द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 31 मार्च 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्यातर्फे आयोजित जम्मू काश्मिर, वैष्णोदेवी, अमृतसर, वाघा बॉर्डर या सहलीसाठी त्यांचे आई-वडिल, पत्नी, नातेवाईक- श्री हळळुर व श्रीमती हळळुर, स्नेही श्रीमती घळसासी, श्री. उन्हाळे व श्रीमती उन्हाळे यांच्यासोबत जाण्याचे ठरविले. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या सांगण्यानुसार रुपये 1,54,000/- अदा केले. दिनांक 15/4/2011 रोजी जाबदेणार यांनी तक्रारदारांना घेऊन मुंबई मधून जम्मू येथे गेले. जम्मू व काश्मिर दाखविण्यात आले. जाबदेणार यांनी सर्वांची श्रीनगर येथील हॉटेल हेवन लेक मध्ये रहाण्याची सोय केली होती. सहलीच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार दिनांक 20/4/2011 रोजी वैष्णोदेवी येथे जाण्याचे ठरले होते. सर्वजण लवकर उठून तयार झाले, मात्र जाबदेणार रात्रीच कुठेतरी निघुन गेल्याचे तक्रारदारांना कळले. जाबदेणार नसल्यामुळे वैष्णोदेवीचा कार्यक्रम रद्य करावा लागला. परतीचे रेल्वे रिझर्व्हेशन मिळु न शकल्याने तक्रारदारांना श्रीनगर व जम्मू येथील मुक्काम वाढवावा लागला, जेवण खाण्याचा खर्च वाढला, सहलीचा पुढील कार्यक्रम रद्य झाला. रेल्वे रिझर्व्हेशन उपलब्ध न झाल्यामुळे तक्रारदारांना मुंबईला परत येतांना विमानाने यावे लागले, इतरांना रिझर्व्हेशन न मिळाल्यामुळे जम्मू येथील मुक्काम वाढवावा लागला. तेथे जाबदेणार यांचा शोध घेतला असता तेथे जाबदेणार पत्नीसोबत सापडले, त्या दोघांचा परतीचा खर्च देखील तक्रारदारांना करावा लागला. जाबदेणार यांनी दिनांक 9/5/2011 रोजीच्या वचनचिठ्ठी द्वारे रुपये 1,61,000/- परत करण्याचे मान्य केले. त्यापैकी रुपये 22,000/- श्री. हळळुर यांच्या खात्यात जमा केले, रुपये 1,39,000/-चा दिनांक 2/9/2011 चा दिलेला चेक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे परत आला. दिनांक 29/9/2011 रोजी नोटीस पाठूनही उपयोग झाला नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 1,39,000/-, नुकसान भरपाई पोटी रुपये 1,00,000/-, त्यावर 24 टक्के दराने दिनांक 1/6/2011 पासून व्याज, तक्रारीचा खर्च रुपये 25,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे मंचाने अवलोकन केले. तक्रारदारांनी दाखल केलेल्या जाबदेणार यांचा नोटराईज्ड वचननामा दिनांक 9/5/2011 चे अवलोकन केले असता जाबदेणार यांनी तक्रारदार व त्यांचे नातेवाईक, स्नेही यांच्याकडून जम्मु काश्मिर, अमृतसर, वाघा बॉर्डर, वैष्णोदेवी परिसर सहलीसाठी रुपये 1,54,000/- घेतल्याचे मान्य केले आहे. तसेच तक्रारदारांना आर्थिकदृष्टया फसविण्याच्या हेतूने, दिनांक 20/4/2011 रोजी वैष्णोदेवी येथे जाण्याचे ठरलेले असतांना देखील आदल्या दिवशीच श्रीनगर सोडून रात्री पलायन केले, त्यामुळे तक्रारदारांना गैरसोय, शारिरीक, मानसिक, आर्थिक त्रास, नाहक भुर्दंड सहन करावा लागल्याचे मान्य केले आहे. तसेच जाबदेणार यांच्या तक्रारदार व सर्वांना फसविण्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे रुपये 1,61,000/- खर्च करावा लागला, ती रक्कम देण्याचे मान्य केले असल्याचे स्पष्ट होते. त्यापैकी रुपये 22,000/- श्री. आशिश हळळुर यांच्या खात्यात दिनांक 7/5/2011 रोजी जमा केल्याचे त्यात नमूद करण्यात आलेले आहे. तसेच रुपये 1,39,000/- दिनांक 1/6/2011 किंवा त्यापुर्वी अदा करण्याचे वचन दिलेले आहे, तसेच ही रक्क्म 1/6/2011 पुर्वी अदा न केल्यास वचननाम्यासोबत जोडलेल्या प्रॉपर्टीकार्डावर देय रकमेचा बोजा चढवून देण्याची संमती देखील जाबदेणार यांनी सदरहू वचननाम्यात दिल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार यांनीच वचननाम्यात तक्रारदारांची सहल संपुर्ण पैसे स्विकारुनही पुर्ण केली नाही, त्यामुळे तक्रारदारांची गैरसोय झाली, शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला हे मान्य केलेले आहे. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 1,39,000/- दिनांक 2/9/2011 चा दिलेला चेक “Funds insufficient” म्हणून परत आल्याचे दिनांक 5/9/2011 च्या चेक रिर्टन मेमोवरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 1,39,000/- दिनांक 1/6/2011 पासून 9 टक्के व्याजाने परत मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रुपये 1,00,000/- ची मागणी केलेली आहे. परंतू ही मागणी अवास्तव आहे. तक्रारदारांना रुपये 1,39,000/- दिनांक 1/6/2011 पासून 9 टक्के मंजुर केलेले असल्यामुळे नुकसान भरपाईची तक्रारदारांची मागणी मंच अमान्य करीत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 1,39,000/- 9 टक्के व्याजासह दिनांक 1/6/2011 पासून संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.