निकाल
दिनांक- 15.07.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार हमीदभाई शेख पाशामियॉं यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे बीड येथे टेलरींगचे दुकान चालवितात. सामनेवाला क्र.1 व 2 बीड येथे व्यवसाय करतात. सामनेवाला यांनी सेवा भव्य सुलभ हप्ता विक्री योजना सुरु केली. योजनेमध्ये 100 सभासदांची संख्या ठेवण्यात आली. सभासदाकडून दरमहा रक्कम रु.3,000/- जमा करुन घेऊन एकूण 20 हप्ते ठेवण्यात आले. महिन्याच्या दहा तारखेला रात्री 9.00 वाजता भाग्यवान क्रमांक काढून भाग्यवान सभासदास पॅशन प्रो सेल्फ स्टार्ट मोटार सायकल देण्याचे आश्वासन दिले.
तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना आश्वासन दिले व योजनेत भाग घेण्यास सांगितले. तक्रारदार हे कार्ड क्र.28 अन्वये सभासद झाले, तक्रारदार यांनी दरमहा रु.3,000/- हप्त्याप्रमाणे एकूण चार हप्त्याची रक्कम रु.12,000/- सामनेवाला यांच्याकडे जमा केले. सामनेवाला यांनी तक्रारदार यास काही न कळवता सदरील योजना बंद केली. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे जमा केलेली रक्कम रु.12,000/- ची मागणी केली. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीचे उत्तर दिले. तक्रारदार यांनी दि.06.09.2013 रोजी सामनेवाला यांना नोटीस पाठवली, सामनेवाला यांना नोटीस मिळूनही त्यांनी तक्रारदाराचे पैसे परत केले नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे पैसे न देऊन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तसेच तक्रारदार यांची फसवणूक करुन मानसिक व शारिरिक नुकसान केलेले आहे. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.12,000/-, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावे अशी विनंती केली आहे.
सामनेवाला क्र.1 यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली, सदरील रजिस्टर नोटीस घेण्यास सामनेवाला यांना सुचना देण्यात आली, सुचना देऊनही सामनेवाला यांनी नोटीस घेतली नाही. सबब सामनेवाला क्र.1 यांना नोटीसची बजावणी झाली आहे असे गृहीत धरुन त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
सामनेवाला क्र.2 यांना नोटीसची बजावणी झाली. नोटीस मिळूनही ते या मंचासमोर हजर झाले नाही. सबब त्यांचे विरुध्द ही एकतर्फा आदेश करण्यात आला.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत निशाणी 4 अन्वये सभासद नोंदणी कार्ड, तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे पैसे भरल्याच्या पावत्या, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दिलेल्या नोटीसची प्रत, पोस्टाची पोहच पावती हजर केलेली आहे. तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र निशाणी 9 अन्वये दाखल केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.वडमारे यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्ताचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार यांनी
शाबीत केली आहे काय ? होय.
2) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ः- तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्ताचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी सेवा भव्य सुलभ हप्ता विक्री योजना सुरु करुन सभासदाकडून दरमहा रक्कम रु.3,000/- प्रमाणे हप्ते वसूल केल्याचे निदर्शनास येते. एकूण 20 हप्त्यामध्ये सदरील सेवा द्यावयाची होती. तक्रारदार यांनी असे कथन केले आहे की, त्यांनी सामनेवाला यांच्याकडे चार हप्त्याची रक्कम रु.12,000/- नियमित भरलेली आहे. तक्रारदार यांनी हप्ते भरल्याबाबत पावत्या मंचासमोर हजर केल्या आहेत, त्याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी नियमित चार हप्ते असे एकूण रक्कम रु.12,000/- सामनेवाला यांचेकडे भरल्याचे स्पष्ट होते. सामनेवाला यांनी सदरील सेवा चार हप्ते भरल्यानंतर खंडीत केली आहे. तक्रारदार यांनी भरलेल्या हप्त्याची रक्कम सामनेवाला यांच्याकडे नोटीस देऊन मागणी केली, सामनेवाला यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदार हे सामनेवाला यांचे सदर योजनेअंतर्गत ग्राहक आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदार हे रक्कम रु.12,000/- तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी
तक्रारदार यांना रक्कम रु. 12,000/- (अक्षरी रुपये बारा हजार, फक्त) निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत दयावेत, सदर रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.10 टक्के व्याज द्यावे.
3) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना झालेल्या
मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.3,000/-
(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी
रु.1000/- (अक्षरी रुपये एक हजार) दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड