::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
(पारीत दिनांक– 16 जानेवारी, 2018)
01. उपरोक्त नमुद दोन्ही तक्रारदारांनी मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केलेल्या तक्रारी हया जरी स्वतंत्ररित्या वेगवेगळया दाखल केलेल्या असल्या, तरी नमुद तक्रारींमधील विरुध्दपक्ष हे एकच आहेत आणि तपशिलाचा थोडाफार भाग वगळता, ज्या कायदे विषयक तरतुदींचे आधारे हया तक्रारी निकाली निघणार आहेत, त्या कायदे विषयक तरतुदी सुध्दा नमुद तक्रारींमध्ये एक सारख्याच आहेत आणि म्हणून आम्ही नमुद दोन्ही तक्रारीं मध्ये एकत्रितरित्या निकाल पारीत करीत आहोत. दोन्ही तक्रारी या विरुध्दपक्ष क्रं-1) सम्राट नवशक्ती जनविकास संस्था मार्फत सचिव जगदिश जोशी यांचे विरुध्द त्यांनी विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे कडून विकत घेतलेल्या आणि तक्रारदारांचे मालकीचे असलेल्या भूखंडाचे मोजमाप करुन प्रत्यक्ष्य ताबे मिळावेत तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) सभापती, नागपूर सुधार प्रन्यास नागपूर यांचे कडून भूखंडाचे नियमितीकरण व्हावे या कारणास्तव दाखल केलेल्या आहेत.
02. दोन्ही तक्रारदारांचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/749 मधीत तक्रारकर्ता श्री संदिप मिहीर भट्टाचार्य यांचे स्वर्गीय वडील यांचे मालकीचा भूखंड विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेचे ले आऊट मध्ये भूखंड होता व त्यांचे मृत्यू नंतर मृत्यूपत्र दिनांक-21/10/2012 अन्वये तक्रारकर्ता श्री संदिप भट्टाचार्य हा सदर भूखंडाचा मालक झाला. तक्रारकर्ता श्री संदिप यांचे वडीलांनी विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे कडून दिनांक-31/03/1994 रोजी मौजा सोमलवाडा, पटवारी हलका क्रं-44, तहसिल व जिल्हा नागपूर येथील खसरा क्रं-94/2 या ले आऊट मधील भूखंड क्रं-39, एकूण क्षेत्रफळ-2050 चौरसफूट नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे विकत घेतले होता व विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे तर्फे सन-1994 मध्ये भूखंड क्रं-39 ची ताबा पावती दिली होती.
तर ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/750 मधील तक्रारकर्ती सौ.मनिषा रविंद्रनाथ भट्टाचार्य हिने विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे कडून दिनांक-04/11/1991 रोजी मौजा सोमलवाडा, पटवारी हलका क्रं-44, तहसिल व जिल्हा नागपूर येथील खसरा क्रं-94/2 या ले आऊट मधील भूखंड क्रं-36, एकूण क्षेत्रफळ-1500 चौरसफूट नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे विकत घेतले होता व विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे तर्फे भूखंड क्रं-36 ची ताबा पावती दिनांक-14/01/1992 रोजी दिली.
उभय तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, जरी विक्रीपत्राची नोंदणी त्यांच्या नावे करण्यात आली होती तरी भूखंडाची मोजणी करुन प्रत्यक्ष्य ताबा देण्यात आला नाही. तक्रारदारांचे मालकीचे भूखंड हे 1900 ले आऊट योजने अंतर्गत असून उभय तक्रारदारांनी कंटाळून भूखंडाचे विकासशुल्क विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास मध्ये भरलेत परंतु आज पर्यंत तक्रारदारांच्या मालकीच्या भूखंडांचे नियमितीकरण विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास कडून करुन मिळालेले नाही. विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास मध्ये नियमिती करणा बद्दल विचारणा केली असता जो पर्यंत नगर भूमापन कार्यालया तर्फे ले-आऊटची मोजणी करुन हद्द निश्चीत केल्या जात नाही तो पर्यंत भूखंडाचे नियमिती करण होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेचा मौजा सोमलवाडा, नागपूर येथील खसरा क्रं-94/2 या अभिन्यासचा सिमावाद असल्याचे सुध्दा नागपूर सुधार प्रन्यास व्दारे संगण्यात आले. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं-1) कडे ले आऊट मोजणी संबधाने विनंती केली असता टाळाटाळ करण्यात आली. वस्तुतः विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेची जबाबदारी अहे की, त्यांनी संपूर्ण मोजणीचा खर्च करुन ले आऊटची रितसर मोजणी व सिमांकन करुन घेणे आवश्यक होते. विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे तर्फे प्रत्यक्ष्य मोजणी करुन भूखंडाचे ताबे तक्रारदारानां मिळालेले नाहीत.
