(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा. अध्यक्ष)
(पारीत दिनांक-08 जुलै,2022)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 खाली विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द विमाकृत वाहनाचे झालेल्या नुकसानी बाबत विम्याची रक्कम मिळावी तसेच अनुषंगीक नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे मालकीची हिरो होंडा मोटर सायकल असून तिचा नोंदणी क्रं-MH-36/AC-0427 असा आह. त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून सदर वाहना करीता टू व्हीलर पॅकेज पॉलिसी काढली होती आणि त्या विमा पॉलिसीचा क्रमांक-04-21-1904-1802-00013563 असा आहे. त्याने विम्याचे हप्त्यापोटी विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे रुपये-2186/- चा हप्ता जमा केला होता. सदर विम्याचा कालावधी हा दिनांक 30 जून, 2020 पासून 29 जून, 2021 असा होता. सदर पॉलिसी ही पॅकेज पॉलिसी असून त्यामध्ये तिस-या पक्षाला झालेले नुकसान, वाहन मालक-चालक तसेच प्रवासी यांना झालेले नुकसान भरपाई करुन देण्याची जोखीम वि.प. विमा कंपनीने उचललेली होती.
त्याने पुढे असे नमुद केले की, त्याची शेती मौजा शहापूर राष्ट्रीय महामार्ग क्रं 6 ला लागून आहे. दिनांक-30 ऑगस्ट, 2020 रोजी पूर आल्यामुळे तक्रारकर्ता हा सायंकाळी 06 ते 06.30 वाजता शेतामध्ये पुराचे पाण्याखाली पिके आली का हे पाहण्यासाठी गेला होता व त्याने मोटर सायकल राष्ट्रीय महामार्ग क्रं 6 च्या कडेला लावली व थोडया अंतरावरील शेतात तो गेला परंतु जेंव्हा तो परत आला त्यावेळी मोटर सायकलची तुटफूट झालेली दिसून आली परंतु आजूबाजुला कोणीही दिसून आले नाही, त्यावेळी अंधार झालेला होता. त्याचे मोटर सायकलला अज्ञात वाहनाने किंवा कुठल्या तरी जनावराने धडक दिलेली होती परंतु नक्की समजू श्काले नाही, त्यावेळी जोरदार पाऊस सुरु होता परंतु वाहनाची चोरी होऊ शकते म्हणून त्याने वाहन त्याच अवस्थेत घरी आणले. पुराचे पाणी ओसरल्या नंतर त्याने मोटर सायकल दिनांक-04.09.2020 रोजी साईराज मोटर हिरो मोटोकॉर्प हया अधिकृत सर्व्हीस सेंटरमध्ये नेली. तक्रारकर्त्याने एजंट मार्फतीने क्लेम फार्म प्राप्त केला. दिनांक-04.09.2020 रोजी विरुध्दपक्ष विमा कंपनीचे तक्रार निवारण केंद्रात तक्रार नोंदवून क्लेम फार्म भरुन दिला व अर्जात घटनेचे विस्तृत विवरण दिले. दिनांक-08.09.2020 रोजी त्याचे भ्रमणध्वनीवर विरुध्दपक्ष विमा कंपनीचा सर्व्हेअरची नियुक्ती केल्या बाबत संदेश आला. सर्व्हेअर याने तक्रारर्त्या कडे विमाकृत वाहनाचा सर्व्हे झाला असल्याचे सांगून पोलीस एफ.आय.आर., एम.एल.सी. दस्तऐवजाची मागणी केली परंतु तक्रारकर्त्याने त्याचे विमाकृत वाहनास अज्ञात वाहनाने किंवा जनावराने धडक दिली हे समजू शकले नसल्याचे तसेच अपघातात तक्रारकर्ता किंवा अन्य ईतर कुठल्याही व्यक्तीला ईजा न झाल्यामुळे पोलीस एफ.आय.आर. व एम.एल.सी.चे दस्तऐवज नसलयाचे सांगितले. त्यानंतर सर्व्हेअर यांनी त्याचा क्लेम पुढे सादर करतो असे सांगितले. विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याचे ई मेलवर दिनांक-24.09.2020 रोजीचे पत्र पाठविले आणि त्यामध्ये नमुद केले की, सर्व्हेअर यांना क्षतीग्रस्त विमाकृत वाहनाची पाहणीची संधी मिळाली नाही तसेच वाहनचालकास अपघातात झालेली दुखापत व वैद्दकीय उपचाराचे दस्तऐवज, पोलीस पंचनामा, एफ.आय.आर तसेच T.P. ला झालेल्या मालमत्तेच्या नुकसानी बाबत दस्तऐवज सादर करण्यास सांगितले. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याचे विमाकृत वाहनास कोणी नुकसान पोहचविले ही बाब समजू न शकल्यामुळे त्याने पोलीस मध्ये एफ.आय.आर. नोंदविला नाही. अपघाताचे वेळी वाहन रस्त्याच्या बाजूला उभे असल्यामुळे वाहन चालकास ईजा पोहचणे व वैद्दकीय उपचार करणे ईत्यादी बाबीचा प्रश्नच उदभवत नाही. या बाबत तक्रारकर्त्याने विमा दावा प्रस्तावा मध्ये तसेच अर्जात माहिती यापूर्वीच दिलेली आहे. तक्रारकर्त्याने पुन्हा या बाबत दिनांक-01.10.2020 रोजीचे पत्र रजि. पोस्टाव्दारे पाठवून विस्तृत स्पष्टीकरण दिले तसेच क्लेम फार्मसह दस्तऐवज पाठविलेत. परंतु त्यानंतरही विरुध्दपक्ष यांनी दिनांक-07.10.2020 रोजी तशाच आशयाचे पत्र पाठविले पुन्हा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दिनांक-16.10.2020 रोजी सर्व दस्तऐवज क्लेम फार्मसह पाठविलेत. तक्रारकर्त्याला क्षतीग्रसत विमाकृत वाहन दुरुस्त झाल्या बाबत साईराज सर्व्हीस सेंटल, भंडारा येथून फोन आला, त्यानुसार विरुध्दपक्ष विमा कंपनीचे एजंटला विमा क्लेम बाबत विचारले असता उत्तर दिले नाही शेवटी तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्तीचा खर्च म्हणून रुपये-41,487/- साईराज सर्व्हीस सेंटर मध्ये जमा केले. विरुध्दपक्ष विमा कंपनीने दिनांक-26.10.2020 रोजीचे पत्राव्दारे तक्रारकर्त्याचा विमा दावा एफ.आय.आर, मेडीकल रिपोर्ट, अपघाती नुकसानी बाबत दस्तऐवज सादर न केल्याचे कारणावरुन खारीज केला. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याचे विमाकृत वाहन कोणी क्षतीग्रस्त केले याची माहिती नसल्यामुळे एफ.आय.आर. नोंदविला नाही तसेच विमाकृत वाहन अपघाताचे वेळी रस्त्याचे बाजूला उभे होते त्यामुळे कोणाला शारिरीक ईजा होण्याचा प्रश्नच नसल्यामुळे वैद्दकीय उपचाराचे दसतऐवज सादर करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्याचा विमा दावा विनाकारण खारीज केला व त्यास दोषपूर्ण सेवा दिली म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा विरुध्द खालील प्रकारच्या मागण्या केल्यात.-
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला विमाकृत मोटर सायकलचे झालेल्या नुकसानी संबधात क्षतीग्रस्त विमाकृत वाहनाचे दुरुस्तीचे बिल रुपये-41,487/- द.सा.द.शे.-18 टक्के दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रक्कम रुपये-20,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्दपक्ष यांनी त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष बजाय अलाईन्ज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये विरुध्दपक्ष कंपनीचा पत्ता हा रियान हाऊस, दुसरा मजला, मोहन नगर, किंग्स-वे, ऑपोझीट कस्तुरचंद पार्क, सदर नागपूर असा असल्याचे नमुद केले. त्यांनी तक्रारकर्त्याने केलेल्या