Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/13/45

श्री. दिलीप विष्‍णुजी ईटनकर - Complainant(s)

Versus

साईधाम बिन्‍डर्स एन्‍ड डेव्‍हलपर्स मार्फत पार्टनर श्री. सतीश रजनिकांत इटकेलवार - Opp.Party(s)

प्रकाश डी. नौकरकर

07 Feb 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/13/45
 
1. श्री. दिलीप विष्‍णुजी ईटनकर
रा.43 जुना बगडगंज,गरोबा मैदान भंडारा रोड नागपूर 44 008
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. साईधाम बिन्‍डर्स एन्‍ड डेव्‍हलपर्स मार्फत पार्टनर श्री. सतीश रजनिकांत इटकेलवार
ऑफीस गोकुल 185 अमेय अपार्टमेंट उत्‍तर बाजार रोड,रामनगर चौक जवळ नागपूर 440 010
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा- श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक-07 फेब्रुवारी, 2014 )

 

1.    तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्षाने बयानापत्र/करारा नुसार भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र उर्वरीत रक्‍कम स्विकारुन त.क. चे नावे करुन देण्‍याचे विरुध्‍दपक्षास आदेशित व्‍हावे व असे करणे विरुध्‍दपक्षास शक्‍य नसल्‍यास तक्रारकर्त्‍याने भूखंडापोटी विरुध्‍दपक्षाकडे जमा केलेली रक्‍कम  आजचे बाजारभावा नुसार द.सा.द.शे.24% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्षा कडून परत मिळावी व इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी  मंचा समक्ष दाखल केली.

2.     तक्रारकर्त्‍याचे तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

       विरुध्‍दपक्ष साईधाम बिल्‍डर्स आणि डेव्‍हलपर्स, नागपूर ही एक भागीदारी फर्म असून विरुध्‍दपक्ष हे तिचे भागीदार आहेत. विरुध्‍दपक्षाचा शेतीचे ले आऊट पाडून भूखंड विक्रीचा व्‍यवसाय आहे.

      विरुध्‍दपक्षाने मौजा हुडकेश्‍वर तालुका नागपूर ग्रामीण जिल्‍हा नागपूर येथील पटवारी हलका नं. 37, खसरा क्रं-160 मध्‍ये ले आऊट पाडून भूखंड विक्रीची योजना सुरु केली. सदर ले आऊटमधील भूखंड क्रं-19 क्षेत्र- 2960 चौरसफूट, प्रतीचौरसफूट दर रुपये-290/- प्रमाणे एकूण किंमत रुपये-8,58,400/- मध्‍ये तक्रारकर्त्‍यास विक्री करण्‍याचा करारनामा दि.12.04.2007 रोजी केला. त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍दपक्षाला कराराचे दिवशी अग्रीम रक्‍कम म्‍हणून रुपये-1,00,000/- पंजाब नॅशनल बँक, नागपूर चेक क्रमांक-452507 व्‍दारे दिली व त्‍या बाबत विरुध्‍दपक्षा कडून पावती क्रं 117 प्राप्‍त केली. सदर अग्रीम रक्‍कम रुपये-1,00,000/- चेक नं.452507 अन्‍वये मिळाल्‍याची बाब विरुध्‍दपक्षाने दि.12.04.2007 रोजीचे करारनाम्‍यात सुध्‍दा मान्‍य केलेली आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने भूखंडापोटी  विरुध्‍दपक्षास पंजाब नॅशनल बँक नागपूर चेक  नं.-270403 व्‍दारे रुपये-1,40,000/- एवढी रक्‍कम दिली व त्‍या बाबत विरुध्‍दपक्षा कडून पावती क्रं-135, दि.06.08.2007 प्राप्‍त केली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास भूखंडापोटी पंजाब नॅशनल             बँक, नागपूर शाखेच्‍या दिनांक-18.12.2007 रोजीचे चेकव्‍दारे रुपये-1,00,000/-


 

