रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग – रायगड.
तक्रार क्रमांक 11/2012
तक्रार दाखल दिनांक :- 22/02/2012
निकालपत्र दिनांक 20-02-2015
श्री. गिरीश व्ही. तेलंग,
रा. मंगेश प्रसाद, सरस्वती बाग,
जोगेश्वरी (पूर्व), मुंबई 400060. ..... तक्रारदार
विरुध्द
श्री. बशीर इमामसाब सय्यद,
रा. बी. 1202, 12 मजला,
धीरज जमुना अपार्टमेंट, चिंचोळी बंदर रोड,
मालाड, मुंबई 400064.
तसेच रा. धामोते, ता. कर्जत, जि. रायगड ..... सामनेवाले
उपस्थिती - तक्रारदारतर्फे ॲड. भूषण जंजिरकर
सामनेवाले तर्फे ॲड. संतोष म्हात्रे
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. उमेश व्ही. जावळीकर,
मा. सदस्य, श्री.रमेशबाबू बी. सिलीवेरी,
– न्यायनिर्णय –
(20/02/2015)
द्वारा मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांस कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. सामनेवाले यांच्या मालकीच्या सर्व्हे क्र. 90 हि. क्र. 34 जुना सर्व्हे क्र. 31/1, 31/3, 32/6, 33/14क क्षेत्र 1-78-8 मौजे धामोते ता. कर्जत जि. रायगड येथे बिनशेती मालकीची जमिन आहे. सदर जमिनीमधील प्लॉट क्र. 34 क्षेत्र 2659 चौ. फूट बिनशेती प्लॉट सामनेवाले यांनी तक्रारदारांना विकत देण्याचा साठेकरार दि. 03/12/08 रोजी रजिस्टर नोंदणी क्र. 8179/2008 अन्वये करुन दिला. करारामध्ये ठरलेली संपूर्ण रक्कम तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दिली. त्यावेळी दि. 06/03/09 रोजी नोंदणी क्र. 2842/09 अन्वये खरेदी खत तकाररदाराच्या हक्कात सामनाले यांनी करुन दिले. सदर साठेकरारातील अट क्र. (v) मध्ये खालील बाबींचा अंतर्भाव होता –
“सदरील मिळकत सध्या अविकसित आहे. सदरील मिळकतीस वर नमूद केल्याप्रमाणे द्वितीय पक्ष यांनी प्लॉटसची बिनशेती मोजणी तालुका निरिक्षण भूमी अभिलेख कर्जत यांचेकडून करणे. बिनशेती प्लॉटसला जमिनीच्या वर दोन फूटांची कुंपण भिंत, लोखंडी तार आणि सिमेंटचे खांब असलेले कुंपण करणे, प्रत्येक प्लॉटला स्वतंत्रपणे पिण्याचे पाणी पुरविण्याची व्यवस्था करणे, वीजेची जोडणी उपलब्ध करुन देणे, बिनशेती मंजूर आराखडयामध्ये दर्शविण्यात आलेले अंतर्गत रस्ते डांबरीकरण करुन पक्क्या स्वरुपात बांधणे वगैरे इतर सर्व कामे शक्यतो खरेदीखताचे पूर्वी आणि किंवा खरेदीखतानंतर 30 दिवसांत करण्याची आहेत. द्वितिय पक्ष यांनी वरील कामे न केल्यास प्रथम पक्ष यांना त्यांचेकडून पूर्तता करुन मागण्याचा तसेच नुकसानभरपाई मागण्याचा हक्क राहील. ”
3. अट क्र. (v) मध्ये नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही बाबीची पूर्तता सामनेवाले यांनी न केल्याने तक्रारदारांस खालील प्रमाणे नुकसान झाले आहे -
(i). दोन फूटांची कुंपण भिंत, त्यास सिमेंटचे पोल लोखंडी तारांसहित खर्च रु. 1,10,000/- (ii). पाण्याची व्यवस्था (बोअरवेल) खर्च रु. 60,000/-, (iii). रस्ता व लाईट खर्च रु. 60,000/-, iv) ड्रेनेज (सांडपाणी जाण्याची व्यवस्था) खर्च रु. 60,000/- असे तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केले आहे.
4. कराराप्रमाणे सामनेवाले यांनी पूर्तता करणेकामी दि. 13/08/09 व 30/10/11 रोजी लेखी नोटीस पाठवून देखील सामनेवाले यांनी सदर बाबींची पूर्तता न केल्याने सदर बाबींची पूर्तता करणेकामी सामनेवाले यांना आदेशित करावे व नुकसानभरपाईसह तक्रार मान्य करण्यात यावी अशी विनंती तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारीत केली आहे.
