द्वारा- श्री.ना.द.कदम...................मा.सदस्य.
1. सामनेवाले हे वसई येथील ज्योत सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आहेत. तक्रारदार वसई येथील रहिवाशी आहेत. सामनेवाले हे चेअरमन असलेल्या संस्थेने तक्रारदाराच्या मुदत ठेवीच्या रकमेवरील व्याज व बचत खात्याची शिल्लक रक्कम तक्रारदाराना दिली नसल्यामुळे प्रसतुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनानुसार त्यांनी सामनेवाले यांचे पत संस्थेमध्ये दि. 14/02/20011 व दि. 10/10/2001 रोजी अनुक्रमे रु. 30,000/- व रु. 50,000/- मुदत ठेवी मध्ये गुंतविली. सदर रक्कम मुदतीअंती दि. 14/02/2004 व दि. 10/01/2005 रोजी अनुक्रमे रु. 45,465/- व रु. 73,427/- इतकी तक्रारदारांना मिळणार होती. तथापी सामनेवाले यांनी केवळ मुळ मुदत ठेव मुद्दल रक्कम त्यांना परत केली. मात्र सदर मुदत ठेवीवरील व्याज रक्कम एकुण रु. 38,892/- व तक्रारदाराच्या बचत खात्यामध्ये असलेली शिल्लक रक्कम रु. 20,000/- सामनेवाले यांचेकडे अनेक वेळा मागणी करुनही त्यांना परत केली नाही त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन व्याज रक्कम रु. 38,892/- व बचत खात्यामधील शिल्लक रक्कम रु. 20,000/- 18% व्याजासह परत मिळावी, रु. 1 लाख मानसिक त्रासाबद्दल मिळावेत व तक्रार खर्च रु. 25,000/- मिळावा अशा मागण्या तक्रारदारांनी केल्या आहेत.
3. सामनेवाले यांनी लेखी कैफियत दाखल करुन असे नमुद केले की, तक्रारदाराच्या मुदत ठेवीची मुद्दल रक्कम रु. 30,000/- व रु. 50,000/- त्यांना वेगवेगळया 2 धनादेशाद्वारे परत केली होती. आपल्या सदरील कथनाच्या पुष्टयर्थ सामनेवाले यांनी संबधित बँकेचा तपशिल सादर केला आहे. सामनेवाले यांनी पुढे असे नमुद केले आहे की, संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत अडचणीची झाल्यामुळे तक्रारदाराच्या मुदत ठेवीवरील व्याज रु. 15,465/- व रु. 23,427/- एकुण रु.38,892/- बँकेकडे निधी प्राप्त झाल्यावर देण्याचे मान्य करुन त्या हमीसाठी सामनवाले यांनी तक्रारदारांना दि. 14/05/2004 व दि. 10/01/2005 रोजी ठेव पावती क्र. 330 व 336 दिली आहे. सदर रक्कम बँकेकडे निधी उपलब्ध झाल्यावर देण्याची लिखित हमी सदर पावत्यांवर नमुद केली आहे. तक्रारदारांनी मागणी केलेली बचत खात्यातील रक्कम रु.20,000/- यापुर्वीच तक्रारदारांना दिली असल्याने व व्याजाची रक्कम योग्य वेळी देण्याचे मान्य केले असल्याने तक्रार फेटाळण्यात यावी.
4. तक्रारदार व सामनेवाले यांनी पुरावाशपथपत्र, कागदपत्रे व लेखी युक्विताद दाखल केला. उभय पक्षांचा वाद प्रतिवाद शपथपत्र व सर्व कागदपत्रांचे अवलोक मंचाने केले. उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला. त्यावरुन प्रकरणामध्ये खालील प्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ) तक्रारदारांनी सामनेवाले यांच्या पत संस्थेमध्ये रु. 30,000/- व रु. 50,000/- दि. 14/02/2001 व दि. 10/10/2001 रोजी मुदत ठेवीमध्ये अनुक्रमे 13% व 12% व्याजदराने गुंतविल्याची बाब व सदर रक्कम मुदत पुर्तीनंतर, अनुक्रमे रु. 45,465/- व रु. 73,427/- तक्रारदारांना व्याजासह देय होत असल्याची बाब सामनेवाले यांनी मान्य केली आहे.