एवढी रक्‍कम दिली व त्‍या बाबत विरुध्‍दपक्षा कडून पावती क्रं-275, दि.29.12.2007 प्राप्‍त केली. अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने करारातील नमुद भूखंडापोटी विरुध्‍दपक्षास वेळोवेळी एकूण रक्‍कम रुपये-3,40,000/- अदा केली.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, तो दि.22.04.2008 रोजी विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात गेला व पंजाब नॅशनल बँक शाखा लगडगंज नागपूर येथील शाखेचा चेक क्रमांक-270409, दि.22.04.2008 रुपये-4,00,000/- विरुध्‍दपक्षास देण्‍याचा प्रयत्‍न केला व करारनाम्‍या नुसार उर्वरीत रक्‍कम विक्रीपत्राचे वेळी घेऊन भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून देण्‍याची विनंती केली परंतु विरुध्‍दपक्षाने सदर रक्‍कम रुपये-4,00,000/- चा चेक स्विकारला नाही त्‍यावेळी विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात उपस्थित असलेल्‍या भागीदारानीं सांगितले की, नोंदणीकृत भूखंड विक्रीसाठी आवश्‍यक लागणारे नागपूर सुधार प्रन्‍यासचे व नगर रचनारकार विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही. भूखंडास अकृषक परवानगी मिळाली नाही त्‍यामुळे विक्रीपत्र नोंदवून देता येणार नाही. शासनाकडून ले आऊटला आवश्‍यक मंजूरी प्राप्‍त झाल्‍या नंतर आपणास तसे पत्राव्‍दारे कळविण्‍यात येईल व त्‍याच वेळी आपण उर्वरीत रक्‍कम आमच्‍याकडे जमा करावी असे  सांगितले. त्‍यानंतरही तक्रारकर्त्‍याने वेळोवेळी विरुध्‍दपक्षाचे कार्यालयास भेटी देऊन करारा नुसार विक्रीपत्र नोंदवून देण्‍याची विनंती केली मात्र प्रत्‍येक वेळी शासनाकडून ले आऊटला आवश्‍यक मंजूरी प्राप्‍त झालेली नाही असे सांगण्‍यात आले. वस्‍तुतः तक्रारकर्ता आजही करारा प्रमाणे भूखंडाची उर्वरीत रक्‍कम विरुध्‍दपक्षाकडे जमा करुन भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र लावून घेण्‍यास तयार आहे. विरुध्‍दपक्षाने ले-आऊटला शासनाकडून कोणतीही मंजूरी प्राप्‍त झालेली नसताना 15 महिन्‍यात आवश्‍यक ती मंजूरी प्राप्‍त करुन घेऊन भूखंडाची विक्री करुन देण्‍याचे आश्‍वासन आपल्‍या लेखी करारनाम्‍यात देऊन भूखंड विक्रीचे खाली तक्रारकर्त्‍याची फसवणूक केलेली आहे आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब व दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.

     तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास अधिवक्‍ता श्री नौकरकर यांचे मार्फतीने दि.02.05.2012 रोजीची नोटीस पाठवून त्‍याव्‍दारे उर्वरीत रक्‍कम स्विकारुन भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्‍यास विनंती केली. सदर नोटीस विरुध्‍दपक्षास प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्षाने कोणताही प्रतिसाद दिला नाही वा तक्रारकर्त्‍याचे नोटीसला आज पर्यंत कोणते उत्‍तरही दिले नाही. विरुध्‍दपक्षाचे                 कृतीमुळे तक्रारकर्त्‍यास  शारिरीक  व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास भूखंडापोटी अदा केलेली रक्‍कम दुसरीकडे गुंतविली असती तर त्‍यास जवळपास रुपये-1,00,000/- एवढा फायदा झाला


 

असता. म्‍हणून शेवटी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षा विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन खालील मागण्‍या केल्‍यात-

1)   विरुध्‍दपक्षाने, करारा नुसार भूखंडाची उर्वरीत रक्‍कम तक्रारकर्त्‍या कडून स्विकारुन, तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्‍याचे आदेशित व्‍हावे. जर काही कारणास्‍तव करारा नुसार  भूखंडाचे  विक्री पत्र करुन  देणे विरुध्‍दपक्षास अशक्‍य असल्‍यास तक्रारकर्त्‍याने भूखंडापोटी विरुध्‍दपक्षाकडे जमा केलेली रक्‍कम आजचे बाजारभावा नुसार द.सा.द.शे.24% दराने व्‍याजासह परत करण्‍याचे आदेशित व्‍हावे.

2)    तक्रारकर्त्‍याचे झालेल्‍या फसवणुकी बद्दल आणि तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाकडे भूखंडापोटी जमा केलेल्‍या रक्‍कम विरुध्‍दपक्षाने इतर ठिकाणी गुंतवून नफा कमविल्‍या बद्दल रुपये-1,00,000/- विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

3)    तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासा बद्दल रु.-50,000/-

      विरुध्‍दपक्षा कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

4)    प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास

      देण्‍याचे आदेशित व्‍हावे. या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्त्‍याचे बाजूने मिळावी.

 

3.    विरुध्‍दपक्षाने नि.क्रं 11 प्रमाणे प्रतिज्ञालेखावरील उत्‍तर मंचा समक्ष सादर केले. विरुध्‍दपक्षाने त्‍यांचा ले-आऊट पाडून भूखंड विक्रीचा व्‍यवसाय असल्‍याची बाब मान्‍य केली. विरुध्‍दपक्ष ही भागीदारी संस्‍था असून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये अन्‍य भागीदारांना प्रतिपक्ष न केल्‍यामुळे सदरची तक्रार ही मंचा समक्ष चालू शकत नाही, असा वि.प.चा आक्षेप आहे. तक्रारकर्त्‍याने मौजा हुडकेश्‍वर तालुका जिल्‍हा नागपूर,खसरा क्रं 160,             भूखंड क्रं 19, क्षेत्रफळ-2960 चौरसफूट एकूण किंमत रुपये-8,58,400/- मध्‍ये खरेदी करण्‍याचा लेखी करार दि.12.04.2007 रोजी त्‍यांचेशी केला होता व रुपये-1,00,000/- अग्रीम दिले आणि करारनाम्‍या नुसार भूखंड  विक्रीची  मुदत 12.07.2008 पर्यंत असल्‍याची बाब सुध्‍दा मान्‍य केली. तक्रारकर्त्‍याने करारा नुसार भूखंडा पोटी वेळोवेळी एकूण रुपये-3,40,000/- अदा केल्‍याची बाब  मान्‍य केली. त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, तक्रारकर्त्‍याने त्‍याची आर्थिक स्थिती उर्वरीत रक्‍कम देण्‍यास सक्षम नाही  असे  विरुध्‍दपक्षास  कळविले                 होते   आणि  बाकी   राहिलेली   रक्‍कम   करारा  प्रमाणे वेळेत दिली नाही.

 

 

तक्रारकर्ता विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात दि.22.04.2008 रोजी आला आणि भूखंडापोटी चेकव्‍दारे रक्‍कम रुपये-4,00,000/- देण्‍याचा प्रयत्‍न केला असता विरुध्‍दपक्षाने तो स्विकारलेला नाही हा मजकूर खोटा असल्‍याचे नमुद केले.  त्‍यांचे पुढे म्‍हणणे असे आहे की, तक्रारकर्त्‍याने नमुद केलेली दि.02.05.2012 रोजीची नोटीस विरुध्‍दपक्षास मिळालेली नाही त्‍यामुळे उत्‍तर देण्‍याचा प्रश्‍न उदभवत नाही. तक्रारकर्त्‍याची संपूर्ण तक्रार ही चुकीची व असत्‍य असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या संपूर्ण मागण्‍या या अमान्‍य आहेत. आपले लेखी उत्‍तरातील विशेष कथनात विरुध्‍दपक्षाने नमुद केले की, तक्रारकर्त्‍याने करारातील भूखंडापोटी वेळोवेळी त्‍यांना रुपये-3,40,000/- एवढी रक्‍कम अदा केली होती. त्‍यानंतर उर्वरीत रक्‍कम देण्‍याची तक्रारकर्त्‍याची परिस्थिती नसल्‍याने तक्रारकर्त्‍याचा भूखंड दुस-या व्‍यक्‍तीस विकून त्‍यातून  रक्‍कम परत करावी असे सांगितल्‍यामुळे विरुध्‍दपक्षाने सदरचा भूखंड दुस-या व्‍यक्‍तीस विकला आणि तक्रारकर्त्‍याने भूखंडापोटी जमा केलेली रक्‍कम रुपये-3,40,000/- परत नेण्‍यास सांगितले परंतु तक्रारकर्त्‍याने ती  परत नेली नाही. तक्रारकर्त्‍याने सदरची रक्‍कम परत घेतली नाही आणि आता पाच वर्षाचे कालावधी नंतर प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली असल्‍याने ती ग्राहक संरक्षण कायदया नुसार मुदतबाहय असल्‍याने खारीज व्‍हावी अशी विनंती विरुध्‍दपक्षाने केली.

