::निकालपत्र::
(पारीत व्दारा श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्यक्ष.)
(पारीत दिनांक–24 जुन, 2014)
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये विरुध्दपक्षा विरुध्द दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात आशय येणे प्रमाणे-
तक्रारकर्ता शेतकरी असून उपरोक्त नमुद पत्त्यावर राहतो. यातील विरुध्दपक्ष क्रं 1 हे उपरोक्त नमुद सोसायटीचे अध्यक्ष आहेत तर विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 हे सोसायटीचे पदाधिकारी आहेत. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष सोसायटी तर्फे कर्ज घेऊन हिरो होंडा दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला. विरुध्दपक्ष क्रं-1 राजु देवनाथजी पारवे यांची पारवे मोर्टस ही फर्म एन.के.कुसुमागर कंपनी, नागपूर-09 ची सब डिलर असल्याची माहिती देण्यात आली व कर्जाने वाहन त्यांचे कडूनच खरेदी करण्याचा आग्रह केला.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने वि.प.क्रं 1 चे मालकीचे पारवे मोटर्स यांनी दिलेल्या कोटेशन नुसार डाऊन पेमेंट म्हणून रुपये-16,000/- चा भरणा दि.19.03.2009 रोजी पावती क्रं 369 प्रमाणे केला व वाहन प्राप्त केले. कर्जाची रक्कम प्रतीमाह रुपये-1540/- प्रमाणे एकूण 24 मासिक किस्तीमध्ये जमा करावयाची होती. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे मालकीचे पारवे मोटर्स आणि समिधा क्रेडीट सोसायटी येथे कर्जापोटी खालील प्रमाणे रकमा जमा केल्यात.
अक्रं | दिनांक | पावती क्रं | भरलेली रक्कम | कोणाकडे रक्कम जमा केली |
1 | 23/04/2009 | 07 | 1540/- | पारवे मोटर्स, भिवापूर |
2 | 23/05/2009 | 33 | 1500/- | पारवे मोटर्स, भिवापूर |
3 | 23/06/2009 | 70 | 1540/- | पारवे मोटर्स, भिवापूर |
4 | 21/07/2009 | 93 | 1140/- | समिधा क्रेडीट को-ऑप. सोसा. |
5 | 24/09/2009 | 129 | 2500/- | समिधा क्रेडीट को-ऑप. सोसा. |
6 | 23/12/2009 | 204 | 1500/- | समिधा क्रेडीट को-ऑप. सोसा. |
7 | 23/02/2010 | 246 | 3000/- | समिधा क्रेडीट को-ऑप. सोसा. |
8 | 03/11/2011 | 839 | 5000/- | समिधा क्रेडीट को-ऑप. सोसा. |
9 | 18/11/2011 | पावती नं.नाही | 15,000/- | समिधा क्रेडीट को-ऑप. सोसा. |
| | एकूण जमा रक्कम | 32,720/- | |
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने वाहन कर्ज घेताना सिक्युरिटी पोटी बँक ऑफ इंडीया शाखा, नागपूर खाते क्रं-870010101100015 चे 03 कोरे साक्षांकीत धनादेश क्रं-961084, 961085, 961086 विरुध्दपक्षाकडे जमा केले. तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या हिरो होन्डा स्प्लेन्डर प्लस वाहनाची एकूण किंमत रुपये-42,295/- आहे. त्यापैकी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे डाऊन पेमेंट म्हणून रुपये-16,000/- (+) वेळोवेळी मासिक किस्तीव्दारे जमा केलेली रक्कम रुपये-32,720/- असे एकूण रुपये-48,720/- चा भरणा केला. विरुध्दपक्ष क्रं 4 यांनी तक्रारकर्त्याचे कर्जाची रक्कम परतफेड झाल्याचे सांगून दि.18.11.2011 रोजी पावतीसह गाडी मालकी हक्का बद्दलचे सर्व दस्तऐवज पुरविले, त्यावर तक्रारकर्त्याने 03 धनादेशाची मागणी केली असता सदर धनादेश वि.प.क्रं 1 यांचे कडून प्राप्त करण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने वारंवार धनादेशासाठी आणि दुस-या चावीसाठी प्रत्यक्ष विरुध्दपक्षाकडे भेटी देऊन विनंती केली परंतु