उभय तक्रारदारानीं पुढे असेही नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तर्फे याच ले आऊट मधील भूखंड क्रं-35 चे मालक श्रीमती अंजू सत्यनारायण चौधरी यांना दिनांक-13/08/2008 रोजी भूखंडाचे नियमितीकरणाचे पत्र दिलेले आहे. तक्रारकर्ता श्री संदिप मिहिर भट्टाचार्य यांचे असे म्हणणे आहे की, दिनांक-04/07/2005 पासून ते दिनांक-21/08/2013 पर्यंत त्यांचे अर्जावर विरुध्दपक्ष क्रं 2 नागपूर सुधार प्रन्यास तर्फे कारवाई करण्यात आली नाही व दिनांक-21/08/2013 रोजी त्यांचा अर्ज खारीज केला. तर तक्रारकर्ती सौ.मनिषा रविंद्रनाथ भटटाचार्य हिचे असे म्हणणे आहे की, तिने दिनांक-20/07/2005 रोजी विरुध्दपक्ष क्रं-2 नागपूर सुधार प्रन्यास यांचेकडे अर्ज केला तसेच त्यांचे दिनांक-12/05/2004 रोजीचे डिमांडनोट नुसार रोख रक्कम कार्यालयात जमा केली परंतु आज पर्यंत कुठलाही आदेश वा कारवाई करण्यात आली नाही, म्हणून तीने विरुध्दपक्ष क्रं-2 नागपूर सुधार प्रन्यास कडे पत्रव्यवहार सुध्दा केला तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 ला कायदेशीर नोटीस दिनांक-25/07/2013 रोजी बजावली परंतु वि.प.क्रं 1 ने दिनांक-08/08/2013 रोजी खोटे उत्तर पाठविले.
उभय तक्रारदारानीं पुढे असे नमुद केले की, भूखंडाचे नियमितीकरण व प्रत्यक्ष्य ताबा न मिळाल्याने ते मागील 17 ते 18 वर्षा पासून भूखंडावर बांधकाम करु शकले नाही, बांधकामाच्या खर्चात 200 पटीने वाढ झालेली आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्षानीं त्यांना दोषपूर्ण सेवा दिल्याने उभय तक्रारदारांचे आर्थिक नुकसान तर झालेच परंतु त्यांना शारिरीक व मानसिक त्रास सुध्दा सहन करावा लागत आहे म्हणून उभय तक्रारदारांनी ग्राहक मंचा समक्ष तक्ररी दाखल करुन त्याव्दारे खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्ष क्रं-1) ला आदेशित करण्यात यावे की, त्याने उभय तक्रारदारांच्या भूखंडाची मोजणी नगर भूमापन विभागाकडून रितसर करुन तक्रारदारांना त्यांच्या त्यांच्या भूखंडाचे प्रत्यक्ष्य ताबे द्दावेत.
(2) विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास यांना आदेशित करण्यात यावे की, त्यांनी उभय तक्रारदारांच्या भूखंडाचे नियमितीकरण करुन द्दावे व तसे न केल्यास तक्रारदारानीं भूखंडाचे विकासशुल्कापोटी विरुध्दपक्ष क्रं-2) यांचे कार्यालयात जमा केलेली रक्कम 18 टक्के व्याजासह परत करण्यात यावी.
(3) विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे तर्फे उभय तक्रारदारांना प्रत्यक्ष्य भूखंडाचा ताबा न मिळाल्यामुळे प्रतीवर्ष रुपये-10,000/- या प्रमाणे मानसिक त्रासा बद्दल अनुक्रमे रुपये-2,30,000/- आणि रुपये-2,20,000/- देण्याचे विरुध्दपक्ष क्रं-1) ला आदेशित करण्यात यावे.