 

4.    तक्रारकर्त्‍याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत नि.क्रं-3 वरील यादी नुसार दस्‍तऐवज दाखल केले, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने भूखंड खरेदी बाबतचा करारनामा,विरुध्‍दपक्षा तर्फे भूखंडाची रक्‍कम मिळाल्‍या बाबतच्‍या पावत्‍यांच्‍या प्रती, विरुध्‍दपक्षास रक्‍कम मिळाल्‍या बाबत नोंदीचा दस्‍तऐवज, दि.22.04.2008 रोजीच्‍या धनादेशाची छायाप्रत,  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास पाठविलेली नोंदणीकृत नोटीस प्रत, पोस्‍टाची पावती अशा दस्‍तऐवजाच्‍या छायाप्रती दाखल केल्‍यात. तक्रारकर्त्‍याने निशाणी क्रं-12 प्रमाणे प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर सादर केले.

 

5.    विरुध्‍दपक्षाने मंचा समक्ष आपले प्रतिज्ञालेखावरील उत्‍तर दाखल केले. अन्‍य दस्‍तऐवज दाखल केले नाहीत.

 

6.   प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री नौकरकर तर विरुध्‍दपक्षा तर्फे वकील श्री इंगोले यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

 

 

7.    तक्रारकर्त्‍याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, विरुध्‍दपक्षाचे प्रतिज्ञालेखावरील उत्‍तर, प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजांचे  काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले असता, न्‍यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहेत-

              मुद्दे                              उत्‍तर

(1)       करारा प्रमाणे वि.प.ने, त.क.ला विहित

              मुदतीत भूखंडाची नोंदणीकृत विक्री करुन

         ताबा न देता वा रक्‍कम परत न करता 

         आपले सेवेत त्रृटी ठेवली आहे काय?.............  होय.

   (2)   काय आदेश?.............................................  अंतिम आदेशा नुसार

 

::कारण मिमांसा::

मु्द्दा क्रं 1 बाबत-

8.    तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षा विरुध्‍दची प्रस्‍तुत तक्रार (यातील विरुध्‍दपक्ष म्‍हणजे-साईधाम बिल्‍डर्स आणि डेव्‍हलपर्स  तर्फे- भागीदार            श्री सतिश रजनीकांत ईटकेलवार असे समजण्‍यात यावे ) प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली आहे. विरुध्‍दपक्षाने आपले स्‍वाक्षरीने प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर मंचा समक्ष सादर केले. सदर लेखी उत्‍तरामध्‍ये विरुध्‍दपक्ष श्री सतिश रजनिकांत ईटकेलवार हे साईधाम बिल्‍डर्स आणि डेव्‍हलपर्स नागपूर या भागीदारी संस्‍थेचे भागीदार असून ते सदर भागीदारी फर्मचे माध्‍यमातून शेतीचे ले-आऊट पाडून निवासी भूखंड विक्रीचा व्‍यवसाय करीत असल्‍याची बाब मान्‍य केली आहे.

 

9.   विरुध्‍दपक्षाने मौजा हुडकेश्‍वर तालुका नागपूर ग्रामीण जिल्‍हा नागपूर येथील पटवारी हलका नं. 37, खसरा क्रं-160 मध्‍ये ले आऊट                       पाडून भूखंड  विक्रीची  योजना  सुरु केली. सदर ले आऊटमधील भूखंड क्रं-19 क्षेत्रफळ- 2960 चौरसफूट, प्रतीचौरसफूट दर रुपये-290/- प्रमाणे एकूण किंमत रुपये-8,58,400/- मध्‍ये तक्रारकर्त्‍यास विक्री करण्‍याचा करारनामा दि.12.04.2007 रोजी केला असल्‍याची बाब विरुध्‍दपक्षाने मान्‍य केली. प्रकरणातील दाखल करारनाम्‍या वरुन सुध्‍दा ही बाब सिध्‍द होते.  

