निकालपत्र
(दिनाक 17-07-2015 )
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडून एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल ज्याचा मॉडेल नं. Samsung Grand-2 हा रक्कम रु. 17,500/- ला खरेदी केला. गैरअर्जदार क्र. 1 ही सॅमसंग कंपनी असून गैरअर्जदार क्र. 3 हे सॅमसंग कंपनीचे नांदेड येथील मोबाईल दुरुस्ती करणारे सर्व्हीस सेंटर आहे. सदर मोबाईल मध्ये खरेदी केलेल्या तारखेपासून 12 महिन्यापर्यंत कांही दोष अथवा बिघाड झाल्यास निशुल्क दुरुस्तीची सेवा देण्याचे गैरअर्जदाराने मान्य केलेले आहे. सदर मोबाईल मध्ये खरेदी केल्याच्या दिवसापासूनच दोष असल्याचे अर्जदारास आढळून आले. खरेदी केलेला मोबाईल हा वेळोवेळी आपोआपच चालू होत नव्हता त्यामुळे दिनांक 03.11.2014 रोजी सदर मोबाईल हा गैरअर्जदार क्र. 3 यांच्याकडे दाखवला. गैरअर्जदार क्र. 3 यांनी मोबाईलची पाहणी करुन सॉफ्टवेअर Re-install करुन दिले. त्यानंतर पुन्हा त्याच दिवसापासून Automatic Restart चा जुनाच प्रॉब्लेम सुरु झाला. अर्जदाराने दिनांक 08.11.2014 रोजी पुन्हा गैरअर्जदार क्र. 3 यांच्याकडे मोबाईल दोषाबद्दल सांगितले तेव्हा गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास सदर मोबाईलचे Mother Board आणि Software टाकावे लागतील असे सांगून दुरुस्तीस 15 ते 20 दिवस लागतील असे सांगितले. अर्जदाराने सदर मोबाईल दुरुस्ती करुन देण्याऐवजी नवीन मोबाईलची देण्याची विनंती केली असता गैरअर्जदार क्र. 3 यांनी त्यास टाळाटाळ केली. अर्जदाराने सॅमसंग कंपनीच्या कस्टमरकेअरला कॉल करुन ही गोष्ट सांगितली तरीही गैरअर्जदाराने अर्जदारास उडवाउडवीची उत्तरे दिली. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे सदरील मोबाईल बदलून देण्याची मागणी केली परंतू अर्जदारास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडून खरेदी केलेला मोबाईल हा सदोष व निकृष्ट दर्जाच्या असून अर्जदारास तो बदलून पाहिजे आहे. यासाठी अर्जदार हा दिनांक 10.11.2014 रोजी गैरअर्जदार यांच्या विरुध्द तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहक मंच नांदेड येथे येत असतांना त्याची बॅग अज्ञत चोरटयाने चोरली. सदर बॅग मध्ये अर्जदाराचा दुसरा एक मोबाईल, चार्जर, हेडफोन, तसेच गैरअर्जदाराकडून खरेदी केलेल्या मोबाईलची मुळ पावती होती. अर्जदाराने पोलीस स्टेशन शिवाजीनगर, नांदेड येथे त्याची बॅग चोरी गेल्याची तक्रार नोंदविलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा मोबाईल बदलून मिळाणार नाही असे सांगितल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून सदर मोबाईल बदलून देण्याविषयी तसेच चुकीच्या व त्रुटीच्या सेवेमुळे अर्जदारास झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु. 25,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- इतक्या रक्कमेची मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर अॅड. अ.वि. चौधरी यांनी गैरअर्जदाराकडून हजर होत असल्याबद्दलची पुरसीस दिली व वकीलपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला. गैरअर्जदार यांना अनेक संधी देवूनही वकिलपत्र दाखल केलेले नाही त्यामुळे दिनांक 3 मार्च,2015 रोजी गैरअर्जदार यांच्याविरुध्द नो-सेचा आदेश पारीत करण्यात आला. युक्तीवादाच्या दिवशी गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांच्यावतीने अॅड. अ.वि. चौधरी यांनी वकीलपत्र दाखल केले व लेखी युक्तीवाद दाखल केला. लेखी युक्तीवादामध्ये गैरअर्जदाराने अर्जदाराने सदर मोबाईल हा कंपनी रिप्लेसमेंट करुन देत नाही. वॉरंटी काळात केवळ तांत्रिक बिघाड झाल्यास ती दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीची असते. अर्जदार हा गैरअर्जदार यांनी सुचविलेल्या नियमावलीप्रमाणे व व्यवस्थीत मार्गदर्शनानुसार मोबाईलचा योग्यरित्या वापर करीत नाही. अर्जदार याचा मोबाईल हा खरेदी केल्यापासून 7 दिवसांच्या आत नादुरुस्त झाला असता तर तो कंपनीस पाठवून बदलण्याचा विचार झाला असता. कारण कंपनी ही केस डिओए (Defect Order approval) समजून मोबाईल बदलून देण्याचा विचार केला असता. परंतू अर्जदार हा गैरअर्जदार यांच्याकडे आलेलाच नाही. गैरअर्जदार हे सदरील मोबाईल दुरुस्ती करुन देण्यास तयार आहेत. गैरअर्जदार यांच्यावर दबाव टाकण्यासाठी अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार यांना सदरील मोबाईल व्यवस्थतरित्या हाताळता येत नाही. सदरील मोबाईल मध्ये कुठलाही दोष नाही त्यामुळे अर्जदाराची तक्रार नामंजूर करावा अशी विनंती गैरअर्जदार यांनी लेखी जबाबाद्वारे केलेली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी दिनांक 16.10.2014 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडून गैरअर्जदार क्र. 1 यांनी उत्पादित केलेला मोबाईल हॅन्डसेट रक्कम रु. 17,500/- ला खरेदी केलेला असल्याचे दाखल पावतीवरुन सिध्द होते. गैरअर्जदार यांच्याकडे सदरील मोबाईल दिनांक 03.11.2014 रोजी दुरुस्तीसाठी अर्जदाराने दिलेला असल्याचे जॉबशिटवरुन दिसून येते. सदरील जॉबशिटचे अवलोकन केले असता मोबाईल हॅन्डसेट मध्ये रिस्टार्ट, नो नेटवर्क अशा पध्दतीचे दोष असल्याचे दिसते. याचा अर्थ मोबाईल खरेदी पासून 15 दिवसात मोबाईलमध्ये बिघाड निर्माण झालेला असल्याचे निदर्शनास येते. अर्जदार याचा मोबाईल हॅन्डसेट वॉरंटी काळातच नादुरुस्त झालेला असल्याने गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी सदरील हॅन्डसेट अर्जदारास त्वरीत दुरुस्तीकरुन देणे बंधनकारक होते परंतू गैरअर्जदार यांनी तसेच केलेले नाही उलट अर्जदारास तक्रार दाखल करण्यास भाग पाडलेले आहे. रक्कम रु. 17,500/- चा मोबाईल हॅन्डसेट 15 दिवसाच्या आतच नादुरुस्त झाला असेल तर कुठल्याही सामान्य व्यक्तीला निश्चितच मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे. अर्जदाराचा मोबाईल नादुरुस्त झाल्यानंतर सदरील मोबाईल वॉरंटी कालावधीमध्ये गैरअर्जदार यांनी दुरुस्ती करुन न दिल्यामुळे सेवेत त्रुटी दिलेली आहे, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार 1 व 3 यांनी अर्जदाराने खरेदी केलेल्या हॅन्डसेटची किंमत रु.17,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास परत करावी.
3. गैरअर्जदार 1 व 3 यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.