ठाणे जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच,
कोंकण भवन, नवी मुंबई.
ग्राहक तक्रार क्रमांकः- 324/2013.
आदेश दिनांक : - 13/01/2014.
श्री. संदीपकुमार जैन,
रा.फ्लॅट नं. 502, पाचवा मजला,
बिल्डींग नं. 20, सीवूडस, फेज – 1 स्कीम,
सेक्टर 54, 56, व 58, नेरुळ,
नवी मुंबई 400706. ... तक्रारदार
विरुध्द
सौ. रितू दिलीप बसोले,
रा. 132, क्लोव्हर पार्क, व्हयू,
लेन नं. 7, कोरेगांव पार्क, पुणे 411001. ... सामनेवाले
समक्ष :- मा. अध्यक्षा, स्नेहा एस. म्हात्रे
मा. सदस्य, एस.एस. पाटील
उपस्थिती :- तक्रारदारातर्फे अॅड. ए.के.सिंग हजर.
आदेश
(दि. 13/01/2014)
द्वारा श्रीमती स्नेहा एस. म्हात्रे, मा. अध्यक्षा
1. तक्रारदारांनी ही तक्रार सामनेवाले श्रीमती रितू दिलीप बसोले (घरमालक) यांच्याविरुध्द दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेबरोबर मे 2011 मध्ये लिव्ह अँड लायसेन्स ॲग्रीमेंट करुन दरमहा रु. 23,500/- भाडयाने घरमालक रितू दिलीप बसोले यांचे घर 11 महिने कालवधीपुरते रहाण्यासाठी भाडयाने घेतले होते व त्यासाठी त्यांनी घरमालकांना रु. 2,30,000/- इतकी अनामत (सिक्युरिटी डिपॉझीट) रक्कम दिली. त्यानंतर पुन्हा एप्रिल 2012 व एप्रिल 2013 पर्यंतच्या दोन करारांसाठी सदर कालावधी वाढवण्यात आला. मे 2013 मध्ये तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदर भाडयाची जागा ते सोडणार असल्याबाबत त्यांनी कळविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. व त्यानंतर घरमालकाने तक्रारदारांकडून घेतलेल्या अनामत रकमेपैकी रु. 2,00,000/- तक्रारदारांना परत केले. परंतु सदर अनामत रकमेपैकी रु. 30,000/- सामनेवाले यांनी तक्रारदारांना परत केले नाहीत. यासंदर्भात तक्रारदाराने सामनेवाले यांचे विरुध्द मंचात तक्रार दाखल केली आहे.
दि. 01/01/2014 रोजी सदर तक्रार दाखल करुन घेण्याबाबत तक्रारदाराचे वकील श्री. ए.के.सिंग यांनी युक्तीवाद केला व सदर तक्रार दाखल करुन घ्यावयाची किंवा कसे ? याबाबत आदेशासाठी दि. 13/01/14 रोजी प्रकरण नेमण्यात आले.
3. सदर तक्रारीचे स्वरुप पहाता, सदर तक्रार ही घरमालक व भाडेकरु यांच्यातील करारानुसार ठरलेली सिक्युरिटी डिपॉझिटची पूर्ण रक्कम सामनेवाले यांनी (घरमालक) तक्रारदारांना (भाडेकरु) परत न केल्यामुळे उद्भवलेल्या वादाची असून सदर भाडेकरु हा घरमालकाकडून तक्रारीत उल्लेख केलेली सदनिका ही खरेदी करीत नसून केवळ 11 महिने रहाण्यासाठी भाडेतत्वावर घेत असल्याने तो ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार ग्राहक होऊ शकत नाही. तसेच घर भाडयाने देण्याचा करार (Leave & License Agreement) व त्याबाबत काही वाद निर्माण झाल्यास महाराष्ट्र भाडेनियंत्रण कायदा,1999 अंतर्गत वेगळी न्यायिक यंत्रणा कार्यक्षम असल्याने तक्रारदाराने सदर वादाबाबत संबंधित न्यायालयात दावा दाखल करणे उचित आहे. व सदर तक्रार ही मंचाच्या न्यायिक कार्यक्षेत्रात येत नसल्याने
सदर तक्रार मंच दाखल करुन घेण्याच्या टप्प्यालाच नाकारत आहे व प्रकरण निकाली काढण्यात येत आहे.
4. सदर आदेशाची सत्यप्रत तक्रारदारांना पाठविण्यात यावी.
ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई.
दिनांक – 13/01/2014.
(एस.एस.पाटील ) (स्नेहा एस.म्हात्रे )
सदस्य अध्यक्षा
अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.