प्रतिसाद मिळाला नाही. दि.19.08.2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं 4 यांनी तक्रारकर्त्याचे गैरहजेरीत त्याचे घरातून वाहन सर्व्हीसिंगचा बहाणा करुन वाहन उचलून नेले. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. तक्रारकर्त्याने अधिवक्ता यांचे मार्फतीने दि.24.11.2013 रोजी विरुध्दपक्षानां नोटीस पाठविली असता विरुध्दपक्षा तर्फे दि.11.12.2013 रोजी उत्तर देऊन सोसायटीचे कर्ज थकीत असल्याने तक्रारकर्त्याचे वाहनाची विल्हेवाट लावल्याचे नमुद केले. वस्तुतः तक्रारकर्त्याने खरेदी केलेले दुचाकी वाहन क्रं-महा-40/एस.आर.7413 चे कर्जाचे रकमेची संपूर्णपणे परतफेड करुन सुध्दा व मालकी हक्का बद्दलचे सर्व मूळ दस्तऐवज तक्रारकर्त्याकडे असताना विरुध्दपक्षाने अवैधरित्या वाहन जप्त करुन स्वतःचे उपयोगासाठी वापरत आहे.
विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्यास शारिरीक मानसिक त्रास व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास वाहनाचे करारपत्र, डयुप्लीकेट चाबी, 03 धनादेश, नाहरकत-प्रमाणपत्र व जप्त केलेले वाहन परत करण्याचा आदेश व्हावा. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे जप्त केलेल्या वाहनाची विक्री केली असल्यास नविन वाहन देण्याचे आदेशित व्हावे. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रास व आर्थिक नुकसानी बद्दल भरपाई म्हणून रुपये-70,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-20,000/- विरुध्दपक्षा कडून मिळावे अशा मागण्या केल्यात.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 समिधा क्रेडीट को-ऑप.सोसायटी, भिवापूर व्दारा अध्यक्ष, राजू देवनाथजी पारवे आणि वि.प.क्रं 2 समिधा क्रेडीट को-ऑप.सोसायटी, भिवापूर व्दारा उपाध्यक्ष यांना अनुक्रमे नि.क्रं-6 व क्रं-7 प्रमाणे मंचाची नोटीस मिळाल्या बद्दल पोस्टाच्या पोच अभिलेखावर दाखल आहेत. परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी निवेदनही सादर केले नाही म्हणून वि.प.क्रं 1 व क्रं 2 विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दि.29.04.2014 रोजी प्रकरणात पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं-3 अमोल पांडूरंगजी निमजे, व्यवस्थापक याने आपले स्वाक्षरीचे लेखी निवेदन दि.04.04.2014 रोजी मंचा समक्ष सादर केले. वि.प.क्रं 3 ने आपले लेखी निवेदनात तक्रारकर्ता विजय नोकचंद आंबेकर हे सोसायटीचे कर्जदार आहेत व त्यांनी कर्ज दि.23.03.2009 रोजी घेतले होते
परंतु तक्रारकर्त्याने कर्जाची रक्कम भरली नसल्यामुळे त.क.चे वाहन पोलीसांचे परवानगीने जप्त केले. वाहन जप्ती पूर्व तक्रारकर्त्यास वारंवार नोटीसव्दारे सुचित करुनही त.क.ने दुर्लक्ष केले. तक्रारकर्त्याने आपले नोटीसमध्ये दि.18.11.2011 रोजी पैसे भरल्या बद्दल ज्या पावतीचा उल्लेख केला आहे, ती खोटया स्वरुपाची पावती आहे कारण यापूर्वी निर्गमित केलेल्या पावत्या हया छापील आणि स्टॅम्प मारलेल्या आहेत. तक्रारकर्त्यास दिलेले कर्ज 24 मासिक हप्त्यांमध्ये फेडावयाचे होते. तक्रारकर्त्याकडे दि.19.01.2013 पर्यंत रुपये-19,484/- आणि त्यावरील व्याज रुपये-7613/- असे मिळून एकूण रुपये-27,097/- थकीत आहेत.
