अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नागपूर ग्राहक तक्रार क्रमांक :-13/8 दाखल दिनांक : 05/01/2013 निकाल पारीत दिनांक : 11/10/2013 तक्रारकर्ता : विश्वनाथ डोनू देशमूख, वय-42 वर्ष, धंदा-मजूरी, राहणार- पोस्ट-मांढळ, तहसिल कुही, जिल्हा नागपूर ::विरुध्द:: विरुध्दपक्ष : सहाय्यक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरक कंपनी मर्या., कुही, उपविभाग कुही, तहसिल कुही, जिल्हा नागपूर ***** गणपूर्ती :– 1) श्री सी.के.धीरन - मा.अध्यक्ष 2) श्री नितीन माणिकराव घरडे - मा.सदस्य. ***** त.क.तर्फे –वकील श्री दिलीप एस.बनसोड वि.प. तर्फे –वकील श्री पी.बी.लिखीते ::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री नितीन माणिकराव घरडे , मा.सदस्य ) (पारीत दिनांक – 11 ऑक्टोंबर, 2013 ) 1. तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्षा कडून त्यास प्राप्त झालेले विज देयक चुकीचे असल्याचे घोषीत करावे व इतर अनुषंगीक मागण्यांसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे-
तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी कडून घरगुती वापरा करीता विद्युत कनेक्शन घेतले असून त्याचा ग्राहक क्रं-415090232059 असा आहे. तक्रारकर्ता हा मोलमजूरी करुन आपल्या कुटूंबियांचे पालनपोषण करतो. तक्रारकर्त्याचा विज वापर हा अल्प प्रमाणात असून तो नियमित विज देयकांचा भरणा करतो. अशी स्थिती असताना अचानक तक्रारकर्त्यास माहे मार्च-2012 चे दि.10.02.2012 ते दि.10.03.2012 या कालावधीचे एकूण विज वापर 674 युनिटचे रुपये-5345/- रकमेचे देयक देण्यात आले. वस्तुतः तक्रारकर्त्याकडील विजेचा वापर हा मर्यादित स्वरुपाचा असून त्याचेकडे दोन ईलेक्ट्रिक बल्ब शिवाय अन्य कोणतीही विजेची उपकरणे नाहीत. सदर बिल प्राप्त झाल्या नंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे कुही कार्यालयात संपर्क साधला असता, वि.प.चे कर्मचारी श्री येळणे यांनी तक्रारकर्त्याचे घरी भेट देऊन मीटरची पाहणी केली व मीटरचे चालू वाचन 3148 असल्याचे विज देयकावर लिहून दिले. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, परंतु त्यानंतरही चुक दुरुस्त न करता, तक्रारकर्त्यास माहे एप्रिल, 2012 चे दि.10.03.2012 ते दि.08.04.2012 या कालावधीचे मागील वाचन 5157 युनिटस आणि चालू वाचन 3148 युनिटस दर्शवून एकूण विज वापर-160 युनिटचे थकबाकीसह रुपये-6220/- रकमेचे देयक देण्यात आले. तक्रारकर्त्याने सदरचे बिला बाबत तक्रार विरुध्दपक्षाचे कार्यालयात केली असता फक्त चालू बिला पोटी रुपये-771/- भरावेत व उर्वरीत रकमेचे बिला बाबतची चुक दुरुस्त केली जाईल असे सांगण्यात आले त्यावरुन, तक्रारकर्त्याने रुपये-771/- चा भरणा केला. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्यानंतरही विरुध्दपक्षाने चुक दुरुस्त न करता माहे जून-2012 चे देयक, ज्यामध्ये मागील वाचन 5157 युनिटस आणि चालू वाचन 3148 युनिटस दर्शवून 160 युनिट विज वापराचे रुपये-6260/-चे बिल पाठविले. तसेच माहे ऑगस्ट-2012 चे देयक ज्यामध्ये मागील वाचन 5157 युनिटस आणि चालू वाचन-3152 युनिटस दर्शवून 160 युनिटचे रुपये-8000/- चे देयक पाठविले. (सदर रुपये-8000/- चे देयक हे माहे ऑगस्ट-2012 चे नसून ते माहे जुलै-2012 चे रेकॉर्डवरुन दिसून येते)
त्याच बरोबर माहे ऑक्टोंबर-2012 चे देयक, ज्यामध्ये मागील वाचन- 5157 युनिटस आणि चालू वाचन-3338 युनिटस दर्शवून 160 युनिटचे रुपये-10,010/- चे देयक पाठविले. (सदर देयक रुपये-10020/- चे असून ते माहे ऑक्टोंबर-2012 ऐवजी सप्टेंबर-2012 चे रेकॉर्डवरुन दिसून येते.) तक्रारकर्त्याने असेही नमुद केले की, विरुध्दपक्षाचे कार्यालयीन कर्मचारी श्री येरणे यांनी स्वतः तक्रारकर्त्याचे घरी भेट देऊन मीटरची पाहणी केली असताना व माहे मार्च-2012 चे देयकावर चालू वाचन 5157 युनिट ऐवजी 3148 एवढे वाचन लिहून दिलेले असतानाही विरुध्दपक्षाने पुढील विज देयकांमध्ये कोणतीही सुधारणा न करता चुकीचे वाचनाची देयके तक्रारकर्त्यास दिलीत. तक्रारकर्त्याने या बाबत विरुध्दपक्षाचे कार्यालयात वेळोवेळी भेटी देऊन या बद्दल कल्पना देऊनही विरुध्दपक्षाने त्याकडे दुर्लक्ष्य केले. विरुध्दपक्षाने दि.08.10.2012 रोजी विद्युत कायदा-2003 चे कलम-56 नुसार तक्रारकर्त्यास नोटीस दिली, तक्रारकर्त्याने नोटीस मिळाल्या नंतर विरुध्दपक्षाचे कार्यालयात भेट दिली असता, रक्कम न भरल्यास कार्यवाही करण्याची धमकी दिली. म्हणून तक्रारकर्त्याने वकील श्री नाकाडे यांचे मार्फतीने विरुध्दपक्षास दि.05.11.2012 रोजी नोटीस पाठविली परंतु सदर नोटीसला कोणतेही उत्तर न देता, उलटपक्षी, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्या कडील विज पुरवठा दि.21.12.2012 रोजी खंडीत केला, परिणामी तक्रारकर्त्यास अंधारात दिवस काढावे लागत आहेत. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत प्रतिज्ञालेखावरील तक्रार, विरुध्दपक्षा विरुध्द, मंचा समक्ष दाखल करुन त्याद्वारे तक्रारकर्त्यास पाठविलेली विजेची देयके ही चुकीची व बेकायदेशीर असल्याचे घोषीत करण्यात यावे. तक्रारकर्त्या कडील खंडीत विज पुरवठा पूर्ववत सुरु करण्याचे आदेशित व्हावे. तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी नुकसानी भरपाई म्हणून रुपये-25,000/- विरुध्दपक्षा कडून मिळावे इत्यादी स्वरुपाच्या मागण्या केल्यात. 3. प्रस्तुत तक्रार प्रकरणात विरुध्दपक्षाने उपस्थित होऊन मंचा समक्ष आपले प्रतिज्ञालेखावरील उत्तर पान क्रं-38 ते 42 वर सादर केले. विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तरात तक्रारकर्त्यास घरगुती वापरा करीता विद्युत कनेक्शन दिले असून त्याचा ग्राहक क्रमांक- 415090232059 असल्याचे मान्य केले. परंतु तक्रारकर्त्याने आपले तक्रारीत त्यास माहे मार्च-2012 चे 674 युनिटचे रुपये-5345/- चे देयक चुकीचे दिल्या बद्दल जे नमुद केले, ते नामंजूर असल्याचे नमुद केले. तक्रारकर्ता मोलमजूरी करतो व त्याचेकडे केवळ 02 ईलेक्ट्रिक बल्ब एवढीच मर्यादित विज वापराची उपकरणे
