जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : १२२/२०१८. तक्रार दाखल दिनांक : ०३/०४/२०१८. तक्रार निर्णय दिनांक : २४/०६/२०२१.
कालावधी : ०३ वर्षे ०२ महिने २१ दिवस
विश्वास मधुकर चव्हाण, वय : ३५ वर्षे, व्यवसाय : नोकरी,
रा. लोहारा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद, ह.मु. बालाजी अव्हेन्यू,
प्लॉट नं. ३०, कामोठे, नवी मुंबई तर्फे अधिकारपत्रधारक : मधुकर
हरीबा चव्हाण, वय ७० वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त,
रा. लोहारा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत,
उपविभाग कार्यालय, लोहारा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
मा. श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- दादासाहेब रंगनाथ डोंगरे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- विनायक बाबासाहेब देशमुख (बावीकर)
आदेश
मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(१) तक्रारकर्ते यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून सन २००७ मध्ये विद्युत जोडणी घेतलेली आहे आणि ते विद्युत देयकांचा नियमीत भरणा करतात. त्यांचा ग्राहक क्रमांक ५९७०७०६५१२८५ व मीटर क्रमांक ९८००७१५७७५ आहे. परंतु छापील देयकावर चुक मीटर क्रमांक ९८००७०७०५२७५ नमूद केला आहे.
(२) तक्रारकर्ता यांचे वादकथन आहे की, विरुध्द पक्ष यांनी दि.२८/९/२०१७ ते २८/१०/२०१७ कालावधीचे रु.२९०/- चे देयक दिले आणि त्याचा भरणा दि.१५/११/२०१७ रोजी केला. त्यानंतर तक्रारकर्ता यांना दि.२८/१०/२०१७ ते २१/११/२०१७ कालावधीकरिता ४९३९ युनीट असा चूक व अवास्तव वीज वापर दर्शवून रु.७०,२००/- देयक दिले. त्याबाबत विचारणा केली असता देयक दुरुस्त करुन देण्यात येईल, असे विरुध्द पक्ष यांनी आश्वासन दिले. परंतु त्यांना पुन्हा जानेवारी २०१८ मध्ये १६७५ युनीट असे अवास्तव व चूक दर्शवून रु.९३,१२०/- चे देयक दिले. तक्रारकर्ता यांनी दि.१७/१/२०१८ रोजी मौखिक व लेखी तक्रार केली असता मीटर तपासणी करुन देयक दुरुस्त करण्यात येईल, असे विरुध्द पक्ष यांनी सांगितले. परंतु विरुध्द पक्ष यांनी फेब्रुवारी २०१८ या महिन्यामध्ये २२६ युनीट वीज वापर दर्शवून रु.७२,६८०/- चे चूक देयक दिले.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे असे वादकथन आहे की, युनीट वापराप्रमाणे व सरासरी होणा-या वीज वापराचे देयक भरण्यास तयार आहेत. मीटरमध्ये दोष असल्यास विरुध्द पक्ष यांनी मीटर बदलून देणे आवश्यक आहे. अर्ज देऊनही विरुध्द पक्ष यांनी त्यांना सी.पी.एल. उपलब्ध करुन दिले नाही. तसेच विधिज्ञांमार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष यांनी विद्युत देयकाची दुरुस्ती केली नाही. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने योग्य त्या सरासरी वीज युनीट वापराप्रमाणे विद्युत देयक दुरुस्त करुन देण्याचा; मीटरमध्ये दोष असल्यास मीटर बदलून देण्याचा; खंडीत वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.५०,०००/- नुकसान भरपाई देण्याचा व रु.