जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 120/2020. तक्रार दाखल दिनांक : 15/09/2020. तक्रार निर्णय दिनांक : 03/08/2022.
कालावधी : 01 वर्षे 10 महिने 19 दिवस
कल्लप्पा यशवंतप्पा बिराजदार, द्वारा : बालाजी क्लॉथ सेंटर,
वय 70 वर्षे, व्यवसाय : स्वंयरोजगार, रा. बँक कॉलनी रोड,
आडत मार्केट, निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
सब पोस्टमास्टर, पोस्ट ऑफीस, निलंगा,
कन्या शाळेच्या पाठीमागे, निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- अनिल के. जवळकर
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- एस.व्ही. देशपांडे
आदेश
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे निलंगा येथे बालाजी क्लॉथ सेंटर नांवे दुकान आहे. त्यांनी वाराणसी येथील यामीन कलेक्शन यांच्याकडून दि.28/3/2019 रोजी 51 साड्या खरेदी केल्या होत्या. त्यापैकी 42 साड्या त्यांनी यामीन कलेक्शन, वाराणसी यांना परत पाठविण्याकरिता 2 गठ्ठे तयार केले. ते 2 गठ्ठे यामीन कलेक्शन, वाराणसी यांना पाठविण्याकरिता विरुध्द पक्ष यांच्या ताब्यात दिले. त्याकरिता विरुध्द पक्ष यांनी पावती क्र. सी.एम. 458545798 आय.एन. रु.441/- व पावती क्र. सी.एम. 458545665 आय.एन. रु.489/- दिलेली आहे. 2 गठ्ठयापैकी 1 गठ्ठा फोडलेला असल्यामुळे यामीन कलेक्शन, वाराणसी यांनी स्वीकारला नाही आणि परत आलेला गठ्ठा तक्रारकर्ता यांनी पाहिला असता त्यातील 19 साड्या काढून कागदांची रद्दी भरलेली दिसून आली. त्यामुळे तक्रारकर्ता यांना 19 साड्यांच्या रु.33,335/- चे नुकसान झाले. त्यानंतर पाठपुरावा करुन व विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवूनही नुकसान भरपाई देण्याकरिता विरुध्द पक्ष यांनी दखल घेतली नाही. उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.489/- व रु.33,335/- व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.15,000/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांचे कथन असे की, डाक खात्याने पार्सल सुविधा उपलब्ध करुन दिलेली असून 20 कि.ग्रॅ. पर्यंत पार्सल सुविधेचा लाभ घेता येतो. तक्रारकर्ता यांनी 2 पार्सलची त्यांच्याकडे नोंदणी केलेली होती; परंतु त्यामध्ये असणा-या वस्तुबाबत ते अनभिज्ञ होते. नियमाप्रमाणे पार्सलमध्ये मुल्यवान वस्तू असल्यास त्याचा विमा काढण्याची वैयक्तिक जबाबदारी येते. विमा काढलेल्या पार्सलकरिता विरुध्द पक्ष विशेष सेवा देतात आणि त्याबाबत काही घडल्यास ग्राहकांना पार्सलचे सर्व मुल्य देण्यात येते. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारकर्ता यांनी पार्सलचा विमा काढलेला नव्हता आणि त्यातील वस्तू जाणीवपूर्वक लपवून ठेवल्या. तक्रारकर्ता यांना नियमाप्रमाणे पार्सल स्वीकारण्याबाबत कळविले असता तक्रारकर्ता यांनी त्याचा स्वीकार केला नाही. पोस्ट ऑफीस गाईड, भाग -1 च्या तरतूद क्र.170 प्रमाणे रु.100/- नुकसान भरपाई देय आहे. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश मजकूर अमान्य करुन ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष यांनी केलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच तक्रारकर्ता यांच्यातर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. तक्रारीमध्ये कथन केल्यानुसार तक्रारकर्ता यांनी 2 गठ्ठे यामीन कलेक्शन, वाराणसी यांना पाठविण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याकडे नोंदणी करुन व शुल्क अदा करुन ताब्यात दिले, हे विवादीत नाही. त्या 2 गठ्ठयापैकी 1 गठ्ठा फोडलेला असल्यामुळे यामीन कलेक्शन, वाराणसी यांनी स्वीकारला नाही, हे विशेष वादातीत नाही. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार 19 साड्या काढून घेतल्यामुळे त्यांना रु.33,335/- चे नुकसान झाले. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांचा प्रतिवाद असा की, गठ्ठयातील वस्तुबाबत ते अनभिज्ञ होते आणि तक्रारकर्ता यांनी पार्सलचा विमा काढलेला नसल्यामुळे पोस्ट ऑफीस गाईड, भाग -1 च्या तरतूद क्र.170 प्रमाणे रु.100/- नुकसान भरपाई देय आहे.