05. विरुध्दपक्ष क्रं 4) सुधिर सुधाकर समर्थ, अभिकर्ता याने दि.29.04.2004 रोजी पुरसिस दाखल करुन, विरुध्दपक्ष क्रं 3 ने मंचा समक्ष सादर केलेले लेखी निवेदन हेच त्याचे लेखी उत्तर समजण्यात यावे असे कळविले.
06. तक्रारकर्त्याने निशाणी क्रं 03 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात, ज्यामध्ये पैसे भरल्याच्या पावत्यांच्या प्रती, वाहन नोंदणी प्रमाणपत्र पावती, टॅक्स प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, मोटर वाहन विमा, वाहनाचे बिल, स्मॉर्ट कॉर्ड, तक्रारकर्त्याने पाठविलेली नोटीस, विरुध्दपक्षाचे नोटीसला दिलेले उत्तर अशा दस्तऐवजांचे प्रतींचा समावेश आहे.
07. विरुध्दपक्ष क्रं 3 ने लेखी निवेदन सादर केले. अन्य दस्तऐवज सादर केले नाहीत.
08. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री बाळासाहेब वर्मा तर वि.प.क्रं 3 सचिव, अमोल पांडूरंग निमजे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
09. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार आणि विरुध्दपक्ष क्रं 3 चे लेखी निवेदन तसेच प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजां वरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ घेण्यात आले.
मुद्दा उत्तर
(1) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा
दिल्याची बाब सिध्द होते काय?........................होय.
(2) त्यासाठी कोण वि.प. जबाबदार आहेत?...............वि.प.क्रं 1 व 2
(3) काय आदेश?.....................................................तक्रार अंशतः मंजूर.
:: कारण मिमांसा व निष्कर्ष ::
मुद्दा क्रं-1 ते 3-
10. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतीं वरुन त्याने वि.प.क्रं 1 चे पारवे मोटर्स येथे वाहनाचे कर्जापोटी डाऊन पेमेंट म्हणून रुपये-16,000/- चा भरणा दि.19.03.2009 रोजी पावती क्रं 369 व्दारे केल्याचे दाखल पावतीचे प्रतीवरुन दिसून येते. तसेच वाहनाचे कर्ज परतफेडी पोटी दिनांक- 23/04/2009 ते 18/11/2011 या कालावधीत मासिक किस्तीव्दारे वेळोवेळी एकूण रुपये-32,720/- असे मिळून एकूण रुपये-48,720/- चा भरणा केल्याची बाब दाखल पावत्यांच्या प्रतींवरुन सिध्द होते. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं 3 यांचे लेखी निवेदना नुसार कर्जाचे रकमेची व्याजासह परतफेड प्रतीमाह रुपये-1540/- प्रमाणे एकूण 24 मासिक किस्तीमध्ये करावयाची होती, याचा हिशेब केल्यास ती रक्कम रुपये-36,960/- एवढी येते.
11. विरुध्दपक्ष क्रं-3 अमोल पांडूरंगजी निमजे, व्यवस्थापक याने आपले लेखी निवेदनात असा आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्याने समिधा को-ऑप. सोसायटी व्दारे निर्गमित दि.18.11.2011 रोजीची रक्कम रुपये-15,000/- ची पावती क्रमांक नसलेली जी पावती अभिलेखावर दाखल केली आहे, तीच मूळात खोटया स्वरुपाची आहे. कारण विरुध्दपक्ष समिधा क्रेडीट को-ऑप. सोसायटीव्दारे निर्गमित पावत्या या छापील आणि स्टॅम्प मारलेल्या आहेत.