१०,०००/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(४) विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडून सन २००७ मध्ये विद्युत पुरवठा घेतल्याचे व तक्रारकर्ता यांचा ग्राहक क्रमांक ५९७०७०६५१२८३ असल्याचे विरुध्द पक्ष यांनी मान्य केले. त्यांचे कथन आहे की, ऑक्टोंबर २०१७ पूर्वीच्या कालावधीमध्ये तक्रारकर्ता यांनी वापरलेल्या प्रत्यक्ष युनीटपेक्षा कमी युनीटचे देयक भरणा केले. तक्रारकर्ता यांचा युनीट वापर कमी दर्शविल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी मीटरची प्रत्यक्ष पाहणी केली असता नोव्हेंबर २०१७ मध्ये एकूण ४९३९ युनीट प्रत्यक्ष वापर दिसून आला. त्याप्रमाणे एकूण युनीटचे देयक तक्रारकर्ता यांना देण्यात आले. तक्रारकर्ता यांनी देयकाबाबत तक्रारीनुसार विरुध्द पक्ष यांनी जुन २०१७ ते मे २०१८ या १२ महिन्याच्या कालावधीमध्ये ५३८२ युनीटची विभागणी करुन अतिरिक्त आकारलेल्या देयकाची रक्कम कमी करुन तक्रारकर्ता यांना देयक देण्यात आले. १२ महिन्याचा तक्रारकर्ता यांचा प्रतिमहा सरासरी ४४९ युनीट वीज वापर आहे. तक्रारीची चौकशी करुन जानेवारी २०१८ च्या देयकातून रु.२१,९७१.२१ पैसे वजा केले. तसेच एप्रिल २०१८ च्या देयकातून रु.४७,६०३.३८ पैसे वजा केले. वापरलेल्या युनीटप्रमाणे तक्रारकर्ता यांचे देयक दुरुस्त करुन दिल्यामुळे वादकारण घडलेले नाही. तक्रारकर्ता यांनी दि.१५/११/२०१७ नंतर देयकाचा भरणा केलेला नसून ते थकबाकीमध्ये आहेत. शेवटी तक्रारकर्ता यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(५) तक्रारकर्ता यांची वादकथने, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन, उभय पक्षांनी दाखल केलेले कागदपत्रे इ. चे अवलोकन करण्यात आले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला असता न्यायनिर्णयासाठी खालीलप्रमाणे उपस्थित होणा-या मुद्यांचे सकारण उत्तरे त्यांच्यापुढे नमूद करुन कारणमीमांसा देत आहोत.
मुद्दे उत्तर
(१) विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? होय.
(२) तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
(३) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमीमांसा
(६) मुद्दा क्र. १ व २ :- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून निवासी वापराकरिता ग्राहक क्र. ५९७०७०६५१२८५ अन्वये विद्युत पुरवठा घेतलेला आहे, ही बाब विवादीत नाही. तक्रारकर्ता यांचे वादकथन आहे की, विरुध्द पक्ष यांनी दि.२८/१०/२०१७ ते २१/११/२०१७ कालावधीकरिता त्यांना ४९३९ युनीटचे रु.७०,२००/- चे चूक व अवास्तव वीज देयक दिले. तसेच जानेवारी २०१८ मध्ये १६७५ युनीटचे अवास्तव व चूक रु.९३,१२०/- चे देयक दिले. तसेच फेब्रुवारी २०१८ महिन्यामध्ये २२६ युनीट वीज वापर दर्शवून रु.७२,६८०/- चे चूक देयक दिले. उलटपक्षी विरुध्द पक्ष यांचे निवेदन आहे की, ऑक्टोंबर २०१७ पूर्वी तक्रारकर्ता यांचा युनीट वापर कमी दर्शविल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या मीटरची प्रत्यक्ष पाहणी केली असता नोव्हेंबर २०१७ मध्ये एकूण ४९३९ युनीट प्रत्यक्ष वापर दिसून आला. त्याप्रमाणे एकूण युनीटचे देयक तक्रारकर्ता यांना देण्यात आले. तसेच तक्रारकर्ता यांनी देयकाबाबत तक्रारीनुसार विरुध्द पक्ष यांनी जुन २०१७ ते मे २०१८ या १२ महिन्याच्या कालावधीमध्ये ५३८२ युनीटची विभागणी करुन अतिरिक्त आकारलेल्या देयकाची रक्कम कमी करुन तक्रारकर्ता यांना देयक देण्यात आले.
