(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर पी. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 23 सप्टेंबर 2016)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. ही तक्रार विरुध्दपक्ष विमा कपंनीने तक्रारकर्त्याचा गाडीचा विमा दावा नाकारल्याने दाखल केली. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हा अशोक लेलॅन्ड ट्रक क्रमांक MH 23 – W – 5235 चा मालक आहे. विरुध्दपक्ष क्र.2 ही श्रीराम जनरल इंशुरन्स कंपनी असून विरुध्दपक्ष क्र.1 ही त्या कंपनीची स्थानिक शाखा आहे. दिनांक 20.9.2011 ला तक्रारकर्त्याने त्या ट्रकचा विमा विरुध्दपक्ष क्र.1 कडून काढला होता व गाडीचा IDV रुपये 7,50,000/- होता. विम्याची मुदत दिनांक 20.9.2011 ते 19.9.2012 अशी होती. दिनांक 8.6.2012 ला त्या ट्रकला अपघात झाला, यासंबंधी पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर. नोंदविण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी तक्रारकर्त्याचे ड्रायव्हरचे ड्रायवींग लायसन्स घेतले होते. ड्रायवींग लायसन्समध्ये ड्रायव्हरचे नांव नुर हक उर्फ राजु असे लिहीले आहे म्हणून तसेच नांव एफ.आय.आर.मध्ये व वैद्यकीय पेपरमध्ये लिहिण्यात आले. ड्रायव्हरला दुखापत झाली असल्याने दवाखाण्यात भरती करण्यात आले. ड्रायव्हरचे हे नाव आधारकार्ड व राशन कार्ड मध्ये सुध्दा लिहीले आहे. तक्रारकर्त्याने पॉलिसी अंतर्गत विरुध्दपक्षाकडे वाहनासंबंधी रुपये 7,50,000/- चा दावा केला होता. सर्व्हेअरने तपासणी करुन तो ट्रक पूर्ण क्षतिग्रस्त झाल्याचा अहवाल दिला होता, परंतु पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पञात ड्रायव्हरचे नाव वेगळे लिहिले असल्याने विमा दावा नाकारण्यात आला. पोलीस पेपरमध्ये ड्रायव्हरचे नाव राजु लिहिले होते व त्याच नावाने ड्रायव्हरने स्वाक्षरी केली होती. परंतु, जप्ती पञकात तसेच जमानतीच्या कागदपञावर व बॉन्डवर नुर हक उर्फ राजु असे लिहिले आहे. सबब, ड्रायव्हरने नाव बदलले नाही किंवा नावा संबंधी कुठलिही लबाडी केली नाही म्हणून या कारणास्तव विमा वादावा फेटाळून विरुध्दपक्षाने सेवेत कमतरता ठेवली. म्हणून तक्रारकर्त्याने रुपये 7,50,000/- व्याजासह विरुध्दपक्षाकडून मागितले असून त्याशिवाय नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मागितला आहे.
3. विरुध्दपक्षास मंचा मार्फत नोटीस बजावण्यात आली, त्यानुसार विरुध्दपक्ष मंचासमक्ष उपस्थित होऊन विरुध्दपक्षाने आपला लेखी जबाब निशाणी क्र.6 खाली दाखल केला आहे. त्यात ट्रकची मालकी तसेच त्याचा रुपये 7,50,000/- चा विमा काढला हे मान्य केले आहे. परंतु ट्रकला झालेला अपघात नाकबूल करुन, हे सुध्दा नाकबूल केले की पोलीसांनी ड्रायव्हरचा ड्रायव्हींग लायसन्स घेतले होते. तसेच ड्रायव्हरचे नाव ड्रायव्हींग लायसन्स, वैद्यकीय पेपर, आधार कार्ड व राशन कार्ड मध्ये नुर हक उर्फ राजु लिहिल्याचे नाकबूल केले. ड्रायव्हरच्या नावामध्ये खोडतोड केल्याने विमा दावा फेटाळण्यात आला, तसेच या तक्रारीला मुदतीची बाधा येते आणि मंचाला अधिकारक्षेञ नाही, या सर्व कारणास्तव तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
4. तक्रारकर्त्याच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्षास संधी देवूनही हजर झाले नाही. अभिलेखावरील दाखल दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
5. विरुध्दपक्षाचे लेखी उत्तरावरुन हे स्पष्ट आहे की, तक्रारकर्त्याचा विमा दावा केवळ या कारणास्तव नाकारण्यात आला की, ट्रक ड्रायव्हरच्या नावात फरक आहे. ड्रायव्हरच्या नावातील हा फरक ही जाणुन-बुजून केलेली लबाडी आहे असे गृहीत धरुन विमा दावा फेटाळण्यात आला. ट्रकच्या विमा बद्दल तसेच विमा अवधी, तसेच झालेल्या अपघाताबद्दल वाद नाही.
