(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा.अध्यक्ष )
01. तक्रारकर्ता श्री कृष्णा जीवन बुरडे यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 35 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 अनुक्रमे बियाणे विक्रेता व बियाणे निर्माता कंपनी यांचे विरुध्द सिरी ग्लोरीयस या धानाचे भेसळयुक्त बियाण्या मुळे त्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे. .
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा व्यवसायाने शेतकरी असून तो उपरोक्त नमुद पतत्यावर राहतो. त्याचे वडीलोपार्जीत मालकीची शेत जमीन मौजा खापा तालुका तुमसर, जिल्हा भंडारा येथे गट/भूमापन क्रं-140/2, क्षेत्रफळ-1.62 हेक्टर आर एवढी शती आहे. तक्रारकर्त्याची शेती ही शेता जवळील नहर कालव्यावर अवलंबून असल्याने तो दोन्ही हंगामात पिक घेत होता. उन्हाळी रब्बी हंगामाला सुरुवात झाल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे विक्रेत्या कडून,विरुध्दपक्षक्रं 2 बियाणे निर्माता कंपनीचे सिरी (ग्लोरीयस) या वाणाचे धानाचे बियाणे एकूण 07 बॅग प्रतीबॅग किम्मत रुपये-750/- प्रमाणे एकूण रुपये-4500/- एवढया किमतीत दिनांक-27.01.2021 रोजी खरेदी केले व बियाण्याचे बिल क्रं 435 प्राप्त केले.
तक्रारकर्त्याने धानाचे बियाणे पेरणीपूर्वी जमीनीची योग्यप्रकारे नांगरणी करुन मशागत केली आणि दिनांक-28.01.2021 रोजी मजूरांचे सहाय्याने धान बियाण्याची पेरणी केली व त्यानंतर पिकाची रोवणी दिनांक-07.03.2021 पासून सुरु केली. पिकाची लागवड केल्या नंतर वेळोवेळी खते, रासायनिक औषधे, किटकनाशकांची फवारणी करण्यात आली. अशाप्रकारे संपूर्ण पिकाचे व्यवस्थापन करुनही धान पिक हे 90 ते 100 दिवसात गर्भातच पुन्हा लोंबी न येता कोमजलेले दिसून आले. धान पेरणीचे 100 दिवसा नंतर नहारात पुन्हा पाणी येईल याची शाश्वती दिसून येत नव्हती, नहर कोरडे पडले होते. वस्तुतः विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने सदर धानाचे उत्पादन हे 90 ते 100 दिवसात येईल याची हमी दिली होती तक्रारकर्त्याने धानाचे बियाणे योग्य नसल्या बाबत विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, यांचे कडे लेखी तक्रार केली. त्या अनुषंगाने तालुका तक्रार निवारण समिती यांनी दिनांक-27.05.2021 रोजी तक्रारकर्त्याचे शेतामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन धान पिकाची पाहणी करुन पंचनामा केला. तालुका तक्रार निवारण समितीचे अहवाला प्रमाणे पाहणीचे दिवशी पिकास 128 दिवस पूर्ण झाले असून अजून 01 महिन्याचा कालावधी परिपक्वतेसाठी लागणार आहे म्हणजेच पिकास 145 ते 150 दिवस लागण्याची शक्यता आहे म्हणजेच पिकाची कापणी ही 27 ते 30 जूनच्या दरम्यान होईल, त्यावेळी पावसाचे दिवस राहणार असल्याने पिकाचे नुकसान होणार आहे तसेच पुढील हंगामात जमीन तयार करणे व त्या कामा करीता शेतक-याला वेळ मिळणार नसल्याने एका हंगामाचे नुकसान होणार आहे. जास्त कालावधीचे पिक निघाल्यामुळे ग्राहक मंचात जाण्याची शिफारस करण्यात येत आहे.
