न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती रोहिणी बा. जाधव, सदस्य
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार हे वर नमूद पत्त्यावरील कायमचे रहिवाशी आहेत. जाबदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तक्रारदार यांना त्यांच्या घराचे बांधकाम करावयाचे असलेने त्यांनी जाबदार यांचेशी चर्चा केली व उभयतांमध्ये तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम 1359 चौ.फूट करण्याचे ठरले. बांधकामाचा आराखडा जाबदार यांनी तयार केला. बांधकामाचा दर हा रु.1200/- प्रति चौरस फूट ठरला व बांधकामाची एकूण किंमत रु.16,30,000/- इतकी ठरली. त्यानुसार उभयतांमध्ये दि. 4/3/2018 रोजी करारनामा झाला. तथापि सदर करारामध्ये जाबदार यांनी बांधकाम कधी पूर्ण करणार हे जाणीवपूर्वक नमूद केले नव्हते. तथापि त्यांनी करारापासून सहा महिन्याचे आत बांधकाम पूर्ण करुन देतो असे तोंडी मान्य केले होते. करार करतेवेळी जाबदार यांनी तक्रारदाराकडून बांधकामाच्या रकमेच्या सुरक्षिततेपोटी दोन को-या चेकची मागणी केली. तक्रारदारांकडे चेक उपलब्ध नसल्याने त्यांनी त्यांचे बंधू श्री किरण सुरेश भिंताडे यांचे नावचे दोन चेक जाबदारांना दिले. सदर बांधकामापोटी तक्रारदार यांनी जाबदार यांना आजअखेर एकूण रक्कम रु.16,10,000/- इतकी रक्कम अदा केली आहे. तथापि जाबदारांनी कराराप्रमाणे बांधकाम न करता अर्धवट बांधकाम ठेवलेले आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे तगादा लावलेनंतर जाबदार यांनी मे 2019 पर्यंत बांधकाम पूर्ण करुन देणेचे कबूल केले. तथापि आजअखेर जाबदारांनी बांधकाम पूर्ण करुन दिलेले नाही. याउलट जाबदार हे तक्रारदाराकडून जादा रक्कम रु.1,50,000/- ची मागणी करीत आहेत. तसेच जाबदार यांनी तक्रारदार यांचे भावाकडून घेतलेल्या दोन चेक पैकी एक चेक भरुन भावाच्या खात्यातून दि.25/10/2018 रोजी रु. 2,10,000/- काढून घेतलेले आहे. तसेच जाबदार हे अजून रु.1,50,000/- ची मागणी करीत आहे. सदरची रक्कम न दिल्यास तक्रारदारांकडून घेतलेला दुसरा चेक बॅंकेत जमा करण्याची धमकी जाबदारांनी दिली व त्यानुसार दि. 21/4/2019 रोजी जाबदारांनी दुसरा चेक बॅंकेत भरला. तो चेक बाऊन्स झाल्याने जाबदार यांनी कलम 138 ची फिर्याद कडेगाव न्यायालयात दाखल केली आहे. तक्रारदार हे जाबदार यांना केवळ रु.20,000/- इतकी रक्कम देय लागत असताना जाबदार यांनी चेकवर रक्कम रु.1,35,000/- टाकून चेक बाऊन्स करुन घेतला आहे. तदनंतर जाबदार हे बांधकाम अर्धवट सोडून गेले आहेत. तक्रारदार यांनी शासकीय बांधकाम सर्व्हेअर श्री शशिकांत धुमाळ यांचेकडून दि. 21/1/2020 रोजी बांधकामाची पाहणी करुन पाहणी अहवाल घेतला आहे. त्याचा सविस्तर तपशील तक्रारअर्जात नमूद केला आहे. सदर अर्धवट कामे पूर्ण करण्यास रु. 5,21,175/- चे आसपास खर्च अपेक्षित आहे असे अहवालामध्ये नमूद केलेले आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांना सदरची कामे तातडीने पूर्ण करुन मागितली असता जाबदार हे जादा रकमेची मागणी करीत आहेत. म्हणून तक्रारदारांनी जाबदार यांना दि. 31/1/2020 रोजी नोटीस पाठविली. परंतु सदरची नोटीस स्वीकारण्यास जाबदार यांनी नकार दिला आहे. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देणेमध्ये त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून सर्व्हेअर श्री धुमाळ यांचे अहवालानुसार अपूर्ण कामे एका महिन्यात पूर्ण करुन मिळावीत, जाबदार यांनी सदरची कामे पूर्ण करुन दिली नाहीत तर रु. 5,21,175/- एवढी रक्कम जाबदारांनी द.स.द.शे. 15 टक्के व्याजासहीत परत करावेत, जाबदारास रु.1,00,000/- दंडाची आकारणी करण्यात यावी, मानसिक, शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.2,00,000/- व अर्जाचा खर्च रु.15,000/- जाबदारांकडून मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत बांधकाम करारनामा, जाबदार यांनी तक्रारदारांना दिलेली पावती, श्री धुमाळ यांचा अहवाल, तक्रारदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीस परत आलेला लखोटा इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र व साक्षीदार श्री शशिकांत धुमाळ व प्रशांत मधुकर गुरव, श्री किरण भिंताडे यांची शपथपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने श्री गणेश हिंमत निकम यांनी तक्रारदार यांचे घराचे पूर्ण केलेल्या बांधकामाचे बिल, श्री गणेश निकम यांचा शासकीय परवाना व त्यांचे शपथपत्र दाखल केले आहे.