 

 

 

10.      तक्रारकर्त्‍याने आपले म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ भूखंड करारा नुसार वेळोवळी विरुध्‍दपक्षास मौजा हुडकेश्‍वर बुर्जूग, पटवारी हलका क्रं 37, खसरा क्रं 160 मधील भूखंड क्रं 19 पोटी  दिलेल्‍या रकमां संबधाने विरुध्‍दपक्षाने निर्गमित केलेल्‍या पावत्‍यांच्‍या प्रती दाखल केल्‍यात, त्‍याचे परिशिष्‍ट-अ प्रमाणे विवरण खालील प्रमाणे-

                            परिशिष्‍ट-अ

 अक्रं

पावती क्रमांक

पावती दिनांक

अदा केलेली रक्‍कम

शेरा

1

2

3

4

5

1

117

.......

1,00,000/-

पंजाब नॅशनल बँक, शाखा लकडगंज नागपूर येथील चेक क्रमांक-452507 अन्‍वये रक्‍कम मिळाल्‍याची बाब विरुध्‍दपक्षाने दि.12.04.2007 रोजीचे करारनाम्‍या मध्‍ये सुध्‍दा मान्‍य केलेली आहे.

2

135

06.08.2007

1,40,000/-

पंजाब नॅशनल बँक, शाखा लकडगंज नागपूर येथील चेक क्रमांक-270403 दि.20.07.2007 अन्‍वये रक्‍कम मिळाल्‍याची बाब विरुध्‍दपक्षाने सदर पावती मध्‍ये नमुद केलेली आहे.

3

275

29.12.2007

1,00,000/-

पंजाब नॅशनल बँक, शाखा लकडगंज नागपूर येथील चेक क्रमांक-..............दि.18.12.2007 अन्‍वये रक्‍कम मिळाल्‍याची बाब विरुध्‍दपक्षाने सदर पावती मध्‍ये नमुद केलेली आहे.

 

 

एकूण

3,40,000/-

 

 

उपरोक्‍त नमुद पावत्‍यांच्‍या प्रती वरुन तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास करारातील भूखंडापोटी वेळोवेळी एकूण रुपये-3,40,000/- अदा केल्‍याची बाब सिध्‍द होते. तसेच तक्रारकर्त्‍या कडून भूखंडा पोटी रक्‍कम मिळाल्‍याबाबत विरुध्‍दपक्षाचे नोंदीचे दस्‍तऐवजा मधील नोंदी वरुन सुध्‍दा ही बाब पूर्णतः सिध्‍द होते. विरुध्‍दपक्षाने सुध्‍दा त्‍यास करारातील भूखंडापोटी तक्रारकर्त्‍या कडून वेळोवेळी एकूण रुपये-3,40,000/-  मिळाल्‍याची  बाब   मान्‍य  केली आहे तसेच करारा नुसार भूखंड विक्रीची मुदत दि.12.07.2008 पर्यंत ठरली होती ही बाब करारनाम्‍या वरुन सिध्‍द होते.

 

11.   तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, करारा नुसार भूखंडाची उर्वरीत रक्‍कम स्विकारुन भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन मिळण्‍यासाठी              त्‍याने दि.22.04.2008 रोजी विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात भेट दिली व

पंजाब नॅशनल बँक शाखा लगडगंज नागपूर येथील शाखेचा चेक                क्रमांक-270409, दि.22.04.2008 रक्‍कम रुपये-4,00,000/- विरुध्‍दपक्षास देण्‍याचा प्रयत्‍न केला व करारनाम्‍या नुसार उर्वरीत रक्‍कम विक्रीपत्राचे वेळी घेऊन भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून देण्‍याची विनंती केली परंतु विरुध्‍दपक्षाने सदर रक्‍कम रुपये-4,00,000/- चा चेक स्विकारला नाही त्‍यावेळी विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात उपस्थित असलेल्‍या भागीदारानीं सांगितले की, नोंदणीकृत भूखंड विक्रीसाठी आवश्‍यक लागणारी मंजूरी शासना कडून मिळाली नाही त्‍यामुळे विक्रीपत्र नोंदवून देता येणार नाही. शासनाकडून ले आऊटला आवश्‍यक मंजूरी प्राप्‍त झाल्‍या नंतर आपणास तसे पत्राव्‍दारे कळविण्‍यात येईल व त्‍याच वेळी आपण उर्वरीत रक्‍कम आमच्‍याकडे जमा करावी असे  सांगितले. त्‍यानंतरही तक्रारकर्त्‍याने वेळोवेळी विरुध्‍दपक्षाचे कार्यालयास भेटी देऊन करारा नुसार विक्रीपत्र नोंदवून देण्‍याची विनंती केली मात्र प्रत्‍येक वेळी शासनाकडून ले आऊटला आवश्‍यक मंजूरी प्राप्‍त झालेली नाही असे सांगण्‍यात आले. वस्‍तुतः तक्रारकर्ता आजही करारा प्रमाणे भूखंडाची उर्वरीत रक्‍कम विरुध्‍दपक्षाकडे जमा करुन भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र लावून घेण्‍यास तयार आहे.

      या उलट विरुध्‍दपक्षाचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्त्‍याने करारा नुसार भूखंडा पोटी वेळोवेळी एकूण रुपये-3,40,000/- अदा केल्‍याची बाब मान्‍य आहे मात्र तक्रारकर्त्‍याने भूखंडापोटी उर्वरीत रक्‍कम विहित मुदतीत दिली नाही व त्‍याची आर्थिक स्थिती उर्वरीत रक्‍कम देण्‍यास सक्षम नाही असे विरुध्‍दपक्षास कळविले. तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात दि.22.04.2008 रोजी आला आणि भूखंडापोटी रक्‍कम रुपये-4,00,000/- देण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु विरुध्‍दपक्षाने तो स्विकारलेला नाही हा मजकूर खोटा असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याची  दि.02.05.2012 रोजीची नोटीस विरुध्‍दपक्षास मिळालेला नाही त्‍यामुळे उत्‍तर देण्‍याचा प्रश्‍न उदभवत नाही. तक्रारकर्त्‍याने भूखंडाची उर्वरीत रक्‍कम देण्‍यास असमर्थता दर्शविल्‍यामुळे विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचा भूखंड दुस-या व्‍यक्‍तीस विकून तक्रारकर्त्‍यास त्‍याने भूखंडापोटी जमा केलेली रक्‍कम रुपये-3,40,000/- परत नेण्‍यास सांगूनही तक्रारकर्त्‍याने ती रक्‍कम आज पर्यंत परत नेली नाही व मंचात प्रस्‍तुत तक्रार दाखल केली.  

 

12.   या संदर्भात मंचाव्‍दारे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात दि.22.04.2008 रोजी भूखंडापोटी रक्‍कम                रुपये-4,00,000/- देण्‍याचा विरुध्‍दपक्षास  प्रयत्‍न केला परंतु विरुध्‍दपक्षाने तो स्विकारलेला नाही या बद्दल पुराव्‍या दाखल पंजाब नॅशनल बँक                   शाखा  लकडगंज,  नागपूर  येथील चेक क्रं 270409, दि.22.04.2008 ची प्रत

