अॅड श्रीधर कसबेकर तक्रारदारांतर्फे
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 2 एप्रिल 2014
प्रस्तूतची तक्रार ग्राहकाने जाबदेणार प्रवासी कंपनी विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटी संदर्भात दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
[1] तक्रारदार क्र 1 व 2 हे पती-पत्नी असून जाबदेणार यांचा प्रवासी कंपनी चालविण्याचा व्यवसाय आहे. दिनांक 12/10/2012 रोजी जाबदेणार यांनी दैनिक सकाळ मध्ये राजस्थान यात्रे संबंधी जाहिरात दिली होती व त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला रुपये 33,500/- खर्च व रुपये 1000/- सर्व्हिस टॅक्स एकूण रुपये 68,000/- चेक द्वारे अदा केली. त्याची पावतीही जाबदेणार यांनी दिली आहे. या पैशामध्ये संपूर्ण जाण्यायेण्याचा प्रवास, जेवण, नाष्टा, चहा व पुणे ते मुंबई विमानतळ टॅक्सीने व मुंबई ते अहमदाबाद विमानाने व अहमदाबाद ते संपूर्ण राजस्थान मधील ठिकाणे दाखविणे व परत माऊंटअबू ते अहमदाबाद ते मुंबई बसने, व अहमदाबाद ते मुंबई विमान प्रवास व मुंबई ते पुणे बसने असा प्रवास ठरलेला होता. प्रवासाची तारीख 18/11/2012 असतांना जाबदेणार यांनी अचानक दिनांक 16/11/2012 रोजी सकाळी 11 वा. प्रवासाला निघावे लागेल असे कळविले. त्यामुळे तक्रारदारांना हातातली कामे बाजूला ठेवावी लागली. अचानक धांदलीमुळे मानसिक त्रास, दु:ख, वेदना झाल्या. परतीच्या प्रवासात तक्रारदार यांना उदयपूर येथील जेवणाचा खर्च रुपये 1227/- करावा लागला. उदयपूर स्वखर्चाने पहावे लागले. जाबदेणार यांनी परतीच्या प्रवासात अहमदाबाद मुंबई विमानाचे तिकीट दिले नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांना बसने पुण्याला जाण्यास सांगितले व पुणे येथे पोहोचल्यानंतर अहमदाबाद-मुंबई विमान प्रवासातील तिकीट खर्च व अहमदाबाद-मुंबई बस तिकीट खर्च यातील फरकाची रक्कम रुपये 7000/- पुणे येथे दिली जाईल असे सांगितले. अशा प्रकारे जाबदेणार यांच्याकडून रुपये 10,027/- येणे आहेत. सदर रकमेसाठी तक्रारदार यांनी वेळोवेळी जाबदेणार यांना दुरध्वनीद्वारे कळविले, पत्रे पाठविली, नोटीस पाठविली परंतू जाबदेणार यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. जाबदेणार यांच्याकडून येणे असलेली रक्कम रुपये 10,427/- परत मिळावी, गैरसोय व दुरध्वनी खर्चापोटी रुपये 10,000/- मिळावेत, शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/- मिळावेत व इतर खर्चापोटी रुपये 15,000/- मिळावेत म्हणून तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार जाबदेणार यांच्याविरुध्द दाखल केली आहे.
[2] जाबदेणार यांना नोटीस बजावून देखील जाबदेणार मंचासमोर गैरहजर राहिले. सबब प्रस्तूतची तक्रार जाबदेणार यांच्याविरुध्द एकतर्फा चालविण्यात आली.
[3] तक्रारदार यांनी आपल्या तक्रारी सोबत शपथपत्र, दैनिक सकाळ मध्ये प्रसिध्द झालेली जाहिरात, जाबदेणार यांचे यात्रेसंबंधीचे प्रसिध्दीपत्रक, तक्रारदार यांनी केलेल्या खर्चाच्या पावत्या, नोटीसची स्थळप्रत, पोहोचपावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार यांनी दिलेल्या पुराव्यास निरुत्तर करण्यासाठी जाबदेणार मंचासमोर उपस्थित राहिले नाहीत. लेखी कथने, शपथपत्र दाखल केले नाही. सबब तक्रारदार यांचा पुरावा विचारात घेऊन जाबदेणार यांनी तक्रारदार यांना निकृष्ट दर्जाची सेवा पुरविली आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारदार हे त्यांनी केलेला खर्च रुपये 10,427/-, त्याचप्रमाणे त्यांना झालेला शारिरीक, मानसिक त्रासापोटी व इतर खर्चापोटी रुपये 5000/- व प्रस्तूत प्रकरणाचा खर्च रुपये 2000/- मिळण्यास पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे.
सबब खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना निकृष्ट दर्जाची सेवा दिली आहे
असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम रुपये 10,427/- [ रुपये
दहा हजार चारशे सत्तावीस मात्र ] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना शारिरीक, मानसिक त्रासापोटी व इतर खर्चापोटी रुपये 5000/- [ रुपये पाच हजार मात्र] व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2000/- [ दोन हजार मात्र] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावे.
5. तक्रारदारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.
ठिकाण- पुणे
दिनांक: 2/4/2014