Dated the 04 Apr 2015
न्यायनिर्णय
द्वारा- श्री.म.य.मानकर...................मा.अध्यक्ष.
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ही सामनेवाले नं.1 व 2 जे विकासक आहेत, त्यांच्या विरुध्द त्यांना त्यांच्या सदनिकेचा ताबा न दिल्यामुळे दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची तक्रार याप्रमाणे कि ते श्री.जी.पी.परुळेकर यांची सदनिका ए-01, 325 चौरस फुट क्षेत्रफळ असलेली सुहास बिल्डींग, प्लॉट नं.27, डोंबिवली को-ऑप.हौसिंग सोसायटी लि., रामनगर, डोंबिवली-पुर्व, यामध्ये ते भाडेकरु होते. ते सन-1984 पासुन भाडेकरु होते व मासिक भाडे रु.80/- होते. श्री.जी.पी.परुळेकर यांचा मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती सरोजीनी परुळेकर हया घरमालक झाल्या. त्यांनी सदरील इमारत सन-1993 मध्ये श्री.पाटकर यांना विकली, श्री.पाटकर यांनी तक्रारदारांना भाडेकरु म्हणुन स्विकारले. श्री.पाटकर यांचे सामनेवाले नं.1 विकासक यांच्या सोबत करार झाला. सामनेवाले नं.1 यांनी तितक्याच क्षेत्रफळाची सदनिका नविन इमारतीमध्ये रु.73,800/- च्या मोबदल्यात तक्रारदारांना देण्याचा करार केला, त्याप्रमाणे सामनेवाले नं.1 व तक्रारदार यांच्यामध्ये ता.02.01.1996 ला करार झाला व तो ता.11.03.1997 रोजी पंजिकृत करण्यात आला. कराराप्रमाणे सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारास सदनिका क्रमांक-3 सन-2000 साली देण्याचे कबुल केले. सन-2010 मध्ये सामनेवाले नं.2 यांनी पुढील बांधकाम करण्यास सुरुवात केली व त्यांनी Sanction Plan Revise केला. ता.02.11.2011 रोजी सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांस सोसायटी/ मिटर करीता रु.1,50,000/- ची मागणी केली. ती तक्रारदार यांनी पुर्ण केली. सदनिकेचा ताबा तक्रारदार यांना दिला नाही व जास्त रकमेची मागणी करीत आहे. तक्रारदार यांनी या तक्रारीव्दारे सामनेवाले यांनी सेवा पुरविण्यात कसुर केला व अनुचित व्यापार पध्दत अवलंबवली तसेच तळ मजल्यावरील सदनिका क्रमांक-3, 325 चौरस फुट क्षेत्रफळ असलेलीची मागणी केली तसेच तक्रारीचा खर्च व इतर मागण्यां करीता ही तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारदार यांनी तक्रारीच्या पृष्ठयार्थ काही कागदपत्र दाखल केली, तसेच शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला.
4. सामनेवाले यांना मंचातर्फे लेखी कैफीयत दाखल करणे कामी नोटीस काढण्यात आली होती. सामनेवाले नं.2 यांना तक्रारदाराच्या वकीलांनी कुरियर मार्फत ता.16.01.2013 रोजी पाठविलेली नोटीस ‘ शिफ्ट ’ या शे-यासह परत आली. तसेच रजिष्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस पोस्टाच्या “अनक्लेम्ड” या शे-यासह परत आली. सामनेवाले नं.2 यांना ता.23.09.2013 रोजी रजि. पोस्टाने पाठविलेली नोटीस “ लेफट ” या शे-यासह परत आली. सामनेवाले यांच्या विरुध्द दैंनिक प्रहारमध्ये ता.07.10.2013 रोजी जाहिर नोटीस प्रकाशीत करण्यात आली होती. सामनेवाले हे मंचासमोर हजर झाले नाहीत, तक्रारदार यांनी ता.09.05.2013 रोजी सामनेवाले यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारित व्हावा असा अर्ज दाखल केला होता. त्यावर मंचाने ता.13.11.2013 रोजी सामनेवाले यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश चालविण्याबाबत पारित केला.
5. तक्रारदार यांचे निवेदन अभिलेखावर अबाधित आहे. तक्रारदार यांनी त्यांचे म्हणणे सिध्द केले किंवा नाही हे पाहणे आवश्यक ठरते. तक्रारदार यांनी भाडे करारपत्र ता.11.03.1984 चे, तसेच भाडे पावत्या ता.11.03.1984 व ता.03.12.1995 च्या दाखल केल्या आहेत. यावरुन हे निर्वीवादपणे सिध्द होते की, तक्रारदार हे सदरील सदनिकेमध्ये भाडेकरु म्हणून राहत होते.
6. तक्रारदार यांना नियोजित नविन इमारतीमध्ये सदनिका देणेबाबत करार झाला होता का ? सामनेवाले यांनी त्यांना श्रीमती सरोजीनी परुळेकर यांनी लिहिलेल्या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, त्या त्यांची इमारत श्री.पाटकर यांना विकत आहेत, तक्रारदार यांनी ता.16.11.1995 चे कागदपत्र दाखल केले त्यावरुन सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांना नियोजित इमारतीतील ब्लॉक नं.03, 325 चौरस फुट बिल्टप क्षेत्र असलेला देण्याचा करार केला होता, त्याचा मोबदला म्हणुन तक्रारदारांनी रु.73,800/- देण्याचा करार केला होता व सामनेवाले नं.1 यांनी रुम नंबर-03 ही तक्रारदारास विकण्याचा करार केला होता. सदरील करारपत्र ता.11.03.1997 रोजी पंजिकृत करण्यात आले. सबब या करारपत्रावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदार यांना ते राहात असलेल्या जागेच्या मोबदल्यात त्यांना नियोजित इमारतीमध्ये ब्लॉक नं.03, 325 चौरसफुट क्षेत्रफळाचा विकण्याचा करार झाला होता.