12. मंचाव्दारे प्रकरणातील वादातील दि.18.11.2011 च्या पावतीचे प्रतीचे सुक्ष्म अवलोकन केले असता सदर पावतीवर हस्ताक्षरात समिधा को-ऑप. सोसायटी, भिवापूर विजय आंबेकर 15000/- जमा दि.18.11.2011 असे नमुद केले असून बाजूला सोसायटीचा शिक्का मारलेला असून त्यावर संक्षीप्त स्वाक्षरी केलेली आहे. सदर दि.18.11.2011 चे पावती वरील संक्षीप्त स्वाक्षरी ही समिधा क्रेडीट को-ऑप. सोसायटी भिवापूर या छापील पावती क्रं 839, दि.03.11.2011 वरील संक्षीप्त स्वाक्षरीशी मिळती जुळती तसेच पारवे मोटर्स यांचे कडून निर्गमित हस्तलिखित दि.23.04.2009 रोजीचे पावती वरील
संक्षीप्त हस्ताक्षराशी मिळती जुळती आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-3 अमोल पांडूरंग निमजे, व्यवस्थापक याचा आक्षेप की, दि.18.11.2011 रोजीची रुपये-15,000/- ची पावती खोटया स्वरुपाची आहे यात काहीही तथ्य दिसून येत नाही.
13. तक्रारकर्त्याचे नोटीसला विरुध्दपक्षाचे अधिवक्ता श्री प्रभाकर नागोशे यांनी दि.11.12.2013 रोजी जे उत्तर पाठविले त्यामध्ये असे नमुद केले की, तक्रारकर्त्यास समिधा क्रेडीट को-ऑप. सोसायटी, भिवापूर यांचे कडून दि.23.03.2009 रोजी हिरो होंडा स्प्लेंडर एम.एच.40/एस.आर.7413 विकत घेण्यासाठी रुपये-29,000/- कर्ज दिले होते, त्यापैकी रुपये-17,720/- दि.03.11.2011 पर्यंत जमा केले. त्यानंतर वारंवार कर्ज भरण्याची सुचना तक्रारकर्त्यास देऊन सुध्दा त.क.ने कर्जाचे रकमेचा भरणा करणे बंद केले. तक्रारकर्त्याकडे दि.13.09.2013 पर्यंत कर्ज रक्कम रुपये-19,484/- आणि थकीत रकमेवरील व्याज रुपये-7,616/- असे एकूण रुपये-27,097/- घेणे असल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याने आर्थिक स्थिती बरोबर नसल्याने थकीत रक्कम देणे शक्य नसल्याने वाहन स्वतःहून विरुध्दपक्षाकडे परत केले. परंतू त्यानंतरही थकीत रक्कम भरणा करण्या विषयी तक्रारकर्त्यास कळवूनही प्रतिसाद न दिल्याने तक्रारकर्त्याचे वाहनाची विल्हेवाट लावली व त्या करीता सर्वस्वी तक्रारकर्ता जबाबदार असल्याचेही नमुद केले.