4. जाबदार यांनी याकामी हजर होवून म्हणणे दाखल केले. जाबदारांनी तक्रारदाराचे तक्रारीतील कथने परिच्छेदनिहाय नाकारली आहेत. श्री धुमाळ यांचे अहवालात नमूद केलेल्या त्रुटी या संगनमत करुन नमूद केल्या आहेत. सदरचे अहवालात करारबाहय गोष्टी नमूद आहेत. सदरचा अहवाल एकतर्फा असून तो जाबदार यांना मान्य नाही. जाबदार हे नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. उभयतांमध्ये झालेल्या करारपत्रात नमूद केल्याप्रमाणे अत्यंत उत्कृष्ट पध्दतीने जाबदार यांनी बांधकाम करुन दिलेले आहे. जादाचे बांधकाम वाढलेस तक्रारदार यांनी जादा रक्कम देणेचे मान्य केले होते. बांधकाम करीत असताना तक्रारदारांनी लाईट फिटींग, जिना टोपी तसेच उच्च दर्जाची किंमतीची फरशी वाढविलेने ठरलेल्या हिशोबापेक्षा रक्कम रु.1,35,000/- इतके बिल वाढलेले आहे. सदरचे रकमेची मागणी जाबदारांनी तक्रारदाराकडे केल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे सर्व व्यवहार बघणारे भाऊ किरण भिंताडे यांचे नावचा चेक जाबदारांना दिला. परंतु सदरचा चेक न वटलेने जाबदारांनी कडेगाव येथील कोर्टात केस दाखल केली आहे. सदरचे केसमध्ये खोटा पुरावा तयार करण्यासाठी तक्रारदारांनी 1 वर्षाचे कालावधीनंतर सदरची तक्रार दाखल केली आहे. बांधकाम पूर्ण केलेनंतर तक्रारदारांनी दि.23/3/2019 रोजी वास्तुशांतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदरचे कार्यक्रमात तक्रारदारांनी जाबदार यांचा उत्कृष्ट काम केलेबाबत सत्कार केला होता. तक्रारदारांनी श्री धुमाळ यांचेशी संगनमत करुन खोटा अहवाल तयार केला आहे. जाबदार यांना देय असणारी रक्कम रु.1,35,000/- बुडविण्याच्या दुष्ट हेतूने तक्रारदाराने तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रार फेटाळण्यात यावी व तक्रारदारांकडून रु.1,35,000/- वसुल होवून मिळावेत अशी मागणी जाबदारांनी केली आहे. जाबदारांनी याकामी तक्रारदाराच्या घराचे वास्तुशांतीचे फोटो, साक्षीदार श्री सुमित उत्तम पवार, श्री अजित रघुनाथ जाधव यांची शपथपत्रे तसेच स्वतःचे पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. तसेच कडेगांव येथील कोर्टात दाखल केलेल्या फिर्यादीची प्रत व तक्रारदाराचे घराचा 8 चा उतारा तसेच बांधकामापोटी खरेदी केलेल्या साहित्यांची बिले दाखल केली आहेत.
5. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र, युक्तिवाद तसेच जाबदार यांचे म्हणणे, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार जाबदार अपूर्ण बांधकामापोटी रक्कम मिळणेस तसेच नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
6. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम करण्याबाबत चर्चा होवून तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम 1359 चौ.फूट करण्याचे ठरले. सदर बांधकामाची एकूण किंमत रु.16,30,000/- इतकी ठरली. त्यानुसार उभयतांमध्ये दि. 4/3/2018 रोजी करारनामा झाला. त्यानुसार सदर बांधकामापोटी तक्रारदार यांनी जाबदार यांना आजअखेर एकूण रक्कम रु.16,10,000/- इतकी रक्कम अदा केली आहे. सदरचे करारनाम्यात नमूद केलेली रक्कम रु.16,10,000/- जाबदार यांना अदा केलेल्या पावतीची प्रत याकामी तक्रारदाराने तक्रारअर्जासोबत दाखल केलेल्या कागदयादीतील अ.क्र.2 ला दाखल केली आहे. सदरची बाब जाबदार यांनी नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदयादीतील कागद क्र.1 ला तक्रारदारांनी तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये बांधकाम करुन देण्याबाबत झालेला करारनामा दाखल केला आहे. सदर करारनाम्यामध्ये तक्रारदाराचे घराचे बांधकामाबाबतच्या सर्व बाबींचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सदरचे बांधकाम एकूण मोबदला रक्कम रु.16,30,000/- मध्ये करुन देण्याचे उभयतांमध्ये ठरले होते. तसेच बांधकाम करताना कोणते मटेरियल वापरले जाईल याचाही पूर्ण तपशील या करारपत्रामध्ये नमूद केलेचे दिसून येते. तसेच तक्रारदारांचे पत्नीने जाबदार यांना रक्कम रु.16,10,000/- अदा केलेबाबतची जाबदार यांनी दिलेली पावती याच कागदयादी सोबत अ.क्र.2 ला दाखल केली आहे. सदरची रक्कम जाबदारांनी स्वीकारल्याचे सदर पावतीवरुन स्पष्ट होते.
8. तक्रारदारांनी याकामी तक्रारअर्जासोबत दाखल केलेल्या कागदयादीतील अ.क्र.3 ला सर्व्हेअर श्री शशिकांत धुमाळ यांचा रिपोर्ट दाखल केला आहे व त्यासोबत अपूर्ण बांधकामाची छायाचित्रे दाखल केली आहेत. सदरचा रिपोर्ट व छायाचित्रे यांचे अवलोकन करता जाबदार यांनी तक्रारदारांच्या घराच्या बांधकामात त्रुटी ठेवल्याचे सिध्द होते असे या आयोगाचे मत आहे. सदरचे सर्व्हेअर यांचे अहवालास छेद देणारा कोणताही स्वतंत्र पुरावा जाबदार यांनी याकामी दाखल केलेला नाही. सबब, सदरचा सर्व्हेअर यांचा रिपोर्ट हा याकामी महत्वाचा पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येतो. सबब, जाबदार यांनी अपूर्ण बांधकाम ठेवून तसेच बांधकामात त्रुटी ठेवून तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
9. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदयादी सोबतच्या अ.क्र.3 च्या श्री शशिकांत धुमाळ यांचे सर्व्हे रिपोर्टवरुन त्रुटीयुक्त अपूर्ण बांधकाम पूर्ण करणेस अंदाजे रु. 5,21,175/- इतका खर्च येईल असे नमूद केलेचे दिसून येते. दि. 4/3/2018 रोजीच्या तक्रारदार व जाबदार यांच्यात झालेल्या करारात जीना टोपीचे पैसे वेगळे द्यावे लागतील असे ठरले होते. तथापि सर्व्हेअरच्या रिपोर्टमधील रु.5,250/- तक्रारदारांना जर जाबदारांनी जीनाटोपीचे काम करुन दिले असते तरच द्यावे लागणार होते. त्यामुळे ती रक्कम तक्रारदारांना जाबदारांकडून देय नाही असे या आयोगाचे मत आहे. सर्व्हे रिपोर्टवरुन त्रुटीयुक्त अपूर्ण बांधकाम पूर्ण करणेस अंदाजे रु.5,21,175/- इतका खर्च येईल असे नमूद आहे. त्यातून तक्रारदारांनी शशी आर्ट्सकडून करुन घेतलेल्या स्लॅबच्या वॉटर प्रूफींगच्या कामाचा खर्च रु.75,000/- व जीना टोपीच्या कामाचे रु. 5,250/- वजा जाता तक्रारदार हे रक्कम रु.4,40,925/- जाबदार यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. त्रयस्थ बांधकाम ठेकेदार श्री गणेश निकम यांचे बिलही या रकमेच्या जवळपासच आहे. परंतु या आयोगाने सर्व्हेअरचा रिपोर्ट हा महत्वाचा पुरावा मानल्याने त्यानुसार रकमेची आकारणी केली आहे. सर्व्हेअरच्या रिपोर्टनंतर तक्रारदाराने त्यांचे अपूर्ण बांधकाम त्रयस्थ बांधकाम ठेकेदाराकडून पूर्ण करुन घेतल्याने तक्रारदार हे वर नमूद केल्याप्रमाणे रक्कम रु. 4,40,925/- जाबदार यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत असे या आयोगाचे मत आहे.