7. तक्रारदार हे नविन इमारतीमधील सदनिका प्राप्त करण्यास पात्र आहेत काय ?
तक्रारदार यांच्या प्रमाणे सदरील इमारतीचे पुढील बांधकाम हे सामनेवाले नं.2 यांनी केले आहे. सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांच्याकडून समर्थ पॅलेस सोसायटी/ मिटरसाठी रु.1,50,000/- रोख रक्कम घेतली आहे. यावरुन असे म्हणता येईल की, सामनेवाले नं.2 यांनी सुध्दा तक्रारदार यांचा ब्लॉक नं.03 बाबत अधिकार असल्याचे मान्य केले. परंतु सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदारास अधिकृतपणे कोणतेही अलॉटमेंट लेटर दिले नाही व वेगळा असा करार सुध्दा केला नाही. तक्रारदार यांनी इलेक्ट्रीक बील दाखल केले आहे. बीलाचे निरीक्षण केले असता हे स्पष्ट होते की, नविन इमारतीमध्ये सदनिका क्रमांक-बी-101, समर्थ पॅलेस को-ऑप.हौसिंग सोसायटी, रामनगर, ही तक्रारदार यांच्या नांवे आहे. या बाबींवरुन हे स्पष्ट होते की, सामनेवाले यांच्याप्रमाणे सुध्दा तक्रारदार हे नविन इमारतीमध्ये सदनिकेसाठी पात्र आहेत. परंतु तक्रारदार यांनी नमुद केल्याप्रमाणे सामनेवाले यांना करारामध्ये नमुद केलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेची आपेक्षा तक्रारदार यांच्याकडून आहे. आमच्या मते ही पध्दत सर्वस्वी अनुचित व्यापार पध्दत म्हणता येईल, तसेच सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसुर केल्याचे सिध्द होते.
8. तक्रारदार यांनी नमुद केलेल्या बाबी यांना शपथपत्राव्दारे दुजोरा दिला आहे. त्यांनी नमुद केलेल्या बाबींना दाखल केलेल्या बाबींना दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन भक्कम आधार मिळतो. यासर्व बाबी अभिलेखावर अबाधित आहेत. ते मान्य न करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही.
9. तक्रारदार यांनी त्यांच्या ताब्यातील जागा सन-1996-97 मध्ये रिक्त करुन सामनेवाले यांस दिली. जवळपास 20 वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर सुध्दा त्यांना आपली हक्काची जागा परत प्राप्त झाली नाही. तक्रारदार यांच्या सहनशिलतेचा जणु अंत पाहण्यासारखे आहे. आमच्या मते सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या सोबत केलेला व्यवहार हा कोणत्याही दृष्टीने उचित म्हणता येणार नाही, तसेच त्यांची सेवा निर्दोष असल्याचे म्हणता येणार नाही.
10. उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
11. “ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-388/2012 मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदार यांस कराराप्रमाणे सेवा देण्यास कसुर केला तसेच
अनुचित व्यापार पध्दत अवलंबवली असे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले नं.1 व 2 यांनी वैयक्तिक किंवा सामाईक रित्या तक्रारदारास नविन इमारती
मधील तळ मजल्यातील सदनिका क्रमांक-03, 325 चौरस फुट क्षेत्रफळ असलेलीचा
कायदेशीर ताबा दयावा.
किंवा
सदनिका क्रमांक-बी-101 समर्थ पॅलेस को-ऑप.हौसिंग सोसायटी, रामनगर, डोंबिवली-पुर्व
चा कायदेशीर ताबा दयावा.
4. सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांच्याकडून स्विकारलेल्या रु.1,50,000/- करीता प्रत्येक
खर्चाची वेगळी रक्कम दर्शविणारी रितसर पावती दयावी.
5. सामनेवाले नं.1 व 2 यांनी वरील पुर्तता ता.31.05.2015 किंवा त्यापुर्वी करावी तसे न
केल्यास तक्रारदार यांना तक्रार दाखल ता.28.09.2012 ते ता.31.05.2015 पर्यंत दरमहा
रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) व ता.01.06.2015 पासुन दरमहा रक्कम
रु.20,000/- (अक्षरी रुपये वीस हजार) नुकसानभरपाई म्हणुन अदा करावे.
6. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे ताबा घेणेबाबत पत्र प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसात
सदरील सदनिकेचा ताबा घ्यावा व त्यानंतर 15 दिवसात कराराप्रमाणे सामनेवाले यांस
रक्कम रु.73,800/- (अक्षरी रुपये त्र्याहत्तर हजार आठशे) अदा करावे.
7. सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारीचा खर्च म्हणुन रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा-
हजार) तक्रारदारास ता.31.05.2015 किंवा त्यापुर्वी अदा करावी.
8. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
ता.04.04.2015
जरवा/