(७) तक्रारकर्ता यांच्या विरुध्द पक्ष यांच्याविरुध्द वादोत्पत्तीकरिता कारण दि.५/१२/२०१७ रोजीचे विद्युत देयक आहे. त्यानंतर सुध्दा दि.३०/१२/२०१७ व २५/१/२०१८ रोजीचे दिलेले विद्युत देयक चूक व अवास्तव असल्याचे तक्रारकर्ता यांचे कथन आहे.
(८) वादोत्पदत्तीकरिता कारणीभूत असणा-या दि.५/१२/२०१७ रोजीच्या विद्युत देयकापूर्वी दिलेल्या विद्युत देयकांचा भरणा तक्रारकर्ता यांनी केल्याचे विरुध्द पक्ष यांना मान्य आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांचा वीज वापरासंबंधी Consumer Personal Ledger (सी.पी.एल.) दाखल केलेला आहे. त्याचे अवलोकन केले असता दि.५/१२/२०१७ च्या देयकापूर्वी तक्रारकर्ता यांचा प्रतिमहा विद्युत वापर हा ५० युनीटपेक्षा कमी असल्याचे आढळतो. त्यामुळे तक्रारकर्ता यांना दि.५/१२/२०१७ व त्यानंतर देण्यात आलेल्या देयकामध्ये दर्शविलेले युनीट हे निश्चितच अवास्तव व अवाजवी असल्याचे निदर्शनास येते.
(९) तक्रारकर्ता यांचे विद्युत मीटर दोषयुक्त आहे, असे विरुध्द पक्ष यांचे कथन नाही. तक्रारकर्ता यांनी विधिज्ञांमार्फत पाठविलेल्या नोटीसमध्ये विद्युत मीटरमध्ये दोष असल्यास बदलून देण्याची विनंती केली आहे. असे दिसते की, विद्युत मीटर तपासणीसाठी करावयाची आवश्यक कार्यवाही किंवा पूर्तता झालेली नाही.
(१०) विद्युत मीटरबाबत उभय पक्षांचा विशेष वाद-प्रतिवाद नसल्यामुळे मुख्य वादविषयाकडे जाणे आवश्यक वाटते. विरुध्द पक्ष यांनी त्यांच्या विद्युत देयकांचे समर्थन करताना ऑक्टोंबर २०१७ पूर्वी तक्रारकर्ता यांचा युनीट वापर कमी दर्शविल्यामुळे मीटरची प्रत्यक्ष पाहणी करुन नोव्हेंबर २०१७ मध्ये ४९३९ युनीट प्रत्यक्ष वापर आढळून आल्यामुळे एकूण युनीटचे देयक तक्रारकर्ता यांना देण्यात आले, असा युक्तिवाद केला. विरुध्द पक्ष यांनी दि.५/१२/२०१७ च्या देयकापूर्वी तक्रारकर्ता यांच्या विद्युत मीटरवर नोंदलेल्या युनीटप्रमाणे विद्युत देयके आकारणी केलेले नाहीत, असा अर्थबोध होतो.