(4) त्याशिवाय उभय तक्रारदारांना तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-20,000/- प्रमाणे विरुध्दपक्षां तर्फे देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) सम्राट नवशक्ती जनविकास संस्था, नागपूर तर्फे सचिव जगदीश गणेशराम जोशी यांनी दोन्ही तक्रारीं मध्ये स्वतंत्र लेखी उत्तर दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं 1 ने उत्तरात दोन्ही तक्रारी या मुदतबाहय असल्याचा प्राथमिक आक्षेप घेतला, त्याचे म्हणण्या नुसार दोन्ही तक्रारदारानां त्यांच्या-त्यांच्या भूखंडाचे प्रत्यक्ष्य ताबे दिनांक-31/03/1994 रोजीच्या नोंदणीकृत विक्रीपत्रांव्दारे देण्यात आले आणि तेंव्हा पासून ते प्रत्यक्ष्य तक्रार दाखल करे पर्यंत ताब न मिळाल्या बाबत कुठेही उजर केलेला नाही, करीता दोन्ही तक्रारदारांच्या तक्रारी या मुदतबाहय असल्याचे कारणा वरुन खारीज करण्यात याव्यात. तक्रारकर्ता श्री संदिप मिहीर भट्टाचार्य यांचे वडील श्री मिहिर भट्टाचार्य यांनी दिनांक-31/03/1994 रोजी नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे विरुदपक्ष क्रं-1) कडून भूखंड विकत घेतल्याची बाब मान्य केली. तर तक्रारकर्ती सौ.मनिषा रविंद्र भट्टाचार्य हिने विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे कडून दिनांक-04/11/1991 रोजीच्या विक्रीपत्रान्वये भूखंड विकत घेतल्याची बाब मान्य केली. ले आऊट जमीन गैरकृषी आदेश मिळवून भूखंड विक्री करण्यात आले. भूखंडा बाबत ताब्याचे पावती देतेवेळी कुठल्याही प्रकारची कायदेशीर तरतुद न करता दिली हे म्हणणे नाकबुल केले. तसेच हे म्हणणे सुध्दा नाकबुल केले की, वि.प.क्रं-1) ने भूखंडांचे वास्तविक वहिवाट व वास्तविक कब्जा तक्रारदारांना दिलेला नाही. विक्रीपत्र नोंदणीचे दिवशी भूखंडाचा ताबा दिल्याचे विक्रीपत्रात नमुद करण्यात आलेले आहे व खरेदी दिनांका पासून तक्रारदार हे भूखंडांचे मालक झालेले आहेत. सदर्हू भूखंड हे सिमावादने ग्रस्त असल्याची बाब नाकबुल केली. तसेच विक्रीपत्रात नागपूर सुधार प्रन्यास व नगररचनाव्दारे फेरबदल सुचविल्यास तक्रारदारांना मान्य करावे लागतील असेही नमुद करण्यात आलेले आहे. सन-1994 मध्ये भूखंडाचे ताबे तक्रारदारांना दिल्यावर विरुध्दपक्ष क्रं 1 चा कुठलाही संबध राहिलेला नाही. तक्रारदारांचे नातेवाईक श्री अमिताभ भट्टाचार्य यांनी यापूर्वी याच स्वरुपाची तक्रार क्रं-115/2010 ग्राहक मंचा समक्ष दाखल केली होती परंतु दिनांक-02/06/2010 चे मंचाचे आदेशान्वये ती तक्रार खारीज करण्यात आली होती. तक्रारदारांचेच असे म्हणणे आहे की, श्री अमिताभ भट्टाचार्य यांचे मालकीचा भूखंड क्रं 31 नियमित करण्यात आलेला आहे, याचाच अर्थ असा निघतो की, तेथे कुठलीही कायदेशीर अडचण वा सिमावाद नव्हता त्यामुळेच भूखंडाचे नियमितीकरण झालेले आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे तर्फे नगर भूमापन कार्यालयात तर्फे मोजणी करुन घेतलेली नाही हे विधान नाकबुल केले. दोन्ही तक्रारदारांनी दाखल केलेल्या दस्तऐवजां वरुन त्यांच्या भूखंडाचे मालकीची फेरफार नोंद झालेली आहे. सदरचे ले आऊट 1900 ले आऊट अंतर्गत विकसित करण्यात आले व तक्रारदारानीं त्यांच्या त्यांच्या भूखंडा करीता लागणा-या विकासशुल्काची रक्कम सुध्दा भरलेली आहे. तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं-1) ला त्रास देण्याचे उद्देश्याने या तक्रारी दाखल केलेल्या आहेत. सबब विरुध्दपक्ष क्रं-1) विरुध्दच्या तक्रारी खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तर्फे ईमारत अभियंत श्री भूपेश पदमाकर मेश्राम यांनी दोन्ही तक्रारीं मध्ये स्वतंत्र लेखी उत्तर दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं-2) ने लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्ता श्री संदिप भट्टाचार्य यांनी दिनांक-12/07/2013 रोजी त्यांचे मालकीचे भूखंडाचे नियमितीकरणासाठी अर्ज दाखल केला होता, त्यांचा सदरचा अर्ज विरुध्दपक्ष क्रं-2 कार्यालया तर्फे दिनांक-21/08/2013 रोजीचे पत्रान्वये खस-याचे सिमे बद्दल विवाद असल्याचे कारणा वरुन नामंजूर करण्यात आला. विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेच्या खस-याचे सिमे संबधीचा विवाद प्रलंबित असल्याचे विरुध्दपक्ष क्रं-2) कार्यालयाने त्यांचे कार्यालयीन पत्र दिनांक-26.08.2009 अन्वये कळविले होते, सदर पत्रान्वये विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेला खस-याचे सिमा वादा संबधाने नगर भूमापन अधिकारी यांचे कडून मोजणी करुन सिमांकन करुन घेण्यास सुचित केले होते परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेनी त्या प्रमाणे कारवाई केली नाही. यामध्ये जो काही दोष आहे तो विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेचा आहे तक्रारकर्ती सौ.मनिषा भट्टाचार्य हिने दिनांक-24/05/2013 आणि दिनांक-21/06/2013 रोजीचे पत्र नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयात सादर करुन भूखंडाचे नियमितीकरण करुन देण्या बद्दल विनंती केली परंतु मोजणी व हद्दीचे सिमांकन जो पर्यंत नगर भूमापन कार्यालया कडून होत नाही तो पर्यंत विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तक्रारदारांचे भूखंडाचे नियमितीकरण करुन देऊ शकत नाही. त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारदारांन दिलेली नाही, सबब त्यांचे विरुध्दच्या तक्रारी खारीज करण्यात याव्यात अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यासव्दारे करण्यात आली.