आरोपा बाबत पुरावा दयावा असे नमुद केले. तक्रारकर्त्याने त्याचे मोटर सायकलची काढलेली विमा पॉलिसी, विम्याचा कालावधी इत्यादी बाबी मान्य केल्यात. तक्रारकर्त्याला दिलेली विमा पॉलिसी अटी व शर्तीचे आधिन पुरविली होती. तक्रारकर्त्याला आदेशित करण्यात यावे की, त्याने मूळ विमा पॉलिसी विरुध्दपक्ष यांना पुरवावी. तक्रारकर्त्याचे विमाकृत मोटरसायकलचे नुकसान दिनांक-30 ऑगस्ट, 2020 रोजी झाले असताना त्याने कॉल सेंटर वरुन त्याची सुचना 04 सप्टेंबर, 2020 रोजी नुकसान झाल्याचे दिनांका पासून पाच दिवस उशिराने दिली आणि त्यामुळे त्याने विमा पॉलिसीतील अट क्रं 1 चे शर्तीचा भंग केला वस्तुतः सदर अटी नुसार नुकसानीची सुचना घटना घडल्या पासून त्वरीत लेखी सुचना विरुध्दपक्ष विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. तसेच विमाकृत मोटर सायकल ही विरुध्दपक्ष विमा कंपनीला कोणतीही माहिती न देता मोक्यावरुन हलविण्यात आली अशाप्रकारे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीची मोका चौकशी करण्याची संधी हिरावून नेली अशाप्रकारे विमा पॉलिसीतील अट क्रं 1 चा भंग झालेला आहे. तक्रारकर्त्याने विमा दावा प्रपत्र भरुन दिलेले नाही तसेच पोलीस रिपोर्ट आणि मोका स्थळाचे फोटो दाखल केलेले नाहीत, फक्त दुरध्वनी वरुन त्याने मोटर सायकल रस्त्याचे कडेला उभी करुन तो शेतात गेला आणि परत आल्यावर अज्ञात याने त्याचे मोटरसायकलला नुकसान पोहचविले असे कळविले. तक्रारकर्त्यास दिनांक-24.09.2020 व दिनांक-07.10.2020 रोजी स्मरणपत्र देऊन सुध्दा त्याने दस्तऐवज पुरविले नाहीत. तक्रारकर्त्याची सुचना मिळाल्या नंतर विरुध्दपक्ष विमा कंपनीने सर्व्हेअर यांची नुकसानीचे निर्धारण करण्यासाठी नियुक्ती केली होती आणि सर्व्हेअर यांनी त्यांचा अहवाल विरुध्दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात दाखल केला. सर्व्हेअर यांनी अहवाला मध्ये असे नमुद केले की, विमाकृत वाहनाचे समोरुन झालेले नुकसान हे विमाकृत वाहनास दुस-या वाहनाने धडक दिल्यामुळे झाले असेल अथवा विमाकृत वाहनाने मागून दुस-या चालत्या वाहनास धडक दिल्यामुळे झालेले असेल. तक्रारकर्त्याने सत्य वस्तुस्थिती लपवून ठेवलेली आहे त्यामुळे विमा दावा मिळण्यास पात्र नाही. परिच्छेद निहाय उततर देताना तक्रारकर्त्याचे मालकीची हिरो होंडा मोटर सायकल नोंदणी क्रं-MH-36/AC-0427 या वाहनाचा विमा विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून काढला होता आणि सदर विम्याचा कालावधी हा दिनांक 30 जून, 2020 पासून 29 जून, 2021 असा होता या बाबी मान्य केल्यात. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीला कोणतीही सुचना न देता वाहन मोक्यावरुन हलविले होते. तक्रारकर्त्याने विमा दावा समर्थनार्थ कोणतेही पुराव्याचे दस्तऐवज दाखल केलेले नाहीत. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीला विमा दाव्या संबधी चौकशी करण्याची कोणतीही संधी दिली नाही. विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झाल्यामुळे त्यांनी विमा दावा नाकारला त्यामुळे कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही.
04. उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवज, दाखल साक्षी पुरावे व लेखी युक्तीवादाचे अवलोकन जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे करण्यात आले. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री विनय भोयर तर विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती डेहाडराय यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन सदर तक्रारी मध्ये न्यायनिर्णयार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | क्षतीग्रस्त विमाकृत वाहनाचा तक्रारकर्त्याचा विमा दावा विरुध्दपक्ष विमा कंपनीने नाकारुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय | -होय- |
2 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
कारणे व मिमांसा
मुद्दा क्रं 1 व क्रं 2-
05. तक्रारकर्त्याचे विमाकृत मोटर सायकल नोंदणी क्रं-MH-36/AC-0427 आणि विम्याचे वैध कालावधी म्हणजे दिनांक 30 जून, 2020 पासून 29 जून, 2021 असा होता तसेच विमाकृत वाहनास झालेले नुकसान या बाबी विरुध्दपक्ष विमा कंपनीला मान्य आहेत. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे कथना प्रमाणे तक्रारकर्त्याचे विमाकृत मोटरसायकलचे नुकसान दिनांक-30 ऑगस्ट, 2020 रोजी झाले असताना त्याने कॉल सेंटर वरुन त्याची सुचना 04 सप्टेंबर, 2020 रोजी पाच दिवस उशिराने दिली आणि त्यामुळे त्याने विमा पॉलिसीतील अट क्रं 1 चे शर्तीचा भंग झालेला आहे. वस्तुतः सदर अटी नुसार नुकसानीची लेखी सुचना घटना घडल्या पासून त्वरीत विरुध्दपक्ष विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. तसेच विमाकृत मोटर सायकल ही विरुध्दपक्ष विमा कंपनीला कोणतीही माहिती न देता मोक्यावरुन हलविण्यात आली अशाप्रकारे विरुध्दपक्ष विमा कंपनीची मोक्यावर वाहन तपासणी आणि चौकशी करण्याची संधी हिरावून घेतली त्यामुळे विमा पॉलिसीतील अट क्रं 1 चा भंग झालेला आहे. तक्रारकर्त्याने विमा दावा प्रपत्र भरुन दिलेले नाही तसेच पोलीस रिपोर्ट आणि मोका स्थळाचे फोटो दाखल केलेले नाहीत, फक्त दुरध्वनी वरुन त्याने मोटर सायकल रस्त्याचे कडेला उभी करुन तो शेतात गेला आणि परत आल्यावर अज्ञात याने त्याचे मोटरसायकलला नुकसान पोहचविले असे कळविले. तसेच पोलीस रिपोर्ट आणि मोका स्थळाचे फोटो दाखल केलेले नाहीत, फक्त दुरध्वनी वरुन त्याने मोटर सायकल रस्त्याचे कडेला उभी करुन तो शेतात गेला आणि परत आल्यावर अज्ञात याने त्याचे मोटरसायकलला नुकसान पोहचविले असे कळविले.तक्रारकर्त्यास दिनांक-24.09.2020 व दिनांक-07.10.2020 रोजी स्मरणपत्र देऊन सुध्दा त्याने दस्तऐवज पुरविले नाहीत.
06. विरुध्दपक्ष विमा कंपनीचा आक्षेप की, त्यांना विमाकृत क्षतीग्रस्त वाहनास झालेल्या नुकसानीची सुचना त्वरीत मिळाली नाही तसेच सुचना मिळाल्या नंतर वाहन मोक्यावरुन हलविले होते. परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्यांचे सर्व्हेअर यांची नियुक्ती केल्या नंतर त्यांनी अहवाल सादर करुन त्यामध्ये विमाकृत वाहनास नुकसान झाल्याचे नमुद केलेले आहे, त्यामुळे विमाकृत वाहनास झालेले नुकसान ही बाब खरी असल्याचे दिसून येते व त्यास सर्व्हेअर यांचे अहवाला वरुन पुष्टी मिळते त्यामुळे तक्रारकर्त्याने विमाकृत वाहनास झालेल्या नुकसानीची सुचना विरुध्दपक्ष विमा कंपनीला उशिराने दिली म्हणून विमाकृत वाहनास झालेली नुकसानीची भरपाई नाकारता येणार नाही. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, तो विमाकृत मोटर सायकल रस्त्याच्या एका बाजूला उभी करुन शेतात गेला होता आणि परत आल्यावर त्याला विमाकृत मोटरसायकलला नुकसान झाल्याचे दिसून आले, त्याने प्रत्यक्ष विमाकृत मोटरसायकलला झालेले नुकसान पाहिलेले नसल्याने पोलीस मध्ये एफ.आय.आर. नोंदविला नाही तसेच विमाकृत वाहन रस्त्याचे बाजूला उभे असताना नुकसान झाले असल्यामुळे कोणतीही जिवित हानी अथवा जखम होण्याची शक्यता नाही त्यामुळे पोलीस एफ.आय.आर. आणि दुखापत झाल्यामुळे वैद्दकीय उपचाराचे दस्तऐवज विरुध्दपक्ष विमा कंपनी मध्ये दाखल करण्याचा प्रश्नच उदभवत नाही, तक्रारकर्त्याचे या कथनात जिल्हा ग्राहक आयोगास तथ्य दिसून येते. कारण विमाकृत वाहनास झालेले नुकसान कोणीही पाहिलेले नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने सत्य वस्तुस्थिती लपविली या विरुध्दपक्ष विमा कंपनीचे कथनात जिल्हा ग्राहक आयोगास तथ्य दिसून येत नाही.