असल्याची बाब सुध्दा नाकबुल केली. विरुध्दपक्षाचे कर्मचारी श्री येळणे यांनी तक्रारकर्त्याचे घरी भेट देऊन एप्रिल-2012 मध्ये पाठविलेल्या विज देयकाचे वाचन हे 3148 असल्या बाबत सदर बिलावर लिहून दिल्याची बाब नाकबुल केली. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे त्यानंतरही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास माहे एप्रिल-2012 चे देयक हे एकूण विज वापर 160 युनिट दर्शवून रुपये-622/- चे चुकीचे देयक पाठविले हे म्हणणे नाकबुल केले (वस्तुतः सदर माहे एप्रिल-2012 चे देयक हे रुपये-6220/- एवढया रकमेचे रेकॉर्डवरुन दिसून येते, त्याऐवजी विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तरात रुपये-622/- असा चुकीचा उल्लेख केल्याचे दिसून येते) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास चालू बिला पोटी केवळ रुपये-771/- भरण्यास सांगितल्याची बाब नाकबुल केली. तक्रारकर्त्याचे म्हणण्या नुसार त्यास माहे जून-2012, ऑगस्ट-2012 व ऑक्टोंबर-2012 चे देयक चुकीचे दिल्या बद्दलची बाब सुध्दा नाकबुल केली. आपले विशेष कथनात विरुध्दपक्षाने नमुद केले की, तक्रारकर्त्याने माहे एप्रिल मध्ये विद्युत मीटर सोबत छेडछाड केली व युनिट 3148 करुन ठेवले त्यामुळे चालू वाचन 5157 युनिटस आल्यावर परत वाचन मागे जात नाही याची तक्रारकर्त्यास जाणीव नसल्याने तक्रारकर्त्याने मीटर सोबत छेडछाड केली. सदर बाब विरुध्दपक्षाचे लक्षात आल्या नंतर त्यांनी तक्रारकर्त्यास बोलावून बिल न भरल्यास कडक कार्यवाही करण्याचे सुचित केले परंतु तरीही तक्रारकर्त्याने बिल भरले नाही व वकील श्री नाकाडे यांचे मार्फतीने खोटी नोटीस विरुध्दपक्षास पाठविली व मीटरमध्ये छेडछाड केल्याने फौजदारी कार्यवाही टाळण्याचे दृष्टीने प्रस्तुत खोटी तक्रार न्यायमंचा समक्ष दाखल केली. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही, त्यांनी तक्रारकर्त्यास मीटर वाचना प्रमाणे दिलेली बिले योग्य आहेत व सदर बिले भरणे तक्रारकर्त्यावर बंधनकारक आहे. तक्रारकर्त्याचा मीटर बाबत वाद असल्यास सदर मीटर पुर्ननिरिक्षणास पाठविता आले असते. त्यांनी तक्रारकर्त्यास बिल माफी देण्याचा कोणताही प्रश्न उदभवत नाही. विरुध्दपक्षाचे कर्मचारी श्री येळणे यांनी चुकीचे वाचन दुरुस्त करुन दिले नाही व तसा त्यांना अधिकारही नाही. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी व चुकीची असल्याने ती खर्चासह खारीज व्हावी, अशी विनंती विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे करण्यात आली.
4. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत पान क्रं 9 वरील यादी नुसार दस्तऐवज दाखल केले, ज्यामध्ये त्यास विरुध्दपक्षा कडून सन-2011 ते 2012 या कालावधीच्या विज देयकांच्या प्रती, तक्रारकर्त्यास बिल भरण्या बाबत विरुध्दपक्षाने दिलेली 15 दिवसांची सुचना, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास पाठविलेली नोटीस अशा दस्तऐवजांच्या प्रती दाखल केल्यात. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. 5. विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तर दाखल केले तसेच तक्रारकर्त्याचा विज वापराचा माहे जानेवारी-2012 ते नोव्हेंबर-2012 या कालावधीचा विज वापराचा गोषवारा पान क्रं 36 ते 37 वर दाखल केला. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. 6. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. 7. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, विरुध्दपक्ष यांचे प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तर आणि प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज व उभय पक्षांचा मौखीक युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे नोंदविलेले आहेत. मुद्दा उत्तर
(1) तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षाने दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?................................... होय. (2) काय आदेश? ………………………………….... अंतीम आदेशा प्रमाणे :: कारण मीमांसा :: मुद्दा क्रं-1 व 2 8. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, विरुध्दपक्षाचे (“विरुध्दपक्ष” म्हणजे सहाय्यक अभियंता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित, कुही, उपविभाग कुही, तालुका कुही, जिल्हा नागपूर) प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तर आणि उपलब्ध दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन मंचा तर्फे करण्यात आले. 9. तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार ही त्यास माहे मार्च-2012 चे देयक, देयक कालावधी-10.02.2012 ते 10.03.2012 असून त्यामध्ये मागील वाचन-4483 युनिट आणि चालू वाचन-5157 युनिट दर्शवून एकूण विज वापर-674 युनिट दर्शवून रुपये-5345/-चे देयका संबधीची आणि त्यापुढील कालावधीची म्हणजे दि. 10.03.2012 ते दि.08.11.212 या कालावधी पर्यंतचे देयका संबधीची आहे. दि.10.03.2012 ते दि.08.11.2012 या कालावधीत तक्रारकर्त्यास प्राप्त झालेल्या देयकां वरुन तयार केलेले विवरण खालील प्रमाणे आहे- देयकाचा कालावधी | मागील वाचन | चालू वाचन | एकूण विज वापर | 10.03.2012 ते 08.04.2012 | 5157 युनिट | 3148 युनिट | 160 युनिट | 08.04.2012ते 08.05.2012 | 5157 युनिट | 3148 युनिट | 160 युनिट | 08.06.2012 ते 08.07.2012 | 5157 युनिट | 3152 युनिट | 160 युनिट | 08.08.2012 ते 08.09.2012 | 5157 युनिट | 3338 युनिट | 160 युनिट | 08.09.2012 ते 08.10.2012 | 5157 युनिट | 3421 युनिट | 160 युनिट | 08.10.2012 ते 08.11.2012 | 5157 युनिट | 3421 युनिट | 160 युनिट |
10. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्यास माहे मार्च-2012 चे देयक चुकीचे युनिट दर्शवून अवाजवी रकमेचे देण्यात आले आणि त्यानंतरही विरुध्दपक्षाकडे तक्रारी केल्या नंतरही त्यास पुढील कालावधीची चुकीचे युनिटची देयके देण्यात आलीत.
