जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 317/2022. तक्रार नोंदणी दिनांक : 17/11/2022. तक्रार निर्णय दिनांक : 16/04/2024.
कालावधी : 01 वर्षे 04 महिने 29 दिवस
मुबारक युसुफअली शेख, वय 38 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. नायगाव, पो. हिंपळनेर, ता. चाकूर, जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शिवसागर ट्रॅक्टर्स तर्फे सोमेश्वर (भुषण) मलशेट्टे
(फार्माट्रॅक ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते), प्रसाद गार्डनशेजारी,
लातूर-नांदेड रोड, अहमदपूर, ता. अहमदपूर, जि. लातूर.
(2) प्रोप्रा. / व्यवस्थापक, शिवसागर ट्रॅक्टर्स, प्रसाद गार्डनशेजारी,
लातूर-नांदेड रोड, अहमदपूर, ता. अहमदपूर, जि. लातूर.
(3) व्यवस्थापकीय संचालक, Escort Limited,
फार्माट्रॅक ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरींग कंपनी प्लांट, प्लॉट नं.2,
सेक्टर 13, फरिदाबाद (हरियाणा) 121 007. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- एस. एस. मुरगे
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकरिता विधिज्ञ :- प्रशांत ए. कांबळे
विरुध्द पक्ष क्र. 3 यांचेकरिता विधिज्ञ :- एम. एफ. सिद्दीकी
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, ते व्यवसायाने शेतकरी आहेत. शेती कामाकरिता मे 2022 मध्ये त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून फार्माट्रॅक कंपनीच्या ट्रॅक्टरची माहिती घेतली. तक्रारकर्ता यांनी त्यांच्या मालकीचा महिंद्रा ॲन्ड महिंद्रा कंपनीचा जुना ट्रॅक्टर क्र. एम.एच.24 ए.जी.2396 अदलाबदल करुन नवीन एस्कॉर्ट फार्माट्रॅक एटीओएम 35 एच.पी. ट्रॅक्टरच्या रु.6,70,000/- किंमतीतून रु.1,35,000/- वजावट करण्याचे व रु.5,35,000/- वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन नवीन ट्रॅक्टर घेण्याचे निश्चित झाले. त्यानुसार उभय पक्षांमध्ये कागदोपत्री लेखी नोंद करण्यात आली. तक्रारकर्ता यांनी दि.10/6/2022 रोजी त्यांचे जुने ट्रॅक्टर क्र. एम.एच.24 ए.जी.2396 विरुध्द पक्ष यांच्याकडे जमा केले. विरुध्द पक्ष यांनी नवीन ट्रॅक्टर खरेदी-विक्री कार्यवाहीसाठी प्रपत्र व को-या कागदपत्रांवर स्वाक्ष-या घेतल्या. त्यानंतर नवीन ट्रॅक्टरचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी ट्रॅक्टर तक्रारकर्ता यांच्या शेतामध्ये नेण्यात आले. प्रात्यक्षिकामध्ये विरुध्द पक्ष यांचे ट्रॅक्टर 35 एच.पी. असूनही ते 15 एच.पी. च्या ट्रॅक्टरचे काम करु शकले नाही. ट्रॅक्टरमध्ये उत्पादकीय दोष असल्याचे निदर्शनास आल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी दि.19/6/2022 रोजी ट्रॅक्टर परत नेले. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी त्यांच्या जुन्या ट्रॅक्टर क्र. एम.एच.24 ए.जी.2396 परत मागितले असता त्यांच्याकडून रु.10,000/- खर्च स्वीकारल्यानंतरही विरुध्द पक्ष यांनी बेकायदेशीररित्या तक्रारकर्ता यांचा ट्रॅक्टर ताब्यात ठेवलेला आहे. तक्रारकर्ता यांनी सातत्याने विनंती व प्रयत्न करुनही विरुध्द पक्ष यांनी त्यांचा ट्रॅक्टर परत न केल्यामुळे मशागतीअभावी जमीन पडीक राहून रु.5,00,000/- चे नुकसान सहन करावे लागले. उक्त वादकथनांच्या अनुषंगाने ट्रॅक्टर क्र. एम.एच.24 ए.जी.2396 सुस्थितीत परत करण्याचा; शेती पडीक पडल्यामुळे झालेले नुकसान रु.5,00,000/- देण्याचा; विरुध्द पक्ष यांनी ट्रॅक्टर परत करण्यासाठी स्वीकारलेले रु.10,000/- परत करण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी संयुक्तपणे लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने अमान्य केले आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या कथनानुसार तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडे नवीन ट्रॅक्टरची त्यांच्याकडे चौकशी केल्याचे व विमा व नोंदणी शुल्कासह ट्रॅक्टरचे रु.6,70,000/- मुल्य सांगितल्याचे नमूद केले. तक्रारकर्ता यांचे जुने ट्रॅक्टर क्र. एम.एच.24 ए.जी.2396 अदलाबदल करण्याचे व त्याचे रु.1,35,000/- वजावट करण्याचे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी मान्य केले होते. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे पुढे कथन असे की, तक्रारकर्ता यांचे जुने ट्रॅक्टर क्र. एम.एच.24 ए.जी.2396 सुस्थितीत असते तर तक्रारकर्ता यांना नवीन ट्रॅक्टर घेण्याची आवश्यकता भासली नसती. तक्रारकर्ता यांचे जुने ट्रॅक्टर अदलाबदल करुन घेण्यास कोणी तयार नसल्यामुळे नवीन ट्रॅक्टर घेण्याचे खोटे भासवून विरुध्द पक्ष यांना त्यांचा जुना ट्रॅक्टर दिलेला आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द यांच्या ट्रॅक्टरचा शेतीमध्ये 9 दिवस वापर करुन ट्रॅक्टर व टायरची झीज केली आणि त्यांचे रु.6,70,000/- चे नुकसान केले आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्या नवीन ट्रॅक्टरचा वापर करुन तो जुना केला आणि विनापरवाना शोरुममध्ये उभा करुन निघून गेले. शेती कामे करताना तक्रारकर्ता यांनी ट्रॅक्टरबद्दल कोणतीच तक्रार केलेली नाही. तक्रारकर्ता यांनी ट्रॅक्टरबद्दल तज्ञ तंत्रज्ञ किंवा अभियंत्याचा अहवाल घेतलेला नाही. प्रात्यक्षिकाबद्दल मुख्य कंपनीस तक्रार केलेली नाही. तक्रारकर्ता यांनी दि.20/6/2022 रोजी महिंद्रा जिओ 245 – 24 एच.पी. ट्रॅक्टर चाकूर येथून खरेदी केला असल्यामुळे त्यांचे शेतीचे नुकसान झालेले नाही. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या नवीन ट्रॅक्टरचे मुल्य बुडविण्याच्या हेतुने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता यांचे जुने ट्रॅक्टर खरेदी-विक्री दलालाने तक्रारकर्ता यांना पूर्ण सहमती घेऊन नेले असल्यामुळे तक्रारकर्ता यांना जुने ट्रॅक्टर देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. तक्रारकर्ता यांनी जुन्या ट्रॅक्टरचे नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही आणि त्यामुळे विरुध्द पक्ष यांचे रु.1,35,000/- चे नुकसान झाले आहे. नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरिता तक्रारकर्ता यांच्याकडून रकमेची मागणी करण्यात येत आहे. अंतिमत: ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.3 यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, त्यांचे नांव Escort Ltd. नसून Escort Kubota Ltd. आहे. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे त्यांचे विक्रेते असून दि.27/2/2022 रोजी त्यांच्याशी झालेल्या करारानुसार विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे त्यांच्या वैयक्तिक व्यवहारास जबाबदार आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या वैयक्तिक व्यवहाराशी विरुध्द पक्ष क्र.3 यांचा कोणताही संबंध नाही. तक्रारकर्ता यांची तक्रार विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या उत्पादनाविषयी नसून विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल आहे. करारानुसार विक्रेत्याने केलेल्या दुर्व्यव्हारामुळे फसवणूक किंवा निष्काळजीपणा असल्यास विरुध्द पक्ष क्र.1 व 2 जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.3 यांनी केलेली आहे.
(4) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचे 'ग्राहक"
असल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 व 2 :- प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडे नवीन ट्रॅक्टरची चौकशी केली आणि विमा व नोंदणी शुल्कासह ट्रॅक्टरचे रु.6,70,000/- मुल्य निश्चित झाल्याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. तत्पूर्वी, तक्रारकर्ता यांचे जुने ट्रॅक्टर क्र. एम.एच.24 ए.जी.2396 अदलाबदल करण्याचे व त्याचे रु.1,35,000/- वजावट करण्याचे निश्चित झाल्याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे.
(6) तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार तक्रारकर्ता यांच्या शेतामध्ये नवीन ट्रॅक्टरचे प्रात्यक्षिक घेतले असता विरुध्द पक्ष यांचे ट्रॅक्टर 35 एच.पी. असतानाही ते 15 एच.पी. च्या ट्रॅक्टरचे काम करु शकले नाही. त्या ट्रॅक्टरमध्ये उत्पादकीय दोष असल्याचे निदर्शनास आल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी दि.19/6/2022 रोजी ट्रॅक्टर परत नेले. उलटपक्षी, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द यांच्या ट्रॅक्टरचा शेतीमध्ये 9 दिवस वापर केला आणि ट्रॅक्टर व टायरची झीज करुन तो जुना केला. त्यानंतर विनापरवाना शोरुममध्ये उभा करुन निघून गेले आणि त्यांचे रु.6,70,000/- चे नुकसान केले आहे.