तक्रारकर्त्याने सिरी ग्लोरीयस बियाण्याची लागवड 1.62 हेक्टर आर क्षेत्रात केली असून त्याला खालील प्रमाणे खर्च आला-
अक्रं | मुद्दा | खर्चाची रक्कम |
1 | मजूरी, ट्रॅक्टर, बैलबंडी व ईतर वाहतूक खर्च, नांगरणी पेरणी, रोवणी देखरेख जाणे येणे यासाठी | रुपये-50,000/- |
2 | नहाराचे पाणी100 दिवसाचे कालावधीत प्रती तास 600/- रुपये प्रमाणे | रुपये-2600/- |
3 | किटक नाशक औषधी खते यासाठीचा खर्च | रुपये-32,000/- |
4 | लोंबी व उत्पादीत नसलेले नापिक धानाचे मरड कापणी खर्च | रुपये-14,000/- |
5 | तक्रारकर्ता व त्यांचे कुटूंबियांनी दुसरे काम न करता शेतासाठी केलेली मेहनत | रुपये-30,000/- |
| धान पिकासाठी आलेला एकूण खर्च | रुपये-1,28,600/- |
विरुध्दपक्षांनी एका एकर क्षेत्रात 40 क्विंटल धानाचे उत्पादन होईल असे आश्वासन दिले होते त्यामुळे 1.62 हेक्टर आर क्षेत्रात कमीतकमी 170 क्विंटल उत्पादन अपेक्षीत होते परंतु धानाचे रोपे बरोबर आले नाहीत, रोवणी नंतर धान पिकास जागोजागी चुडे पडले, ते पूर्ण वाढून आले नाही. धान लोंबी परिपक्व न होता, बदरा व मरड तनिसच झाली होती त्यावेळेस सदर प्रतीचे नियमित उत्पादीत धानाची किम्मत रुपये-1868/- प्रती क्विंटल शासकीय दराने होती त्यामुळे रुपये-3,17,560/- चे उत्पादन मिळणे आवश्यक व गरजेचे होते. तसेच सदर धान शासनास विकले असते तर 15 टक्के बोनस रक्कम म्हणजे रुपये-47,634/- मिळाले असते अशाप्रकारे अपेक्षीत उत्पादन रुपये-3,17,560/-अधिक बोनस रुपये-47,634/- असे एकूण उत्पन्न रुपये-3,65,194/- मिळाले असते. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी व विरुध्दपक्ष क्रं 4 जिल्हाधिकारी हे कृषी निर्माता कंपनी व कृषी विक्रेता यांचेवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी आहेत परंतु तालुका कृषी अधिकारी यांनी सुध्दा दोषपूर्ण सेवा दिली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना दिनांक-17.06.2021 रोजी नोटीस पाठविली परंतु प्रतिसाद मिळालानाही एवढेच नव्हे तर नोटीसला उत्तर सुध्दा दिले नाही.म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्षां कडून तक्रारकर्त्यास मजूरी,ट्रॅक्टर,बैलबंडी, नांगरणी पेरणी व रोवणी करीता आलेला खर्च रुपये-50,000/- देण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रारीतील परिच्छेद कं 7मध्ये दर्शविल्या प्रमाणे रुपये-1,28,600/- ची नुकसानी विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास देण्यचे आदेशित व्हावे
- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे विक्रेत्या कडून सिरी ग्लोरीयस बियाणे खरेदीसाठी केलेला खर्च रुपये-4500/- व त्याचा ने-आण खर्च रुपये-500/- विरुध्दपक्षां कडून तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित व्हावे.
4. तक्रारीतील परिच्छेद क्रं 8 प्रमाणे अपेक्षीत उत्पादन रुपये रुपये-3,17,560/- व बोनसची रक्कम रुपये-47,634/- चे नुकसान झालेले असल्याने अशा रकमा विरुध्दपक्षां कडून तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित व्हावे.
- नहराचे पाणी आणण्यासाठी 600/- रुपये प्रती एकर प्रमाणे आलेला खर्च रुपये-2600/- विरुध्दपक्षां कडून देण्याचे आदेशित व्हावे.
- खत खरेदी,किटक नाशक औषधी खरेदी यासाठी आलेला खर्च रुपये-32,000/- विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित व्हावे.
- नापीक धानाचे मरड कापणी खर्च रुपये-14,000/- विरुध्दपक्षां कडून तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित व्हावे.
8. तक्रारकर्ता व त्याचे कुटूंबियांनी अन्य दुसरे काम न करता शेतीसाठी केलेली मेहनत याचा खर्च रुपये-30,000/- विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे.
9. तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-35,000/- तसेच आश्वासना प्रमाणे सेवा न दिल्याने रुपये-55,000/- आणि नोटीस व तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्दपक्षां कडून तक्रारदारास देण्याचे आदेशित व्हावे.
