निकाल
दिनांक- 05.02.2014
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार राजेंद्र तुकाराम सोनवणे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी सेवा देण्यामध्ये कसूर केल्याबाबत झालेल्या आर्थिक व मानसिक नुकसानीसाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे सावरकर महाविद्यालय येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. सामनेवाला यांचे सत्कार कुशन वर्कस नावाचे नगर रोड बीड येथे कुशन बनविण्याचे दुकान आहे, त्याचे प्रो.प्रा.लहू सदाशिव नारायणकर आहे ते स्वतः दुकान चालवितात.
तक्रारदार याने सामनेवाला यांच्याकडे सोफासेटला कुशन करण्याकरता सोफा दिला होता सदर सोफासेट तयार करण्याकरता रक्कम रु.10,000/- मध्ये ठराव झालेला आहे. तक्रारदाराने ठरावानुसार रक्कम रु.6,500/- सोफासेटचे कुशन तयार करण्यासाठी अडव्हान्स म्हणून सामनेवाला यांना मधूकर लक्ष्मण चोपडे यांच्या समक्ष दिलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.6,500/- घेऊन सुध्दा तक्रारदार यांचे सोफासेटला कुशन बनवून दिले नाही. म्हणून तक्रारदाराने सामनेवाला यांच्या दुकानातून सोफासेट उचलून आणला व दुस-या दुकानामध्ये जाऊन सोफासेटला कुशन बनवून घेतले आहे.
सामनेवाला यांनी तक्रारदाराने दिलेले अडव्हान्स रक्कम रु.6,500/- अद्याप पर्यंत तक्रारदार परत केलेले नाही. तक्रारदार याने ब-याच वेळा सामनेवाला यांच्याकडे पैशाची मागणी केली, सामनेवला यांनी त्यावर उडवाउडवीचे उत्तर देऊन पैसे देण्याचे टाळले. तसेच सामनेवाला व तक्रारदाराचा मित्र मधूकर लक्ष्मण चोपडे यांनी सुध्दा मध्यस्थी करुन सामनेवाला यास समजावून सांगून पैसे परत देण्याबाबत विनंती केली आहे परंतू सामनेवाला यांनी अद्यापपर्यंत तक्रारदार यास रक्कम परत दिलेली नाही. सामनेवाला हे रक्कम रु.6,500/- परत देत नाही म्हणून तक्रारदार यांनी दि.30.09.2013 रोजी वकीलामार्फत सामनेवाला यास नोटीस पाठविली आहे, सदर नोटीस सामनेवाला यांना मिळाली असून त्या नोटीसचे उत्तर सामनेवाला यांनी दिले नाही व रक्कम परत केलेली नाही. सामनेवाला यांनी सेवेत कसूर करुन तक्रारदाराची फसवणूक केली आहे. त्यामुळे तक्रारदारास आर्थक, मानसिक व शारिरिक नुकसान झाले आहे. म्हणून सदर नुकसानी पोटी तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.50,000/- तसेच सामनेवाला यांनी घेतलेली रक्कम रु.6,500/-, नोटीस व अर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- व्याजासहीत मागणी केली आहे व तक्रारदाराचा अर्ज मंजूर करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
सामनेवाला यांना रजिस्टर पोस्टामार्फत निशाणी क्र. 7 अन्वये नोटीस बजावली. सामनेवाला हे मंचासमोर हजर झाले नाही. सबब त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश झालेला आहे.
तक्रारदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र तसेच सामनेवाला यांना वकीलामार्फत दिलेली नोटीस दाखल केली आहे. तसेच तक्रारदार यांनी मधूकर लक्ष्मण चोपडे यांचे शपथपत्र व बँकेचा खाते उतारा पुराव्याकामी दाखल केलेले आहे. तक्रारदाराचे वकीलांनी केलेला युक्तीवाद ऐकला. त्यावरुन न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) तक्रारदार यांना सामनेवाला यांनी सेवा
देण्यात त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार यांनी सिध्द केली आहे काय? होय.
2) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय? होय.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.सोनवणे यांनी युक्तीवादात सांगितले की, तक्रारदार हे सावरकर महाविद्यालय येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. त्यांनी सामनेवाला यांच्याकडे स्वतःचा सोफासेट कुशन करण्याकरता दिला होता. सदर सोफासेटला कुशन करण्याकरता सामनेवाला व तक्रारदार यांच्यामध्ये रु.10,000/- देण्याचे कबूल केले होते.सदर ठरावाप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला यांना सोफासेट कुशन करण्याकरता त्याबददल लागणारे सामान आणण्यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना अडव्हान्स म्हणून रक्कम रु.6,500/- तक्रारदार व सामनेवाला यांचा मित्र मधूकर लक्ष्मण चोपडे यांचे समक्ष दिलेले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना अडव्हान्स रक्कम दिल्यानंतरही सामनेवाला यांनी तक्रारदाराचे सोफासेटचे कुशन विहीत मुदतीत तयार करुन दिले नाही. सामनेवाला यांच्या दुकानात तक्रारदाराचा सोफासेट दोन महिने तसाच पडलेला होता. तदनंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून सदर सोफासेट आणून दुस-या दुकानामध्ये सोफासेटचे कुशन तयार करुन घेतलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराची अडव्हान्स रक्कम रु.6,500/- परत केले नाही व सोफासेट कुशन सुध्दा तयार करुन दिले नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कसूर केला आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाला यांना नोटीस बजावली असता मंचासमोर ते हजर झाले नाही. सबब त्यांचे विरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश झालेला आहे.
वर नमुद केलेला युक्तीवाद याचे बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदार याने दाखल केलेले कागदपत्र आणि पुराव्याकामी दाखल केलेले शपथपत्र याचे अवलोकन केले. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार याने सामनेवाला यांना स्वतःचा सोफासेट कुशन बनवण्याकरता दिला होत, त्यासाठी त्यांनी अडव्हान्स म्हणून रक्कम रु.6,500/- सामनेवाला यास दिले आहे, ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी स्वतःचा बँकेचा खाते उतारा दाखल केला आहे त्याचे अवलोकन केले असता दि.17.07.2013 रोजी तक्रारदार यांनी बॅकेतून रु.7,000/- काढले आहे असे निदर्शनास येते. तक्रारदार याने रक्कम रु.6,500/-सामनेवाला यास अडव्हान्स म्हणून दिलेली आहे. ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी मधूकर लक्ष्मण चोपडे यांचे शपथपत्र दाखल केले आहे. त्याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सामनेवाला यांना रु.6,500/- अडव्हान्स म्हणून मधूकर लक्ष्मण चोपडे यांच्या समक्ष दिलेले आहे ही बाब सिध्द होते.
सामनेवाला यांचे सत्कार कुशन वर्क्स नावाचे दुकान आहे. सामनेवाला यांचा व्यवसाय कुशन वर्क्स करणे असा आहे. सामनेवाला यांचे आद्यकर्तव्य आहे की ग्राहकास योग्य ती सेवा देण्याचे परंतू सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून आगाऊ रक्कम घेऊन सुध्दा तक्रारदाराचे सोफासेट कुशन तयार केले नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना रक्कम रु.6,500/- ची वेळोवेळी मागणी करुनही सामनेवाला यांनी सदर रक्कम तक्रारदारास परत केलेली नाही. त्यामुळे तक्रारदारास शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यास कसूर केलेला आहे ही बाब सिध्द होते. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून अडव्हान्स दिलेली रक्कम रु.6,500/- तसेच तक्रारदारास झालेल्या शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.1,000/- मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला यांनी तक्रारदारास अडव्हान्स म्हणून घेतलेली रक्कम रु.6,500/-निकाल कळाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावे. सदर
रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास सदर रकमेवर तक्रार दाखल
तारखेपासून वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड