न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार हे वर नमूद पत्त्यावरील रहिवासी आहेत. जाबदार ही सहकार कायद्याप्रमाणे नोंदणीकृत पतसंस्था आहे. तक्रारदार व त्यांचे पती हे जाबदार संस्थेचे सभासद आहेत. तक्रारदारांचे पती हे जाबदार संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळात संचालक आहेत. जाबदार संस्थेने संचालक व त्यांचे कुटुंबियांचा वैद्यकीय विमा न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडे उतरविला होता. सदर पॉलिसीचा क्र. 15170134200400000001 असा असून कालावधी दि. 22/08/2020 ते 21/08/2021 असा होता. तक्रारदार यांना दि. 24/04/2021 रोजी कोवीड-19 ची बाधा झालेने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. सदर उपचारासाठी झालेल्या खर्चाचा क्लेम तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे दाखल केला होता. त्यानुसार विमा कंपनीने तक्रारदार यांचा रक्कम रु.1,35,523/- चा क्लेम मंजूर केलेला आहे व सदरची रक्कम जाबदार पतसंस्थेच्या खात्यावर दि.30/6/2021 रोजी जमा केलेली आहे. तक्रारदार यांना विमा कंपनीने रक्कम जमा केलेबाबतचे पत्र देवून कळविलेनंतर तक्रारदार या जाबदार संस्थेत रकमेची मागणी करीत होत्या. परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे देणेत येत होती. तक्रारदार यांनी दि.12/07/2021 रोजी जाबदार संस्थेस पत्र देवून रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी तक्रारदार यांना पत्र देवून मूळ कागदपत्रांची फाईल जमा करणेबाबत कळविले. तक्रारदार यांनी सदरची फाईल विमा कंपनीकडे जमा केली असलेचे जाबदार संस्थेस कळवूनही जाबदार यांनी तक्रारदार याच्या क्लेमची रक्कम तक्रारदार यांना अदा केलेली नाही. अशा प्रकारे जाबदार यांनी सेवात्रुटी केल्यामुळे तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून विमा कंपनीने जाबदारांकडे जमा केलेली विमा क्लेमची रक्कम रु.1,35,523/- मिळावी, मानसिक त्रासापोटी रु.1,50,000/- व अर्जाचा खर्च रु.25,000/- मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत तक्रारदार यांनी सहकार आयुक्त, पुणे यांचेकडे केलेल्या अर्जाची प्रत, एम.डी.इंडिया हेल्थ इन्शुरन्स प्रा.लि. यांनी क्लेम रक्कम तक्रारदार यांचे खात्यात भरलेबद्दलची पावती, तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे रक्कम मिळणेसाठी केलेला अर्ज, जाबदार यांनी तक्रारदार यांना दिलेले उत्तर इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. जाबदार क्र.1 व 2 यांनी याकामी म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराचे तक्रारीतील कथने परिच्छेदनिहाय नाकारली आहेत. तक्रारदारांनी प्रस्तुत वादविषयाबाबत सहायक निबंधक, सहकारी संस्था, दहिवाडी जिल्हा उपनिबंधक, सातारा व सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारदार यांना एकाच वेळी दोन फोरमकडे तक्रार करता येणार नाही. त्यामुळे या आयेागात तक्रारदारास तक्रार दाखल करता येणार नाही. तक्रारदार या संचालक नारायण माने यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व मालक असे संबंध नाहीत. त्यामुळे सदरची तक्रार या आयोगासमोर चालू शकत नाही. तक्रारदार यांनी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीला या कामी पक्षकार केलेले नाही. सबब, या तक्रारीस Non-joinder of necessary parties या तत्वाचा बाध येतो. सदरचे पॉलिसीनुसार जाबदार संस्थेचे संचालक व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय विमा घेण्याचा असलेस तो प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह जाबदार संस्थेकडे दाखल करण्याचा असतो व त्यावर संस्थेकडून योग्य त्या शिफारशीसह तो विमा कंपनीकडे सादर करणेचा असतो. तक्रारदार यांनी कोणताही विमाक्लेम जाबदार संस्थेकडे सादर केलेला नाही. त्यामुळे तो क्लेम विमा कंपनीला पाठविण्याचा व क्लेमची रक्कम तक्रारदारांचा देणेना प्रश्नच उद्भवत नाही. जाबदार यांनी दि. 28/5/2022 रोजी विमा कंपनीकडे तक्रारदाराचे विमाक्लेमबाबत चौकशी केली. परंतु विमा कंपनीकडे कोणताही चौकशी अहवाल अद्यापी प्राप्त झालेला नाही. तक्रारदारांचा विमाक्लेम चुकीचा आहे. जाबदार संस्थेने सदर क्लेमची चौकशी व्हावी असा अर्ज विमा कंपनीला दिलेला आहे. सबब, तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा अशी मागणी जाबदार क्र.1 व 2 यांनी केली आहे.
