// आ दे श //
(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर पी. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 06 जून 2016)
1. ही तक्रार स्टेशन व्यवस्थापक, मध्य रेल्वे स्टेशन, नागपूर विरुध्द सेवेतील कमतरतेसाठी नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
2. तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारकर्ता त्याचे कुटूंबासह ग्वालियरहून नागपूरला दिनांक 24.10.2012 ला आले होते. नागपूरहून मनमाडला परत जाण्यासाठी दिनांक 25.10.2012 रोजीचे टिकीट आरंक्षीत केले होते. त्या तारखेस तो त्याची पत्नी, दोन मुले व त्याची सुन नागपूरला सेवाग्राम एक्सप्रेस मध्ये त्यांचे आरंक्षीत डब्यात चढले, त्याचवेळी त्यांच्या आरंक्षीत डब्यात आंबेडकर रॅलीची भीड घुसली, त्यांनी तक्रारकर्त्याचे सामान बाहेर फेकले व त्याला व त्याचे कुटूंबाला गाडीच्या बाहेर काढले व त्यांच्या आरंक्षीत आसनाचा ताबा घेतला. सदर घटनेच्या वेळेस रेल्वे पोलीस, स्टेशन मॅनेजर व टिकीट तपासणीस हजर होते, परंतु त्यांनी त्याला काहीही मदत केली नाही. सदर रेल्वेच्या आधिका-यानी तक्रारकर्त्याला प्रवास रद्द करण्यास सांगितले, तेंव्हा त्याने टिकीटाची रक्कम वापस मागितली परंतु रक्कम वापस करण्यास रेल्वे अधिका-यांनी नकार दिला. पुढे त्याचे विनंतीवरुन रेल्वे अधिका-यानी त्याचे टिकीटांवर “Due to heavy rush at Nagpur Railway Station on Dated 25.10.2012” असा शेरा लिहून दिला. तक्रारकर्त्यास पुढील प्रवास रद्द करावा लागला व त्याची तक्रार उपस्टेशन प्रबंधक, वाणिज्य नागपूरला दिली.
3. सदर घटनेमुळे तक्रारकर्त्यास व कुटूंबास मानसिक व शारिरीक ञास झाला या सबंधी रेल्वे पोलीस मध्ये तक्रार दाखल करण्यास गेले परंतु त्यास मदत मिळाली नाही. सदर घटनेमुळे तक्रारकर्त्याचे स्वास्थ्य बिघडले व त्याला हृदयघात झाल्या सारखे वाटले त्यामुळे त्याला नागपूर येथील व्होकार्ड हॉस्पीटलमध्ये दाखल करुन एंन्जीओग्राफी व अन्य चाचण्या करण्यात आल्या, त्यास रुपये 34,181/- खर्च आला. त्यानंतर त्याला अरनेजा हॉस्पीटल नागपूर येथे भरती करण्यात आले, तेथे पण एन्जीओग्राफी झाली. या सर्व उपचारासाठी त्याला एकूण 6,00,000/- खर्च आला त्यापैकी रुपये 4,00,000/- ची प्रतिपूर्ती विमा कंपनीकडून त्याला मिळाली. म्हणून या तक्रारीव्दारे त्याने टिकीटाची पूर्ण रक्कम रुपये 2,618/- परत मागितली आणि झालेल्या ञासाबद्दल रुपये 3,00,000/- ची नुकसान भरपाई व खर्चा बद्दल रुपये 15,000/- ची मागणी केली आहे.
4. तक्रारीची नोटीस मंचा मार्फत विरुध्दपक्षांना पाठविण्यात आली, त्याप्रमाणे विरुध्दपक्ष हजर झाले व त्यांनी निशाणी क्र.11 प्रमाणे लेखी जबाब दाखल केला. विरुध्दपक्षानी तक्रारकर्ता कुटूंबासह नागपूरला आला होता व त्यानंतर त्यांनी नागपूर ते मनमाड परत जाण्याची टिकीट आरंक्षीत केली होती या सर्व बाबी नामंजूर केल्या आहे. रेल्वे स्टेशनवर घडलेल्या तथाकथीत घटना व त्यामुळे तक्रारकर्त्यास नागपूर ते मनमाड प्रवास रद्द करावा लागला हे पण नाकबूल केले आहे. तसेच, सदर तथाकथीत घटनेमुळे तक्रारकर्त्याला हृदयघात झाला व त्यामुळे दवाखाण्यात भरती व्हावे लागले हे सुध्दा नाकबूल केले आहे. तक्रारकर्त्याची तक्रार पूर्णपणे नाकबूल करुन खारीज करण्याची विनंती केली आहे.