5. तक्रारीत सामनेवाले यांना लेखी म्हणणे दाखल करणेकामी नोटीस प्राप्त होऊन देखील त्यांनी म्हणणे दाखल न केल्याने दि. 25/11/13 रोजी सामनेवाले यांच्या लेखी म्हणण्याशिवाय तक्रार पुढे चालविण्यात येते असे आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
6. तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेले प्रतिज्ञापत्र हेच पुरावा शपथपत्र समजण्यात यावे अशी पुरशीस दि. 25/11/13 रोजी दिली आहे, तसेच तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रेही पुरावा म्हणून वाचण्यात यावीत असेही सदर पुरशीसमध्ये नमूद केले. तक्रारदारांनी सामनेवाले यांनी दि. 17/11/14 रोजी लेखी युक्तीवाद दाखल केला. व दि. 29/11/14 रोजी पुरावा शपथपत्र दाखल केले. लेखी युक्तीवादाची प्रत तक्रारदारांनी दि. 29/11/14 रोजी स्वीकारली व पुरावा शपथपत्राची प्रत दि 31/01/15 रोजी स्वीकारली. सामनेवाले यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवादामध्ये करारातील अट क्र. (v) मधील सेवासुविधा पुरविण्यामध्ये कसूर केल्याचा आक्षेप प्रस्तुत मंचाकडे दाद मागून पूर्तता करण्याविषयी आदेश प्राप्त करुन घेणे न्यायोचित नसून सदर बाबीसाठी दिवाणी न्यायालयात दाद मागणे उचित होते असे कथन केले आहे. तसेच प्रस्तुत तक्रारीस कारण दि. 05/04/09 नंतर घडले असून प्रस्तुत तक्रार दि. 05/04/11 पर्यंत दाखल करणे आवश्यक असताना देखील तकाररदारानीं विलंबाने दि. 18/02/12 रोजी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रार कालबाहयतेच्या मुद्दयावर फेटाळण्यास पात्र आहे तसेच तक्रारदारांनी मागणी केलेली खर्चाची रक्कम कागदोपत्री पुराव्यानिशी सिध्द न झाल्याने सदरील सर्व कामे ही सामनेवाले यांनी करुन दिलेली आहेत. सामनेवाले यांनी मूळ रस्त्यापर्यंत झेड. पी. ची पाईपलाईन टाकून दिलेली आहे तसेच तक्रारदाराच्या प्लॉटपासून 30 फूटांवर एम.एस.ई.बी. चा पोल टाकून दिलेला आहे. सदरचा पोल तक्रारदारांनी प्लॉट खरेदी करण्याअगोदर करुन दिलेला आहे. तसेच प्लॉट मोजून झाल्यावर तारेचे कुंपण सदर प्लॉटला करुन दिलेले आहे. तसेच सर्व प्लॉटसाठी बोअरवेलची व्यवस्था देखील केलेली आहे. तक्रारदार हे बँकेमध्ये नोकरीला असल्याने जास्तीत जास्त कर्ज मिळणेकरीता तक्रारीत नमूद सुविधांची मागणी अतिरिक्त कर्ज मिळावे या हेतूने सामनेवाले यांचे संमतीनेच सदर सुविधा खरेदीखतात नमूद केलेल्या आहेत. तक्रारदाराच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही प्लॉटच्या खरेदीखतामध्ये सदर सुविधांचा उल्लेख नाही. तक्रारदार व इतर सभासदांच्या प्लॉटधारकांची श्री. साईबाबा सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केलेली असून दि. 01/01/10 रोजी नोंदणी प्रमाणपत्र हस्तगत केलेले आहे. सबब सदरची तक्रार संस्थेमार्फत दाखल न केल्याने फेटाळण्यास पात्र आहे. तक्रारदारांनी तक्रारीत केलेली विनंतीच्या पुष्टयर्थ्य तज्ञ सल्लागाराचे एस्टीमेट तक्रारीचे सोबत दाखल केलेले नसल्याने तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी असे शपथपत्रात व युक्तीवादात सामनेवाले यांनी नमूद केले आहे. सामनेवाले यांनी दि. 22/07/14 व दि 17/11/14 रोजी सामनेवाले यांनी श्री. प्रसन्न वामन मोगरे यांना लिहून दिलेले कुलमुखत्यारपत्र तसेच विद्युत मीटर व प्लॉटची तसेच वस्तूस्थिती दर्शक फोटो दाखल केले आहेत. तक्रारदारांनी तक्रारीसोबत साठेकरार दि. 03/12/08 ची प्रत दाखल केली. सदर कागदपत्रे तक्रारदारांना देण्यात आली. त्यानंतर तक्रारदारांनी अतिरिक्त पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दि. 31/01/15 रोजी दाखल केला. तसेच कागदपत्रांच्या यादीसह कागदपत्रेही दाखल केली. सदर कागदपत्रांची प्रत सामनेवाले यांना दिली. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता, दि. 27/01/15 रोजी प्लॉट भोवती संरक्षक भिंत तसेच पक्के सिमेंटचे रस्ते व जी. आय. वायर फेन्सींग साठी लागणाऱ्या एकंदरीत खर्चाच्या देयकाची रक्कम रु. 