5. जाबदार क्र.1 व 2 यांनी याकामी शपथपत्र व जाबदार संस्थेचा ठराव क्र. 1214 दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे, पुरावा, युक्तिवाद तसेच जाबदार क्र.1 व 2 यांचे म्हणणे व शपथपत्र व युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | नाही. |
2 | जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ? | नाही. |
3 | तक्रारदार जाबदार यांचेकडून कथित विमाक्लेमची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | नाही. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जाचे कलम 2 मध्ये त्या व त्यांचे पती हे जाबदार संस्थेचे सभासद असलेचे कथन केले आहे. तसेच कलम 6 मध्ये तक्रारदार या संस्थेच्या सभासद व खातेदार असलेचे म्हटले आहे. तथापि तक्रारदार यांनी त्या जाबदार संस्थेच्या ग्राहक असलेबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सहकारी संस्थेचा सभासद हा संस्थेचा ग्राहक होत नाही. तक्रारदार जर जाबदार संस्थेचा खातेदार असेल तर तसे कोणतेही खात्याचे पासबुक तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी दाखल केलेले नाही. सबब, तक्रारदार या जाबदार यांची ग्राहक असलेची बाब सिध्द होत नसलेने तक्रारदार या जाबदार क्र.1 व 2 यांचे ग्राहक नसलेच्या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग नकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 व 3
8. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात, जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांचा रक्कम रु.1,35,523/- चा क्लेम मंजूर केलेला आहे व सदरची रक्कम जाबदार पतसंस्थेच्या खात्यावर दि.30/6/2021 रोजी जमा केलेली आहे असे कथन केले आहे. सदर कथनाचे पुष्ठयर्थ तक्रारदार यांनी एम.डी.इंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रा.लि. यांचे पत्र दाखल केले आहे. सदर पत्राचे अवलोकन करता सदरचे पत्र हे दी न्यू इंडिया अॅश्युरन्स कं.लि. या विमा कंपनीचे नसून ते एम.डी.इंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रा.लि. यांचे आहे. सदर पत्रानुसार तक्रारदाराच्या विमा क्लेमची रक्कम जाबदार संस्थेत जमा करण्यात आली असे कोठेही नमूद करण्यात आलेले नाही अथवा त्याबाबत कोणताही सविस्तर तपशील नमूद करण्यात आलेला नाही. तक्रारदाराने दी न्यू इंडिया अॅश्युरन्स कं.लि. या विमा कंपनीकडून तक्रारदाराचे विमा क्लेमची रक्कम जाबदार संस्थेत तक्रारदार यांचे खात्यात जमा झाली हे दर्शविणारा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे एम.डी.इंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रा.लि. यांचे वर नमूद पत्रावर विश्वास ठेवता येणार नाही. तक्रारदाराचा विमाक्लेम दी न्यू इंडिया अॅश्युरन्स कं.लि. या विमा कंपनीने मंजूर केला व तो जाबदार संस्थेमध्ये जमा केला याबाबत कोणताही पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केलेली कथने ही केवळ मोघम स्वरुपाची कथने आहेत. सदरचे कथनांचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब, जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास विमा कंपनीने जमा केलेली विमा क्लेमची रक्कम अदा न करुन सेवात्रुटी केली ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी दिले आहे.
9. तक्रारदार या जाबदार यांच्या ग्राहक नसलेने तसेच जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केली नसल्याने तक्रारदार या जाबदार यांचेकडून कोणतीही रक्कम मिळण्यास पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर नकारार्थी दिले आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाहीत.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.