14. विरुध्दपक्षाचे अधिवक्ता श्री प्रभाकर नागोशे यांचे सदरचे उत्तरा वरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्षास तक्रारकर्त्याने दि. 23/04/2009 ते 03/11/2011 पर्यंत कर्ज परतफेडी पोटी वेळोवेळी मासिक किस्तीव्दारे रुपये-17,720/- भरल्याची बाब मान्य आहे परंतु विरुध्दपक्षा तर्फे नोटीसला दिलेल्या उत्तरात समिधा को-ऑप. सोसायटीची दि.18.11.2011 रोजीची रक्कम रुपये-15,000/- ची पावती नाकारण्यात आलेली आहे वर नमुद केल्या प्रमाणे सदरची पावती वि.प.व्दारे दिल्याची बाब सिध्द झालेली असल्यामुळे विरुध्दपक्षास मान्य असलेली रक्कम रुपये-17,720/- (+) दि.18.11.2011 ची पावती रक्कम रुपये-15,000/- असे मिळून एकूण रुपये-32,720/- तक्रारकर्त्याने भरल्याचे सिध्द होते. तक्रारकर्त्यास कर्जाची रक्कम रुपये-1540/- प्रमाणे एकूण 24 मासिक किस्तींमध्ये एकूण रुपये-36,960/- भरावयाची होती ही बाब उभय पक्षांनाही मान्य आहे. विरुध्दपक्षाने आपले नोटीसचे उत्तरात
असेही नमुद केले की, त्यांनी थकीत रक्कम भरण्या विषयी वारंवार तक्रारकर्त्यास सुचित केले परंतु तक्रारकर्त्यास थकीत रक्कम भरणा करण्या बद्दल लेखी सुचना दिल्या बद्दलचा कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. दि.18.11.2011 रोजीची रुपये-15,000/- ची पावती छापील स्वरुपात नसल्याचा फायदा घेऊन विरुध्दपक्ष ती नाकारत असल्याचे दिसून येते. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्या कडील वाहन जप्त करुन त्याची विल्हेवाट लावल्याचे नोटीसचे उत्तरात नमुद केले आहे. वाहन जप्तीचा पंचनामा करण्यात आला नाही आणि जप्त वाहनाची विल्हेवाट लावण्यापूर्वी तक्रारकर्त्यास लेखी सूचना दिल्याचा कोणताही पुरावा विरुध्दपक्षाने सादर केला नाही. तसेच सदरचे वाहन कोणाला, कधी, कसे व किती किंमतीस विकले याची माहिती तक्रारकर्त्यास दिली नाही व कर्जाची रक्कम कपात करुन उर्वरीत रक्कम दिली नाही. या सर्व वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्याने कर्जाची व्याजासह जवळपास 90% रक्कम म्हणजे रुपये-32,720/- परतफेड केल्या नंतर त्याचे कडे केवळ रुपये-4240/- एवढी आंशिक बाकी असताना त्यास राहिलेली कर्जाची रक्कम भरण्यासाठी कोणतीही लेखी पूर्व सुचना न देता जबरीने वाहन जप्त करुन परस्पर विल्हेवाट लावणे ही वि.प.क्रं 1 व 2 ची कृती दोषपूर्ण सेवा तसेच अनुचित व्यापारी पध्दती या सदरात मोडणारी आहे.
15. वरील सर्व वस्तुस्थिती वरुन सिध्द होते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष समिधा क्रेडीट को-ऑप. सोसायटी कडून घेतलेल्या कर्जाची व्याजासह जवळपास 90% परतफेड केलेली आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाचा आक्षेप की, तक्रारकर्त्याकडे दि.13.09.2013 पर्यंत कर्ज रक्कम रुपये-19,484/- आणि थकीत रकमेवरील व्याज रुपये-7,616/- असे एकूण रुपये-27,097/- थकीत आहेत यात काहीही तथ्य मंचास दिसून येत नाही. तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष समिधा क्रेडीट को-ऑप. सोसायटी तर्फे वाहन विकत घेण्यासाठी दि.23.03.2009 रोजी रुपये-29,000/- कर्ज दिले होते व व्याजासह 24 महिन्यात एकूण रुपये-36,960/- फेडावयाचे होते. त्या कर्ज फेडीपोटी दि.18.11.2011 पर्यंत रुपये-32,720/- परतफेड केल्याने तक्रारकर्त्याकडे कर्जाची रक्कम रुपये-4240/- थकीत असल्याची बाब सिध्द होते. विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 हे समिधा को-ऑप. सोसायटीचे अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत तर विरुध्दपक्ष क्रं 3 अमोल पांडूरंग निमजे यांचे मंचा समक्ष दाखल लेखी निवेदना वरुन ते समिधा को-ऑप. सोसायटीचे व्यवस्थापक आहेत तर विरुध्दपक्ष क्रं 4 सुधिर सुधाकर समिर हे सोसायटीचे एजंट आहेत. विरुध्दपक्ष