1,52,100/- ची प्रत दाखल केली आहे. तसेच ड्रेनेज लाईनसाठी रक्कम रु. 62,860/- व इतर अनुषंगिक खर्चासाठी रक्कम रु. 25,300/- व कुंपण भिंत व त्यावरील तारेसहीत खर्च रु. 1,10,000/- बाबतचे कोटेशन दाखल केले आहे. तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवादामध्ये साठेकरारामधील अट क्र. (v) व खरेदीखतामधील रककम अट क्र. (v) मध्ये नमूद बाबींची पूर्तता सामनेवाले यांनी न केल्याने तक्रारदारांस स्वखर्चाने सदर बाबींची पूर्तता करुन घ्यावी लागले असल्याची बाब नमूद करुन तक्रारीमध्ये दाखल देयके ही सामनेवाले यांनी तक्रारदारांस अदा करण्याबाबत आदेशित करावे असे नमूद करुन वीज जोडणी संबंधातील कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत. सामनेवाले यांनी सदर कागदपत्रांस आक्षेप घेऊन सदर कागदपत्रे अग्राहय धरण्यात यावीत व तक्रार अमान्य करण्यात यावी असे पुढे नमूद करुन तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे सन 2015 सालातील असून ती पुराव्याकामी ग्राहय धरण्यास सबळ नाहीत असे कथन केले आहे. सबब तक्रार अमान्य करण्यात यावी अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
उभयपक्षांनी दाखल केलेली वादकथने, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले असता, तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात –
मुद्दा क्रमांक – 1 तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार विहीत मुदतीत दाखल केल्याची
बाब तक्रारदार सिध्द करतात काय ?
उत्तर होय.
मुद्दा क्रमांक - 2 तक्रारदारांची मागणी बाबत न्यायनिर्णय देण्याचे अधिकार या
मंचास आहेत काय ?
उत्तर होय.
मुद्दा क्रमांक - 3 सामनेवाले यांनी तक्रारदारांस कराराप्रमाणे सेवासुविधा
पुरविल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ?
उत्तर होय.
मुद्दा क्रमांक - 4 सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र
आहेत काय ?
उत्तर होय.
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक - 1 तक्रारदारांनी सामनेवालेकडून दि. 03/12/08 रोजी साठेकराराद्वारे नोंदणीकृत करारानामा केला असून सदर करारनाम्यातील अट क्र. (v) प्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांस नमूद सेवा सुविधा पुरविणे हे कायदेशीर दायित्व सामनेवाले यांचे होते. सामनेवाले यांनी तक्रारदारांसोबत दि. 06/03/09 रोजी नोंदणीकृत करारनामा करुन दि. 03/12/08 रोजी केलेला साठेकरार कायम केला आहे. दि. 03/12/08 रोजी केलेला साठेकरार व दि. 06/03/09 रोजीचा कायम खरेदी दस्तऐवज यामधील अट क्र. (v) मधील मजकूरामध्ये तंतोतंत साम्य असून सदर बाबींची पूर्तता करणेकामी घडणारे कारण हे सातत्याने घडणारे कारण असल्याने सामनेवाले यांनी घेतलेल्या तक्रार मुदतबाहय असल्याच्या आक्षेप न्यायोचित सिध्द होत नाही. सबब, प्रस्तुत तक्रार मुदतीत दाखल केली आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रमांक - 2 तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये झालेल्या नोंदणीकृत करारामधील अटींची पूर्तता न केल्याबद्दल प्रस्तुतची तक्रार आहे. सामनेवाले यांनी सदर बाबींच्या पूर्ततेसाठी तक्रारदारांनी दिवाणी न्यायालयात दाद मागणे न्यायोचित असल्याची बाब नमूद करुन तक्रारीस आक्षेप घेतला असला तरी करारातील अटींच्या पूर्ततेसाठी मंचाकडे दाद मागणे ही बाब न्यायोचित आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी करारातील अटींच्या पूर्तते विषयी दाद मागितली असून सदर अटी या मूळ प्लॉटच्या बाबतीत अनुषंगिक सेवासुविधांबाबतच्या असल्याने सदर बाबींच्या पूर्ततेसाठी विशेष कराराची पूर्तता करुन देण्याबाबतचा दावा दाखल करण्याइतपत सबळ कारण सामनेवाले सिध्द करु शकले नाहीत. सबब प्रस्तुत मंचास तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र आहे ही बाब सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रमांक - 3 सामनेवाले यांनी तक्रारदारांस अट क्र. (v) मध्ये नमूद बाबींची पूर्तता करुन देणेकामी 30 दिवसांत