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर ते झुरळ खाण्यात आले असते तर तक्रारकर्त्याला व त्याचे परिवाराला नक्कीच नुकसान पोहचले असते. त्यामुळे जेंव्हा कोणतीही कंपनी खाद्य पदार्थ निर्माण करीत असते, तेंव्हा त्यांनी कीडे-कीटके न येण्याबाबतची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता ठेवणे देखील अत्यावश्यक आहे, परंतु खा-या दाण्याच्या पाकीटमधील मृत झुरळ निघाल्यामुळे विरुध्दपक्ष क्र.2 हे दोषी आढळून येतात, असे मंचाचे मत आहे. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तीकरित्या किंवा संयुक्तीकरित्या नुकसान भरपाई, आर्थिक, मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 10,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
(3) विरुध्दपक्षांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत करावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- .20/07/2016