क्रं 3 व 4 हे सोसायटीचे अनुक्रमे नौकर आणि एजंट असून त्यांनी संस्थेच्या पदाधिका-यांच्या आदेशा प्रमाणे वाहन जप्त केले आहे, त्यामुळे त्यांना
वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 हे सोसायटीचे पदाधिकारी असल्यामुळे तसेच विरुध्दपक्ष क्रं-1 राजू देवनाथ पारवे हे सोसायटीचे अध्यक्ष आहेत आणि पारवे मोटर्स म्हणूनही व्यवसाय करतात त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 हेच जबाबदार ठरतात. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्या कडून जप्त केलेल्या वाहनाची विल्हेवाट लावली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे मूळ वाहन उपलब्ध नसल्याने, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांचे कडून हिरो होंडा स्प्लेंडर प्लस नविन वाहन आवश्यक कायदेशीर दस्तऐवजांसह थकीत रुपये-4240/- भरुन मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे कर्जाचे सिक्युरिटीपोटी बँक ऑफ इंडीया शाखा, नागपूर खाते क्रं-870010101100015 चे जमा केलेले 03 कोरे साक्षांकीत धनादेश क्रं-961084, 961085, 961086 परत मिळण्यास पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 चे दोषपूर्ण सेवेमुळे आणि अनुचित व्यापारी प्रथे मुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल तसेच आर्थिक हानी (जप्त केलेल्या वाहनाचा टॅक्स रुपये-2469/- तक्रारकर्त्याने भरलेला आहे) बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रार खर्च म्हणून रुपये-5000/- वि.प.क्रं 1 व क्रं 2 कडून मिळण्यास पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 व क्रं 4 हे सोयायटीचे अनुक्रमे व्यवस्थापक आणि एजंट म्हणून असल्याने त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येते. म्हणून मुद्दा क्रं 1 ते 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविलेले असून मंचा तर्फे प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
::आदेश::
तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 समिधा क्रेडीट को-ऑप. सोसायटी, भिवापूर (र.न.1236/09) तर्फे अध्यक्ष राजू देवनाथजी पारवे तसेच विरुध्दपक्ष क्रं-2 समिधा क्रेडीट को-ऑप. सोसायटी, भिवापूर (र.न.1236/09) तर्फे उपाध्यक्ष यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
1) विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्या कडून रुपये-4240/-(अक्षरी रुपये चार हजार दोनशे चाळीस फक्त) स्विकारुन तक्रारकर्त्याचे अनधिकृतरित्या जप्त केलेले वाहन क्रं-MH-40-SR-7413 डयुप्लीकेट चाबीसह आणि चालू स्थितीत संपूर्ण कायदेशीर कागदपत्रांसह तक्रारकर्त्यास द्दावे व ते योग्यस्थितीत मिळाल्या बाबत तक्रारकर्त्या कडून लेखी पोच घ्यावी आणि सदर वाहनाची अनधिकृतपणे विल्हेवाट लावली असल्यास त्या बदल्यात नविन हिरो होंडा स्प्लेंडर प्लस हे वाहन डयुप्लीकेट चाबीसह तसेच संपूर्ण कायदेशीर दस्तऐवजासह तक्रारकर्त्यास द्दावे.
2) तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरीक व मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) वि.प.क्रं 1 व क्रं 2 यांनी तक्रारकर्त्यास द्दावेत.
3) तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे कर्जाचे सिक्युरिटीपोटी बँक ऑफ इंडीया शाखा, नागपूर खाते क्रं-870010101100015 चे जमा केलेले 03 कोरे साक्षांकीत धनादेश क्रं-961084, 961085, 961086 तक्रारकर्त्यास परत करावेत.
4) विरुध्दपक्ष क्रं- 3 व क्रं 4 यांना प्रस्तुत तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
5) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे..
6) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात यावी.