05. उपरोक्त नमुद तक्रारीं मध्ये तक्रारदारां तर्फे वकील श्री आशिष भिडे यांचा तर विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तर्फे वकील श्रीमती दाभाडकर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे तर्फे मौखीक युक्तीवादाचे वेळी कोणीही उपस्थित नव्हते. दाखल दस्तऐवज आणि लेखी युक्तीवादाचे अवलोकन करण्यात आले, यावरुन अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येतो-
::निष्कर्ष::
06. या प्रकरणां मध्ये तक्रारदारांच्या भूखंडाचे मालकी हक्का बद्दल विवाद नाहीत. विरुध्दपक्ष क्रं-1) सम्राट नवशक्ती जनविकास संस्थेचे ले आऊट असून त्यामधील भूखंडांचे विक्रीपत्र तक्रारदारांनी करुन घेतलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) गृहनिर्माण संस्थे तर्फे सचिव श्री जगदिश गणेशराम जोशी यांनी त्यांचे लेखी उत्तरात तक्रारकर्ता श्री संदिप मिहीर भट्टाचार्य यांचे वडील श्री मिहिर भट्टाचार्य यांनी दिनांक-31/03/1994 रोजी नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे विरुदपक्ष क्रं-1) कडून भूखंड विकत घेतल्याची बाब मान्य केली. तर तक्रारकर्ती सौ.मनिषा रविंद्र भट्टाचार्य हिने विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे कडून दिनांक-04/11/1991 रोजीच्या विक्रीपत्रान्वये भूखंड विकत घेतल्याची बाब मान्य केली. ले आऊट जमीन गैरकृषी आदेश मिळवून भूखंड विक्री करण्यात आले.
07. तक्रारकर्ता श्री संदिप मिहीर भट्टाचार्य यांचे तक्रारी प्रमाणे त्यांचे वडील श्री मिहीर भट्टाचार्य यांनी विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे कडून दिनांक-31/03/1994 रोजी मौजा सोमलवाडा, पटवारी हलका क्रं-44, तहसिल व जिल्हा नागपूर येथील खसरा क्रं-94/2 या ले आऊट मधील भूखंड क्रं-39, एकूण क्षेत्रफळ-2050 चौरसफूट नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे विकत घेतले होता व विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे तर्फे सन-1994 मध्ये भूखंड क्रं-39 ची ताबा पावती दिली होती.
तर ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/750 मधील तक्रारकर्ती सौ.मनिषा रविंद्रनाथ भट्टाचार्य हिचे तक्रारी प्रमाणे तिने विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे कडून दिनांक-04/11/1991 रोजी उपरोक्त वर्णनातीत ले आऊट मधील भूखंड क्रं-36, एकूण क्षेत्रफळ-1500 चौरसफूट नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे विकत घेतले होता व विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे तर्फे भूखंड क्रं-36 ची ताबा पावती दिनांक-14/01/1992 रोजी तिला दिली होती.
08. उभय तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे, जरी विक्रीपत्राची नोंदणी त्यांच्या नावे करण्यात आली होती तरी भूखंडाची मोजणी करुन प्रत्यक्ष्य ताबा देण्यात आला नाही. तक्रारदारांचे मालकीचे भूखंड हे 1900 ले आऊट योजने अंतर्गत असून उभय तक्रारदारांनी भूखंडाचे विकासशुल्क विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास मध्ये भरलेत परंतु आज पर्यंत तक्रारदारांच्या मालकीच्या भूखंडांचे नियमितीकरण (Regularization of plots) विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास कडून करुन मिळालेले नाही. विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास मध्ये नियमिती करणा बद्दल विचारणा केली असता जो पर्यंत नगर भूमापन कार्यालया तर्फे ले-आऊटची मोजणी करुन हद्द सिमांकित केल्या जात नाही तो पर्यंत भूखंडाचे नियमिती करण होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले.