अभिलेखावर दाखल केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने आपले प्रतीउत्‍तरामध्‍ये सुध्‍दा विरुध्‍दपक्षाने सदरचा चेक रुपये-4,00,000/- अस्विकार केल्‍याची बाब नमुद केली.विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचा करार रद्द केल्‍या बाबत तक्रारकर्त्‍यास काहीही कळविलेले नाही व तसा पत्रव्‍यवहार केला नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने भूखंडापोटीची उर्वरीत रक्‍कम आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्‍याने असमर्थता दर्शवून जमा केली नाही व  तक्रारकर्त्‍याचा भूखंड अन्‍य व्‍यक्‍तीस विक्री करण्‍यास सांगितल्‍यामुळे विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचा भूखंड  दुस-या व्‍यक्‍तीस विकला हे विरुध्‍दपक्षाचे म्‍हणणे  खोटे ठरते. तक्रारकर्त्‍याने भूखंडाचे पूर्ण किंमती पोटी जवळपास रुपये-3,40,000/- एवढी रक्‍कम वेळोवेळी विरुध्‍दपक्षाकडे विहित मुदतीत जमा केलेली असताना तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास उर्वरीत रक्‍कम जमा करण्‍यास तो असमर्थ असल्‍याची बाब सांगणे हे विरुध्‍दपक्षाचे कथन सर्वसामान्‍य व्‍यवहारात न पटण्‍या सारखे आहे.

 

13.     मंचाचे मते ले आऊटला शासनाकडून कोणतीही मंजूरी प्राप्‍त झालेली नसताना विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याशी भूखंड विक्रीचा करारनामा केला आणि भूखंडापोटी रकमा वेळोवेळी स्विकारल्‍या आणि ज्‍यावेळी भूखंडाचे दर वाढले त्‍यावेळी चढत्‍या वाढीव दराने तक्रारकर्त्‍याने नोंदणी केलेला भूखंड दुस-या व्‍यक्‍तीस विकला व तशी लेखी कबुली आपले जबाबामध्‍ये मंचा समक्ष विरुध्‍दपक्षाने दिलेली आहे. अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याची विरुध्‍दपक्षाने फसवणूक करुन दोषपूर्ण सेवा आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याची बाब सिध्‍द होते. तक्रारकर्ता सन-2007 पासून भूखंड विक्रीचे स्‍वप्‍न पाहत आहे. तक्रारकर्त्‍याने भूखंडापोटी विरुध्‍दपक्षाकडे जमा केलेली रक्‍कम दुसरीकडे गुंतवली असती तर तक्रारकर्त्‍यास निश्‍चीतच त्‍यावर व्‍याज मिळून फायदा झाला असता हे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे योग्‍य आहे. तसेच विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍या कडून भूखंडापोटीची रक्‍कम स्विकारुन तिचा विनीयोग आपले व्‍यवसायात करुन नफा कमाविला हे  तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे अगदी योग्‍य आहे आणि त्‍यामुळे तक्रारकर्ता भूखंडापोटी अदा केलेली संपूर्ण रक्‍कम व्‍याजासह विरुध्‍दपक्षा कडून मिळण्‍यास पात्र आहे. विरुध्‍दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासा बद्दल व तक्रारखर्चा बद्दल विरुध्‍दपक्षा कडून रक्‍कम मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत आहे.

14.   विरुध्‍दपक्षाने आपले लेखी उत्‍तरात आणखी असेही आक्षेप घेतले आहे की, साईधाम बिल्‍डर्स आणि डेव्‍हलपर्स, हुडकेश्‍वर मेन रोड, नागपूर ग्रामीण ही एक भूखंड विक्रीचा व्‍यवसाय करणारी भागीदारी फर्म असून तक्रारकर्त्‍याने सदर भागीदारी फर्मच्‍या अन्‍य भागीदारानां प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये प्रतिपक्ष केलेले नाही

 

म्‍हणून तक्रार खारीज व्‍हावी तसेच भूखंड विक्री बाबतचा करारनामा हा दि.12.04.2007 रोजीचा आहे आणि प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दि.14.02.2013 रोजी जवळपास पाच वर्षाने दाखल झालेली असल्‍याने ग्राहक संरक्षण कायदयान्‍वये ती मुदतबाहय असल्‍यामुळे खारीज होण्‍यास पात्र आहे.

