न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती रोहिणी बा. जाधव, सदस्य
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार हे मौजे बोंबाळे, ता.खटाव जि. सातारा येथील रहिवासी आहेत. सदर गावी तक्रारदारांनी बंगल्याचे काम केले आहे. जाबदार यांचे फर्निचरचे दुकान आहे. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये चर्चा होवून तक्रारदाराच्या घरामध्ये फर्निचर करण्याचे ठरले. जाबदार यांनी तक्रारदार यांना फर्निचरचे साहित्य व मजुरी याचे एकूण रु.1,90,000/- सांगितले होते व कामातील मटेरियलमध्ये काही वस्तू कमी जास्त पडल्यास वर फक्त रु.15,000/- देवून व्यवहार पूर्ण करण्याचे उभयतांमध्ये ठरले होते. जाबदार यांनी तक्रारदार यांना फर्निचरच्या मटेरियलमध्ये गर्जन प्लाय सनमायका व चांगल्या प्रतीच्या काचा बसविणेचे ठरले होते. तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.5/08/2021 रोजी रक्कम रु.1,45,000/- अदा केले. त्यानुसार उभयतांमध्ये दि. 6/08/2021 रोजी करार झाला. त्याचदिवशी जाबदारने काम करणेस सुरुवात केली. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या कॉम्प्युटर असलेल्या खोलीत कडाप्पाच्या कपाटाशेजारी छोटे कपाट दरवाजासह एक व बेडरुममध्ये कडाप्पा शेजारी दुसरे छोटे कपाट दरवाजासह फक्त प्लायवूडमध्ये तयार केले आहे. एवढेच काम जाबदार यांनी आजअखेर केले आहे. करारातील अटी व शर्तीनुसार जाबदारांनी काम पूर्ण केलेले नाही. तक्रारदाराने जाबदारांची समक्ष भेट घेतली असता जाबदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून तक्रारदारांनी दि.1/12/2021 रोजी जाबदार यांना नोटीस दिली तथापि नोटीस मिळूनही जाबदार यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पुन्हा तक्रारदाराने जाबदार यांना दि. 5-01-2022 रोजी नोटीस पाठविली. ही नोटीस पण जाबदार यांना मिळाली तरीसुध्दा याही नोटीसीला जाबदारांनी काहीच प्रतिसाद दिला नाही म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, जाबदार यांचेकडून रक्कम रु.1,45,000/- परत मिळावी, तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- मिळावी व तक्रार अर्जाचा खर्च जाबदार यांचेकडून मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत श्री फर्निचर यांनी तक्रारदार यांना दिलेल्या पावतीची झेरॉक्स, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये झालेल्या कराराची प्रत, तक्रारदारांनी जाबदार यांना वकीलामार्फत पाठविलेल्या दोन नोटीसा, सदर नोटीसांच्या पोचपावत्या, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र दाखल केला आहे.
4. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार यांचेवर होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत तसेच त्यांनी म्हणणेही दाखल केले नाही. सबब, जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र व युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे जाबदार यांचेकडून त्यांनी अदा केलेली रक्कम रु.1,45,000/- व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
6. तक्रारदारांना त्यांचे बंगल्यामध्ये फर्निचरचे काम करावयाचे होते. जाबदार यांचे फर्निचरचे दुकान असलेने तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये चर्चा होवून तक्रारदाराच्या घरामध्ये फर्निचर करण्याचे ठरले. सदर कामापोटी तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.5/08/2021 रोजी रक्कम रु.1,45,000/- अदा केले. त्यानुसार उभयतांमध्ये दि. 6/08/2021 रोजी करार झाला. सदर रक्कम अदा केल्याची पावती व करारनामा याकामी तक्रारदाराने कागदयादीसोबत अ.क्र.1 व 2 ला दाखल केला आहे. जाबदार यांनी सदरची पावती व करारनामा याकामी हजर होवून व म्हणणे दाखल करुन नाकारलेला नाही. सबब, सदर करारनाम्याचे व पावतीचे अवलोकन करता, तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. तक्रारदारांचे कथनानुसार, जाबदार यांनी तक्रारदार यांच्या कॉम्प्युटर असलेल्या खोलीत कडाप्पाच्या कपाटाशेजारी छोटे कपाट दरवाजासह एक व बेडरुममध्ये कडाप्पा शेजारी दुसरे छोटे कपाट दरवाजासह फक्त प्लायवूडमध्ये तयार केले आहे. एवढेच काम जाबदार यांनी आजअखेर केले आहे. करारातील अटी व शर्तीनुसार जाबदारांनी काम पूर्ण केलेले नाही. तक्रारदाराने जाबदारांची समक्ष भेट घेतली असता जाबदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून तक्रारदारांनी दि.1/12/2021 रोजी जाबदार यांना नोटीस दिली परंतु तरीही जाबदार यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही असे तक्रारदाराचे कथन आहे. दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तक्रारदारांनी वकीलांमार्फत दि.1/12/2021 रोजी तसेच दि.5/01/2022 रोजी नोटीस पाठविल्याचे दिसून येते. सदरच्या नोटीसा जाबदार यांना मिळालेबाबतच्या पोहोच पावत्या याकामी तक्रारदारांनी दाखल केल्या आहेत. सदरची बाब विचारात घेता, जाबदारांना नोटीसा मिळूनही जाबदार यांनी तक्रारदार यांचे फर्निचरचे काम पूर्ण करुन दिलेले नाही ही बाब स्पष्ट होते. तक्रारदाराची तक्रारअर्जातील कथने जाबदार यांनी याकामी हजर राहून नाकारलेली नाहीत. जाबदार यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होवूनही जाबदार हे याकामी हजर झाले नाहीत. सबब, जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदारांनी आपले तक्रारअर्जातील कथनांचे शाबीतीसाठी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराचे शपथेवरील कथनांचा विचार करता तक्रारदाराने आपली तक्रार शाबीत केली आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, जाबदार यांनी करारानुसार तक्रारदार यांचे घरातील फर्निचरचे काम पूर्ण न करुन तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
8. तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदयादीतील अ.क्र.1 ला जोडलेल्या पावतीवरुन तक्रारदारांनी जाबदार यांना रक्कम रु.1,45,000/- अदा केले असलेचे दिसून येते. जाबदारांनी करारानुसार फर्निचरचे काम पूर्ण करुन न दिलेने तक्रारदार हे सदरची रक्कम रु.1,45,000/- जाबदार यांचेकडून परत मिळणेस पात्र आहेत. तथापि तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी त्यांचे घराचे फर्निचरचे कामाचे सदयस्थितीबद्दल कोणतेही फोटो अथवा अनुषंगिक पुरावा दाखल केलेला नाही या बाबींचा विचार करता तक्रारदार यांचे घरातील फर्निचरचे जे काही काम जाबदारांनी केले आहे त्या कामाच्या मोबदल्याची रक्कम वजा करुन घेणेस जाबदार पात्र राहतील व सदरचे उर्वरीत रकमेवर तक्रारदार हे करार तारखेपासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत. तसेच जाबदारांनी तक्रारदारास सदोष सेवा दिल्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला व या आयोगात तक्रार अर्ज दाखल करावा लागला, या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार यांनी तक्रारदारास रक्कम रु.1,45,000/- अदा करावी तसेच सदर रकमेवर दि.06/08/2021 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
- जाबदारांनी तक्रारदाराचे घरात केलेल्या फर्निचरचे कामाची रक्कम वजा करुन घ्यावी.
- जाबदार यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी निकालाची प्रत मिळालेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.