श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार,
:- निकालपत्र :-
दिनांक 29 एप्रिल 2011
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदाराच्या पतीने जाबदेणार यांच्याकडे सर्व्हे क्र. 16/3/2 आंबेगाव बुद्रुक येथे चालू करण्यात आलेल्या गृहयोजनेतील पाचव्या मजल्यावरील सदनिका क्र.26 बुक केली. त्यापोटी तक्रारदाराच्या पतीने जाबदेणार यांना दिनांक 4/7/2008 रक्कम रुपये 75,000/-, 9/7/2008 रक्कम रुपये 70,000/- अदा केली. त्यानंतर दिनांक 1/10/2008 रक्कम रुपये 20,000/- सदनिकेचे भाग मोबदल्यापोटी व अतिरिक्त रक्कम रुपये 20,000/- सदनिकेचे करारनाम्याचे खर्चापोटी, एकूण रक्कम रुपये 1,85,000/- अदा केली. त्यानंतर डिसेंबर 2008 मध्ये तक्रारदारास आर्थिक अडचणींमुळे पुढील हप्ते देणे शक्य नसल्यामुळे त्यांनी जाबदेणार यांना सदनिका रद्य करावी अशी विनंती केली तसेच त्यांनी पुढील हप्ते भरले नाहीत. तक्रारदारानी भरलेली रक्कम रुपये 1,85,000/- परत मागितली. त्यानंतर दिनांक 20/7/2009 रोजी तक्रारदाराच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे तक्रारदाराची आर्थिक स्थिती आणखी खालावली. तक्रारदारानी जाबदेणार यांच्याकडे अनेक वेळा या रक्कमेची मागणी केली. तरीही जाबदेणार यांनी रक्कम परत केली नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रक्कम रुपये 1,85,000/-, सन ऑक्टोबर 2008 पासून ऑक्टोबर 2010 पर्यन्त 18 टक्के व्याज रक्कम रुपये 66,600/-, तसेच रक्कम रुपये 10,000/- तक्रारीच्या खर्चापोटी, एकूण रक्कम रुपये 2,61,600/- मागतात. तक्रारदारानी प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांचेविरुध्द मंचानी दिनांक 4/3/2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदाराच्या पतीने जाबदेणार यांच्याकडे सर्व्हे क्र. 16/3/2 आंबेगाव बुद्रुक येथे चालू करण्यात आलेल्या गृहयोजनेतील पाचव्या मजल्यावरील सदनिका क्र.26 बुक केली. त्यापोटी तक्रारदाराच्या पतीने जाबदेणार यांना एकूण रक्कम रुपये 1,85,000/- अदा केली. परंतू पुढील हप्ते आर्थिक अडचणीमुळे तक्रारदारास भरणे शक्य झाले नाही आणि त्यांनी सदनिका घेण्याचे रद्य केले. तक्रारदारानी रामेश्वर डेव्हलपर्स यांच्या दिनांक 4/7/2008 च्या रक्कम रुपये 75,000/-, दिनांक 9/7/2008 च्या रक्कम रुपये 70,000/-, व दिनांक 1/10/2008 च्या रक्कम रुपये 20,000/- पावत्या दाखल केलेल्या आहेत. तसेच करारनाम्यासाठी रक्कम रुपये 20,000/- जमा केल्याची जाबदेणार यांचे पार्टनर श्री.पवार यांच्या सहीची दिनांक 1/10/2008 ची पावती तक्रारदारानी दाखल केलेली आहे. अशा प्रकारे तक्रारदारानी जाबदेणार यांना एकूण रक्कम रुपये 1,85,000/- अदा केल्याचे दिसून येते. तक्रारदारानी जाबदेणार यांना दिनांक 9/7/2010 रोजी नोटीस पाठवून देखील जाबदेणार यांनी तक्रारदारास रक्कम परत केली नाही. तक्रारदाराचे पती हयात नाहीत. त्यामुळे तक्रारदारास या रक्कमेची अत्यंत निकड असल्याचे ते म्हणतात. म्हणून मंच जाबदेणार यांनी तक्रारदारास रक्कम रुपये 1,85,000/- 9 टक्के व्याजासह दिनांक 22/10/2010 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदारास अदा होईपर्यन्त परत करावी. तक्रारदार तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत.
वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारास रक्कम रुपये 1,85,000/- 9 टक्के व्याजासह दिनांक 22/10/2010 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदारस अदा होईपर्यन्त तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1,000/- या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयात दयावी.
3. आदेशाची प्रत दोन्ही पक्षास विनामूल्य पाठविण्यात यावी.