09. याउलट, विरुध्दपक्ष क्रं-1) सम्राट नवशक्ती जनविकास संस्थे तर्फे सचिव श्री जगदिश गणेशराम जोशी यांचे उत्तरा प्रमाणे दोन्ही तक्रारदारानां त्यांच्या-त्यांच्या भूखंडाचे प्रत्यक्ष्य ताबे दिनांक-31/03/1994 रोजीच्या नोंदणीकृत विक्रीपत्रांव्दारे देण्यात आले आणि तेंव्हा पासून ते प्रत्यक्ष्य तक्रार दाखल करे पर्यंत ताब न मिळाल्या बाबत कुठेही उजर केलेला नाही, करीता दोन्ही तक्रारदारांच्या तक्रारी या मुदतबाहय असल्याचे कारणा वरुन खारीज करण्यात याव्यात. दोन्ही तक्रारदारांनी दाखल केलेल्या दस्तऐवजां वरुन त्यांच्या भूखंडाचे मालकीची फेरफार नोंद झालेली आहे. सदरचे ले आऊट 1900 ले आऊट अंतर्गत विकसित करण्यात आले व तक्रारदारानीं त्यांच्या त्यांच्या भूखंडा करीता लागणा-या विकासशुल्काची रक्कम सुध्दा विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास मध्ये भरलेली आहे. विक्रीपत्र नोंदवून दिल्याने व ताबा दिल्याने विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेचा मालकी हक्क संपुष्टात आलेला असून आता सर्व काही जबाबदारी भूखंड मालकांवर म्हणजे तक्रारदारांवर येत असल्याचे नमुद केले.
10. विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास यांचे लेखी उत्तरा प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेच्या खस-याचे सिमे संबधीचा विवाद प्रलंबित असल्याचे विरुध्दपक्ष क्रं-2) कार्यालयाने त्यांचे कार्यालयीन पत्र दिनांक-26.08.2009 अन्वये कळविले होते, सदर पत्रान्वये विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेला खस-याचे सिमा वादा संबधाने नगर भूमापन अधिकारी यांचे कडून मोजणी करुन सिमांकन करुन घेण्यास सुचित केले होते परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेनी त्या प्रमाणे कारवाई केली नाही त्यामुळे या प्रकरणां मध्ये जो काही दोष आहे तो विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेचा असल्याचे नमुद केले.
11. अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे प्रकरणातील दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तर्फे विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेचे सचिव श्री जगदिश जोशी यांना दिनांक-19/06/2014 रोजीचे दिलेल्या पत्रात असे नमुद करण्यात आलेकी, मौजा सोमलवाडा, खसरा क्रं-94/2, सम्राट नवशक्ती को-ऑप. हाऊसिंग सोसायटीचे सुधारित अभिन्यासाचा प्रस्ताव या कारणास्तव फेटाळण्यात येत आहे की, या अभिन्यासातील बहुतांश भूखंडांना नियमितीकरण पत्र देण्यात आलेले असून सुधारित अभिन्यासा प्रमाणे भूखंडांचे स्थानांतरण होत आहे तसेच पूर्वीच्या मंजूर अभिन्यासाचे नकाशातील खुली जागा सुधारीत नकाशात दर्शविलेली नाही. लगतच्या ले आऊटवाल्यां सोबत सिमावाद असल्याने लगतच्या ले आऊटच्या प्रवर्तका कडून नाहरकत प्रमाणपत्र सादर केलेले नाही. सर्व भूखंड धारकंचे समतीपत्र सादर केलेले नाही तसेच काही भूखंड धारकांचा सुधारित नकाशाला मंजूरी देण्या बाबत अक्षेप आहे, त्यामुळे सुधारीत नकाशा नामंजूर करण्यात येत असल्याचे कळविले. सदरच्या नागपूर सुधार प्रन्यासचे पत्रावर श्री बी.पी.मेश्राम, ईमारत अभियंत पश्चीम नागपूर सुधार प्रन्यास यांनी स्वाक्षरी केलेली आहे.
12. विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे तर्फे सचिव श्री जगदिश गणेशराम जोशी यांनी दिनांक-18/09/2015 रोजी वर्तमानपत्रात जाहिर सुचना देऊन त्याव्दारे मौजा सोमलवाडा खसरा क्रं-94/2 या ले आऊट मध्ये जागे अभावी अंतर्गत बदल करण्याचे ठरविले असल्याने करीता सर्व सभासदानी सुचना प्रकाशित दिनांका पासून 07 दिवसाचे आत भूखंडाचे मूळ विक्रीपत्र आणून सभासद नोंदणी करावी.
13. विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तर्फे दिनांक-19 एप्रिल, 2011 रोजीचे पत्र विरुध्दपक्ष क्रं-1) सम्राट नवशक्ती को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, खसरा क्रं-94/2, मौजा सोमलवाडा तर्फे सचिव श्री जगदिश गणेशराम जोशी, राहणार डॉक्टर कॉलिनी, प्लॉट क्रं 22, छत्रपती नगर, नागपूर तसेच सदर वादातील ले आऊट लगतची दुसरी सोसायटी मनोहर को ऑप हाऊसिंग सोसायटी तर्फे श्री मोरेश्वर सोर, राहणार- 473, तिरंगा चौक नागपूर आणि समाज एकता को-ऑप. हाऊसिंग सोसायटी तर्फे श्री परमहंस सुखदेव हाडके, राहणार बुध्द विहार जवळ, सोमलवाडा, नागपूर यांचे नावे दिलेले आहे, सदर पत्र हे या प्रकरणां मधील वादावर प्रकाश टाकणारे आहे, त्यामध्ये मौजा सोमलवाडा येथील सम्राट नवशक्ती को-ऑप.हाऊसिंग सोसायटी येथील खसरा क्रं-94/2, मनोहर को ऑप. हाऊसिंक सोसायटी येथील खसरा क्रं-94/2-3 आणि समाज एकता को-ऑप.हाऊसिंग सेसायटी येथील खसरा क्रं-95/3 यांचे सिमेबाबत विवाद असून पुढे पत्रात असे नमुद केलेले आहे की, विभागीय अधिकारी (पश्चीम) नागपूर सुधार प्रन्यास यांचे अहवाला नुसार मौक्यावर तिन्ही अभिन्यासाच्या सिमा परस्पर व्याप्त (Overlap) होत असल्याने आपण नगर भूमापन कार्यालया तर्फे मोक्यावर संयुक्तपणे संरेखन करुन व संयुक्त मोजणीचा नकाशा नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यालात सादर करावा. मंजूर अभिन्यासा प्रमाणे मोक्यावर संरेखन झाल्या नंतरच विकासाची व नियमितीकरणाची पुढील कामे केल्या जातील. सदर पत्रावर श्री प्र.प्र. धनकर, ईमारत अभियंता (पश्चीम), नागपूर सुधार प्रन्यास यांची स्वाक्षरी आहे.
14. विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तर्फे जे दिनांक-19 एप्रिल, 2011 रोजीचे पत्र दिलेले आहे त्यावरुन एकूण 03 सोसायटींचा त्यांच्या त्यांच्या ले आऊट सिमांकना संबधाने विवाद आहे आणि जो पर्यंत नगर भूमापन कार्यालया तर्फे तिन्ही ले आऊटची मोजणी होऊन त्या त्या ले आऊटच्या सिमा चिन्हांकित केल्या जात नाही तो पर्यंत नागपूर सुधार प्रन्यास तर्फे भूखंडाचे नियमितीकरणाची प्रक्रिया केल्या जाऊ शकत नाही ही बाब उघड आहे. या तिन्ही ले आऊटची आजच्या घडीला मोजणी करण्यासाठी बराच मोठा खर्च लागणार आहे ही बाब सुध्दा तेवढीच स्पष्ट आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी तिन्ही ले आऊटचे प्रवर्तक व तिन्ही सोसायटीचे संपूर्ण भूखंड मालक एकत्रित येत नाहीत व एकमताने योग्य तो निर्णय घेऊन नगर भूमापन अधिकारी यांचे कडून ले आऊटची मोजणी करुन घेत नाही तो पर्यंत हा प्रश्न रेंगाळत राहणार आहे, यामध्ये केवळ विरुध्दपक्ष क्रं-1) सम्राट नवशक्ती को ऑप हाऊसिंगचे सचिव श्री जगदिश जोशी हेच एकटेच जबाबदार आहेत असेही म्हणता येणार नाही.
15. तक्रारदारांनी मा.राज्य ग्राहक आयोग, परिक्रमा खंडपिठ, नागपूर यांनी प्रथम अपिल क्रं-ए/10/501 मध्ये दिनांक-15 मार्च, 2016 रोजी याच विरुध्दपक्ष सम्राट नवशक्ती जनविकास संस्था, नागपूर विरुध्द याच ले आऊट मधील एक भूखंड धारक श्री अमिताभ शिशीररंजन भट्टाचाचर्य यांचे प्रकरणात पारीत केलेल्या आदेशावर आपली भिस्त ठेवली, त्यामध्ये मा.राज्य ग्राहक आयोगाने विरुध्दपक्ष उत्तरवादी नवशक्ती जनविकस संस्था तर्फे सचिव श्री जगदिश जोशी यांना असे आदेशित केले की, त्यांनी तक्रारकर्ते अपिलार्थी श्री अमिताभ भट्टाचार्य यांना प्रत्यक्ष्य भूखंडाचा ताबा द्दावा व ताबा न दिल्यास ताबा देई पर्यंत प्रतीमहिना रुपये-5000/- प्रमाणे नुकसान भरपाई दाखल द्दावेत. यावर तक्रारदारानीं यावर जोर दिला आहे की, श्री अमिताभ भट्टाचार्य यांचे मालकीचा भूखंड क्रं-31 हा विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तर्फे नियमिती करण करुन देण्यात आलेला आहे व विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तर्फे ही बाब उत्तरातून नाकारण्यात आलेली नाही, त्यामुळे उभय तक्रारदारांचे भूखंडांचे नियमितीकरण विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तर्फे करुन देण्यात यावे.