11. तक्रारकर्त्याचे या म्हणण्यात मंचास सकृतदर्शनी तथ्य वाटते कारण तक्रारकर्त्यास प्राप्त देयकां वरुन तयार केलेल्या विवरणपत्रातील नोंदी वरुन लक्षात येईल की, सर्वसाधारण व्यवहारामध्ये मागील वाचना पेक्षा कधीही चालू वाचन हे जास्त युनिटचे येते आणि चालू वाचनातून, मागील वाचनाची वजावट करुन, उर्वरीत फरकाचे युनिटचे देयक संबधित विज ग्राहकास देण्यात येते. परंतु आमचे समोरील प्रकरणात मात्र यापेक्षा उलट स्थिती आहे, सदरचे विवरणपत्रात देयका वरुन मागील वाचन हे जास्त युनिटचे दर्शवून चालू वाचन हे कमी युनिट दर्शविले आहे आणि चालू वाचनाचे आकडे बदलविल्या नंतर सुध्दा विरुध्दपक्षाने एकसारख्या युनिटचे म्हणजे एकूण विज वापर 160 युनिट दर्शवून प्रत्येक देयक दिलेले आहे. 12. तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, त्यास माहे मार्च-2012 चे चुकीचे आणि अवाजवी रकमेचे देयक देण्यात आल्यामुळे त्याने वारंवार विरुध्दपक्षाचे कुही कार्यालयात संपर्क साधला असता, विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे कर्मचारी श्री येळणे यांनी तक्रारकर्त्याचे घरी भेट देऊन मीटरची पाहणी केली व माहे मार्च-2012 चे देयकावर 3148 रिडींग आहे असे लिहून दिले. विरुध्दपक्षाने ही बाब स्पष्टपणे नाकबुल केली असून, त्यांनी आपले लेखी उत्तरामध्ये श्री येळणे यांना तसा अधिकार नसल्याचेही नमुद केले. परंतु विरुध्दपक्षाने त्यांचे या म्हणण्याचे पुराव्या दाखल संबधित कर्मचारी श्री येळणे यांचा प्रतिज्ञालेख प्रस्तुत प्रकरणात दाखल केला नाही. 13. विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तराचे विशेष कथनात असेही नमुद केले की, तक्रारकर्त्याने माहे एप्रिल मध्ये विद्युत मीटर सोबत छेडछाड केली व युनिट 3148 करुन ठेवले त्यामुळे चालू वाचन 5157 युनिटस आल्यावर परत वाचन मागे जात नाही याची तक्रारकर्त्यास जाणीव नसल्याने तक्रारकर्त्याने मीटर सोबत छेडछाड केली. सदर बाब विरुध्दपक्षाचे लक्षात आल्या नंतर त्यांनी तक्रारकर्त्यास बोलावून बिल न भरल्यास कडक कार्यवाही करण्याचे सुचित केले. परंतु विरुध्दपक्षाचे या म्हणण्यात मंचास काहीही तथ्य दिसून येत नाही. कारण तक्रारकर्त्याने मीटरमध्ये छेडछाड केली असे जर विरुध्दपक्षाचे कथन आहे, तर त्यांनी त्यासंबधीचा घटनास्थळ पंचनामा का तयार केला नाही? व तो अभिलेखावर का दाखल केला नाही? व असा पंचनामा तयार केल्याचे विरुध्दपक्षाचे म्हणणे सुध्दा या प्रकरणात नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने मीटरमध्ये छेडछाड केल्याचे विरुध्दपक्षाचे कथनात मंचास विश्वसनियता दिसून येत नाही. 14. तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, त्याचेकडे घरगुती वापरासाठी केवळ 02 बल्ब एवढीच मर्यादित विज उपकरणे आहेत आणि त्यास अतिशय कमी युनिटची बिले पूर्वी प्राप्त होत होती, या म्हणण्याचे पुष्ठर्थ्य तक्रारकर्त्याने त्यास सन-2011 मध्ये विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी कडून प्राप्त झालेल्या देयकांच्या प्रती अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत, सदर देयकांच्या प्रतीं वरुन सुध्दा तक्रारकर्त्याचा विज वापर हा किमान 15 युनिट आणि जास्तीत जास्त 142 युनिट एवढा झाल्याचे दिसून येते. मात्र तक्रारकर्त्यास एकदम एकाकी माहे मार्च-2012 चे देयक, कालावधी-10.02.2012 ते 10.03.2012 , मागील वाचन-4483 युनिट आणि चालू वाचन-5157 युनिट दर्शवून एकूण विज वापर-674 युनिट रक्कम रुपये-5345/-चे देयक देण्यात आले आणि त्यापुढील कालावधी करीता सुध्दा थकबाकी दर्शवून जास्त रकमेची बिले देण्यात आल्याचे दिसून येते. 15. विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने पान क्रं 36 ते 37 वर तक्रारकर्त्याचा विज वापराचा गोषवारा माहे जानेवारी-2012 ते नोव्हेंबर-2012 या कालावधीचा दाखल केला. या संपूर्ण कालावधीत तक्रारकर्त्या कडील विद्युत मीटरची स्थिती ही “Normal” सामान्य दर्शविलेली आहे. सदर विज वापराचे गोषवा-यामध्ये खालील प्रमाणे तक्रारकर्त्याचा विज वापर दर्शविलेला आहे. देयकाचा महिना | मागील वाचन | चालू वाचन | एकूण विज वापर | मीटर स्थिती | जानेवारी-12 | 4370 | 4431 | 61 | Normal | फेब्रुवारी-12 | 4431 | 4483 | 52 | Normal | मार्च-12 | 4483 | 5157 | 674 | Normal | एप्रिल-12 | 5157 | 5157 | 160 | Normal | मे-12 | 5157 | 5157 | 160 | Normal | जून-12 | 5157 | 5157 | 160 | Normal | जुलै-12 | 5157 | 5157 | 160 | Normal | ऑगस्ट-12 | 5157 | 5157 | 160 | Normal | सप्टेंबर-12 | 5157 | 5157 | 160 | Normal | ऑक्टोंबर-12 | 5157 | 5157 | 160 | Normal | नोव्हेंबर-12 | 5157 | 5157 | 160 | Normal |
16. तक्रारकर्त्याचे विज वापराचे उपरोक्त गोषवा-यातील नोंदी वरुन सुध्दा लक्षात येते की, तक्रारकर्त्यास माहे फेब्रुवारी-2012 पर्यंत योग्य वाचनाची आणि योग्य रकमेची बिले देण्यात आलीत आणि त्यानंतरचे कालावधीत मात्र मार्च-2012 मध्ये मागील वाचन 4483 युनिट आणि चालू वाचन 5157 युनिट दर्शवून एकदम एकाकी 674 युनिटचे देयक देण्यात आले आणि त्यानंतर माहे एप्रिल-2012 ते नोव्हेंबर-2012 या कालावधीत प्रतीदेयकामध्ये मागील वाचन-5157 युनिट आणि चालू वाचन-5157 युनिट दर्शवून एकसारखी 160 युनिटची देयके देण्यात आलीत, ती एकदम चुकीची दिसून येतात. विरुध्दपक्षाचे विज वापराचे गोषवा-या नुसार जर मीटरची स्थिती ही “Normal” आहे असे गृहीत धरल्यास, माहे एप्रिल-2012 ते नोव्हेंबर-2012 या कालावधीतील तक्रारकर्त्याचे प्रती देयक निहाय मागील वाचन 5157 युनिट आणि चालू वाचन 5157 युनिट एक सारखे दर्शवून एकूण विज वापर 160 युनिट प्रती देयक कसा दर्शविण्यात आला ?. यावरुन सिध्द होते की, तक्रारकर्त्यास माहे मार्च-2012 पासून ते नोव्हेंबर-2012 या कालावधीत मीटर वरील प्रत्यक्ष्य वापर न दर्शविता, चुकीची विज देयके विरुध्दपक्षा तर्फे निर्गमित करण्यात आलीत. सदर कालावधीत मागील वाचन आणि चालू वाचनाचे आकडे एकसारखे दर्शविले असल्यामुळे मीटरमध्ये नक्कीच बिघाड दिसून येतो. तक्रारकर्त्यास दि.08.10.2012 रोजीची विद्युत बिल भरण्या बाबत 15 दिवसाची सुचना पाठवून त्याद्वारे दि.30.09.2012 पर्यंत देयक असलेली थकबाकी 9038.47 पैसे दि.22.10.2012 पर्यंत भरण्यास सुचित केले व थकबाकी न भरल्यास विज कायदा 2003 चे कलम 56 नुसार कार्यवाही करण्याचे सुचित केले. सदर कालावधीची देयके दुरुस्त करुन न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास आपले वकीलांचे मार्फतीने दि.05.11.2012 रोजीची रजिस्टर नोटीस पाठविली परंतु त्यावर काहीही कार्यवाही विरुध्दपक्षाने केली नाही. म्हणून शेवटी तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षा विरुध्द मंचात तक्रार दाखल करावी लागली. या सर्व प्रकारामुळे तक्रारकर्त्यास निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास झाल्याचे सिध्द होते. 