निकाल
पारीत दिनांकः- 30/07/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडून दि. 12/4/2010 रोजी ‘फाबिया क्लासिक 1.2 एम.पी.आय’ ही गाडी रक्कम रु. 4,56,428/- किंमतीला खरेदी केली. या किंमती व्यतीरिक्त तक्रारदारांनी रक्कम रु. 10,492/- इन्शुरन्स प्रिमिअमकरीता आणि रक्कम रु. 30,424/- आर.टी.ओ. चार्जेसपोटी, असे एकुण रक्कम रु. 40,916/- भरले. जाबदेणार क्र. 1 यांनी उत्पादक म्हणून उत्पादकीय दोषांकरीता दोन वर्षांची वॉरंटी दिली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांना खरेदी केलेल्या गाडीकरीता स्पेशल सजिस्ट्रेशन नंबर, म्हणजे MH-12-FY-0501 हवा होता म्हणून त्यांनी आर.टी.ओ. ची ज्यादा फी रक्कम रु. 3000/- व एजंटची फी रु. 2000/- असे एकुण 5000/- भरले. तक्रारदारांना जेव्हा गाडी देण्यात आली, तेव्हा त्यांना वरील MH-12-FY-0501 नंबर देण्यात आला, हा नंबर तक्रारदारांचा लकी नंबर होता व त्यांना तो न्युमरॉलॉजिस्टने दिला होता. ही बाब जाबदेणार क्र. 2 यांनी माहित होती. तरीही जाबदेणार क्र. 2 यांच्याकडून त्यांना जेव्हा रजिस्ट्रेशन सर्टीफिकिट मिळाले तेव्हा त्यामध्ये MH-12-FU-9886 हा होता. त्यामुळे त्यांनी स्पेशल नंबरसाठी दिलेली रक्कम रु. 5000/- रक्कम वाया गेली व इन्शुरन्स पॉलिसीही वाया गेली कारण तक्रारदारांनी त्यांना हव्या असलेल्या नंबरकरीता म्हणजे MH-12-FY-0501 करीता पॉलिसी घेतली होती. दि. 6/4/2011 रोजी सदरच्या गाडीचे इंजिन जास्त गरम होत असल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी जाबदेणारांच्या शिवाजीनगर येथील अधिकृत सर्व्हिस स्टेशनकडे पाठविली. तेथील कर्मचार्याने तक्रारदारांच्या गाडीची तपासणी केली व त्यांना जॉब कार्ड दिले. त्यानंतर दि. 22/4/2011 पर्यंत गाडी तेथेच होती व 22/4/2011 रोजी गाडी पूर्ण दुरुस्त झाल्याचे आश्वासन देऊन त्यांनी परत केली. त्यानंतर दि. 11/7/2011 रोजी गाडीच्या रेडिएटरचा पंखा पूर्णपणे जळाला, त्यामुळे गाडी पुन्हा जास्त गरम होऊ लागली, म्हणून तक्रारदारांनी पुन्हा दि. 12/7/2011 रोजी सदरची गाडी सर्व्हिस स्टेशनकडे पाठविली. दि. 5/8/2011 पर्यंत ही गाडी सर्व्हिस स्टेशनकडे दुरुस्तीसाठी ठेवण्यात आली होती व त्याच दिवशी पूर्ण दुरुस्त झाली असे सांगून परत देण्यात आली. त्यानंतर पुन्हा तीन आठवड्यांच्या आंत म्हणजे दि. 25/8/2011 रोजी गाडीमध्ये काही दोष निर्माण झाला म्हणून तक्रारदारांनी गाडी सर्व्हिस स्टेशनकडे पाठविली व अद्यापही ती तेथेच आहे. दरम्यानच्या काळामध्ये जाबदेणार क्र. 2 यांनी गाडीचे इंजिन ओव्हरहॉल करावे लागेल व जरी इंजिनचे हेड बदलले तरीही गाडी पूर्णपणे दुरुस्त झाली नसल्याचे कलविले. यावरुन गाडीमध्ये उत्पादकीय दोष आहे व तो दोष जाबदेणार शोधून काढू शकत नाहीत, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे, त्यामुळे गाडी वारंवार सर्व्हिस स्टेशनकडे पाठवावी लागते. तक्रारदारांनी ज्या उद्देशाने गाडी खरेदी केली होती, त्याकरीता त्यांना गाडी वापरता आली नाही, त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला. म्हणून तक्रारदारांनी दि. 20/10/2011 रोजी जाबदेणारांना नोटीस पाठविली, परंतु नोटीस मिळून ही दोन्ही जाबदेणारांनी त्याची दखल घेतली नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 4,56,428/- गाडीची किंमत, रु. 40,916/- रजिस्ट्रेशन व इन्शुरन्ससाठी भरावी लागणारी रक्कम, रु. 50,000/- गाडी वापरता न आल्यामुळे झालेल्या त्रासापोटी, रु. 50,000/- मानसिक त्रासापोटी, रु. 5000/- स्पेशल रजिस्ट्रेशनसाठी झालेला खर्च, रु. 28,000/- ड्रायव्हरचा पगार आणि रु. 1,00,000/- नुकसान भरपाई, असे एकुण रक्कम रु. 7,30,344/- नोटीस पाठविण्यापूर्वी आणि त्यानंतर झालेल्या नुकसानापोटी रक्कम रु. 27,000/- व नोटीशीचा खर्च रु. 5,000/- असे एकुण रक्कम रु. 7,62,344/- द.सा.द.शे. 18% व्याजदराने किंवा सदरची गाडी बदलून नविन गाडी व वर नमुद केल्याप्रमाणे आर.टी.ओ. टॅक्सेस, इन्शुरन्स इ. गोष्टींकरीता रक्कम रु. 3,05,516/- द्यावेत अशी मागणी जाबदेणारांकडून करतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] दोन्ही जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, जाबदेणार क्र. 1 मंचामध्ये उपस्थित राहिले परंतु त्यांचा लेखी जबाब दाखल केला नाही, म्हणून त्यांच्याविरुद्ध ‘नो-से’ आदेश पारीत करण्यात आला. जाबदेणार क्र. 2 नोटीस मिळूनही गैरहजर राहिले म्हणून त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
4] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दि. 12/4/2010 रोजी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडून जाबदेणार क्र. 1 यांनी उत्पादित केलेली ‘फाबिया क्लासिक 1.2 एम.पी.आय’ ही गाडी रक्कम रु. 4,56,428/- किंमतीला खरेदी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सदरच्या गाडीकरीता स्पेशल नंबर म्हणजे MH-12-FY-0501 हा नंबर मिळण्याकरीता रक्कम रु. 5000/- भरले व ही रक्कम त्या जाबदेणारांकडून परत मागतात. तक्रारदारांनी ही रक्कम जाबदेणारांना दिली याबद्दल काहीही पुरावा दाखल केला नाही, उलट त्यांनी दि. 9/4/2010 रोजीची मोटर वाहन विभाग, महाराष्ट्र राज्य यांची रक्कम रु. 3000/- च्या पावतीची प्रत दाखल केलेली आहे. यावरुन तक्रारदारांनी स्पेशल नंबर करीता जाबदेणारांना रक्कम न देता मोटर वाहन विभागाला रक्कम दिलेली आहे व प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये त्यांना पक्षकार केलेले नाही, त्यामुळे तक्रारदारांना ही रक्कम जाबदेणारांकडून मागता येणार नाही.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, दि. 6/4/2011 रोजी त्यांच्या गाडीचे इंजिन गरम होण्याचा दोष निर्माण झाला म्हणून त्यांनी गाडी सर्व्हिस स्टेशनकडे दुरुस्तीसाठी दिली. तक्रारदारांनी दि. 11/7/2011 व दि. 25/8/2011 रोजीच्या जॉब कार्डाची प्रत दाखल केली आहे. दि. 11/7/2011 रोजीच्या जॉब कार्डमध्ये गाडी जास्त गरम होत होती (Overheating) असे नमुद केले आहे व रेडिएटरचा फॅन बदलून दिला तक्रारदार व जाबदेणारांचे म्हणणे आहे. दि. 25/8/2011 रोजीच्या जॉब कार्डवर ‘जर्किंग प्रॉब्लेम’ नमुद केले आहे. तक्रारदारांनी हा दोष त्यांच्या तक्रारीमध्ये नमुद केल्याचे दिसून येत नाही. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये, जाबदेणारांनी त्यांना पत्र पाठवून इंजिन बदलल्याचे व गाडी ओव्हरहॉल करावी लागेल असे सांगितले होते, असे नमुद केले आहे. तोंडी युक्तीवादाच्या वेळी जाबदेणारांच्या वकिलांनी गाडीचा ‘सिलेंडर हेड’ हा पार्ट बदलल्याचे व गाडी पूर्णपणे दुरुस्त करुन ठेवल्याचे सांगितले. परंतु तक्रारदारांना गाडी घेऊन जा, असे वेळोवेळी सांगूनदेखील ते अद्यापपर्यंत गाडी घेऊन गेलेले नाहीत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सदरची गाडी घेतल्यापासून बर्याच वेळा त्यामध्ये दोष निर्माण झालेले आहेत, म्हणजेच त्यामध्ये उत्पादकिय दोष आहेत व जाबदेणारांना ते दुरुस्त करता आले नाहीत, म्हणून तक्रारीमध्ये नमुद केलेल्या खर्चासह नविन गाडी द्यावी किंवा गाडीची किंमत व इतर खर्च द्यावा, अशी मागणी तक्रारदार करतात. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत गाडीमध्ये उत्पादकिय दोष आहेत याकरीता कुठलाही स्वतंत्र पुरावा किंवा तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार पुराव्याआभावी त्यांची तक्रार सिद्ध करु शकले नाहीत असे मंचाचे मत आहे. त्याचप्रमाणे, तक्रारदारांनी एप्रिल 2010 मध्ये गाडी खरेदी केली व त्यामध्ये एप्रिल 2011 मध्ये दोष निर्माण झाले असे तक्रारीमध्ये नमुद केले आहे. याचा अर्थ तक्रारदारांनी सदरची गाडी ही जवळ-जवळ एक वर्ष व्यवस्थित वापरली. जाबदेणारांनी दुरुस्त गाडी घेऊन जाण्याकरीता वेळोवेळी तक्रारदारांना सांगितले, तरीही तक्रारदार गाडी घेऊन गेले नाहीत.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.