10. या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे विक्रेत्याने आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल केले. त्याने आपले लेखी उत्तरा मध्ये तक्रारकर्ता हा त्याचे दुकानात धानाचे बियाणे खरेदीसाठी दिनांक-27.01.2021 रोजी आला होता ही बाब मान्य केली परंतु कमी कालावधीचे उत्कृष्ट धान बियाणे विषयक त्याने चौकशी केली होती हे विधान नामंजूर केले. विरुध्दपक्ष क्रं 1 हा बरेच वर्षा पासून मे. नवदुर्गा कृषी केंद्र नावाने बियाणे विक्रीचा व्यवसाय करीत आहे परंतु त्याने तक्रारकर्त्याला धान बियाण्याची हमी दिली होती हे विधान नामंजूर केले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्या कडून दिनांक-27.01.2021 रोजी प्रती बॅग वजन 10 किलो प्रमाणे एकूण 06 बॅग प्रती बॅग किम्मत रुपये-750/- प्रमाणे एकूण रुपये-4500/- मध्ये खरेदी केले होते ही बाब मान्य केली. तक्रारकर्त्याने सर्व विरुध्दपक्षांना सि.पी.सी कोड कलम 80 प्रमाणे नोटीस दिली होती ही बाब मान्य आहे. आपले विशेष कथनात असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी कडून बियाण्या बाबत जे काही सांगितले जाते तेच त्यांनी तक्रारकर्त्यास सांगितले होते. विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता ज्या स्थितीत बियाणे निर्माता कंपनी कडून बियाणे प्राप्त होते त्याच स्थितीत बियाण्याची विक्री करतो. बियाण्याची संपूर्ण माहिती ही बियाण्याचे पिशवीवर दिलेली असते. दोषपूर्ण बियाण्याचे नुकसानीची सर्व काही जबाबदारी ही विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीची येते. सबब विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे विक्रेत्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीने आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्याने त्यास विरुध्दपक्षांनी दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही तक्रारकर्ता हा खोटी तक्रार करुन कायदयाचा दुरुपयोग करीत आहे. सबब तक्रार खारीज व्हावी. तक्रारकर्ता हा शेतातील पिकासाठी बावनथडी नदीतील पाण्याचा उपयोग करतो परंतु नियमित पाणी पुरवठा होत नाही हा एक अभिलेखाचा भाग आहे. तक्रारकर्ता हा दोन हंगामात पिक घेतो हा सुध्दा अभिलेखाचा भाग आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी सिरी ग्लोरीयस धान वाणाचे बियाणे गुणवत्ता पूर्ण निर्मीत करते आणि सर्व माहिती पिशवीवर छापलेली असते. विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीने धान पिकाचे उत्पादन हे 90 ते 100 दिवसात होते असे छापलेले नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे विक्रेत्या कडून एकूण 06 बॅग रुपये-4500/- मध्ये विकत घेतल्या होत्या ही बाब माहिती अभावी नाकबुल केली. तक्रारकर्त्याने धान बियाण्याची लागवड केल्या नंतर खते औषधी दिली होती योग्य काळजी घेतली होती या बाबी माहिती अभावी नाकबुल केल्यात. तक्रारकर्त्याने तक्रारीमधून विरुध्दपक्षा विरुध्द केलेले सर्व आरोप नामंजूर केलेत. धानाचे पिक हे 90 ते 100 दिवसात विकसित झाले नव्हते ही बाब नाकबुल केली. तालुका तक्रार निवारण समितीने दिनांक-27.05.2021 रोजी तक्रारकर्त्याचे शेतातील धान पिकाची पाहणी करुन पंचनामा केला या बाबी मान्य केल्यात. तक्रारकर्त्याने स्वतःच निष्काळजीपणा केल्यामुळे तो योग्य दर्जाचेपिक घेऊ शकलेला नाही त्यामुळे तो कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. तक्रारकर्त्याची नोटीस प्राप्त झाली परंतु ती नोटीस खोटी असल्याने नोटीसला उत्तर दिले नाही. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे अहवाला वरुन स्पष्ट होते की, धानाचे बियाणे हे दोषपूर्ण नव्हते. तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, धानाचे पिक हे 90 ते 100 दिवसात आले नाही तर ते विकसीत होण्यासाठी 130 दिवस लागतील. तक्रारकर्त्याने स्वतः मान्य केले आहे की, त्याचे शेताला नियमित पाणी पुरवठा होत नाही, जेंव्हा की, धान पिकाचे फुलास आणि परिपक्व होताना पाण्याची आवश्यकता असते. तसेच त्याने असे सुध्दा नमुद केलेले आहे की, कालव्या पासून त्याचे शेत बरेच अंतरावर आहे त्यामुळे पिकास पाणी पोहचत नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीने धानाचे पिक हे 90 दिवसात परिपक्व होईल अशी कधीही हमी दिलेली नाही. धानाचे बियाण्याचे पिशवीवर त्यांनी संपूर्ण माहिती छापलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी असल्याने ती खारीज करावी असे विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीने नमुद केले.