07. अभिलेखावरील दाखल विरुध्दपक्ष विमा कंपनीचे विमा पॉलिसी नुसार विमाकृत वाहनाची घोषीत किम्मत (Insured Declared Value (IDV) रुपये-32,341/- दर्शविलेली आहे. तक्रारकर्त्याने विमाकृत वाहन साईराज ऑटोमोबाईल्स भंडारा यांचे कडून दुरुस्त केल्या बाबतचे दिनांक-17.10.2020 रोजीचे बिल दाखल केले, त्यानुसार त्यास विमाकृत वाहनास आलेला खर्च हा रुपये-41,487/- दर्शविलेला आहे. जिल्हा ग्राहक आयोगाचे मते तक्रारकर्त्यास विमाकृत वाहनाचे दुरुस्तीपोटी जो एकूण खर्च रुपये-41,487/- दर्शविलेला आहे तो वाहनाची किम्मत, जुने वाहन इत्यादी बाबी लक्षात घेता जास्तीत जास्त दर्शविल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत विमा पॉलिसी मध्ये विमाकृत वाहनाची जी घोषीत किम्मत (Insured Declared Value (IDV) रुपये-32,341/- दर्शविलेली आहे त्या रकमेच्या 50 टक्के एवढी रक्कम रुपये-16,170/- नुकसान भरपाई म्हणून आणि सदर रकमेवर तक्रारकर्त्याने ऑटोमोबाईल्स यांना बिलाची रक्कम अदा केल्याचा दिनांक-17.10.2020 पासून ते रकमेच्या प्रतयक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.7 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. तसेच विमाकृत वाहनास झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती आणि विरुध्दपक्ष विमा कंपनीने मागणी केलेल्या दस्तऐवजाचा ताळमेळ कुठेही बसत नाही, यावरुन विरुध्दपक्ष विमा कंपनीला विमा दावा देण्याची ईच्छा नाही असेच दिसून येते. विरुध्दपक्ष विमा कंपनीने सबळ कारण नसताना विनाकारण तक्रारकर्त्याचा विमा दावा आज पर्यंत रोखून ठेऊन त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते त्यामुळे तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-7000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/- अशा नुकसान भरपाईच्या रकमा मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
08. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येतो-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्ता श्री हिरालाल किसनजी गजभिये यांची तक्रार विरुध्दपक्ष बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेउ, नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेउ, नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला विमाकृत मोटर सायकल नोंदणी क्रं-MH-36/AC-0427 ला झालेल्या नुकसानीची रक्कम रुपये-16,170/- (अक्षरी रुपये सोळा हजार एकशे सत्तर फक्त) अदा करावी आणि सदर रकमेवर तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्तीचे बिलाची रक्कम अदा केल्याचा दिनांक-17.10.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.7 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्याला दयावे.
- विरुध्दपक्ष बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेउ, नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-7000/- (अक्षरी रुपये सात हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अशा नुकसान भरपाईच्या रकमा तक्रारकर्त्याला दयाव्यात.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेउ, नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक यांनी प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्यात.