5. विरुध्दपक्षानी व्होकार्ड हॉस्पीटल येथील हृदयशल्य विशारद यांची साक्ष घेतली. तक्रारकर्त्याने तक्रारीच्या समर्थनार्थ शपथपञ दाखल केले. दोन्ही पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले. त्यावरुन खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
6. तक्रारकर्त्याने त्याच्या प्रवासाचे टिकीटाच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. त्यावरुन हे सिध्द होते की, दिनांक 24.10.2012 ला तो त्याचे कुटूंबासह नागपूरला आला होता. परत परतीच्या प्रवासासाठी त्याने सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये मनमाड पर्यंतची टिकीट आरंक्षीत केली होती, परतीचा प्रवास दिनांक 25.10.2012 ला होता. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याचदिवशी आंबेडकर रॅलीची गर्दी स्टेशनवर होती व रॅलीतील लोकांनी त्याला आरंक्षीत आसनावर बसू दिले नाही व त्याचे सामान बाहेर काढले, त्याचे आरंक्षीत टिकीटवर “Due to heavy rush at Nagpur Railway Station on Dated 25.10.2012” असा शेरा लिहिला आहे. परंतु, या शे-यावरुन तक्रारकर्त्याने परतीचा प्रवास रद्द केला होता हे सिध्द होत नाही, परंतु त्याने उप स्टेशन प्रबंधक, वाणिज्य यांना तक्रार दिली होती, ज्यामध्ये लिहिले आहे की, रॅलीतील लोकांचे गर्दीमुळे त्याला आरंक्षीत डब्यात चढता आले नाही व त्याला रेल्वे अधिका-यानी प्रवास रद्द करण्याचा सल्ला दिला. या तक्रारीवर उप स्टेशन प्रबंधकाची स्वाक्षरी व शिक्का आहे. त्याशिवाय विरुध्द पक्षाच्या वकीलांनी डॉक्टरांची साक्ष घेतली यावरुन हे सिध्द होते की, दिनांक 25.10.2012 ला तक्रारकर्ता नागपूरहून परतीच्या प्रवासाला गेला नव्हता. वरील सर्व बाबीवरुन आम्हांला असे दिसून येते की, दिनांक 25.10.2012 ला आंबेडकर रॅलीची गर्दी असल्यामुळे तक्रारकर्ता नागपूरहून परतीचा प्रवास करु शकला नव्हता.
7. तक्रारकर्त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, त्यादिवशी रेल्वे स्टेशनवर झालेल्या घटनेमुळे त्याचे स्वास्थ्य बिघडले त्यामुळे हे पाहणे जरुरी ठरले की, त्याचे स्वास्थ्य बिघडण्यास ही घटना कारणीभूत होती की त्याला पूर्वीपासूनच तब्येतीचा ञास होता. तक्रारकर्त्याचे हे म्हणणे विरुध्दपक्षानी नाकारले आहे आणि ते दाखविण्यास त्यांनी व्होकार्ड हॉस्पीटलमधील ज्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली त्याची साक्ष घेतली आहे. डॉक्टरांनी आपल्या साक्षीत असे सांगितले आहे की, तक्रारकर्त्याला दवाखाण्यामध्ये दिनांक 26.10.2012 ला भरती करण्यात आले. त्यापूर्वी दिनांक 25.10.2012 ला तक्रारकर्त्याने त्याचे तब्येती विषयी डॉक्टरांशी चर्चा केली होती. त्यावेळी तपासणीमध्ये असे आढळून आले की, तक्रारकर्त्याने तीन वर्षापूर्वी Trade Meal Test TMT केली होती. परंतु, TMT अहवाल प्रमाणे तक्रारकर्त्याला हृदयाचा ञास 6 वर्षापासून होता, तक्रारकर्त्याला हृदयविकाराचा झटका आला नव्हता. उच्च रक्त दाब, मदुमेह आणि हृदय रक्त वाहिण्यात अडथळा या व्यतीरिक्त त्याची प्रकृती सर्वसाधारण होती. डॉक्टरने पुढे सांगितले की, तक्रारकर्त्यास हृदयाचा ञास गर्दीमुळे वाढण्याची शक्यता