17. उपरोक्त वस्तुस्थिती वरुन तक्रारकर्ता हा माहे मार्च-2012 कालावधी दि.10.02.2012 ते दि.10.03.2012 पासून ते माहे नोव्हेंबर-2012 या कालावधीची व त्यापुढील विज पुरवठा खंडीत करे पर्यंतचे कालावधीची सर्व विज देयके माहे डिसेंबर-2011 विज वापर 66 युनिट, माहे जानेवारी-12 विज वापर 61 युनिट आणि माहे फेब्रुवारी-12 विज वापर 52 युनिट याचे सरासरी नुसार प्रतीमाह एकूण-60 युनिट या प्रमाणे प्रतीमाह देयक मिळण्यास पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच तक्रारकर्ता हा त्याचे कडील खंडीत विज पुरवठा पूर्ववत सुरु करुन मिळण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-2000/- विरुध्दपक्षा कडून मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे, त्यावरुन आम्ही, खालील प्रमाणे प्रकरणात आदेश पारीत करीत आहोत- ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षा विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्षाने, सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 24 तासाचे आत तक्रारकर्त्या कडील खंडीत विज पुरवठा तक्रारकर्त्या कडून कोणतेही शुल्क न आकारता पूर्ववत सुरु करुन द्दावा. तसेच तक्रारकर्त्या कडील विज मीटर तक्रारकर्त्या कडून कोणतेही शुल्क न आकारता बदलवून, त्याऐवजी, योग्य विज मीटर निकालपत्र प्राप्त झाल्या पासून 08 दिवसांचे आत तक्रारकर्त्याकडे बसवून द्दावे. 3) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दिलेली माहे मार्च-2012 कालावधी दि.10.02.2012 ते दि.10.03.2012 पासून ते माहे नोव्हेंबर-2012 (विज पुरवठा खंडीत करे पर्यंत) या कालावधीची विज देयके या आदेशान्वये रद्द करण्यात येत आहेत. त्याऐवजी विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास माहे डिसेंबर-2011 ते फेब्रुवारी-2012 या 03 महिन्याची सरासरी 60 युनिट या प्रमाणे प्रतीमाह देयक 60 युनिट प्रमाणे माहे मार्च-2012 ते नोव्हेंबर-2012 व त्यापुढील विज पुरवठा खंडीत करे पर्यंत या कालावधी करीता, त्या त्या कालावधीतील प्रचलीत दरानुसार देयक तयार करावे, असे देयक तयार करताना त्यामध्ये विलंब आकार, व्याज इत्यादीच्या रकमा समाविष्ठ करण्यात येऊ नये आणि असे देयक तयार झाल्या नंतर त्यातील रकमेची एकूण-06 मासिक हप्त्यांमध्ये विभागणी करुन, त्याची चालू बिलां सोबत एकूण 06 मासिक हप्त्यांमध्ये वसुल करावी. सदर माहे मार्च-12 ते नोव्हेंबर-12 या कालावधीत तक्रारकर्त्याने बिलापोटी काही रकमेचा भरणा केला असल्यास त्याचे योग्य ते समायोजन त्यामधून करण्यात यावे. 4) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-2000/-( अक्षरी रुपये दोन हजार फक्त) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास द्दावेत. विरुध्दपक्ष तक्रारकर्त्यास देय असलेल्या नुकसान भरपाईच्या रकमा या तक्रारकर्त्या कडून भविष्यात देय असलेल्या विज देयकातून समायोजित करु शकतील. 5) विरुध्दपक्षाने, सदर आदेशाचे अनुपालन, अंतिम निकालपत्रात नमुद केल्या नुसार विहित मुदतीत करावे. 6) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. ( श्री सी.के. धीरन ) | (श्री नितीन माणिकराव घरडे ) | मा. अध्यक्ष | मा. सदस्य |
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नागपूर *****
| Nitin Manikrao Gharde, MEMBER | C.K.Dhiran, PRESIDENT | , | |