ब) प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदारांनी प्रामुख्याने असे नमुद केले आहे की, त्यांना दोन मुदत ठेवीवरील व्याज रक्कम रु 38,892/-, शिवाय, बचत खात्यामधील शिल्लक रककम रु. 20,000/- अद्याप मिळाली नाही. तक्रारदारांना ठेवीवरील व्याज रक्कम रु. 38,892/- अद्याप दिले नसल्याची बाब सामनेवाले यांनी मान्य केली आहे. तथापी, तक्रारदाराची बचत खात्यामधील रक्कम रु. 20,000/- ची मागणी अमान्य करुन, सदरील रक्कम यापुर्वीच तक्रारदारांना दि. 18/09/2016 रोजी धनादेश क्र. 194791 अन्वये अदा केली असल्याचे लेखी कैफियतीमधील परिच्छेद 7ब मध्ये नमुद केले आहे. त्या कथनाच्या पुष्टयर्थ त्यांनी तक्रारदाराचे बचत खाते क्र. 534 चा तपशिल असलेले पृष्ठ क्र. 45, चा खाते उतारा दाखल केला आहे. त्यानुसार तक्रारदारांना दि. 18/09/2006 रोजी अॅक्सीस बँकेच्या धनादेशाद्वारे रु. 20,000/- मिळाल्याची नोंद असुन तक्रारदाराच्या बचत खात्यावर शुन्य रक्कम शिल्लक असल्याचा तपशिल आहे. तथापी, सामनेवाले यांनी या बरोबरच तत्कालीन युटीआय बँक (सद्याची अॅक्सीस बँक) मध्ये समानेवाले पीटर लोपेस यांचे बचत खाते क्र. 19010100000507 च्या पासबुकचा तपशिल दाखल केला असुन त्यामध्ये सामनेवाले पीटर यांनी स्वतःच्या व त्यांच्या पत्नीच्या संयुक्त खात्यामधुन तक्रारदारांना धनादेश क्र. 198783 द्वारे रु. 20,000/- दि. 21/01/2006 रोजी दिल्याची नोंद आहे. याबाबतची नोंद तक्रारदाराच्या बचत खात्यामध्ये दि. 18/09/2006 रोजी घेण्यात आली आहे. मात्र सामनेवाले यांनी आपल्या वैयक्तिक खात्यामधुन तक्रारदारांना रु. 20,000/- दिल्याची नोंद दि. 21/01/2016 रोजीची आहे. एवढेच नव्हे तर, सामनेवाले यांनी दि. 29/02/2016 रोजी लेखी युक्तिवादासह, पुन्हा सामनेवाले संस्थेकडे असलेल्या तक्रारदार यांचे बचत खाते क्र. 534 चा पृ.क्रृ 45 वरील खाते उतारा दाखल केला आहे. मात्र यामध्ये यापुर्वी रु. 20,000/- दि. 18/09/2006 रोजी दिल्याच्या नोंदीमध्ये अनाधिकृत बदल करुन दि. 18/09/2006 ऐवजी दि. 18/01/2006 अशी तारीख नमुद केली आहे. मुळ तारखेमध्ये असा अनाधिकृत केलेला बदल अगदी सहजासहजी व सकृतदर्शनी दिसुन येतो. शिवाय असा बदल संस्थेच्या ज्या अधिका-याने केला त्याची स्वाक्षरी सुध्दा दिसून येत नाही.
क) या संदर्भात अत्यंत गंभीर बाब नमुद करावेसे वाटते की, सामनेवाले यांनी त्यांच्या युटीआय बँकेतील त्यांच्या पत्नीसह असलेल्या वैयक्तिक बँक खाते क्र. 00502 मधुन तक्रारदारांना दि. 21/01/2006 रोजी दिलेले रु. 20,000/- व तक्रारदारांची पत्नी अॅनी पी लोपेझ यांच्या वैयक्तिक नावावर असलेल्या महाराष्ट्र को.ऑप.बँकेतील बचत खात्यामधून तक्रारदारांना दि. 10 नोव्हेंबर 2005 मध्ये दिलेले रु. 30,000/- या दोन्ही रक्कमांची नोंद स्टार ज्योत को.ऑपरेटीव्ह या तक्रारदाराच्या बचत खाते क्र. 534 च्या खाते उता-याच्या पृ.क्र. 45 वर घेण्यात आलेली आहे. म्हणजेच सामनेवाले चेअरमन श्री. लोपेझ यांनी त्यांच्या वैयक्तिक खात्यामधुन केलेल्या खर्चाची नोंद त्यांनी पतपेढीच्या खात्यामध्ये दर्शविली असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याने, हा एक गैरप्रकार असल्याचे प्रथमदर्शनी वाटते. सबब, तक्रारदाराच्या स्टारज्योत को.ऑप. पत पेढीमधील बचत खाते क्र. 534 मधील शिल्लक रक्कम रु. 20,000/- सामनेवाले यांनी दिल्याचा खात्रीलायक पुरावा नसल्याने तक्रारदारांनी सदर रकमेची केलेली मागणी योग्य असल्याचे मंचास वाटते. त्यावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 471/2012 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या मुदत ठेवीबाबत त्रृटींची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले पतसंस्थेने तक्रारदाराचे एकुण व्याज रक्कम रु. 38,892/- (अक्षरी रु. अडतीस हजार आठशे ब्याण्णव फक्त) तक्रार सादर दि. 01/02/2005 पासून 4% व्याजासह दि.31/12/2016 पुर्वी तक्रारदारांना द्यावी. आदेशपुर्ती नमुद कालावधीमध्ये न केल्यास दि. 01/02/2005 पासून आदेशपुर्ती होईपर्यंत 5% व्याजासह संपुर्ण रक्कम तक्रारदारांना द्यावी.
4. तक्रारदाराच्या बचत खात्यामध्ये त्यांची शिल्लक असलेली रक्कम रु. 20,000/- (अक्षरी रु. वीस हजार फक्त) दि. 10/11/2005 पासून 4% व्याजासह दि. 31/12/2016 पुर्वी सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी. आदेशपुर्ती नमुद कालावधीमध्ये न केल्यास दि. 10/11/2005 पासून आदेशपुर्तीपर्यंत 6% व्याजासह संपुर्ण रक्कम द्यावी.
5. तक्रार खर्चासाठी रु. 15,000/- (अक्षरी रु. पंधरा हजार फक्त) सामनेवाले यांनी दि. 31/12/2016 पुर्वी तक्रारदारांना अदा करावी.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
7. तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.