(7) तक्रारकर्ता यांच्यातर्फे शिवानंद पि. प्रल्हाद दांडगे, पीर महंमद महेबूब शेख, संगमेश्वर पि. मल्लिकार्जून लोहारे, अरविंद पि. त्र्यंबक जगताप (पाटील) व बाळासाहेब पि. दिगंबद सावंत यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल करण्यात आले. त्यांच्या निवेदनानुसार तक्रारकर्ता यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टरचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आणि ते 15 एच.पी. पेक्षा कमी अश्वशक्तीचे कार्य करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे दि.19/6/2022 रोजी विरुध्द पक्ष यांनी परत नेले. उलटपक्षी, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्यातर्फे किरण पि. लक्ष्मण बेल्लाळे यांचे शपथपत्र सादर करण्यात आले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांना ते ओळखतात. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे नवीन ट्रॅक्टरचे प्रात्यक्षिक देतेवेळी ते उपस्थित होते. ट्रॅक्टरच्या प्रात्यक्षिक व अश्वक्षमतेसंबंधी तक्रार नव्हती. तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडून ट्रॅक्टर खरेदी करावयाचे नसल्यामुळे खोटे कारण देऊन चाकूर येथून महिंद्रा जिओ 245 - 24 एच.पी. ट्रॅक्टर खरेदी केला आहे. त्यांनी पुढे निवेदन केले की, तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्यामध्ये नवीन ट्रॅक्टरचा व्यवहार पूर्ण झालेला नाही आणि विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी जुना ट्रॅक्टर घेतलेला नाही. तक्रारकर्ता यांनी जुने ट्रॅक्टर खरेदी-विक्री दलालास दिले असून विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचा त्याबद्दल संबंध नाही.
(8) वाद-तथ्ये, अभिलेखावर दाखल कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्रे व युक्तिवाद पाहता तक्रारकर्ता यांचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याशी वादकथित एस्कॉर्ट फार्माट्रॅक एटीओएम 35 एच.पी. ट्रॅक्टर खरेदीचा व्यवहार पूर्ण झालेला नाही, हे स्पष्ट होते. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी एस्कॉर्ट फार्माट्रॅक एटीओएम 35 एच.पी. ट्रॅक्टर तक्रारकर्ता यांना विक्री केला, याबद्दल विक्री देयक दिसून येत नाही.
(9) उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता एस्कॉर्ट फार्माट्रॅक एटीओएम 35 एच.पी. ट्रॅक्टर खरेदी करताना तक्रारकर्ता यांचे जुने ट्रॅक्टर क्र. एम.एच.24 ए.जी.2396 अदलाबदल करण्याचे व त्याचे रु.1,35,000/- वजावट करण्याचे निश्चित झालेले होते. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या कथनानुसार तक्रारकर्ता यांनी दि.10/6/2022 रोजी वादकथित ट्रॅक्टर नेला आणि 9 दिवस वापर करुन त्याची झीज केली. प्रश्न निर्माण होतो की, ट्रॅक्टरची खरेदी-विक्रीची प्रक्रिया होण्यापूर्वी तक्रारकर्ता यांना नवीन ट्रॅक्टर का देण्यात आला ? आणि त्याबद्दल विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याद्वारे योग्य खुलासा होऊ शकला नाही. शिवाय, ट्रॅक्टर तक्रारकर्ता यांच्या ताब्यात दिल्याबद्दल ताबा पावती दाखल केलेली नाही. अशा स्थितीत, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करुन ट्रॅक्टरचा ताबा दिल्याचे सिध्द होत नाही. उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद काहीही असला तरी दि.19/6/2022 रोजी वादकथित ट्रॅक्टर विरुध्द पक्ष यांच्याकडे परत आल्याचे मान्य करावे लागते. निर्विवादपणे, तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्यामध्ये एस्कॉर्ट फार्माट्रॅक एटीओएम 35 एच.पी. ट्रॅक्टर खरेदी-विक्रीचा व्यवहार पुर्णत्वास गेलेला नाही. ज्यावेळी उभय पक्षांमध्ये वादकथित ट्रॅक्टरच्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया पूर्ण होऊन त्याचे मुल्य अदा झाल्याचे सिध्द होत नाही, त्यावेळी तक्रारकर्ता हे कथित व्यवहाराच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचे 'ग्राहक' होऊ शकत नाहीत. आमच्या मते, ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (7) अन्वये तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे 'ग्राहक' असल्याचे सिध्द होत नसल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. ग्राहक तक्रारीमध्ये उपस्थित अन्य वाद-तथ्ये व प्रश्नांना स्पर्श न करता मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.2 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-