न्यायोचित उपाययोजना करण्याचे अभिवचन करारनाम्यामध्ये दिले होते. सदर बाबींची उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गोषवारा सामनेवाले यांनी दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदारांनी लेखी नोटीस पाठवून देखील सदर नोटीसप्रमाणे उचित कार्यवाही करणेकामी तक्रारदारांनी कोणतीही निश्चित उपाययोजना केलेली नाही. सामनेवाले यांनी तक्रारीमध्ये दाखल केलेल्या कागदोपत्री पुराव्यावरुन व फोटोचे अवलोकन केले असता सदरील फोटो हे तक्रारदारांच्या प्लॉट संबंधातील आहेत याबाबत फोटोग्राफरचे प्रमाणपत्र सामनेवाले यांनी दाखल केलेले नाही. तसेच कोणत्याही तज्ञ परिक्षकाचे अहवाल मंचासमक्ष दाखल केलेले नाहीत. करारातील अटीप्रमाणे सामनेवाले यांनी विहित कालमर्यादेमध्ये सेवासुविधा पुरविण्याची जबाबदारी सामनेवाले यांचेवर होती, परंतु सदर बाबींची पूर्तता न केल्यामुळे तक्रारदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदारांनी तज्ञ परिक्षकाचा अहवाल दाखल केला नाही, ही मागणी तक्रारदाराकडे सामनेवाले यांनी करणे न्यायोचित नाही. सामनेवाले यांनी तक्रारीतील मुद्दयांचे खंडन करताना अट क्र. (v) मध्ये नमूद बाबींची पूर्तता करणेकामी झालेल्या खर्चांची देयकेही मंचासमक्ष दाखल केलेली नाहीत. सबब सामनेवाले यांनी तक्रारदारांस अट क्र. (v) प्रमाणे विहीत कालमर्यादेत सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रमांक - 4 तक्रारदारांनी सामनेवाले कडून दि 03/12/08 रोजी साठेकरार करुन दि. 06/03/09 रोजी खरेदीखत केलेले आहे. अट क्र. (v) प्रमाणे खरेदीखत नोंदविण्यापूर्वी व अगर खरेदीखत नोंदविल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीमध्ये नमूद बाबींची पूर्तता सामनेवाले यांनी न केल्यास तक्रारदारास नुकसानभरपाई मागण्याचा हक्क राहिल असे नमूद केले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदोपत्री पुराव्यावरुन सामनेवाले यांनी सदर बाबींची पूर्तता केली नसल्याची बाब सिध्द होते. सबब सामनेवाले हे तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारीसोबत दाखल केलेल्या खर्चाच्या देयकांवरुन तक्रारदारांस सदर कामांच्या पूर्ततेसाठी येणारा खर्च नमूद केला आहे. त्यावरुन सामनेवाले हे तक्रारदारांस सदर खर्चाची प्रतिपूर्ती करुन देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब सामनेवाले हे तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक 4 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश:-
1. तक्रार क्र. 11/12 अंशत: मान्य करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांस विहीत कालमर्यादेत करारानुसार सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांस करारातील अट क्र. (v) प्रमाणे -
(1) दोन फूटांची कुंपण भिंत, त्यास सिमेंटचे पोल लोखंडी तारांसहित (2) पाण्याची व्यवस्था (बोअरवेल), (3) रस्ता व लाईट या बाबींची पूर्तता या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत करुन द्यावी. करारातील अट क्र. (v) मध्ये 4) ड्रेनेज ही बाब (सांडपाणी जाण्याची व्यवस्था) नमूद नसल्याने सदर मागणी अमान्य करण्यात येते.
4. सामनेवाले करारातील अट क्र. (v) मधील बाबींची पूर्तता 30 दिवसांत करण्यास असमर्थ ठरल्यास तक्रारदारांस सदर बाबींची पूर्तता करणेकामी रक्कम रु. 2,30,000/- (रु. दोन लाख तीस हजार मात्र) 30 दिवसांत अदा करावेत.
(v). सामनेवाले यांनी तक्रारदारांस तक्रार दाखल खर्च, मानसिक व शारिरिक त्रासापोटी व इतर खर्चाच्या नुकसानभरपाई पोटी एकत्रितपणे रक्कम रु. 30,000/- (रु. तीस हजार मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत द्यावेत.
6. न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना त्वरित पाठविण्यात याव्यात.
ठिकाण - रायगड-अलिबाग.
दिनांक – 20/02/2015
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उमेश व्ही. जावळीकर)
सदस्य अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.