*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
तक्रारदार स्वत:
जाबदेणार गैरहजर- एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. श्रीकांत. एम. कुंभार, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 28/ऑगस्ट/2013
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणार यांच्या विरुध्द सेवेतील त्रुटी संदर्भात ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. जाबदेणार हे इलेक्ट्रिक मिटरचे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून दिनांक 10/12/2011 रोजी बिल क्र एचओ/बी 62948 अन्वये इस्टार कंपनीचा मिटर सिरीअल नंबर 05257869 खरेदी केला व दिनांक 12/12/2011 रोजीच्या चेक अन्वये रक्कम रुपये 9000/- जाबदेणार यांना अदा केली. दिनांक 12/12/2011 रोजी मिटर तक्रारदारांच्या ताब्यात मिळाला. त्यावेळी तो व्यवस्थित पॅक नव्हता, जुना वाटत होता व याची कल्पना तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिली. तसेच जाबदेणार यांच्याकडून टेस्ट सर्टिफिकीट व माहितीपत्रक मागितले असता ते न देता वस्तू चांगली असल्याचे जाबदेणार यांनी तक्रारदारांना सांगितले. जाबदेणार यांच्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी सदर मिटर MSEDC Ltd. यांच्याकडे तपासणीसाठी पाठविला असता मिटर खराब असल्याच्या रिपोर्ट सह मिटर परत आला.
2. त्यानंतर तक्रारदारांनी सदर मिटर जाबदेणार यांना परत दिला. जाबदेणार यांनी दुसरा मिटर दिला व त्यापोटी पुर्वीच्या मिटरच्या किंमतीपेक्षा रुपये 1125/- जादा घेतले. तक्रारदारांनी ही रक्कम चेक क्र 673088 दिनांक 14/12/2011 अन्वये अदा केली. सदर मिटर सिक्युअर कंपनीचा होता. त्याचा सिरीअल नंबर एम एस 906889 असा होता. त्यासोबत कंपनीचा टेस्ट रिपोर्टही होता. परंतू ते आवश्यक त्या पॅकिंग मध्ये नव्हते, टेस्ट रिपोर्टवर कंपनीचा शिक्का व माहितीपुस्तक नव्हते. तक्रारदारांनी सदर मिटर MSEDC Ltd. यांच्याकडे तपासणीसाठी दिला असता तोही खराब असल्याचे टेस्टींग विभागाने सांगितले त्यामुळे जाबदेणार यांना मिटर रिमार्कसह परत केला. सबब तक्रारदारांनी जाबदेणार यांना या मिटरच्या बदल्यात तिसरा मिटर देण्याचे सांगितले.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना तिसरा मिटर दिला परंतू तोही कंपनीचे पॅकिंग नसलेला, टेस्ट रिपोर्ट नसलेला, माहितीपत्रक नसलेला होता. जाबदेणार यांच्यावर तक्रादारांचा विश्वास राहिलेला नसल्यामुळे तक्रारदारांनी सदरहू मिटर स्विकारला नाही. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे भरलेल्या रकमेची मागणी केली असता जाबदेणार यांनी रक्कमही परत केली नाही. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून त्यांनी भरलेली सर्व रक्क्म परत मिळावी, तसेच नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 20,000/- व मानसिक त्रासापोटी रुपये 6000/- मिळावेत अशी मागणी करतात.
4. जाबदेणार यांना मंचाची नोटीस बजावूनही गैरहजर, त्यांनी कोणत्याही प्रकारचे लेखी म्हणणे दाखल केलेले नाही म्हणून सदरचे प्रकरण एकतर्फा चौकशीसाठी ठेवण्यात आले.
5. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्टयर्थ स्वत:चे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून टॅक्स इनव्हॉईस दिनांक 10/12/2011 अन्वये मिटरची रक्कम रुपये 9000/- अधिक व्हॅट रुपये 1125/- एकूण रुपये 10,125/- अदा करुन इलेक्ट्रिक मिटर विकत घेतल्याचे स्पष्ट होते. MSEDC Ltd. यांनी दिनांक 13/12/2011 रोजी दिलेल्या अहवालानुसार सदरहू मिटरचे टेस्टींग केल्यानंतर त्याला डिस्प्ले नसल्यामुळे तो सदोष असल्याचे त्यात नमूद करण्यात आलेले आहे. सबब जाबदेणार यांनी तक्रारदारांना सदोष मिटर विकल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार यांनी सदोष मिटर परत घेतला परंतू त्यापोटी तक्रारदारांनी अदा केलेली रक्कम रुपये 10,125/- परत न करणे ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने जाबदेणार यांनी मंचासमोर हजर राहून लेखी जबाब दाखल करुन नाकारलेली नाहीत. सबब जाबदेणार तक्रारदारांना रक्कम रुपये 10,125/- परत करण्यास जबाबदार ठरतात. तसेच सदोष मिटर मुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असणार. म्हणून तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5000/-, कामातील खोळंब्यापोटी रुपये 3000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2000/- एकूण रुपये 10,000/- मिळण्यास पात्र ठरतात.
वर उल्लेख केलेल्या विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना सदोष इलेक्ट्रिक मिटरची विक्री
करुन सेवेतील त्रुटी निर्माण केलेली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदारांना सदोष मिटरपोटी घेतलेले रक्कम रुपये 10,125/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत परत करावेत.
4. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी, कामातील खोळंब्यापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रित रक्कम रुपये 10,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
5. तक्रारदारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांका पासून एका महिन्यात घेऊन जावेत अन्यथा ते नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक – 28 ऑगस्ट 2013
[एस. एम. कुंभार] [व्ही. पी. उत्पात]
सदस्य अध्यक्ष