16. मा.राज्य ग्राहक आयोग, परिक्रमा खंडपिठ, नागपूर अपिलीय निवाडयाचे सुक्ष्म वाचन केले असता त्यामध्ये अपिलार्थी भूखंडधारक श्री अमिताभ भट्टाचार्य यांचे मालकीचा भूखंड क्रं-31 चा ताबा उत्तरवादी सम्राट नवशक्ती संस्थेतर्फेसचिव श्री जगदिश जोशी यांनी देण्याचे आदेशित आहे, सदर आदेशामध्ये भूखंड नियमितीकरणा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
17. उभय तक्रारदारांनी त्यांच्या त्यांच्या तक्रारीत तसेच त्यांचे वकीलानीं युक्तीवादाचे वेळी या मुद्दावर भर दिला की, ज्या अर्थी वादातील ले आऊट मधील एक भूखंडधारक श्री अमिताभ भट्टाचार्य यांचे मालकीचा भूखंड क्रं-31 हा विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तर्फे नियमिती करण करुन देण्यात आलेला आहे त्याअर्थी त्याच ले आऊट मधील तक्रारदारांचे मालकीचे भूखंडांचे नियमितीकरण का होऊ शकत नाही.
नागपूर सुधार प्रन्यास तर्फे भूखंडधारक श्री अमिताभ भट्टाचार्य यांचे भूखंडाचे नियमितीकरण करण्यात आले परंतु ज्यावेळी तक्रारदारांच्या भूखंडाचे नियमितीकरणाची बाब आली त्यावेळी लगतच्या ले आऊट धारकानीं सिमेच्या हद्दी बाबत लेखी विवाद उपस्थित केलेत, त्यामुळे सिमा वादाचा प्रश्न प्रलंबित असताना भूखंडधारक श्री अमिताभ भट्टाचार्य यांचे भूखंडास नियमितीकरणास मंजूरी दिल्यावर व ले आऊट संबधी लेखी हरकती प्राप्त झाल्या नंतर त्या परिस्थितीत पुन्हा ती चुक नागपूर सुधार प्रन्यास यांनी करावी असा आदेश देता येऊ शकत नाही.
18. या प्रकरणा मध्ये लगतच्या तिन्ही ले आऊटच्या सिमा परस्पर व्याप्त (Overlap) होत आहेत. विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तर्फे दिनांक-19 एप्रिल, 2011 रोजीचे पत्र विरुध्दपक्ष क्रं-1) सम्राट नवशक्ती को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, खसरा क्रं-94/2, मौजा सोमलवाडा तर्फे सचिव श्री जगदिश गणेशराम जोशी, तसेच सदर वादातील ले आऊट लगतची दुसरी सोसायटी मनोहर को ऑप हाऊसिंग सोसायटी तर्फे श्री मोरेश्वर सोर, आणि समाज एकता को-ऑप. हाऊसिंग सोसायटी तर्फे श्री परमहंस सुखदेव हाडके, यांचे नावे दिलेले आहे, थोडक्यात विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तर्फे योग्य कारवाई करण्यात आलेली आहे परंतु तिन्ही ले आऊटच्या मालकांनी त्याकडे दुर्लक्ष्य केलेत. या प्रकरणाचा विवाद हा वर वर जरी क्षुल्लक स्वरुपाचा दिसत असला तरी हा प्रश्न सोडविण्यासाठी तिन्ही ले आऊटची मोजणी होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रचंड प्रमाणावर मोजणी खर्च येणार आहे तसेच तिन्ही ले आऊटचे मालक व भूखंडधारक यांनी एकत्रित येऊन हे कार्य करणे जरुरीचे आहे.
19. तक्रारदारानीं व इतर तिन्ही ले आऊटचे बाधीत भूखंड मालकानीं खरे पाहता जिल्हाधिकारी, नागपूर तसेच मंत्रालयीन स्तरावर विनंती अर्ज करुन हा विवाद सोडविण्यासाठी प्रयत्न करावयास हवे होते. यामध्ये तिन्ही ले आऊट मधील अनेक भूखंडधारक या सिमावादा मुळे बाधीत आहेत. तक्रारदारांचे भूखंड हे 1900 ले आऊट मधील आहेत. अशापरिस्थितीत जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करुन व तो शासनस्तरावर मंजूर करुन तिन्ही ले आऊटची मोजणी अत्यंत क्षुल्लक व माफक खर्चात करुन देऊन तिन्ही ले आऊट हद्दीचे सिमांकन नगर भूमापन अधिकारी यांचे कार्यालया कडून करवून घेणे आवश्यक व गरजेचे आहे, त्यामुळे अनेक भूखंडधारकांचे प्रश्न निकाली निघू शकतील. जो पर्यंत भूखंडांचे नियमितीकरण केल्या जाऊ शकत नाही, तो पर्यंत भूखंडधारक तेथे घरे सुध्दा बांधू शकत नाहीत.
