द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
** निकालपत्र **
दिनांक 31/07/2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे -
1. तक्रारदारांनी त्यांचा जीवनचरितार्थ चालविण्यासाठी शेवरेला तवेरा गाडी खरेदीसाठी जाबदेणार यांच्या पुणे शाखे कडून दिनांक 16/1/2008 रोजी कर्ज रक्कम रुपये 5,25,000/- घेतले. उभय पक्षकारात करारनामा क्र NRFWPU 50807745 झाला. प्रोसिजर नुसार तक्रारदारांनी सिक्युरिटी साठी कोरे धनादेश दिले. दरमहा कर्जाचा हप्ता रुपये 16,188/- होता. तक्रारदार नियमित कर्जाचे हप्ते भरत होते. जाबदेणार हप्ते भरल्याच्या पावत्या देत होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार हप्ते भरलेले असतांना देखील हप्ते थकलेले आहेत या नावाखाली जाबदेणार यांनी डिसेंबर 2009 मध्ये तक्रारदारांच्या घरासमोरुन गाडी ओढून नेली. तक्रारदार गाडी ओढून नेल्याचे समजल्यानंतर चार दिवसांनी कर्जाची उर्वरित रक्कम भरण्यासाठी रुपये 4,00,000/- चा धनादेश घेऊन पुणे शाखेत भरण्यासाठी गेले असता जाबदेणार यांनी कर्मचा-यांनी गाडी विकल्याचे तक्रारदारांना सांगितले. तक्रारदारांनी गाडीचे सर्व कर्ज फेडून गाडी परत मागितली. परंतु गाडी परत देण्यास जाबदेणार यांनी असमर्थता दर्शविली. तक्रारदारांनी अनेक वेळा गाडीची मागणी करुनही जाबदेणार यांनी पुर्तता केली नाही. म्हणून तक्रारदारांनी गाडी ताब्यात घेतांना भरलेले डाऊन पेमेंटची मागणी केली परंतु ते परत देण्यासही जाबदेणार यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदार कर्जाची उर्वरित रक्कम भरण्यास तयार होते परंतु जाबदेणार यांनी मागील दोन ते अडीच वर्षापासून गाडीबाबत तक्रारदारांना कोणतीही माहिती पुरविली नाही. भरलेली रक्कमही परत केली नाही. कोणतीही पुर्व सुचना न देताच जाबदेणार यांनी तक्रारदारांची गाडी, तक्रारदारांच्या संमतीशिवाय विकली. दिनांक 5/12/2011 रोजी जाबदेणार यांनी तक्रारदारांना रिकव्हरीची नोटीस पाठवून संपुर्ण कर्जाच्या रक्कम रुपये 5,25,000/- ची मागणी केली. ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे सर्व रक्कम भरण्यास तयार असल्याचे सांगितले, तसेच डाऊन पेमेंट व भरलेले काही हप्ते याबाबतही सांगितले परंतु जाबदेणार यांनी तक्रारदारांना सर्व कर्जाची रक्क्म भरण्यास सांगितले अन्यथा तक्रारदारांनी दिलेले कोरे धनादेश बँकेत टाकू असेही सांगितले. गाडी अभावी तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाले. त्रास सहन करावा लागला. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून त्यांची गाडी क्र. एम एच 14 एएच 4768 चा योग्य व चालु कंडिशन मध्ये ताबा मागतात. तसेच नुकसान भरपाईपोटी रुपये 9,00,000/- व मानसिक त्रासापोटी रुपये 1,00,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्या विरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी टुरिस्ट व्हेईकल संदर्भातील आर.टी.ओ यांच्या कडील फॉर्म क्र 041849 दाखल केलेला आहे. त्यावर तक्रारदारांच्या वाहनाचा प्रकार टी 1 टॅक्सी नमूद करण्यात आलेला आहे. तक्रारदारांनी तक्रारीमध्येच सुरुवातीलाच जीवनचरितार्थ चालविण्यासाठी शेवरेला तवेरा गाडी खरेदीसाठी जाबदेणार यांच्या पुणे शाखे कडून दिनांक 16/1/2008 रोजी कर्ज रक्कम रुपये 5,25,000/- घेतल्याचे नमूद केलेले आहे. सबब ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार तक्रारदार जाबदेणार यांचे ग्राहक आहेत असे मंचाचे मत आहे.
4. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार गाडीचे हप्ते क्लिअर असतांनाही जाबदेणार यांनी गाडीचे हप्ते थकलेले आहेत या नावाखाली तक्रारदार घरी नसतांना डिसेंबर 2009 मध्ये घरासमोरुन गाडी ओढून नेली. परंतु त्याआधी तक्रारदारांना प्रिसेल नोटीस देण्यात आलेली नव्हती. म्हणून तक्रारदार चार दिवसांनी जाबदेणार यांच्या पुणे शाखेकडे उर्वरित कर्जाची रक्कम रुपये 4,00,000/- भरण्यासाठी चा चेक घेऊन गेले असता जाबदेणार यांच्या कर्मचा-यांकडून गाडी विकल्याचे तक्रारदारांना कळले. परंतु यासंदर्भात तक्रारदारांनी कुठलाही कागदोपत्री पुरावा, चेकची छायांकीत प्रत, चेकचा क्रमांक, दिनांक, बँकेचे नाव याबाबतचा पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही.
5. तक्रारदारांनी जाबदेणारांकडे हप्त्यांपोटी भरलेल्या रक्कम रुपये 1,20,564/- भरलेली आहे. भरलेल्या रकमांच्या पावत्या मंचासमोर दाखल करण्यात आलेल्या आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार यांनी गाडीची विक्री करुन कर्जाची रक्कम वसूल केलेली आहे. असे असतांनाही जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिनांक 5/12/2011 रोजी वकीलांमार्फत कर्ज रिकव्हरीबाबत नोटीस पाठवून कर्जाची संपुर्ण रकमेची म्हणजेच रुपये 5,25,000/- ची मागणी केलेली आहे. नोटीसची प्रतही मंचासमोर दाखल केलेली आहे. सदर कामी जाबदेणारय यांनी तक्रारदारांची गाडी विक्री करीत असतांना कायदेशिर बाबींची पुर्तता केली नाही, प्रिसेल नोटीस दिली नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या गाडीची विक्री करुन कर्जाची वसूली केलेली असतांनाही परत कर्ज रिकव्हरीची नोटीस पाठवून संपुर्ण कर्जाच्या रकमेची मागणी करणे, सिक्युरिटी पोटी दिलेले चेक्स परत मागूनही ते परत न करणे ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी, अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे, अनुचित व्यापारी पध्दतीमुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. म्हणून तक्रारदार नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 1,50,000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी नुकसान भरपाईपोटी रुपये 9,00,000/- ची केलेली मागणी अवास्तव आहे असे मंचाचे मत आहे, त्याबाबत तक्रारदारांनी कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. यासंदर्भात मंचाने स्टेट ऑफ कर्नाटका विरुध्द विश्वभारती हाऊस बिल्डींग को.ऑप सो. [A.I.R. 2003 SC 1043] या निवाडयाचा आधार घेतला.
6. तक्रारदार गाडी क्र. एम एच 14 एएच 4768 चा योग्य व चालु कंडिशन मध्ये ताबा मागतात. परंतु तक्रारदारांनीच तक्रारीमध्ये नमुद केल्याप्रमाणे व वरील विवेचनानुसार तक्रारदारांची गाडी जाबदेणार यांनी विकलेली असल्यामुळे तक्रारदांची गाडी योग्य व चालु स्थितीतील मिळण्याची मागणी मंच अमान्य करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 1,50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.