असू शकते पण हृदयविकाराचा धक्का येऊ शकत नाही. तसेच, त्यांची जी एन्जीओग्राफी करण्यात आली त्याचा तक्रारकर्ता म्हणतो त्या घटनेशी काहीही संबंध नाही. उलट तपासणीमध्ये तक्रारकर्त्याने डॉक्टरला असे सुचविले की, त्यादिवशी त्याला उच्च रक्त दाब, हृदयात दुखणे आणि घाम येत होता म्हणून दवाखाण्यात भरती होण्याचा सल्ला दिला. परंतु, डॉक्टरने तसा सल्ला देण्याचे नाकबूल केले. तसेच, तक्रारकर्त्याला लगेच बायपास सर्जरीचा सल्ला दिला या तक्रारकर्त्याच्या म्हणण्याला डॉक्टरने दुजोरा दिला नाही. डॉक्टरने आपली साक्ष स्वतंञ साक्षीदार म्हणून दिली आहे, त्यामुळे त्याने विरुध्दपक्षाला मदत व्हावी म्हणून खोटी साक्ष दिली नाही. कारण साक्षीदार एक स्वतंञ खाजगी वैद्यकीय व्यवसाय करतो व तो विरुध्दपक्षाचे अधिपत्याखाली नाही. डॉक्टरने दिलेल्या या साक्षीवरुन तक्रारकर्त्याच्या तक्रारीला कुठलाही दुजोरा मिळत नाही. त्यामुळे त्या घटनेमुळे तक्रारकर्त्याचे स्वास्थ्य बिघडले हे दाखविण्यास कुठलाही पुरावा आलेला नाही.
8. तक्रारकर्त्याचे एन्जोप्लॉस्टी झाली होती व उपचारावर त्याला रुपये 6,00,000/- खर्च आले याबद्दल फारसा वाद होण्याची गरज नाही, कारण दोन्ही दवाखाण्याचे बिल त्याने दाखल केले आहे. परंतु सदरच्या घटनेमुळे दवाखाण्यात भरती होऊन एन्जीओग्राफी करावी लागली हे सिध्द होत नाही.
9. दिनांक 25.10.2012 ची घटना घडली त्यावेळी विरुध्दपक्षानी किंवा रेल्वे अधिका-यांनी तक्रारकर्त्याला मदत केली नाही हे दाखविण्यासाठी कुठलाही पुरावा आलेला नाही. परंतु, हे सर्वश्रृत वस्तुस्थिती आहे की, दसरा सणाचे दिवशी नागपूरला आंबेडकर अनुयायाची बरीच गर्दी असते, त्यावेळी बाहेरुन लोक नागपूरला येत असतात व ट्रेनमध्ये आंबेडकर रॅलीच्या लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, त्यादिवशी इतर प्रवाशांना ट्रेनमध्ये आरंक्षीत डब्यातून प्रवास करणे फार कठीण जातो. त्यामुळे तक्रारकर्त्याला त्यादिवशी सल्ला देण्यात आला होता की, त्याने प्रवास रद्द करावा. त्यादिवशी बरीच गर्दी असल्या कारणाने रेल्वे पोलीस पण फारशी मदत करु शकले नसतील. परंतु रेल्वे प्रशासनाची ही जबाबदारी आहे की, ज्या प्रवाशांनी टिकीट आरंक्षीत केलेली होती त्यांना त्यांचे आरंक्षीत आसनावर बसून प्रवास करता आला पाहिजे, परंतु या जबाबदारीमध्ये विरुध्दपक्ष योग्य ती मदत तक्रारकर्त्याला देण्यास असमर्थ ठरतो व त्यामुळे त्याला प्रवास रद्द करावा लागतो. विरुध्दपक्षाच्या सेवेमध्ये ही कमतरता आहे आणि म्हणून विरुध्दपक्षानी तक्रारकर्त्याला त्याचे आरंक्षीत टिकीटाचे भाड्याचे पैसे परत करणे योग्य राहिल, तसेच प्रवास करता न आल्यामुळे झालेल्या ञासाबद्दल नुकसान भरपाई पण देणे वाजवी ठरेल. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्षास आदेश देण्यात येते की, त्याने तक्रारकर्त्यास त्याचे रद्द केलेल्या प्रवास टिकीटाचे संपूर्ण रक्कम रुपये 2618/- परत करावे.
(3) तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारिरीक ञासाबद्दल रुपये 5000/- व तक्रार खर्चाबद्दल रुपये 3000/- द्यावे.
(4) आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- .06/06/2016