20. तक्रारदार राहत असलेल्या ले आऊट मधील भूखंडधारक व लगतच्या अन्य दोन ले आऊट मधील भूखंडधारकांनी तिन्ही ले आऊट मधील मौक्यावर तिन्ही अभिन्यासाच्या सिमा परस्पर व्याप्त (Overlap) होत असल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी नगरभूमापन कार्यालयातर्फे मोजणी होऊन हद्दीचे सिमांकन होणे जरुरीचे आहे यासाठी भूखंड धारक व तिन्ही ले आऊटचे मालक/प्रवर्तक यांनी संयुक्त स्वाक्षरीचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात तसेच मंत्रालयीन स्तरावर आवश्यक दस्तऐवजांसह सादर करावे व जिल्हाधिकारी, नागपूर यांनी विशेष बाब म्हणून शासन स्तरावर दाखल करुन त्यास मंजूरी प्राप्त करुन अत्यंक कमीतकमी खर्चात तिन्ही लेआऊटची मोजणी करण्याचे आदेश द्दावेत कारण या प्रकरणा मध्ये अनेक भूखंडधारक सिमावादा मुळे बाधीत होत असून त्यांचे भूखंडाचे नियमितीकरणाची प्रक्रिया ही त्यामुळे थांबलेली आहे तसेच भूखंड नियमितीकरण न झाल्यामुळे अनेक भूखंडधारक तेथे घर सुध्दा बांधू शकत नाहीत. विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास यांना असे आदेशित करण्यात येते की, त्यांनी दोन्ही तक्रारदारांना व अन्य बाधीत भूखंडधारकांना वेळोवेळी योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन करुन तक्रारदार व अन्य बाधीत भूखंडधारक यांच्या तक्रारी कमीत कमी वेळेत दुर होऊन त्यांच्या भूखंडाचे लवकरात लवकर नियमितीकरण (Regularization of Plots) होईल यासाठी शासनस्तरावर योग्य ते उपाय सुचवून त्यांच्या तक्रारीचे निराकरण करावे.
21. तिन्ही ले आऊट मधील सिमावाद असल्याने तक्रारदारांच्या मालकीचे भूखंडाचे नियमितीकरण विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास यांनी करुन द्दावे असा चुकीचा आदेशही अतिरिक्त ग्राहक मंच देऊ शकत नाही. तक्रारदारांना जर वाटत असेल की अशाही परिस्थितीत त्यांच्या भूखंडाचे नियमितीकरण विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तर्फे व्हावे तर भविष्यात लेआऊट मोजणीमुळे काही फेरबदल झाले व तक्रारदारांच्या भूखंडांच्या जागा बदलल्या तर होणा-या संभाव्य परिणामास/हानीस तक्रारदार हे स्वतः जबाबदार राहतील असे दोन्ही तक्रारदारांनी स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञालेखाव्दारे लिहून दिल्यास अटी व शर्तीचे अधिन राहून (Subject to the conditions) विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर सुधार प्रन्यास तक्रारदारांच्या भूखंडांचे नियमितीकरणास मंजूरी देऊ शकतील परंतु या मुद्दावर कोणताही आदेश अतिरिक्त ग्राहक मंच देऊ शकत नाही.
22. उपरोक्त नमुद दोन्ही तक्रारीं मध्ये सकृत दर्शनी नागपूर सुधार प्रन्यास यांचे कडून जो पुरावा दाखल करण्यात आलेला आहे, त्यामध्ये दोन्ही तक्रारदारांचे भूखंड ज्या ले आऊट मध्ये स्थित आहेत ते ले आऊट आणि त्या ले आऊट लगतच्या अन्य दोन लेआऊट मधील सिमावाद आहे आणि जो पर्यंत सर्व भूखंडधारक एकत्रितयेऊन मोजणीसाठी अर्ज नगर भूमापन कार्यालयात करीत नाही तो पर्यंत हा वाद मिटू शकत नाही. तक्रारदारानीं अन्य दोन ले आऊटच्या प्रवर्तक ज्यांच्या ले आऊटच्या सिमा या तक्रारदारांच्या ले आऊटच्या सिमेशी परस्पर व्याप्त (Overlap) होत असल्याने त्यांना या प्रकरणात प्रतिपक्ष बनविलेले नाही त्यामुळे अशा परिस्थितीत अतिरिक्त ग्राहक मंचाला या प्रकरणां मध्ये कोणताही आदेश देता येत नाही, परिणामी या दोन्ही तक्रारी खारीज होण्यास पात्र आहेत.
23. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही, नमुद तक्रारीं मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) उपरोक्त नमुद दोन्ही तक्रारीतील तक्रारदार अनुक्रमे श्री संदीप मिहीर भट्टाचार्य आणि सौ.मनिषा रविंद्रनाथ भट्टाचार्य यांच्या विरुध्दपक्ष क्रं-1) सम्राट नवशक्ती जनविकास संस्था मार्फत सचिव श्री जगदिश जोशी आणि विरुध्दपक्ष क्रं-2) सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर यांचे विरुध्दच्या तक्रारी खारीज करण्यात येतात.
(2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(3) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात. निकालपत्राची मूळ प्रत ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/749 मध्ये लावण्यात यावी आणि अन्य ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/750 मध्ये निकालपत्राची प्रमाणित प्रत लावण्यात यावी.