(5) उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्यामार्फत पाठविलेल्या 2 गठ्ठयांपैकी 1 गठ्ठा फोडलेला असल्यामुळे यामीन कलेक्शन, वाराणसी यांनी स्वीकारला नाही आणि तो परत करण्यात आला, हे अविवादीत आहे. परत आलेला गठ्ठा फोडून साड्या काढण्यात आल्यामुळे तक्रारकर्ता यांनी परत स्वीकारला नाही, हे अविवादीत आहे. तसेच 2 पैकी 1 गठ्ठा फोडण्यात आलेला होता, हे विरुध्द पक्ष यांनी अमान्य केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांच्या 2 गठ्ठयापैकी 1 गठ्ठयातील साहित्य गहाळ झाले, हे सिध्द होते आणि त्याकरिता विरुध्द पक्ष यांची यंत्रणा कारणीभूत ठरते.
(6) आमच्या मते, ज्यावेळी मालप्रेषक वाहतूक सेवेमध्ये मालप्रेषितीकडे पोहोच करण्यासाठी वस्तू, साहित्य किंवा माल ताब्यात देतो आणि त्याचे मुल्य अदा करतो, त्यावेळी त्याला विश्वास व हमी असते की, त्या वस्तू, साहित्य किंवा माल हे सुरक्षीत, विनानुकसान व हाणीशिवाय मालप्रेषितीच्या इच्छितस्थळी पोहोच होतील. त्याप्रमाणे वाहकाने त्या वस्तू, साहित्य किंवा माल हे काळजीपूर्वक वहन करुन इच्छितस्थळी पोहोच केल्या पाहिजेत. वस्तू, साहित्य किंवा मालाचे वहन करताना त्या गहाळ झाल्यास किंवा त्यांचे नुकसान झाल्यास तो वाहकाचा निष्काळजीपणा ठरतो आणि त्याची भरपाई करण्याची जबाबदारी केवळ त्याच्यावरच येते.
(7) नुकसान भरपाई देण्याचे दायित्व अमान्य करण्यासाठी विरुध्द पक्ष यांचा बचाव असा की, तक्रारकर्ता यांनी पार्सलचा विमा काढलेला नसल्यामुळे पोस्ट ऑफीस गाईड, भाग -1 च्या तरतूद क्र.170 प्रमाणे रु.100/- नुकसान भरपाई देय आहे. त्यांनी तरतूद क्र.170 चा लेखी संदर्भ सादर केला. उलटपक्षी, तक्रारकर्ता यांनी मा. राष्ट्रीय आयोगाच्या "इंडियन पोस्टल डिपार्टमेंट /विरुध्द/ मोनू झलानी" 2018 (4) सी.एल.टी. व "सिनीअर सुप्रीन्टेंडेंट ऑफ पोस्ट ऑफीसेस /विरुध्द/ रजनीकांत शर्मा" 2019 (2) सी.पी.आर. 298 (एन.सी.) या न्यायानिर्णयाचा संदर्भ सादर केला. विरुध्द पक्ष यांचे कथन असे की, नियमाप्रमाणे पार्सलमध्ये मुल्यवान वस्तू असल्यास त्याचा विमा काढण्याची वैयक्तिक जबाबदारी येते आणि तक्रारकर्ता यांनी पार्सलचा विमा काढलेला नव्हता. परंतु कायदेशीर तरतुदीनुसार साड्या ह्या मौल्यवान वस्तू आहेत, असे दिसत नाही. उक्त निवाड्यातील न्यायिक तत्व विचारात घेतले असता तक्रारकर्ता यांना झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचे दायित्व विरुध्द पक्ष यांना अमान्य करता येणार नाही. सर्व विवेचनाअंती विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होते आणि तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्याकरिता पात्र ठरतात.
(8) तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार गठ्ठयातील 19 साड्या काढण्यात आल्यामुळे त्यांना एकूण रु.33,335/- चे नुकसान झाले. असे दिसते की, तक्रारकर्ता यांनी यामीन कलेक्शन, वाराणसी यांच्याकडून खरेदी केलेल्या 51 साड्यांपैकी 42 साड्या परत करण्यासाठी 2 गठ्ठे तयार केले आणि त्यापैकी 1 गठ्ठयातील 19 साड्या गहाळ झाल्या. देयकांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता कथन करतात त्याप्रमाणे साड्यांचे मुल्य होते, हे अमान्य करता येत नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारकर्ता यांचे रु.33,335/- चे नुकसान झाले, हे ग्राह्य धरावे लागते. तसेच वहन मुल्य रु.489/- परत मिळण्याची तक्रारकर्ता यांची मागणी रास्त वाटते. कारण तक्रारकर्ता यांच्या वस्तू इच्छितस्थळी पोहोच झालेल्या नसल्यामुळे त्याचे वहन मुल्य आकारणी करता येणार नाही.
(9) तक्रारकर्ता यांनी वहन मुल्य रु.489/- व साड्यांचे मुल्य रु.33,335/- हे दि.28/1/2020 पासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने मागणी केलेली आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन त्यावर जिल्हा आयोगामध्ये ग्राहक तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देण्याकरिता विरुध्द पक्ष यांना आदेश करणे न्यायोचित आहे.
(10) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.15,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना नुकसान भरपाई मिळविण्याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी नुकसान भरपाई न दिल्यामुळे तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत.
(11) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना वहन मुल्य रु.489/- व साड्यांची नुकसान भरपाई रु.33,335/- द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना उक्त रकमेवर दि.15/9/2020 पासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
ग्राहक तक्रार क्र. 120/2020.
(3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/1822)