     या संदर्भात मंचाव्‍दारे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याने दि.12.04.2007 रोजीचा भूखंड विक्रीचा करार हा साईधाम बिल्‍डर्स आणि डेव्‍हलपर्स तर्फे पार्टनर श्री सतिश रजनिकांत ईटकेलवार यांचेशी केलेला आहे. सदरच्‍या व्‍यवहारात श्री सतिश ईटकेलवार हेच पार्टनरशिप फर्मचे               प्रतिनिधीत्‍व करीत असल्‍याने फर्मच्‍या इतर भागीदारानां प्रस्‍तुत प्रकरणात प्रतिपक्ष केले नाही म्‍हणून कोणतहीही कायदेशीर बाधा येत नाही. तसेच जो पर्यंत विरुध्‍दपक्ष करारा नुसार भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याचे नावे करुन देत नाही तो पर्यंत अशा तक्रारीचे कारण हे सदोदीत घडत असल्‍याने (Cause of Action is Continuing) तक्रार मुदतीत आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. म्‍हणून मुद्दा क्रं 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

मुद्दा क्रं 2 बाबत-

15.    उपरोक्‍त नमुद परिस्थितीत, विरुध्‍दपक्षाने भूखंडाची उर्वरीत‍ रक्‍कम (भूखंडाची एकूण किंमत रुपये-8,58,400/- (वजा) भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्‍कम-3,40,000/-) रुपये-5,18,400/- तक्रारकर्त्‍या कडून स्विकारुन, तक्रारकर्त्‍याचे नावे भूखंडाचे नोंदणीकृत खरेदीखत करारा प्रमाणे नोंदवून द्दावे. नोंदणीचा खर्च करारा नुसार तक्रारकर्त्‍याने करावा. करारा नुसार भूखंडाची खरेदी करुन देणे विरुध्‍दपक्षास शक्‍य नसल्‍यास तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍दपक्षाकडे, बयानापत्रा नुसार वेळोवळी मौजा हुडकेश्‍वर बुर्जूग,पटवारी हलका क्रं 37, खसरा क्रं 160 मधील भूखंड क्रं 19 पोटी  दिलेल्‍या रकमां संबधाने परिशिष्‍ट- अनुसार जमा केलेली रक्‍कम रुपये-3,40,000/- भूखंडापोटी शेवटची मासिक किस्‍त स्विकारल्‍याचा  दिनांक-18.12.2007 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्षाने परत करावी. तसेच तक्रारकर्त्‍यास  झालेल्‍या  शारिरीक  मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- व तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/- विरुध्‍दपक्षाकडून मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे, असे न्‍यायमंचाचे  मत आहे.

16.   वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                     ::आदेश::

 

         तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्षा विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर

        करण्‍यात येते.

 

 

1)      विरुध्‍दपक्ष यांना निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी भूखंडाचे खरेदी

        बाबत बयानापत्रा नुसार मौजा हुडकेश्‍वर बुर्जूग,पटवारी हलका क्रं 37,

        खसरा क्रं 160 मधील भूखंड क्रं 19 चे नोंदणीकृत विक्रीपत्र

        तक्रारकर्त्‍या कडून उर्वरीत रक्‍कम रुपये-5,18,400/- (अक्षरी रुपये-

        पाच लक्ष अठरा हजार चारशे फक्‍त ) स्विकारुन तक्रारकर्त्‍याचे नावे

        नोंदवून द्दावे. नोंदणीचा खर्च करारा नुसार तक्रारकर्त्‍याने करावा.

        अथवा काही कारणास्‍तव तक्रारकर्त्‍याचे नावे भूखंडाचे  नोंदणीकृत

        विक्रीखत नोंदविणे विरुध्‍दपक्षास शक्‍य नसल्‍यास, तक्रारकर्त्‍याने,

        वि.प.कडे भूखंडा पोटी परिशिष्‍ट-अ प्रमाणे जमा केलेली एकूण रक्‍कम

        रुपये-3,40,000/-(अक्षरी रु. तीन लक्ष चाळीस हजार फक्‍त)

        भूखंडापोटी शेवटची मासिक किस्‍त स्विकारल्‍याचा दि.- 18.12.2007

        पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने

        व्‍याजासह विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास परत करावी.

2)      विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल

        रु.-15,000/-(अक्षरी रु. पंधरा हजार फक्‍त) आणि तक्रारखर्च म्‍हणून

        रु.-5000/-(अक्षरी रु. पाच हजार फक्‍त) द्दावेत.

3)      सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्षाने सदर निकालपत्राची प्रत प्राप्‍त

        झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत करावे..

4)      निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

        देण्‍यात यावी.

              

 

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.