(११) माहे ऑक्टोंबर २०१७ पर्यंतच्या विद्युत देयकांचा तक्रारकर्ता यांनी नियमीतपणे भरणा केलेला आहे. विरुध्द पक्ष कथन करतात त्याप्रमाणे ऑक्टोंबर २०१७ पूर्वी वीज वापराप्रमाणे तक्रारकर्ता यांना देयक आकारणी झालेले नाही. तक्रारकर्ता यांना ऑक्टोंबर २०१७ पूर्वी दिलेल्या विद्युत देयकांमध्ये दर्शविलेल्या वीज वापर युनीटकरिता काय आधार होता, याचे स्पष्टीकरण विरुध्द पक्ष यांनी दिलेले नाही. ऑक्टोंबर २०१७ पूर्वी तक्रारकर्ता यांचा वीज वापर ५० युनीटपेक्षा कमी आहे. ऑक्टोंबर २०१७ पूर्वी दिलेल्या विद्युत देयकांमध्ये युनीट सरासरी पध्दतीने दर्शविले, असेही विरुध्द पक्ष यांचे कथन नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार / वीज ग्राहकास विद्युत मीटरवर नोंदलेल्या रिडींगप्रमाणे म्हणजेच वीज वापराप्रमाणे देयकाची आकारणी करणे अपेक्षीत व आवश्यक आहे; किंबहुना ती त्यांची महत्वपूर्ण जबाबदारी व कर्तव्य आहे. विरुध्द पक्ष यांनी दि.५/१२/२०१७ च्या देयकामध्ये जो ४९३९ युनीट वापर दर्शविला त्याचा स्पष्ट खुलासा केला नाही. त्या देयकामध्ये ४९३९ युनीटबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलेले नाही किंवा तक्रारकर्ता यांना लेखी पत्र पाठवून त्याची माहिती दिलेली नाही. अशा मोठ्या प्रमाणातील युनीटची थकबाकी वसूलपात्र ठरवण्यात आलेली असताना त्या थकबाकीची सविस्तर माहिती वीज ग्राहकास देण्याचे सौजन्य विरुध्द पक्ष यांनी दर्शवले नाही. तसेच ४९३९ युनीट वीज वापर किती महिन्यामध्ये व कोणत्या दराने आकारणी केला, हे स्पष्ट होत नाही. तसेच तक्रारकर्ता यांच्या देयकातून रु.२१,९७१.२१ व एप्रिल २०१८ च्या देयकातून रु.४७,६०३.३८ पैसे वजावट करण्याचा आधार स्पष्ट केला नाही. तक्रारकर्ता यांना जे वीज आकार देयक दिले, त्याचा त्यांनी भरणा केला. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी कमी युनीटचे देयक भरणा केले, हे ग्राह्य धरता येत नाही. आमच्या मते तक्रारकर्ता यांना दि.५/१२/२०१७ च्या देयकामध्ये दर्शविलेला ४९३९ युनीट वापर व त्याप्रमाणे आकारणी केलेले देयक योग्य व उचित नाही, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(१२) विरुध्द पक्ष यांना तक्रारकर्ता यांच्याकडून दि.५/१२/२०१७ च्या देयकांमध्ये व त्यास अनुसरुन नंतर देण्यात आलेल्या देयकाची थकबाकी वसूल करण्याचा हक्क प्राप्त होत नाही. दि.५/१२/२०१७ च्या देयकांमध्ये नमूद केलेले युनीट अनुचित व अयोग्य असून त्याप्रमाणे देयकाची आकारणी करणे आणि त्यांची वसुली करण्याचे कृत्य विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. विरुध्द पक्ष यांनी दिलेले दि.५/१२/२०१७ चे देयक रद्द करणे न्यायोचित ठरते. तसेच तक्रारदार हे मानसिक व शारीरिक त्रासासह तक्रार खर्चापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. उपरोक्त विवेचनावरुन आम्ही मुद्दा मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे आणि शेवटी खालील आदेश देत आहोत.
आदेश
(१) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना दि.५/१२/२०१७ चे व त्यानंतर विद्युत पुरवठा खंडीत होईपर्यंत दिलेले सर्व वीज आकार देयके रद्द करण्यात येतात.
(२) विरुध्द पक्ष यांनी दि.२८/१०/२०१७ पासून विद्युत पुरवठा खंडीत करेपर्यंत प्रतिमहा ५० युनीट वीज वापराचे देयक आकारणी करावे आणि त्याचा भरणा तक्रारकर्ता यांनी करावा.
(३) तक्रारकर्ता यांचा विद्युत पुरवठा प्रस्तुत आदेश प्राप्त झाल्यानंतर ५ दिवसाच्या आत सुरु करावा.
(४) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना त्रासापोटी रु.५,०००/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.३,०००/- द्यावेत.
ग्राहक तक्रार क्र. १२२/२०१८.
(५) उपरोक्त आदेश क्र.१, २ व ४ ची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेशाच्या प्राप्तीपासून ४५ दिवसाचे आत करावी.
(श्री. मुकुंद भगवान सस्ते) (श्री. किशोर दत्तात्रय वडणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/१०४२१)