05. तालुका कृषी अधिकारी, तुमसर यांनी आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले, त्यांनी लेखी उत्तरा मध्ये असे नमुद केले की, त्यांचे विभागा मार्फत कृषी परवाना, कृषी केंद्रातील बियाणे तपासणे , प्रयोगशाळेत बियाणे नमुना सादर करणे ही कामे केली जातात, तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार दिनांक-27.05.2021 रोजी तालुका तक्रार निवारण समितीने पिक पाहणी करुन अहवालाची प्रत तक्रारकर्त्यास दिलेली आहे व त्यास ग्राहक मंचात जाऊन दाद मागण्यास कळविलेले आहे. तक्रारकर्त्याचे नोटीसला त्यांनी दिनांक-15.09.2021 रोजी दिले आहे.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, व शपथे वरील पुरावा, विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे विक्रेता यांचे लेखी उत्तर, विरुध्दपक्ष कं 2 बियाणे निर्माता कंपनीचे लेखी उत्तर तसेच प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज ईत्यादीचे जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर तक्रारीचे न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी तर्फे निर्मित दोषपूर्ण धान बियाण्याची विक्री केली आहे काय ? | -होय- |
2 | दोषपूर्ण धान बियाण्यामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे काय? | -होय- |
3 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: निष्कर्ष ::
मुद्दा क्रं 1 बाबत
07. विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीने आपल्या लेखी उत्तरा मधून तक्रारदारांची संपूर्ण तक्रार व त्यामधील विधाने, विरुध्दपक्षा विरुध्द केलेल्या मागण्या या नाकबुल केलेल्या आहेत. विरुध्दपक्ष क्रं 2 निर्मीत सिरी (ग्लोरीयस) धानाचे बियाणे दोषपूर्ण होते किंवा कसे या बाबतीत तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल वाचन करुन योग्य तो निर्णय देणे आवश्यक आहे. तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवालावर श्री मिलींद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी,भंडारा, तालुका कृषी अधिकारी, तुमसर श्री विकास अंकुश काळे, मंडळ कृषी अधिकारी श्री जे.बी. सरोदे, कृषी अधिकारी पंचायत समिती तुमसर श्री संजय एस.न्यायमूर्ती तसेच विक्रेता प्रतिनिधी श्री सुनिल पारधी, तक्रारकर्ता शेतकरी श्री कृष्णा जीवन बुरडे यांच्या स्वाक्ष-या असल्याचे दिसून येते. फक्त पंजाबराव कृषी विद्दापिठ यांचे शास्त्रज्ञ व विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निमाता कंपनीचे प्रतिनिधीची स्वाक्षरी नाही. सदर समितीचे अहवालावरुन असे दिसून येते की, या मधील अहवालावर शासनाचे कृषी विभागातील तज्ञांच्या स्वाक्ष-या आहेत.
तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने तक्रारकर्त्याचे शेतात लागवड केलेल्या धान पिकाची पाहणी दिनांक-27.05.2021 रोजी करुन आपला विस्तृत अहवाल दिलेला आहे, ज्यामध्ये बियाणे विक्रेत्याचे नाव, खरेदी केलेल्या बियाण्याचा तपशिल-धान सिरी, विक्रेत्याने दिलेल्या बिलाचा क्रमांक-435 व बिल दिनांक-27.01.2021 खरेदी केलेले वाण-सिरी, लॉट क्रमांक-PRSRT/2021/13, उत्पादक कंपनीचे नाव-प्रथम बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर नमुद केलेले आहे. समीतीने आपले पाहणी अहवाला मध्ये शेतीचा सर्व्हे क्रं-140/2 नमुद केलेला असून लागवड क्षेत्र 1.62 हेक्टर आर नमुद केलेले असून जमीनीचा प्रकार मध्यम असल्याचे नमुद केले. पेरणीची तारीख-22/01/2021 व पुर्नलागवड तारीख-07/03/2021 नमुद केलेले आहे. सिंचनाची सुविधा कालवा सरकारी असे नमुद केलेले आहे. सदर समितीचे अहवालावर तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष कं 1 बियाणे विक्रेता यांच्या सहया आहेत.
दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, विरुदपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीने आपले लेखी उत्तरा मध्ये तक्रारकर्त्याने लागवड केलेल्या सिरी ग्लोरीयस धानाच्या वाणाच्या लागवडी संबधात जर-तरचे आरोप केलेले आहेत परंतु हे सर्व आरोप तक्रारकर्त्याचे शेताची पाहणी न करता केलेले आहेत त्या संबधाने कोणताही सक्षम पुरावा विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीने दाखल केलेला नाही. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे अहवाला मध्ये मुद्दा क्रं 3 मध्ये योग्य मशागत केल्याचे तसेच मुद्दा क्रं 6 मध्ये सरकारी कालव्या व्दारे सिंचनाची व्यवस्था केल्याचे नमुद आहे. सदर अहवाला मध्ये पेरणी पुर्नलागवड पध्दतीने योग्य अंतर ठेवून केल्याचे सुध्दा नमुद आहे. समितीचे अहवालामध्ये तक्रारकर्ता याने स्वतः साक्ष दिलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 श्री सुनिल पारधी या बियाणे विक्रेता याने तक्रारकर्त्याला बिल क्रं 435 दिनांक-27.01.2021 अनुसार बियाणे विक्री केल्याचे अहवालात मान्य केलेले आहे. सदर समितीचे अहवाला वर तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे विक्रेता यांच्या स्वाक्ष-या आहेत.
08. तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने अहवाला मध्ये खालील प्रमाणे निष्कर्ष नोंदविला-
दिनांक-27.05.2021 ला समितीने तक्रारदार शेतक-याच्या शेताची पाहणी केली .प-हे दिनांक-28.01.2021 व रोवणी दिनांक-07.03.2021 ला केली. पाहणीच्या दिवशी धानाला 128 दिवस पूर्ण झाले आहे. धान सध्या काही प्रमाणात (10 ते 20 टक्के) पोटरी अवस्थेत आहे. पिक परिपक्व होण्यासाठी अजून 1 महिना लागणार आहे. सदर शेतक-याकडे पाण्याची सोय आढळून आली आहे. उत्पादक कंपनीच्या माहितीपत्रका नुसार 120 दिवसाचे बियाणे आहे परंतु प्रत्यक्षात पक्वतेसाठी 145 ते 150 दिवस लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच कापणी 27 ते 30 जूनच्या दरम्यान होईल, त्यावेळी पावसाचे दिवस राहणार असल्याने पिकाचे नुकसान होणार आहे व पुढील हंगामात जमीन तयार करण्या करीता व ईतर कामा करीता शेतक-याला वेळ मिळणार नसल्याने एक हंगामाचे नुकसान होणार आहे. असे जास्त कालावधीचे पिक निघाल्यामुळे ग्राहक मंचात जाण्याची शिफारस करण्यात येते. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे दिनांक-27.05.2021 रोजीचे पाहणी अहवाला वरुन एक बाब प्रकर्षाने दिसून येते की, समितीचे अहवाला प्रमाणे बियाणे निर्माता कंपनीच्या माहितीपत्रका नुसार सिरी ग्लोरीयस हे धानाचे बियाणे 120 दिवसाचे आहे परंतु प्रत्यक्षात पक्वतेसाठी 145 ते 150 दिवस लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच कापणी 27 ते 30 जूनच्या दरम्यान होईल, त्यावेळी पावसाचे दिवस राहणार असल्याने पिकाचे नुकसान होणार आहे व पुढील हंगामात जमीन तयार करण्या करीता व ईतर कामा करीता शेतक-याला वेळ मिळणार नसल्याने एक हंगामाचे नुकसान होणार आहे या बाबी सिध्द होतात. तसेच तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने तक्रारकर्त्यास झालेल्या नुकसानी बाबत जिल्हा ग्राहक आयोगा मध्ये जाण्याची सुध्दा शिफारस केलेली आहे. सदर शासना मार्फत गठीत केलेल्या समीती मध्ये कृषी क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश आहे, त्यामुळे त्यांनी दिलेल्या अहवालावर अविश्वास दाखविण्याचे कोणतेही प्रयोजन जिल्हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही. तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीव्दारे निर्मित सिरी ग्लोरीयस धानाचे दोषपूर्ण बियाणे विक्री केल्याची बाब सिध्द होते करीता मुद्दा क्रं 1 चे उत्तर आम्ही “होकारार्थी” नोंदवित आहोत.
