निकालपत्र
(दि.08.07.2015)
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार हा साई सिड्स †òन्ड पेस्टीसाईड या नावाने व्यवसाय करतो. गैरअर्जदार हा जुना मोंढा नांदेड येथे सेंट्रल पार्सल सर्व्हीस या नावाने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. अर्जदाराने आपल्या दुकानात विक्रीसाठी सन 2013 मध्ये वेगवेगळया कंपनीचे माल मागविले होते व सिजन संपल्यानंतर उरलेला माल सदरील कंपनीस अर्जदार परत करीत असतात. त्यानुसार अर्जदाराने दिनांक 13.07.2013 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे आपल्या दुकानातील 20 पोते ज्वारीचे बियाणाचे बॉक्स व 8 बॅग्स कापसाचे पाकीटाचे बॉक्स एन.यु.जिन्स प्रा.लि. हैद्राबाद या कंपनीचा माल परत पाठविणेसाठी गैरअर्जदार याचे ट्रान्सपोर्टला माल दिला. त्याबाबतची रितसर पावती ज्याचा बील क्रमांक 3663 व 3662 असा आहे. अर्जदाराने पाच बॉक्स कापूस बियाणे पाठविले होते. सदरील बॉक्सची किंमत रक्कम रु.930/- प्रत्येकी पॉकीट अशी असून 5 बॉक्समध्ये एकूण 100 कापूस बियाणाचे पॉकीट होते,ज्याची किंमत रु.93,000/- एवढी आहे. सदरील माल अर्जदाराने गैरअर्जदार यांना पाठविणेसाठी दिला त्यावेळेस गैरअर्जदार यांनी सदरील माल तपासून ट्रान्सपोर्ट पाठविणेसाठी भाडे म्हणून रक्कम रु.5094/- नगदी स्वरुपात गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून घेतले. सदरील माल घेतेवेळेस गैरअर्जदार यांनी खात्री दिली होती की आमच्या ट्रान्सपोर्टव्दारे काळजीपूर्वक व व्यवस्थीतपणे माल हैद्राबाद येथे पाठविला जाईल. परंतु दोन दिवसानंतर एन.यु.जिन्स प्रा.लि. हैद्राबाद यांनी फोनव्दारे कळविले की, पाठविलेला मालापैकी 5 बॉक्स वंडर कापूस बियाणाच्या पाकीटाच्या गैरअर्जदार यांनी कमी दिले आहे. त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचेकडे प्रत्यक्ष जाऊन गैरअर्जदार यांना 5 बॉक्स कमी मिळून आल्याबाबत कल्पना दिली. गैरअर्जदार यांनी चौकशी करुन तुम्हाला कळवितो असे अर्जदाराला सांगितले. परंतु अर्जदार हा गैरअर्जदार यांचेकडे वारंवार व नियमितपणे पाठविलेल्या मालापैकी 5 बॉक्स कॉटनचे कंपनीला कमी मिळालेबाबत विचारपूस केली असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी सांगितले की, गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे चौकशी करुन तुम्हाला माहिती सांगतो. परंतु गैरअर्जदार यांनी त्याबाबत कुठलीही चौकशी करुन अर्जदारास माहिती दिलेली नाही. त्यामुळे अर्जदाराचा माल गहाळ झालेला असल्याचे अर्जदाराचे लक्षात आले. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे पुन्हा जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन तुमच्या चुकीच्या सेवेमुळे व निष्काळजीपणामुळे माल गहाळ झालेला आहे व त्यामुळे रु.93,000/- नुकसान झालेले असून सदरील नुकसान भरपाई देण्याची विनंती केली. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदारास नुकसान भरपाई दिलेली नाही. सदरील माल कंपनीस कमी मिळाल्यामुळे कंपनीने अर्जदारास रु.93,000/- कपात केलेली आहे. दिनांक 13.07.2013 पासून अर्जदार हा गैरअर्जदार यांचेकडे नुकसान भरपाईची मागणी करीत आहे. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराची विनंती फेटाळून लावल्यामुळे अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना आदेश द्यावा की, अर्जदाराचा माल कापूस बियाणाचे चार बॉक्स ट्रान्सपोर्ट करतेवेळी गहाळ केल्याबद्दल रु.93,000/- अर्जदाराचे आर्थिक नुकसान गैरअर्जदार यांनी व्याजासह द्यावे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस तामील होऊनही ते मंचात गैरहजर राहिले म्हणून दिनांक 03.01.2015 रोजी त्यांचेविरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्यात आला.
4. अर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदाराचा युक्तीवाद ऐकला. दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यांनी आपल्या तक्रारीच्या पृष्ट्यर्थ खालीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेतः-
अ) दिनांक 13.07.2013 रोजीचे डिलिव्हरी चलन पावती 50
पोत्याबद्दल क्रमांक 3662
ब) डिलिव्हरी चलन पावती क्रमांक 3663
क) गैरअर्जदार यांनी दिलेली पावती 540
सदरील पावत्यांचे अवलोकन केले असता अर्जदाराने गैरअर्जदार याचेमार्फत एन.यु.जिन्स प्रा.लि. हैद्राबाद यांना माल पाठविला असल्याचे दिसून येते. सदरील पावत्यावर पाठविलेल मालाचे विवरण आहे. अर्जदाराने एन.यु.जिन्स प्रा.लि. हैद्राबाद यांना कापूस बियाणाची 5 बॉक्स कमी मिळालेला असल्याबद्दलचा कुठलाही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही किंवा एन.यु.जिन्स प्रा.लि. हैद्राबाद यांनी अर्जदारास दिलेले तश्या स्वरुपाचे पत्र मंचासमोर दिलेले नाही किंवा एन.यु.जिन्स प्रा.लि. हैद्राबाद या कंपनीने अर्जदारास माल कमी मिळाल्यामुळे रक्कम रु.93,000/- कपात केलेली असल्याचाही पुरावा दिलेला नाही. दाखल कागदपत्रांवरुन अर्जदाराने पाठविलेला मालापैकी कापूस बियाणाचे 5 बॉक्स गैरअर्जदार यांनी एन.यु.जिन्स प्रा.लि. हैद्राबाद यांना माल कमी पाठविलेला असल्याबद्दलचे सिद्ध होत नाही. अर्जदार आपली तक्रार कागदपत्रांसह व पुराव्यानीशी सिध्द करु शकला नाही असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.