तक्रारदारातर्फे अॅड. श्रीमती सुर्वे हजर.
जाबदेणारांतर्फे अॅड. श्री. झंझाड हजर
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(07/12/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेविरुद्ध सेवेतील त्रुटीकरीता ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार हे महात्माफुले पेठ, पुणे – 42 येथील रहिवासी असून जाबदेणार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तक्रारदार हे 785, गंजपेठ, पुणे येथील मिळकतीमध्ये भाडेकरु आहेत. या मिळकतीचे डेव्हलपमेंट करावयाचे होते, म्हणून तक्रारदार यांनी जागेचा ताबा दि. 7/11/2009 रोजी जाबदेणार यांना दिला. दि. 5/1/2010 रोजी दोन्ही बाजूंमध्ये नोंदणीकृत करारनामा झाला. त्यावेळी तक्रारदार यांनी जाबदेणार यांना रक्कम रु. 97,125/- चेकद्वारे दिले. करारातील अटी व शर्तींनुसार जाबदेणार यांनी तक्रारदार यांना पर्यायी जागा दिली. त्या जागेतील गैरसोयीमुळे तक्रारदार यांच्या फर्निचरचे नुकसान झाले. तशी नोटीस तक्रारदार यांनी जाबदेणार यांना पाठविली. जाबदेणार यांनी तक्रारदारांना सदनिकेचा ताबा देण्यास उशिर केल्यामुळे तक्रारदार यांनी जाबदेणार यांना नोटीस पाठविली. जाबदेणार यांनी बांधकामामध्ये दिरंगाई केली व कामे अपुरी ठेवली. तक्रारदारांनी जाबदेणार यांना रक्कम रु. 2,27,125/- दिलेले आहेत. संबंधीत सदनिकेचे क्षेत्रफळ 7 चौ. फु. ने कमी दिलेले आहे, म्हणून तक्रारदार यांनी रक्कम रु. 14,000/- मागितलेले आहेत. तक्रारदार सर्व सोयी-सुविधांयुक्त सदनिकेचा ताबा, भोगवटा प्रमाणपत्र आणि नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 10,000/-, त्याचप्रमाणे दिलेल्या रकमेवर 18% व्याज, कमी क्षेत्रफळासाठी रक्कम रु. 14,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- आणि खर्च रक्कम रु. 10,000/- मागतात.
2] जाबदेणार यांनी प्रस्तुत प्रकरणी उपस्थित राहून त्यांचा लेखी जबाब दाखल केला. त्यात त्यांनी तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. तक्रारदार यांनी पाठविलेल्या नोटीशीचा मजकुर चुकीचा असल्यामुळे तो जाबदेणार यांनी नाकारलेला आहे. तक्रारदार यांनी करारामध्ये कबुल केल्याप्रमाणे रक्कम न दिल्यामुळे सदनिकेचा ताबा दिलेला नाही. अद्यापही तक्रारदार यांचेकडून रक्कम रु. 1,22,525/- येणे आहेत.
करारानुसार तक्रारदार यांनी लाईट मीटरपोटी व सोसायटीसाठी रक्कम रु. 30,000/- देण्याचे मान्य केले होते. सर्व रकमा जमा केल्यानंतर सदनिकेचा ताबा देऊन पुर्णत्वाचा दाखला, ताबेपावती देण्याची तयारी जाबदेणार यांनी दर्शविली आहे.
3] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदोपत्री पुरावे आणि लेखी कथने विचारात घेता खालील मुद्दे निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | तक्रारदार यांनी जाबदेणार यांना कराराप्रमाणे संपूर्ण रक्कम दिली आहे का ? | नाही |
2. | जाबदेणार यांनी करारामध्ये नमुद केल्याप्रमाणे सर्व सोयी-सुविधांयुक्त सदनिकेचा ताबा मुदतीमध्ये दिला आहे का? | नाही |
3. | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते |
कारणे
4] तक्रारदार व जाबदेणार यांच्या कथनांचा विचार केला असता असे स्पष्ट होते की, तक्रारदार हे मुळ जागेमध्ये भाडेकरु होते. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा देईपर्यंत पर्यायी जागा दिलेली होती. सदनिकेच्या किंमतीपोटी तक्रारदार यांनी रक्कम रु. 3,88,500/- वेळोवेळी देण्याचे होते. जाबदेणार यांच्या कथनानुसार, अद्यापही तक्रारदार त्यांची रक्कम देणे आहेत, म्हणून सदनिकेचे काम
पूर्ण झालेले नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या फोटोग्राफ्सची पाहणी केली असता असे दिसून येते की, अद्यापही प्लास्टरचे काम झालेले नाही, सदरच्या सदनिकेमध्ये काही ठिकाणी लिकेज आहे. तक्रारदार यांना जाबदेणार यांनी पर्यायी जागा दिल्यामुळे सदरच्या सदनिकेचा ताबा देण्यास विलंब झाल्याबद्दल तक्रारदार यांना नुकसान भरपाई मागता येणार नाही. तथापी, जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या सदनिकेची अपूरी कामे पूर्ण करणे हे जाबदेणार यांचेवर बंधनकारक आहे. जाबदेणार यांच्या कथनानुसार, तक्रारदार यांनी सदनिकेपोटी पूर्ण रक्कम दिलेली नाही, त्यामुळे ते सदनिकेचा ताबा मागण्यास पात्र नाहीत. तक्रारदार यांनी पर्यायी जागेत ठेवलेल्या फर्निचरचे नुकसान झाल्याबद्दल जाबदेणार यांचेकडून नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. त्या मागणीचा या तक्रारीमध्ये कोणताही संबंध येणार नाही. तक्रारदार यांची जुन्या विद्युत मीटरवर विद्युत पुरवठा व्हावा, ही मागणीदेखील अप्रस्तुत आहे, कारण एम.एस.ई.बी., जुन्या मीटरवर विद्युत पुतवठा करत नाही.
5] तक्रारदार यांनी सदर सदनिकेचे क्षेत्रफळ सात चौ. फु. ने कमी असल्यामुळे रक्कम रु. 14,000/- मिळावेत, अशी मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी एस. आर. कन्सलटंट यांचे प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. त्यावर तारीख नाही, प्रमाणपत्र देणार्याचे प्रतिज्ञापत्र नाही, सदरची मोजणी उभय पक्षासमोर झाल्याचे दिसून येत नाही. सबब, हे प्रमाणपत्र वाचता येणार नाही. या प्रकरणात तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा मिळाला नसल्यामुळेम सदर सदनिकेची मोजणी केली आहे काय? व त्याचे क्षेत्रफळ कमी आहे काय? याबाबतचा निर्णय करता येणार नाही. तक्रारदार यांनी सोसायटी स्थापनेची विनंती केलेली आहे, त्यासाठी तक्रारदार यांनी जाबदेणार यांना रक्कम देण्याचे आहे. त्याचप्रमाणे विद्युतमीटरसंबंधीच्या खर्चाचा उल्लेख करारामध्ये नसल्यामुळे त्याचा खर्च तक्रारदार यांनी करावयाचा आहे. तक्रारदार यांनी सदनिकेतील बांधकामाच्या त्रुटीबाबत फोटोग्राफ्स दाखल केलेले आहेत. ते फोटोग्राफ्स पाहिले असता, असे दिसून येते की, सदनिकेतील बरेचसे काम अपूर्ण आहे व ते पूर्ण करुन घेण्याचा अधिकार तक्रारदार यांना आहे. वर उल्लेख केलेले मुद्दे, निष्कर्षे आणि कारणे यांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात
येते.
2. तक्रारदार यांनी जाबदेणार यांना उर्वरीत रक्कम
रु. 1,52,525/- (रु. एक लाख बावन्न हजार
पाचशे पंचवीस फक्त) द्यावेत व जाबदेणार यांनी
तक्रारदार यांना करारामध्ये कबुल केलेल्या सर्व
सोयी-सुविधांसह सदनिकेचा ताबा, तक्रारदार यांनी
उर्वरीत रक्कम मंचामध्ये किंवा प्रत्यक्षात त्यांना
दिल्यापासून एका महिन्याच्या आंत द्यावा, त्याच
प्रमाणे भोगवटापत्र आणि कन्व्हेयन्स डीड करुन
द्यावे.
3. जाबदेणार यांना असेही आदेश देण्यात येतात
की त्यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक
त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून त्याचप्रमाणे
रक्कम तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 10,000/-
(रु. दहा हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्या
पासून चार आठवड्यांच्या आंत द्यावे.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
5. दोन्ही पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात
की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक
महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे
संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट
करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 07/डिसे./2013