09. तक्रारकर्त्याचे वकीलांनी तक्रारीतील युक्तीवादाचे समर्थनार्थ खालील नमुद मा.वरिष्ठ न्यायालयांचे निवाडयांवर आपली भिस्त ठेवली-
- Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ Kanta Kantha Rao- Verus-Y.Surya Narayana” (2017) CJ 619 (N.C.)- Revision Petition Nos.1008,1009 and 1010 of 2017 Decided on 03-05-2007
Petitioner had never filed any objections to report of Scientist nor did not file any application under Section 13 (1) (c) requesting for sample seeds to be sent to appropriate laboratory for testing. Petitioner could have sent sample for testing to laboratory which it had failed to do so. Revision Petitions dismissed.
*****
- Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ Dharam Pal & Sons- Verus-Som Prakash” (2014) CJ 666 (N.C.)- Revision Petition No.-4672 of 2012 Decided on 08-05-2014
We have perused the evidence on record, the report submitted by the Committee constituted by the Deputy Director, Agriculture, Sirsa. Thus, as per the report, it is clear that the Complainant had sufferd his paddy crop, to the extent of 50%, on account of substandard quality of seeds sold to him by the Ops. Revision Petition dismissed.
*****
- Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ National Seeds Corporation Ltd.- Verus-Abdul Azia Fakir Mohd. Inamdar & Another” (2009) CJ 518 (N.C.)- Revision Petition No.-1227 of 2004 Decided on 19-01-2009
In view of report of District Seeds Complaint Enquiry Committee seeds supplied to complainant were defective and a wrong representation had been made to complainant that seeds were certified and were having 85% germination capacity. Revision Petition dismissed.
*****
- Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ Maharashtra State Seeds Corporation Ltd.- Verus-Arvind Bajirao Borkar &Others” (2014) CJ 35 (N.C.)- Revision Petition No.-1412 of 2013 Decided on 06-09-2013
There is nothing on record to show that at the time of preparation of Panchanama made by District Seeds Complaint Enquiry Committee, representative of petitioners ever objected to same. As per Panchanama 50% of seeds were infected.
*****
- Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- “ Western Agri Seeds Pvt.Ltd. & Others -Verus-K. Murlidhar Reddy & Others” (2015)CJ 920(NC)
या व्यतिरिक्त जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे खालील नमुद मा.सर्वोच्च न्यायालयाचे व मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयांवर भिस्त ठेवण्यात येत आहे-
- Hon’ble Supreme Court of India- H.N.S.Shastry- Verus-“Asstt. Director Agriculture” (2004 (4) Mh.L.J.- (Page No.-838 to 841) Civil Appeal No. 2253 of 1999 decided on 06-05-2004
सदर न्यायनिवाडया मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने असे नमुद केलेले आहे की, Under Section 14(1) of the Consumer Protection Act, 1986, if the District Forum is satisfied that the goods complained against suffer from any defect, it could grant reliefs which include return of the price of the paddy and also compensation to the consumer for any loss suffered. Granting of relief to the consumer does not depend upon whether he should have made alternative arrangement. In the present case, it was enough for the appellant to establish that the paddy seeds supplied by the respondent were defective.
आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्दा तक्रारकर्त्याने विकत घेतलेले सिरी ग्लोरीयस जातीचे धान बियाण्याचे पिका मध्ये मोठया प्रमाणात देवधान जंगली धान आल्याने विरुध्दपक्ष क्रं2 बियाणे निर्माता कंपनीचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा निष्कर्ष तालुका स्तरीय बियाणे तक्रार समितीने अहवाला मध्ये नोंदविलेला असल्याने सदर मा.सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे आमचे मत आहे.
******
- Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- “ Indian Farmers Fertilizers Co-operative Ltd. -Verus-Vijay Kumar And Another” (2018)CJ 861 (N.C.)
सदर न्यायनिवाडया मध्ये मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केलेले आहे की, “If despite all efforts made by the farmer, there is no flower and foliage in as many as 60-70% of the plants, it is obvious that there was some adulteration in the seeds. The team of the Agriculture Department also noted in this regard that there was a mixture of Gwar seeds shown to it.
Therefore, there is no reason to discard the report prepared by the officers of the Agriculture Department”.