6. ड्रायव्हरच्या ड्रायव्हींग लायसन्सची प्रत आम्हीं तपासून पाहिली ज्यामध्ये त्याचे नाव Noorul Haq S/o. Nin ul Haq असे लिहिले आहे, हेच नांव आधार कार्डवर व त्याच्या वडीलांचे राशन कार्डवर लिहिले आहे. त्याचदिवशी आर.टी.ओ. च्या जारी केलेल्या ड्रायव्हींग लायसन्सच्या Extract of Driving License मध्ये सुध्दा हेच नांव नमूद केले आहे. यावरुन असे दिसते की, सरकारी दस्ताऐवजामध्ये आणि ओळखपञामध्ये ड्रायव्हरचे नाव Noorul Haq S/o. Nin ul Haq असे लिहिले आहे. नावा संबंधीचा विवाद तेंव्हा उत्पन्न झाला जेंव्हा ट्रकला अपघात झाल्यानंतर एफ.आय.आर., पंचनामा आणि दवाखाण्याच्या कागदपञामध्ये राजु असे लिहिण्यात आले. आम्हीं त्या कागदपञाची तपासणी केली एफ.आय.आर. हा सुरेश ढलाल नावाच्या ईसमाने लिहिला असून तो ट्रक ड्रायव्हर Raju S/o. Anul Khan याच्या विरुध्द दिला आहे. घटनास्थळ पंचानाम्यामध्ये सुध्दा हेच नाव नमूद केले आहे. एफ.आय.आर. वरुन असे दिसून येते की, त्या ड्रायव्हरला अपघातामध्ये गंभीर दुखापत झाली होती, त्याल ट्रक मधून काढल्यानंतर त्याने त्याचे नाव Raju S/o. Anul Khan असे सांगितले. म्हणून तेच नाव पोलीस व दवाखाण्याच्या कागदपञांमध्ये लिहिण्यात आले. परंतु, पुढे पोलीस तपासामध्ये त्याचे नांव Noorul Haq उर्फ राजु S/o. Nin ul Haq असे लिहिण्यात आले. हेच नाव दोषारोप पञ, जप्ती मेमो, जमानती बॉन्डस् आणि इतर पोलीस कागदपञांवर लिहिण्यात आले. साक्षदारांच्या बयाणामध्ये सुध्दा ड्रायव्हरचे नाव राजु उर्फ निरुल हक असे लिहिले आहे.
7. या ठिकाणी हे लक्षात घ्यावे लागेल की, पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोप पञ जे दाखल झाले ते ट्रक नं. MH-23- W- 5235 च्या ड्रायव्हर विरुध्द झाले असून त्यामध्ये त्याचे नांव Noorul Haq उर्फ Raju S/o. Nin ul Haq असे लिहिले आहे. हा तोच ईसम आहे जो घटनेच्या दिवशी तक्रारकर्त्याच्या ट्रकला झालेल्या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. म्हणून त्या ट्रकच्या ड्रायव्हरच्या ओळखी विषयी आमच्या मनात कुठलाही संभ्रम नाही. विरुध्दपक्षाने दस्ताऐवजाची नीट तपासणी नक करता दावा नाकारुन सेवेत कमतरता ठेवली, या कारणा व्यतिरिक्त दावा नाकारण्यास इतर कुठलेही कारण नसल्याने तक्रारकर्ता हा त्याच्या गाडीची विमा राशी मिळण्यास पाञ आहे.
8. विरुध्दपक्षा तर्फे ही तक्रार मुदतबाह्य आहे किंवा ती चालविण्यास मंचाला अधिकारक्षेञ नाही या संबंधी काहीही पुरावा देऊ शकली नाही. सबब विरुध्दपक्षाचे हे आक्षेप फेटाळण्यात येते.
9. अंततः वरील कारणास्तव ही तक्रार मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 ला आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक किंवा संयुक्तीकरित्या त्याच्या क्षतिग्रस्त ट्रकच्या विमापोटी रुपये 7,50,000/- दिनांक 11.6.2012 पासून द.सा.द.शे. 9 % व्याज दराने तक्रारकर्त्यास द्यावे.
(3) विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारिरीक ञासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 3,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 23/09/2016