10. तक्रारदारांनी दि.26/3/2024 रोजी दाखल केलेल्या कागदयादी सोबतचे अ.क्र.1ला श्री गणेश निकम यांनी अपूर्ण बांधकाम पूर्ण करुन दिल्याचे बिल तसेच श्री निकम यांचा बांधकाम करणेबाबतचा शासकीय परवाना व श्री गणेश निकम यांचे प्रतिज्ञापत्र अ.क्र.2 व 3 ला दाखल केले आहे. सदर अ.क्र.1 चे बिलावरुन अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी रु. 4,41,950/- इतका खर्च आल्याचे दिसून येते. तसेच तक्रारदारांनी दि. 20/6/2022 रोजी काही कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर कागदयादीतील अ.क्र.1 व 2 चे कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी शशी आर्टसचे प्रोप्रायटर प्रशांत मधुकर गुरव यांचेकडून स्लॅब वॉटर प्रूफींगचे काम रु. 75,000/- देवून करुन घेतल्याचे दिसून येते. जाबदारांनी दाखल केलेल्या दि. 20/2/2024 च्या कागदयादीतील बिलांवर तक्रारदाराचेच नांव दिसून येत असल्याने नक्की बिले कोणी दिली याबाबत बोध होत नाही. तसेच ही बिले जाबदारांनी दिली असल्याबाबत कोणताही पुरावा जाबदार यांनी दाखल केलेला नाही. तसेच जाबदारांनी श्री सुमित उत्तम पवार (सुपरवायझर) व श्री अजित रघुनाथ जाधव (बांधकाम व सेंट्रींग मिस्त्री) या साक्षीदारांचे शपथपत्र साक्षीकामी दाखल केले आहे. श्री सुमित उत्तम पवार (सुपरवायझर) यांनी त्यांचे शपथपत्रात “तक्रारदार यांच्या बंगल्याचे संपूर्ण कामकाज अत्यंत उत्कृष्ट पध्दतीने पूर्ण केले आहे. म्हणून माझा व श्री निकेतन नानासाहेब कांबळे यांचा श्री बाळकृष्ण सुरेश भिंताडे यांनी सत्कार केला होता.” असे कथन केले आहे. श्री अजित रघुनाथ जाधव (बांधकाम व सेंट्रींग मिस्त्री) यांनी त्यांचे शपथपत्रात “श्री बाळकृष्ण सुरेश भिंताडे यांचे बंगल्याचे संपूर्ण कामकाज अत्यंत उत्कृष्ट पध्दतीने पूर्ण केले आहे.” असे कथन केले आहे. तथापि, तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, तक्रारीसोबतची कागदपत्रे व सर्व्हेअर श्री शशिकांत धुमाळ यांचा रिपोर्ट यांचे अवलोकन करता जाबदाराने तक्रारदाराच्या घराचे बांधकामात त्रुटी ठेवल्याची बाब स्पष्टपणे दिसून येते.
11. जाबदार यांनी तक्रारदाराविरुध्द Negotiable Instruments Act चे कलम 138 अन्वये फिर्याद दाखल केली आहे. सदरची फिर्याद हे धनादेश न वटलेबाबतची आहे. तक्रारदारांनी दाखल केलेली प्रस्तुतची तक्रार ही जाबदारांनी बांधकामात ठेवलेल्या त्रुटींबाबतची आहे. सबब, सदरच्या दोन्ही तक्रारी या वेगवेगळया आहेत. जाबदारांनी तक्रारदारांना सेवेत त्रुटी दिलेली असल्याने तक्रारदारांना या आयोगासमोर तक्रार दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
12. सबब, तक्रारदार हे रक्कम रु.4,40,925/- इतकी रक्कम जाबदारांकडून मिळणेस पात्र आहेत असे या आयोगाचे मत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे दि. 4/3/2018 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदारास मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच जाबदार यांनी सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच या आयोगात तक्रारअर्ज दाखल करावा लागला. या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु. 20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु. 5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार यांनी तक्रारदारास अपूर्ण व त्रुटीयुक्त बांधकामाच्या खर्चापोटी रक्कम रु. 4,40,925/- अदा करावी तसेच सदर रकमेवर दि. 04/03/2018 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
- जाबदार यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी निकाल तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायद्यामधील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.