सदर मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्ये स्पष्टपणे नमुद आहे की, शेतक-याने पिक लागवडीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केल्या नंतरही 60 ते 70 टक्के झाडांना फुले व बोंडे आलेले नाहीत आणि बियाणे भेसळयुक्त असल्याचा अहवाल कृषी अधिकारी यांचे समीतीने दिलेला असून सदर अहवाल अमान्य करण्याचे कोणतेही प्रयोजन नाही.
आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्दा वादातील सिरी ग्लोरीयस जातीचे धान बियाणे दोषपूर्ण असल्याचा निष्कर्ष तालुका स्तरीय बियाणे तक्रार समितीने अहवाला मध्ये नोंदविलेला असल्याने सदर मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा निवाडा हातातील प्रकरणात अंशतः लागू पडतो असे आमचे मत आहे.
******
- Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- “ Avon Beej Company- -Verus-Anoop Singh And Others” (2020)CJ 954 (N.C.)
सदर न्यायनिवाडया मध्ये मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केलेले आहे की, “Report of the Agriculture Experts Committee wherein it has been found that 31% plants were of off-type due to which the Complainant suffered 29% loss of paddy crop and Off-type means any seed or plant not a part of the same variety and make include, seeds or plants of other varieties. Further, it is established that the seeds were not pure. The report submitted by the team of Agriculture Experts was not discarded”.
आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्दा वादातील सिरी ग्लोरीयस जातीचे धान बियाणे दोषपूर्ण असल्याचा निष्कर्ष तालुका स्तरीय बियाणे तक्रार समितीने अहवाला मध्ये नोंदविलेला असल्याने सदर मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा निवाडा हातातील प्रकरणात अंशतः लागू पडतो असे आमचे मत आहे.
******
मुद्दा क्रं 2 बाबत
10. तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवालाचे सुक्ष्म अवलोकन केले असता असे दिसून येते की, समितीने अहवाला मध्ये माहिती पत्रका नुसार 120 दिवसात पिक निघणार आहे परंतु प्रत्यक्षात पिक निघण्यास 145 ते 150 दिवस लागणार आहेत म्हणजेच ऐन पावसाळयाचे दरम्यान म्हणजे 27 ते 30 जूनच्या दरम्यान पिक परिपक्व होणार असल्याने पावसाळयातील पाण्यामुळे पिकाचे नुकसान होणार आहे तसेच पिक उशिराने आल्याने शेतक-यास पुढील हंगामा करीता जमीन तयार करण्या करीता वेळ मिळणार नसल्याने त्याचे एका हंगागाचे नुकसान झाले असा निष्कर्ष तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने काढलेला आहे . तक्रारकतर्याने आपले तक्रारी मध्ये पिकाची मशागत, वाहतूक, पाणी व्यवस्थापन रासायनिक औषधी, खते, किटकनाशके, पिक कापणी, मजूरी अशा विविध बाबींवर केलेल्या संपूर्ण खर्चाची मागणी केलेली आहे परंतु जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे तक्रारकर्त्यास अपेक्षीत उत्पन्नाची नुकसान भरपाई मंजूर होणार असल्या मुळे वेगवेगळया बाबी करीता वेगवेगळी भरपाई देण्याचे कोणतेही प्रयोजन नाही कारण अपेक्षीत उत्पादनाची नुकसान भरपाई मंजूरी विचारात घेण्यात येणार आहे.
11. तक्रारकर्त्यास अपेक्षीत धानाचे पिकाचे नुकसानीची भरपाई देण्यासाठी जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर येथील प्रचलीत दराचा आधार घेण्यात येते. कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर मधील तांदुळाचे दर सन-2018-2019 मध्ये सरासरी जास्तीत जास्त रुपये-4725/- आणि कमीतकमी रुपये-2750/- संगणकावर दर्शविलेले आहेत, त्यानुसार तक्रारकर्त्यास धान पिकाचा भाव प्रती क्विंटल रुपये-3000/- एवढा दर मंजूर करण्यास कोणतीही अडचण नाही. तक्रारकर्त्याने तक्रारी मध्ये रुपये-1868/- प्रती क्विंटल आणि त्यावर 15 टक्के बोनस या प्रमाणे 170 क्विंटल अपेक्षीत उत्पादनाचे नुकसानीची मागणी केलेली आहे. म्हणजेच धान पिकाचे नुकसान रुपये-3,17,560/- आणि बोनस रुपये-47,634/- असे मिळून एकूण रुपये-3,65,194/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे.
12. जिल्हा ग्राहक आयोगाचे मते पारंपारीक शेती आणि मशागतीचा विचार करता विदर्भा मध्ये धानाचे अपेक्षीत उत्पादन हे प्रती एकर 20 क्विंटल एवढे येते. तक्रारकर्त्याने तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवाला प्रमाणे धानाचे बियाणे शेतामध्ये 1.62 हेक्टर आर एवढया क्षेत्रामध्ये पेरले होते. सर्वसाधारणपणे 40 आर शेती म्हणजे एक एकर आणि 2.5 एकर म्हणजे 100 आर म्हणजेच एक हेक्टर असे गणल्या जाते. तक्रारदारांनी 1.62 हेक्टर आर मध्ये वादातील धानाचे बियाणे पेरले याचाच अर्थ तक्रारकर्त्याने एकूण 04 एकर एवढया क्षेत्रात वादातील धानाचे बियाणे पेरले, पेरणी केलेले क्षेत्र बघता त्याला एकूण 80 क्विंटल धानाचे अपेक्षीत उत्पादन होणे आवश्यक आहे. परंतु तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे अहवाला प्रमाणे त्याचे शेतात पावसाळयाचे दिवस असल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता दर्शविलेली आहे तसेच पिक उशिरा आल्याने जमीन तयार करण्यासाठी वेळ मिळणार नसल्याने एका हंगामाचे नुकसान होण्याची शक्यता दर्शविलेली आहे. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने तक्रारकर्त्याचे अपेक्षीत उत्पादनाचे नेमके किती टक्के नुकसान झालेले आहे याचा उल्लेख केलेला नाही, केवळ एका हंगामाचे नुकसान झाले एवढाच उल्लेख आहे. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्यास अपेक्षीत उत्पादनाच्या 50 टक्के नुकसान भरपाई मंजूर केल्यास एकूण 80 क्विंटलच्या 50 टक्के म्हणजे 40 क्विंटल धानाचे उत्पादनाची नुकसान भरपाई धानास प्रतीक्विंटल रुपये-3000/- दर लक्षात घेता तक्रारकर्त्यास रुपये-1,20,000/- एवढी नुकसान भरपाई विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
13. तक्रारकर्त्यास वेळेवर त्यांचे पिकाचे झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने शेवटी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करावी लागली. विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीचे सिरी ग्लोरीयस जातीचे धानाचे बियाणे दोषपूर्ण असल्याची बाब तालुका तक्रार निवारण समितीचे अहवाला वरुन सिध्द झालेली असल्याने त्याला नाहक या प्रकरणात त्रास सहन करावा लागला त्यामुळे त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी कडून देण्याचे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर “होकारार्थी” नोंदवित आहोत. विरुध्दपक्ष क्रं 1 हा बियाणे विक्रेता असून दोषपूर्ण बियाण्या संबधाने त्याची कोणतीही जबाबदारी येत नसल्याने त्याचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. अशाप्रकारे मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्तर “होकारार्थी” नोंदविण्यात आल्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 3 अनुसार तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्ता श्री क्रिष्णा जीवन बुरडे यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-2 बियाणे निर्माता कंपनी प्रथम बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड नागपूर आणि तिचे मालक/ कार्यकारी संचालक यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं-2 बियाणे निर्माता कंपनी व तिचे मालक/कार्यकारी संचालकांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास पुरविलेले सिरी ग्लोरीयस या दोषपूर्ण धान पिकाचे बियाण्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई दाखल रक्कम रुपये-1,20,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष वीस हजार फक्त) आणि सदर नुकसान भरपाईचे रकमेवर तक्रार दाखल दिनांक-14.09.2021 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याज प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्त्यास अदा करावी.
- तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल भरपाई म्हणून रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा रकमा विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी व तिचे मालक/ कार्यकारी संचालक यांनी तक्रारकर्त्यास अदा कराव्यात.
- विरुध्दपक्ष क्रं-1 नवदुर्गा कृषी केंद्र तुमसर तर्फे प्रोप्रायटर श्री सुनिल संपत पारधी या बियाणे विक्रेत्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर आणि विरुध्दपक्ष क्रं 4 जिल्हाधिकारी, भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- 1 बियाणे निर्माता कंपनी आणि तिचे मालक/कार्यकारी संचालक यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त संच त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.